भक्ती परब

रोजच्या धावपळीच्या लयीत टाकलेल्या प्रत्येक पावलाला फिल्मी संगीताने रेडिओतून ताल दिला. त्या ठेक्यावर आधी डोलायला लावलं मग गुणगुणायलाही लावलं. फिल्मी संगीत विविध माध्यमांतून पटकन आपल्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे त्याचं रुजणं तसं साहजिकच पण इतरही संगीतप्रकार आहेत. विविध भाषिक गाणी आहेत. परदेशी रॉक बॅण्डचंही संगीत आहे. शास्त्रीय संगीत आहे. त्यात विविध घराणी आहेत. गाणं शिकणं ते गाणं, गुणगुणणं, सादर करणं, गाण्याची आवड जपणं हे प्रत्येक नव्या पिढीत असतं. यात गाणं ऐकणाराही सुजाण वर्ग असतोच. दूरचित्रवाणीवर होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे तर संगीत शिकणारे तरुण किती आहेत, हे समजून घेता येते. गाणं हे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मानसिक अवस्थेनुसार भावतं. त्याच्या जगण्याच्या लयीत साथ देणारं गाणं त्याच्या प्लेलिस्टमध्ये कायमस्वरूपी ठेवण्यात येते. म्हणूनच तरुणांच्या प्ले लिस्टमध्ये कोणती गाणी आहेत, त्यांना कुठली गाणी आवडतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तरुणांनी उत्स्फूर्तपणे त्यांची ‘प्ले लिस्ट’ आमच्याबरोबर शेअर केली.

अवघा रंग एक झाला ते रिअल फ्रेंड्स, थंडरक्लाऊड्स..

लेखन, अभिनय आणि दिग्दर्शनात रमणारा सिद्धेश शेलार म्हणतो, ‘मन सुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची’, ‘आया है राजा’ (अप्पू राजा), ‘बस इतना सा ख्वाब है’ (येस बॉस), कुमार गंधर्वाचे ‘युगन युगन हम जोगीड’, ‘अवघा रंग एक झाला’ (किशोरीताई आमोणकर), ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ (भीमसेन) आणि ‘दिल तो बच्चा है जी’ (इश्किया) ही गाणी मला अतिशय आवडतात. कलाकार मनाचा असल्याने प्रेरणा देणारं संगीत त्याला नेहमी आपलंसं वाटतं. त्यामुळे तशी गाणी त्याच्या प्ले लिस्टमध्ये अधिक असतात. तर धीरज भोळेने ‘गर्ल्स लाईक यू’ (मारुन), ‘हॅप्पीअर’ (मार्शेलो अ‍ॅण्ड बस्टाईल), ‘रिअल फ्रेंड्स’, ‘साइड इफेक्ट्स’, ‘थंडरक्लाऊड्स’ ही गाणी त्याला आवडतात. समाजमाध्यमांमुळे जगभरातील संगीत पटकन आपल्यापर्यंत पोहोचते तो बॅण्ड कुठला आहे, गायक कोण, त्यांचे सादरीकरण कसे असते, अशा गोष्टी कळतात. त्यामुळे बॅण्डचे संगीत तरुणांकडून आत्मसात केले जाते.

बहुविध संगीताची  जादूच न्यारी..

अभिनेता जयेश शेवाळकरला विविध भाषिक संगीत जास्त आवडते, हे त्याची गाण्यांची प्ले लिस्ट सांगते. ‘आ चल के तुझे मै लेके चलूं इक ऐसे गगन के तले’, ‘शाह का रुतबा’ (अग्निपथ), ‘तोच चंद्रमा नभात’, ‘अनबे शिवम’ (तमिळ), ‘फॅशन’ (पंजाबी), ‘सुभान अल्लाह’ (उस्ताद हॉटेल, मल्याळम), ‘हिअर आय एम’ (ब्रायन अ‍ॅडम्स) ही जयेशची अतिशय आवडती गाणी आहेत असे तो म्हणाला. अभिनय क्षेत्रात असल्यामुळे देशातील विविधभाषिक गोष्टी त्याला भावतात. साहजिकच संगीतही त्याला तितकंच आवडतं. त्यामुळे त्याच्या प्ले लिस्ट विविध भाषिक गाणी सहज सामावून जातात.

