12 November 2019

News Flash

योग : एक आकलन

योग हे केवळ प्राणायाम किंवा आसन किंवा ध्यान शिकण्याचे तंत्र नसून की जीवनपद्धती आहे

डॉ. आशीष फडके, आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ

नुकताच देशभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. योग म्हणजे आसने असाच समज आपल्याकडे झाला आहे. योग म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊया..

योग हा संस्कृत शब्द युज या धातूपासून तयार झाला आहे. युज या शब्दाचे तीन अर्थ शास्त्रग्रंथामध्ये सांगितले आहेत. यापैकी एक लोकप्रिय अर्थ म्हणजे जोडणे. योगाच्या संदर्भात आत्मा व परमात्माचे मीलन, शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्रीकरण किंवा शरीरस्थ पेशी, चेतासंस्था यांचा समन्वय असे अनेक अर्थ आहेत.

ज्या पतंजली मुनींनी योग सूत्राची निर्मिती केली वा योगदर्शन लिहिले, संकलित केले त्या योगसूत्रावरील भाष्यामध्ये भाष्यकार व्यासमुनींनी स्पष्ट लिहिले आहे की पंतजलींना अपेक्षित योग शब्दाचे मूळ ‘युज’. याचा अर्थ ‘समाधि युज समाधौ’(साधकाला समाधी अवस्थेकडे घेऊन जाणारा) असा जाणावा.

त्याच प्रमाणे कठोपनिषदांमध्ये युज म्हणजे पंचज्ञानेंद्रियांचे संयमन करणारा ‘युज संयमने’ असा सांगितला आहे.

आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सहा दर्शने वैदिक वा सेश्वर मानली आहेत. म्हणजे जी वेदांना प्रमाण मानतात. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा जे वेदान्त नावाने अधिक प्रचलित आहे.

दर्शन हा शब्दही दश् म्हणजे बघणे किंवा पाहणे या अर्थी योजला आहे. इथे दर्शन हे जीवनाकडे किंवा जीवनाला जाणण्याचा एक दृष्टिकोन, जीवन जगण्याची पद्धती असा आहे.

योग हे केवळ प्राणायाम किंवा आसन किंवा ध्यान शिकण्याचे तंत्र नसून की जीवनपद्धती आहे. त्याचा मूळ उद्देश योग शिकणाऱ्या व्यक्तीला कैवल्यप्राप्ती व्हावी असा आहे. कैवल्य हा शब्द ‘केवल’ ‘एकटा’ या शब्दापासून जाणला पाहिजे. साधकाला योगसाधना करत असताना मी म्हणजे माझे दृश्य स्वरूप नसून माझ्यामधले जे चेतना तत्त्व आहे हे जाणले पाहिजे. याच कैवल्याला वेदान्तमध्ये मोक्ष आणि गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये याला ‘निर्वाण’ संज्ञेने ओळखतात. कैवल्यावस्था किंवा मोक्षावस्था किंवा निर्वाणावस्था या वेगवेगळ्या संकल्पनेचा प्रवास एकाच दिशेने होतो.

पतंजली योगाच्या संदर्भात सांगायचे झाले तर त्यांनी ही अवस्था प्राप्त करण्यासाठी सूत्रबद्ध व अतिशय टप्प्यानुटप्पे, काटेकोरपणे, नियमबद्ध अष्टांग योगशास्त्राची रचना केली.

* यम (सामाजिक पातळीवर सांगितलेले नियम)

अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य, अपरिग्रह (अनावश्यक संचय न करणे) असे ५ यम सांगितले आहेत.

* नियम (वैयक्तिक पातळीवरील नियम)

हे पाच उपप्रकारामध्ये विभागले आहेत. शौच (शरीर आणि मनाची स्वच्छता), संतोष (मिळालेल्या गोष्टीमध्ये समाधान व आनंद मानण्याची वृत्ती), तप (खडतर अभ्यास, साधना), स्वाध्याय (योग साधकाने यौगिक शास्त्राचे केवळ अध्ययनच नव्हे तर त्यावर चिंतन-मनन करणे अपेक्षित आहे), ईश्वर प्रणिधान (सर्वोच्च शक्तिप्रति किंवा ईश्वराप्रति संपूर्ण समपर्ण आणि आराधना)

यम आणि नियम दोन्ही सार्वभौम देश, काळ अशा सर्व बाबतीत लागू होणारे आहेत. यांच्या निष्ठापूर्वक पालनाने अष्टांग योगातील साधनेमध्ये साधकांची नैतिक बैठक तयार होते आणि तो

पुढील पायऱ्यांसाठी तयार होतो.

