चिन्मय पाटणकर

आर्थिक महासत्ता होण्याच्या नादात माणूस, निसर्ग आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यामुळे निसर्ग, वन्यजीवांच्या रक्षणासाठी अनेकदा व्यवस्थेविरोधात लढा द्यावा लागतो. या संघर्षांत तरुणाईचा सक्रिय सहभाग आहे का, याचा जागतिक वन्यजीव संवर्धन दिनानिमित्त घेतलेला धांडोळा..

आरे जंगलामध्ये मेट्रो कारशेड उभारण्याच्या निर्णयाविरोधात तरुणांनी एकत्र येऊन राज्य शासनाला विरोध केला. आरे जंगल वाचवण्यासाठी जवळपास पाच वर्षांमध्ये एक चळवळच उभी राहिली. मात्र, हे चित्र राज्यात किंवा देशात सर्वत्र अभावाने पाहायला मिळतं. त्यामुळे पर्यावरण संवर्धन, वन्यजीव रक्षणासाठी आज तरुणाई कुठे आहे, असा प्रश्न आहे.

आज जगभरात पर्यावरण, वन्यजीवांचा प्रश्न गंभीर झाला आहे. अ‍ॅमेझॉन, ऑस्ट्रेलियात लागलेल्या वणव्यामध्ये जंगलच्या जंगलं नामशेष झाली, वन्यजीवांच्या कित्येक प्रजाती नष्ट झाल्या. आपल्याकडे पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी, वसाहती निर्माण करण्यासाठी  झाडे तोडली जात आहेत. स्वाभाविकपणे त्याचा फटका निसर्गाला बसतो. परिसंस्थेला हानी पोहोचते. वन्यजीव विस्थापित होतात. पर्यावरणवादी, वन्यजीवप्रेमी त्यांच्यापरीने या विरोधात उभे राहत आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयातली ग्रेटा थनबर्ग ही स्वीडिश मुलगी आज पर्यावरण रक्षणासाठी आवाज उठवते आहे.जगभरातल्या राजकारण्यांना ग्रेटानं ‘तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंत,’ अशा शब्दांत फटकारलं. पण या सगळ्यात प्रश्न आहे, की आपल्याकडचे महाविद्यालयीन तरुण कुठे आहेत, तरुणांमधील ऊर्जा पर्यावरण रक्षण, वन्यजीव संवर्धनासाठी वापरली जाते को, ते त्यांच्या पद्धतीने काही चळवळ, जनजागृती करतात का.. तर दुर्दैवानं त्याचं उत्तर नाही असं येतं. पर्यावरण, वन्यजीवांसाठी ज्या प्रमाणात तरुणांनी पुढे यायला हवं आहे, ज्या प्रमाणात जनजागृती व्हायला हवी आहे, तितक्या प्रमाणात होत नसल्याचं या क्षेत्रात काम करणाऱ्यांना वाटतं. पर्यावरण, वन्यजीवांचे प्रश्न सर्वसामान्यांपर्यंत आणि व्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी तरुणांचा या क्षेत्रात सक्रिय सहभाग हवा आहे. व्यापक चळवळ, व्यापक प्रयत्न निर्माण करण्याची गरज आहे.

‘छायाचित्रणाच्याच्या माध्यमातून तरुण आता वन्यजीवनाकडे आकर्षित झाले आहेत. त्यात चांगल्या पद्धतीनं काम केलं जात आहे. काही वन्यजीवांवर संशोधन करत आहेत. मात्र काही प्रमाणात हे काम व्हर्च्युअल स्वरूपातच राहत आहे. वन्यजीवांच्या संवर्धधनासाठी सक्रिय प्रयत्न होण्याची गरज. आज त्याची नितांत गरज आहे. जे प्रयत्न होतात ते तुटपुंजे आहेत. अर्थात त्यासाठी केवळ आंदोलनं हाच मार्ग आहे, असंही नाही. वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणं हाही महत्त्वाचाच भाग आहे. निसर्गात चुकीचा हस्तक्षेप, वन्यजीवांची शिकार होते तेव्हा समाजमाध्यमांमध्येच प्रतिक्रिया उमटतात ही शोकांतिका आहे. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी तरुणाई एकवटली, तर वन्यजीवांची वाताहत थांबेल. जी आंदोलने होतात, त्यात शाश्वतता, पाठपुरावा दिसत नाही. व्यापक स्तरावर जागरूकता निर्माण करण्यासाठी, वन्यजीवांच्या लढाईला तरुणांनी बळ दिलं पाहिजे. तरुणांमध्ये जी ऊर्जा आहे, त्याला दिशा मिळण्याचीही गरज आहे. तरुणांशिवाय वन्यजीवन संवर्धनाला तरणोपाय नाही,’ असं पुण्यातील पर्यावरण अभ्यासक सचिन पुणेकर यांना वाटतं.

