आर्थिक वर्षांची शेवटची तिमाही आली की स्मार्टफोन कंपन्यांमध्ये नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी चढाओढ लागते. सध्या जगभरात करोना विषाणूच्या भीतीने अर्थव्यवस्थेला झळ बसू लागली आहे. अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन सादरीकरणाचे कार्यक्रमही स्थगित करावे लागले आहेत. मात्र, असे असले तरी, गेल्या तीन महिन्यांत बाजारात आलेल्या आणि नजीकच्या काळात येऊ घातलेल्या काही स्मार्टफोननी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शाओमि एमआय १० प्रो

‘शाओमि’ या कंपनीचे स्मार्टफोन भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. या कंपनीचा नवीन स्मार्टफोन ऑनलाइन विक्रीस उपलब्ध होताच, त्यावर ग्राहकांच्या उडय़ा पडतात. त्यामुळे कंपनीही ठरावीक कालावधीत भारतात नवनवीन स्मार्टफोन आणत असते. ‘शाओमि एमआय १० प्रो’ हा तब्बल १०८ मेगापिक्सेल क्षमतेचे चार कॅमेरे असलेला फोन आहे. हा फोन येत्या काही दिवसांत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, करोना विषाणूमुळे त्याच्या आगमनास विलंब होत आहे.

ठळक वैशिष्टय़े : ६.६७ इंच आकाराची स्क््रीन, १०८+८+१२+२० मेगापिक्सेलचा कॅमेरा, आठ जीबी रॅम, ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी, क्वालकॉम स्नॅपड्रगन ८६५ प्रोसेसर

किंमत : ५११५० रुपये (अंदाजे)

सॅमसंग गॅलक्सी एस१० व एस१० प्लस

सॅमसंगच्या या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्टय़ त्याचा ‘अमोल्ड डिस्प्ले’ आहे. आकर्षक रंगप्रकटन, बारीक रंगछटांचे दर्शन यांमुळे हा फोन पाहण्यास आकर्षित वाटतो. शिवाय यात डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही पुरवण्यात आला आहे. यातील तीन कॅमेरे उत्तम छायाचित्रणासाठी उपयुक्त आहेत.

ठळक वैशिष्टय़े : आठ/१२ जीबी रॅम, ६.१/६.४ इंच आकाराची स्क्रीन, १२+१२+१६ मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा, १२८ ते एक टीबीपर्यंतची स्टोअरेज

किंमत : ६९९०० रुपये.

रिअलमी ६

रिअलमी ६ आणि ६ प्रो या दोन स्मार्टफोननिशी या कंपनीने भारतीय बाजारात अन्य स्मार्टफोनना तगडे आव्हान उभे केले आहे. या फोनचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये मागील बाजूस चार कॅमेरे पुरवण्यात आले आहेत. यात चार जीबी, सहा जीबी आणि आठ जीबी असे तीन रॅमचे पर्याय असून ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोअरेज सुविधा आहे.

ठळक वैशिष्टय़े: अँड्रॉइड दहा ऑपरेटिंग सिस्टिम, ६.५ इंच आकाराचा फूल एचडी प्लस डिस्प्ले, कॉर्निग गोरिला ग्लास ३, ऑक्टाकोअर मीडियाटेक हेलिओ एसओसी, मागील बाजूस ६४ मेगापिक्सेलचा कॅमेरा व त्याला ८+२+२ मेगापिक्सेल कॅमेऱ्यांची जोड, पुढील बाजूस १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा, ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी.

किंमत: १२९९९ ते १५९९९ रुपये.

ओप्पो रेनो ३

ओप्पो रेनो ३ हा याच महिन्यात बाजारात दाखल झालेला स्मार्टफोन असून तो अँड्रॉइड दहा या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत आहे. मागील बाजूस चार आणि पुढील बाजूस दोन कॅमेरे असलेल्या या फोनच्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या छायाचित्रांचा दर्जा उत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे. मागील बाजूस असलेला मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सेलचा असून त्याला १३+८+२ मेगापिक्सेल कॅमेऱ्यांची जोड देण्यात आली आहे. यातील डिस्प्ले ६.४ इंच आकाराचा असून तो स्मार्टफोनचा दर्शनी भाग पूर्णपणे व्यापून टाकतो.  याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या फोनची बॅटरी अवघ्या ६० मिनिटांत पूर्णपणे चार्ज करता येते.

ठळक वैशिष्टय़े : ४०२५ एमएएच क्षमतेची बॅटरी, गोरीला ग्लास, ऑक्टा कोअर मीडिया टेक प्रोसेसर, आठ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोअरेज, पुढील बाजूस ४४+२ मेगापिक्सेलचे कॅमेरा.

किंमत : २९९९०  रुपये.

विवो नेक्स ३एस ५जी

विवो कंपनीने गेल्या वर्षी बाजारात आणलेल्या ‘नेक्ट ३एस’ या स्मार्टफोनची ही ‘५जी’ आवृत्ती आहे. हा स्मार्टफोन प्रथमदर्शनी आपल्या आधीच्याच आवृत्तीसारखा असला तरी, त्यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा दिसून येतात. स्नॅपड्रॅगन ८६५ चिप, अधिक प्रभावी रॅम, अधिक वेगवान स्टोअरेज आणि ‘५जी’ युक्त असा हा स्मार्टफोन आहे. अँड्रॉइड १० आणि विवोच्या फनटच ओएस १०वर आधारित या फोनमध्ये ६.८९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

ठळक वैशिष्टय़े: ६.८९ इंच आकाराची स्क्रीन, १२ जीबीपर्यंतची रॅममर्यादा, मागील बाजूस तीन कॅमेरे, २५६ जीबी स्टोअरेज, ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी, ब्लूटुथ ५.१.

किंमत : ५०००० रुपये (अंदाजे)