* आसन (यालाच सध्या अधिक महत्त्व दिले जात आहे)

लोणावळ्याच्या कैवल्यधाम योग संस्थेचे संस्थापक स्वामी कुवळ्यानंद आणि विद्यानिकेतन मुंबईचे संस्थापक पद्मश्री योगाचार्य सदाशिवराव निंबाळकर यांच्या नुसार आसने ही केवळ देहाने आणि शरीराने करण्याचा एक प्रकारचा व्यायाम प्रकार नसून की मनोदैहिक संरचना आहेत. पतंजलीच्या व्याख्येनुसार, ज्या अवस्थेत आपल्या शरीराला व मनाला स्थिर व सुखकर वाटते, ज्यामध्ये आपण दीर्घकाळ बसू शकतो अशा अवस्थेला आसन असे म्हणतात. (स्थिर सुखम् आसनम्)

आसनांचे प्रामुख्याने दोन प्रकार योग मानतो.

१. ध्यान करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आसने

जसे सुखासन, स्वस्तिकासन, अर्धपद्मासन, पद्मासन, सिद्धासन या आसनांत पाया ही दीर्घ असल्याने वर डोक्याकडील भागाकडे निमुळते टोक होते. त्यामुळे या आसनाचा आकृतिबंध त्रिकोणाकार दिसतो.

२. अन्य आसने –

* झोपून करावयाची आसने- उदा. शवासन, पवनमुक्तासन, हलासन इत्यादी.

*  बसून करण्याची आसने- पद्मासन योगमुद्रा, पश्चिमतानासन, गोमुखासन, भद्रासन इत्यादी.

*  उभे राहून करण्याची आसने- हस्तपादासन, ताडासन, वृक्षासन

* सध्याच्या काळात अनेकानेक आसने वेगवेगळ्या विकारांवर एकल पद्धतीने किंवा एकत्रितपणे आसनांचा संच ठरावीक क्रमावारीमध्ये वापरण्याची उदाहरणे आढळतात.

योगाची व्याख्या करताना चित्ताच्या वृत्तीचा (मनात उसळणाऱ्या अनेकानेक विचार प्रक्रियांना) निरोध करणे (शांत किंवा कमी करणे) असे पतंजली योग सूत्र सांगते. जर एखाद्या तलावाच्या पाण्यामध्ये तरंग आहेत तर त्याचा तळ पाहू शकत नाही. परंतु जर ते पाणी शांत असेल तर त्याचा सुंदर तळही स्पष्टपणे पाहू शकतो. हेच सूत्र मनाबाबतही लागू होते. मन जर अनेक विचारांनी ग्रस्त असेल तर कोणते निर्णय घ्यायचे आहेत ते उमगत नाही. मात्र योग साधनेने या मनाला शांत, स्थिर, निरभ्र करणे शक्य आहे. शांत मनाने काम केल्याने बऱ्याचदा आपली सुप्त प्रतिभा, अन्तर्प्रज्ञा जागी होते.

पण हे कसे साधायचे? ‘अभ्यास’ आणि ‘वैराग्य’ या दोहोंच्या मदतीने साधता येते. ज्या प्राणायामच्या साहाय्याने जेव्हा आपण वायुचे नियमन करतो तेव्हा आपण मनाचे ही नियमन करू शकतो.

प्राणायाम –

प्राणायाममध्ये साधक आपल्या श्वास घेणे व सोडणे या प्रक्रियेमध्ये एक प्रकारचे लयबद्ध व नियमबद्ध परिवर्तन घडवितो. यामध्ये श्वास नाकपुडय़ांमधून आत घेण्याच्या क्रियेला पूरक, श्वास बाहेर सोडणे याला रेचक असे म्हणतात, तर श्वास शरीराच्या आत रोखून ठेवण्याला अन्तर्कुम्भक आणि शरीराच्या बाहेर रोखून ठेवण्याचा प्रक्रियेस बहिर्कुम्भक असे संबोधतात. सर्वसाधारण नियमांनुसार, साधकाने श्वास आत घेण्याच्या दुप्पट वेळेत श्वास शरीराबाहेर सोडणे अभिप्रेत आहे. कुम्भक मार्ग पूरकाच्या चौपट पटीमध्ये आत वा बाहेर ठेवला जावा असे शास्त्र सांगते.

प्राणायाम करताना हे लक्षात ठेवा

प्राणायाम हे गर्दीच्या ठिकाणी, चालत्या ट्रेनमध्ये करणे चुकीचे आहे. भरल्या पोटी प्राणायाम करू नये. पोट साफ नसताना, बद्धकोष्ठ असल्यास प्राणायाम करणे टाळावे. पूरक आणि रेचकाचे प्रमाण एकास दोन असे असावे.

* प्रत्याहार

पंचज्ञानेद्रियांचा आहार डोळ्यांनी बघणे, कानांनी ऐकणे, नाकाने श्वास घेणे, जिभेने चव घेणे आणि त्वचेने स्पर्श करणे या नित्यनेमाच्या  गोष्टी काही काळ्यापुरत्या थांबवून आपल्या चित्ताला यापासून विलग करून अंतर्मुख करवणे याला प्रक्रियेस प्रत्याहार म्हणतात. वरील योगांना बहिरंग योग म्हणतात.

अंतरंग योगाबद्दल पुढील भागात माहिती घेऊया

 

First Published on June 25, 2019 5:04 am

Web Title: yoga assessment information about yoga zws 70