-मनोज कुमार पंसारी

कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘आर्टिफिशियल इंटिलीजन्स’ हा शब्द गेल्या वर्षभरापासून सातत्याने चर्चेचे केंद्र बनला आहे. कृत्रिम प्रज्ञेची चुणूक गत वर्षांत पाहायला मिळाली असली तरी, नवीन वर्ष हे या तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष वापरानी व्यापलेलं असं असेल.

आपल्या आसपास आपल्याला तंत्रज्ञानातील आधुनिकता कुठे कुठे पाहायला मिळते, याचा विचार करा. भविष्याचा वेध घेणाऱ्या एखाद्या कादंबरीतील पान वाचल्यासारखं तुम्हाला नक्की वाटेल! बघा ना, गाडय़ा आपोआप चालत आहेत, वायरीशिवाय उपकरणे काम करत आहेत, उडणारे ड्रोन कॅमेरे.. अशा अनेक गोष्टी आपल्याला नकळत चकीत करतील. गत वर्षांत तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीची ही काही उदाहरणे आहेत. परंतु, २०१९ हे वर्ष अशा आणि याहून प्रगत अशा तंत्रज्ञानाने भारलेलं असेल. हे वर्ष बाजारपेठेचा चेहरामोहरा बदलून टाकेल आणि तंत्रज्ञान हे शाश्वत आहे, हे सिद्धही करेल.

यावर्षीच्या तंत्रज्ञानातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आर्टिफिशियल इंटिलिजन्स (‘एआय’) अर्थात कृत्रिम प्रज्ञा हा असेल. ‘एआय’ने गेल्या काही वर्षांत बरीच खळबळ माजवली असली तरी यापुढेही या ट्रेंडकडे लक्ष ठेवायला हवं. कारण, आपण कसे जगतो, कसे काम करतो, खेळतो या सगळ्यावर अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच ‘एआय’चा प्रभाव पडणार आहे. भूतकाळात इंटरनेटसोबत जे झाले तेच ‘एआय’चेही होणार आहे. हे तंत्रज्ञान येत्या काळात सर्वत्र पाहायला मिळेल. डिजिटल बदलांच्या पुढच्या टप्प्याला ‘एआय’चीच जोड असणार आहे, हे निश्चित. प्रत्येक क्षेत्रात सखोल शिरून ‘एआय’ विविध कार्यचलनाला साह्य करेल. यामुळे रोजगाराला धक्का पोहोचेल, अशी ओरडही केली जात आहे. मात्र, हे मिथक आहे. ‘एआय’मुळे जितक्या नोकऱ्या जातील, त्याहूनही अधिक रोजगार संधी हे तंत्रज्ञान निर्माण करेल.

वापरकर्ते, ऑटोमेटिंग प्रोसेसमध्ये अधिक व्यक्तिगतपणा आणून आणि आपल्या काम करण्याच्या पद्धतीत बदल घडवत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उद्योग क्षेत्रांच्या संकल्पना नव्याने मांडेल. याचे एक उदाहरण म्हणजे चॅटबॉट्स. तुम्ही माणसाशी बोलताय की रोबोटशी हे तुम्हाला कळूही नये इतक्या सहजतेने तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी हल्लीच्या वेबसाईट या प्रणालीचा वापर करत आहेत. मशिन लर्निंगमुळे काम सहज होत आहे. आजघडीला भारतात अगदी खालच्या पातळीपर्यंत ‘एआय’चा वापर केला जात आहे. मात्र, विकसित देशांच्या तुलनेत आजही आपल्याकडे भविष्यासाठीची सर्वसमावेश ‘एआय’ स्ट्रॅटेजी बनवण्यासाठीचा वेग गाठण्यात आलेला नाही.

