सध्याची तरुण पिढी साहित्यापासून दूर गेलीय.. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या जाळय़ात गुरफटली गेलीय.. अशी वाक्यं अलीकडे अनेकदा कानी पडत असतात. पण हे १०० टक्के खरं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण सोशल मीडियापासून, ब्लॉगिंगपर्यंत आणि ई-बुकपासून बाजारात येणाऱ्या नवनवीन कादंबऱ्यांपर्यंत अनेक ठिकाणी तरुण वर्ग लिहिता झालेला दिसतो. त्याचप्रमाणे डिजिटल साहित्य वाचणारा तरुणवर्गही मोठा आहे. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तरुणाईचा साहित्याकडे कल कसा आहे, याची चाचपणी करण्याचा हा प्रयत्न.

सोशल मीडियाने साऱ्यांनाच एक लेखनऊर्जा मिळवून दिली आहे. आपल्याला वाटेल त्या विषयावर, हव्या त्या शब्दांत व्यक्त होण्याची संधी देणारं हे व्यासपीठ तरुणवर्गाला साहित्याकडे नेणारं मुक्तद्वार ठरू लागलं आहे. गेल्या काही वर्षांत विशी-पंचविशीतील तरुण केवळ लेखक म्हणून उदयास आलेले नाहीत तर, यातील अनेकजण आज भारतातील ‘बेस्टसेलर’ पुस्तकांचे निर्माते आहेत. त्यामुळेच की काय, लिहिते होण्याकडे तरुणवर्गाचा ओढा वाढत आहे. ‘डिजिटल लेखक’ नावाचा नवा वर्ग सध्या विस्तारत चालला आहे. हा तरुण वर्ग त्याला हव्या त्या विषयावर लिहितो, हवी तशी कथा/कादंबरी रचतो. पण हे लिखाण पुस्तकरूपात प्रकाशित होण्यासाठी प्रकाशकांची वाट पाहात बसत नाही. इंटरनेटच्या माध्यमातून तो आपलं लिखाण अवघ्या जगासमोर मांडतो. तरुणाईचं साहित्यप्रेम कमी झालेलं नाही, तर साहित्याशी जवळीक साधण्याचं माध्यम बदललंय, असंच अनेकांचं म्हणणं आहे.

‘तरुणाईची गाडी वेगाने साहित्याकडे वळत आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांत तरुणांची संख्या वर्षांनुवर्षे वाढत आहे. मागच्याच वर्षी या कार्यक्रमांना लाभलेले ६० टक्के प्रेक्षक हे १८ ते २५ वयोगटातील होते,’ असं जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचे सहआयोजक सुजॉय रॉय सांगतात. ‘तरुण एका ताकदीने आमच्या फेस्टिव्हलला येतात. आम्हाला इतका तरुणांचा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं; परंतु या तरुणांची साहित्याकडे वळण्याची इच्छा जशी आहे त्याहीपेक्षा एका आशेने ते इथे येतात. मोठमोठय़ा लेखकांशी संवाद साधतात, त्यातून जाणवतं की काहीतरी ते शोधतायत व त्यांची उत्तरं त्यांना अशा फेस्टिवलस् व मोठय़ा लेखकांच्या मार्गदर्शनाखालीच मिळतील,’ असे रॉय म्हणाले.

तरुणांना डिजिटली लिहून व्यक्त होण्यापलीकडे आपले विचार छापील स्वरूपात मांडायचे असतात. यावर मेहता पब्लिकेशनच्या योजना यादव सांगतात,‘तरुण मुलं आमच्याकडे कथा लिहिण्यापेक्षा कविता तसेच भयकथांच्या माध्यमातून लिखाण करतात. वास्तविक तरुणांकडून भयकथा लिहिणं म्हणजे थोडं चमत्कारिक वाटेल. परंतु त्यातून त्यांना तरुण वाचकांचीच पसंती मिळतेय, याचे सर्व श्रेय त्यांनाच जातं.’ अर्थात, एखादी कादंबरी लिहिण्यामागे लागणारा वेळ, तिची मांडणी या गोष्टी या तरुण लेखकांसाठी आव्हानात्मक आहेत, असंही यादव सांगतात.

एखादी कादंबरी चित्रपटरूपात आली की, तिला तरुणवर्ग चांगली पसंती देतो. ‘द लास्ट मुघल’ या कादंबरीचे लेखक विल्यम डॅलरीम्पल यांच्या म्हणण्यानुसार, तरुणवर्ग आत्मकथापर साहित्य अधिक वाचतो. ‘मी एक स्वत: इतिहासकार आहे. जेव्हा एखादं पुस्तक काढण्याचा विचार आम्ही करतो, तेव्हा विशिष्ट विषय आमच्या डोक्यात घुटमळत असतो. पण आज असे विषय जिकडे-तिकडे दिसतात. ‘डिजिटली अ‍ॅक्टिव्ह’ असलेला तरुणवर्ग ते हेरतो आणि त्यावर लिहून मोकळा होतो. त्यातही एका विशिष्ट धाटणीचे लिखाण करण्यावर त्यांचा भर असतो. एकाच प्रकारच्या विषयांतर्गत लिखाण करताना त्यांना अनेक मुद्दे मिळत जातात व लिखाण वाढत जाते. यात त्यांना यश मिळतंय,’ असं डॅलरीम्पल म्हणतात.

एकाच धाटणीतल्या वेगवेगळय़ा कथा मांडणाऱ्या लेखकांना सध्या चांगली पसंती मिळत आहे. चेतन भगत, सुदीप नगरकर, अमिष त्रिपाठी यांसारखे तरुणाईच्या समस्या, प्रेमकथा, पुराणकथा अशा विशिष्ट धाटणीच्या विषयांतर्गत लिहिणारे लेखक तरुणवर्गाचे ‘आयकॉन’ आहेत. या लेखकांचे डिजिटल लिखाण वाचणारे तरुण-तरुणी भरपूर आहेत. मात्र, त्यांच्या पुस्तकावरही तरुणवर्गाच्या उडय़ा पडतात. लेखक सुदीप नगरकर याच्या मते, गेल्या दशकभरापासून वाचनाच्या पद्धतीत काही बदल झाले आहेत. ‘आजची तरुण पिढी हातात पुस्तक घेऊन न वाचता तंत्रज्ञानाचा आधार घेऊन वाचन करते. दैनंदिन आयुष्यात झालेल्या बदलांना स्वीकारून ती वाचन करते. त्यामुळे वाचन होतंय, हे महत्त्वाचे. ते कोणत्या माध्यमातून झाले तरी, हरकत नाही,’ असे सुदीप म्हणतो.

डिजिटलायझेशन जसे होत असते तसेच एकंदरीत साहित्य जेव्हा अशा माध्यमातून जाते तेव्हा तरुण पिढी याकडे कशा रीतीने पाहते हे अगदी ठामपणे मांडता येणार नाही. कारण या प्रवाहात सतत बदल होत असतात, असे मत लेखक उत्पल व.बा. यांनी मांडले. ‘जेव्हा मुद्दा सोशल मीडियावरच्या लेखनाचा येतो तेव्हा त्यांना संपूर्ण स्वातंत्र्याचे भान असते. एखादा मुद्दा मांडल्यामुळे मिळणाऱ्या वरच्याखालच्या प्रतिक्रियांचे त्यांना भान असते. सोशल मीडियावरील लेखनाची पावती त्यांना जागच्या जागी मिळते. त्यामुळे पुस्तक काढून वाट पाहण्यापेक्षा सोशल मीडिया हा त्यांना सोपा मार्ग वाटू लागला आहे,’ असं ते म्हणतात.