ठाण्याची गार्गी गीध फुलपाखरांची अभ्यासक आहे. पर्यावरण किंवा वन्यजीवांना वाचवण्यासाठी तरुण लढत आहेत. जागतिक ग्रेटा थनबर्गची लढाई तरुणांच्या बळावरच सुरू आहे, असं गार्गी सांगते. ‘पर्यावरण, वन्यजीवांसंदर्भातील लढय़ासाठी वेळ द्यावा लागतो. वन्यजीवांसाठीच्या लढाईत टिकून राहाणं कठीण आहे. पूर्वीच्या काळात लढा वेगळ्या पद्धतीचा आता तो लढा उघड झालाय. उद्योग, वाळू माफिया, कंपन्यांविरोधात तग धरणं कठीण झालं आहे. तळमळीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. अगदी जीवालाही धोका असतो. काही वेळा धार्मिक भावना दुखावतात. आज तरुण लढतायत, मात्र त्याला पुरेसा प्रतिसाद नाही. जे काम करतात ते तळमळीने करतायत. मात्र, त्यांची संख्या कमी आहे, वाढत आहे. पर्यावरण किंवा वन्यजीवांसंदर्भात प्रश्न नीट समजून घेतल्याशिवाय ते सोडवणं शक्य होत नाही. मात्र, तरुणांची समजून घेण्याची क्षमता संपली आहे का असाही प्रश्न पडतो. त्यामुळेच पर्यावरण, वन्यजीवनाविषयी मोठय़ा प्रमाणात जागरूकता वाढवण्याची गरज आहे. पर्यावरणाचे, वन्यजीवनाचे अनेक प्रश्न अजून कळलेले नाहीत. खरंतर आपणच निसर्गावर अवलंबून आहोत, त्यामुळे निसर्गाला वाचवण्याची क्षमता आपल्याकडे नाही. त्यामुळे किमान स्वत:ला वाचवण्यासाठी व्यापक चळवळीची गरज आहे. येत्या काळात हळूहळू तरुण वन्यजीव, पर्यावरण वाचवण्यासाठी जोडले जातील, अशी आशा आहे,’ असं गार्गीनं सांगितलं.

किरण घाडगे बऱ्याच वर्षांपासून वन्यजीव छायाचित्रकार म्हणून काम करत आहे. ‘आजच्या काळात कॅमेरा आणि संबंधित साहित्य सहज उपलब्ध होतं. डिजिटल क्रांती झाल्यानंतर कॅमेरा आणि छायाचित्रण प्रत्येकासाठी सुलभ झालं आहे. मात्र, वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात जितके तरुण काम करतात, तितके वन्यजीव रक्षणामध्ये किंवा जनजागृतीमध्ये दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अर्थात प्रत्येक जण आंदोलन करू शकत नाही, किंवा चळवळीत येत नाहीत म्हणून दोष त्यांना दोष द्यायचा नाहीये. पण वन्यजीव छायाचित्रणाच्या बाबतीतला दृष्टिकोन गेल्या काही बदलल्याचं जाणवतं. म्हणजे असं, की समाजमाध्यमांमध्ये छायाचित्रांना जास्त लाइक्स मिळवण्यासाठी छायाचित्र काढणे, तुझ्यापेक्षा चांगलं छायाचित्र काढलं अशा प्रकारची स्पर्धा निर्माण झाली आहे. ती योग्य नाही. वन्यजीव छायाचित्रण ही सुद्धा एकप्रकारे चळवळ किंवा वन्यजीव संवर्धन, निसर्ग संवर्धनासाठीचं महत्त्वाचं माध्यम आहे. निसर्गात होत असलेला मानवी हस्तक्षेप दाखवण्यासाठी, गैरप्रकार समोर आणण्यासाठी छायाचित्रण उपयुक्त ठरू शकतं, या दृष्टीनं त्याकडे पाहायला हवं. सर्वसामान्यांमध्ये पर्यावरण, वन्यजीवनाविषयी जागृती करण्यासाठी छायाचित्रण हे महत्त्वाचं माध्यम आहे,’ असं किरण सांगतो. सागर सुरवसे सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर विद्यापीठात प्राध्यापक आहे. त्याशिवाय तो सर्पमित्र, पक्षिमित्र म्हणून काम करतो. ‘आपल्याकडची तरुणाई समाजमाध्यमात व्यग्र आहे. अर्थात सगळेच तसे आहेत असं नाही. कित्येक तरुण पर्यावरण-वन्यजीव संवर्धनासाठी काम करत आहेत. कित्येक तरुण नोकरी सांभाळून पर्यावरणासाठी काम करतात. पक्षिगणनेत तरुणांचा सहभाग असतो. मात्र, निसर्ग चळवळीत तरुणांचा सहभाग वाढणं गरजेचं आहे,’ असं सागरला वाटतं.