सर्व काही रॉक बँड..

माध्यमात काम करणारी ऐश्वर्या सहस्रबुद्धे हिला रॉक म्युझिक आवडते. ‘कोल्ड प्ले’ (रॉ बॅण्ड), ‘इमॅजिन ड्रॅगन्स’ (रॉक बॅण्ड), ‘आर्टिक मंकीज’ (रॉक बॅण्ड), ‘रेड हॉट चिली पेपर्स’ (रॉक बॅण्ड) हे तिचे आवडते रॉक बॅण्ड असल्याचे तिने सांगितले. टेलर स्वीफ्ट ही अमेरिकन गायिकाही तिला आवडते असे ती म्हणाली.

लेखक दिव्यांक वैद्यला हिंदी चित्रपटातील गाणी विशेष आवडतात. ‘जिंदगी एक सफर, है सुहाना’, ‘समा है सुहाना’, ‘मेरे निशान’ यांसारखी त्याची आवडती गाणी आहेत. हिंदी चित्रपट संगीतातील जुनी गाणी आणि नवी गाणी आवडणारा तरुणवर्ग आहे तसा रॉक संगीत आवडणारा वेगळा तरुणवर्ग आहे.

मी मूळ कोकणातील राजापूर गावातून संगीतात करिअर करण्यासाठी रत्नागिरी आणि त्यानंतर मुंबईत आले. माझे गुरू पं. अरुण कशाळकर आणि मुग्धा सामंत यांच्या मार्गदर्शनातून गायन विषय घेऊन एम.ए. आणि आता पीएच.डी. करत आहे. संपदा जोगळेकर-कुळकर्णी या प्रतिभावान दिग्दर्शिकेच्या मार्गदर्शनाखाली ‘सं. मत्स्यगंधा’ आणि आता ‘चि.सौ.कां. रंगभूमी’ ही व्यावसायिक नाटकंही करत आहे. आजच्या काळात कलाकार म्हणून स्वत:चं कौशल्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि त्यासाठी शक्य त्या माध्यमांचा जरूर उपयोग करावा. पण आत्ताच्या फास्ट लाइफमध्ये जेवढय़ा लगेच आपण चमकू शकतो तेवढय़ाच गतीने गायब होण्याचीही भीती असते.

– केतकी चैतन्य, गायिका

झी मराठी सारेगमपचा विजेता झाल्यानंतर मला विविध संगीत कार्यक्रमांसाठी विचारणा होऊ  लागल्या. या कार्यक्रमात गाणी सादर करताना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी शास्त्रीय संगीत शिकलेलो असल्यामुळे हिंदी मराठी चित्रपटगीते किंवा उडत्या चालीची गाणी गाणं हे करून पाहता आलं. त्यानंतर गाण्यांच्या कार्यक्रमांच्या टूर मी केल्या. खास करून तानपुरा लावून गाणं मला आवडतं. ते सुख वेगळंच आहे. माझा आवाज कोमल (सॉफ्ट) असल्यामुळे मला भावगीतं, रोमँटिक फिल्मी गीतं वगैरे गायला सांगितलं जातं. गाण्यांच्या कार्यक्रमात सादरीकरणावेळी इतर माझ्या समवयस्क गायकांकडूनही छान प्रोत्साहन मिळतं. युटय़ूबसारखी माध्यमं आल्यामुळे जो तो आपलं चॅनल सुरू करून गात सुटला आहे. पण मला तसं करायचं नाही.

– नचिकेत लेले, गायक