आणखी एक प्रभावी तंत्रज्ञान म्हणजे ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी. आपण आजही ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीच्या फार प्राथमिक टप्प्यावर आहोत. क्रिप्टोकरन्सीला चालना देण्यासाठी हे तंत्रज्ञान तयार करण्यात आले होते. मात्र आता भांडवली बाजार, पुरवठादार साखळी, वित्त हस्तांतरण आणि बँकिंग अशा क्षेत्रांमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. भविष्यात काही ठिकाणी आयओटी उपकरणांना अशा एका प्रणालीची गरज लागणार आहे जी त्यांना एकत्र ठेवेल आणि त्यांनी जमवलेल्या माहितीची देवाणघेवाण करेल. ‘ब्लॉक चेन’ याकरिता उपयुक्त ठरणार आहे. स्मार्ट कँाट्रॅक्ट्स आणि कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे याची मागणीही वाढत जाणार आहे. ब्लॉक चेन प्रणाली उभी राहत असताना त्यातून होणारी रोजगारनिर्मिती हा आणखी एक मुद्दा आहेच.

‘ऑगमेंटेंड रीअ‍ॅलिटी’सुद्धा मुख्य प्रवाहात येईल. ‘एआर’ बाजारपेठ अनेक नावीन्यपूर्ण पर्यायांसाठी खुली आहे. वापरकर्त्यांचा अनुभव अधिक नैसर्गिक आणि वैयक्तिक करणे हा सध्याचा नवा ट्रेंड आहे. २०१९मध्ये ‘मोबाइल एआर’ हा स्टार असणार आहे. ‘एआर’चे आणखी एक विस्तारित रूप म्हणजे ‘एक्सआर-एक्स्टेंडेड रीअ‍ॅलिटी’. तंत्रज्ञानाच्या विश्वातील हा नवा कळीचा शब्द असणार आहे. ‘एक्सआर’ उत्पादनांसाठी मनोरंजन हे मुख्य क्षेत्र असेल. हळूहळू बदलणाऱ्या, विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारे आता सर्व व्यवसायांनी क्रांतिकारी पर्याय वापरून ‘एआर’वर आधारित डिजिटल बदल करण्याची हीच योग्य वेळ आहे.

‘डीप लर्निग’चा वेग कायम राहणार आहे. हल्ली ‘डीप लर्निग’मध्ये माहिती गोळा करणे आणि मोजणीतील गुंतागुंतीमुळे काही आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ‘डीप लर्निंग’मधील प्रयोगांचा वेग वाढवण्यासाठी हार्डवेअरमध्ये नावीन्यता आणली जात आहे. यामुळे कार्यचलनातील वैशिष्टय़े विकसित होतील, उत्पादकता वाढेल आणि उत्पादनाची किंमत कमी होईल. लोक आणि पर्यावरणासोबत अधिक स्मार्ट संवाद झाल्याने इंटरनेट ऑफ थिंग्स अधिक बुद्धिमान होईल. गेल्या काही वर्षांपासून आयओटीवर भर दिला जात आहे आणि २०१८ मध्ये सातत्याने गाठलेली वृद्धी आणि विकास यामुळे आता आणखी नवे जागतिक ट्रेण्ड येतील. इंटरनेट ऑफ थिंग्सला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची जोड दिल्याने आपली घरे आणि शहरे अधिक स्मार्ट बनवण्यासाठी नवे अप्रतिम तंत्रज्ञान मिळणार आहे.

थोडक्यात सांगायचे तर, २०१८ सालाने अनेक नवे दृष्टिकोन आणि पर्याय यातून तांत्रिक नावीन्यतेत प्रचंड प्रगती साधली आणि आताही ते उत्क्रांत होतच आहे. अर्थात, रिटेल क्षेत्रावरील या डिजिटल क्रांतीचा परिणाम अजून स्पष्ट व्हायचा आहे. मात्र, असे प्रयोग सुविधा, संधी आणि मार्गदर्शनासह नव्या कल्पना देऊ  करतात, हे नक्की. भविष्यातही अशा प्रकारच्या नावीन्यतेला खतपाणी घातले जाणार आहे. टेक कंपनीज अधिकाधिक नावीन्यपूर्ण होत आहेत आणि इतर क्षेत्रातील कंपन्यांच्या तुलनेत नव्या कल्पनांवर काम करण्यास त्या अधिक उत्सुक आहेत.

(लेखक अ‍ॅस्ट्रम कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)