सुपरबाइक खरेदी करण्याआधी..

भारताला स्पोर्ट्स बाइक किंवा सुपरबाइकच काही नावीन्य राहिलं नाही.

(संग्रहित छायाचित्र)

वैभव भाकरे

भारताला स्पोर्ट्स बाइक किंवा सुपरबाइकच काही नावीन्य राहिलं नाही. हार्ले डेविडसन, इंडियन, एप्रिलिया, डुकाटीसारख्या अनेक मोठय़ा कंपन्या आज देशात आपले पाय रोवू पाहत आहेत. या मोठय़ा शक्तिशाली बाइक विकत घेणे आज भरपूर सोपे झाले आहे. जास्त सीसीच्या दमदार बाइक विकत घेताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा प्रवास नेहमीच आनंदी आणि सुरक्षित राहील.

काही वर्षांपूर्वी बाइक खरेदी करताना केवळ बाइकची किंमत आणि तिचा अ‍ॅवरेज यांचाच विचार व्हायचा पण आता बाजारात परवडणाऱ्या बाइक आणि स्पोर्ट्स बाइक यांची वेगळी बाजारपेठ आहे. आज ४०० सीसी, ५०० सीसी, १२०० सीसी इंजिनची बाइक घेणे फार मोठी कुतूहलाची गोष्ट राहिली नाही. या अवाढव्य बाइक रस्त्यावरून सुसाट पळताना दिसायला आणि ‘ऐकायला’ येऊ  लागल्या आहेत. परंतु या बाइक्स आपल्या सामान्य १५० आणि २०० सीसी बाइक्सहून बऱ्याच वेगळ्या असतात. त्यामुळे अशी बाइक खरेदी करताना काही निकषांचे अत्यंत गंभीरपणे पालन करणे गरजेचे आहे.

परदेशात तुळतुळीत रस्त्यांवर धावणाऱ्या या बाइक्स भारतीय रस्त्यांवर पळवणे जरा जिकिरीचे होऊन जाते. त्यामुळे या बाइक्स चालवताना किंवा विकत घेताना केवळ जास्त सीसी म्हणजे उत्तम बाईक अशी धारणा ठेवू नका. आपण ज्या ठिकाणी राहतो तेथे ही बाइक चालविण्यास किती वाव आहे. हे एकदा पडताळून पाहा.

मोठी बाइक विकत घेताना कुठल्या प्रकारची बाइक घ्यायची आहे ते ठरवा. ही निवड सर्वस्वी तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. भारतीय बाजारात अ‍ॅडव्हेंचर बाइक, क्रुजर बाइक आणि स्पोर्ट्स बाइक हे प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. हिरो एक्स प्लस २००, एस डब्ल्यू एम सुपर डय़ुअल ६००, डुकाटी एक्सआरई ३०० या बाइक मोडतात. तर क्रुजर बाइकमध्ये हर्ले डेव्हिडसन, इंडियन स्काऊट, कावासाकी व्हल्कन या बाइक येतात. तर स्पोर्ट्स बाइकमध्ये सुझुकी हायाबुसा, यामाहा वाय झेड एफ आर १, कावासाकी निन्जा ६५०, ह्योसुंग जी टी आर ६५० या बाइक मोडतात. या बाइकच्या किमती बाइकचा प्रकार आणि त्यांच्या इंजिन क्षमतेवर अवलंबून आहे. ३०० सीसीच्या बाइक्सची किंमत ही दोन लाखांपासून सुरू होते.

धावण्याआधी चालायला शिका

जर तुम्हाला केवळ १५०सीसी आणि २०० सीसीच्या बाइक्सच चालवण्याचा अनुभव असेल तर थेट १००० आणि १२०० सीसीच्या इंजिनच्या बाइक विकत घेण्याकडे झेप घेऊ नका. जसे पहिली पास करून थेट दहावीची परीक्षा देणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या बाइक्स चालविण्यासाठी पुरेसा अनुभव गरजेचा आहे. मोठय़ा बाइक्सचे वजन सामान्य बाइकपेक्षा खूप जास्त असते, त्यामुळे आपल्याला रस्त्यात चालताना कुठली बाइक हाताळता येईल ते पाहा. आपल्या रस्त्यांवर असलेले खड्डे आणि ट्रॅफिकमुळे तुम्हाला अनेक समस्या येऊ  शकतील. २०० सीसीच्या बाइकवरून ५०० सीसी त्यानंतर ८०० सीसी मग १००० सीसी अशा प्रकारे टप्प्याटप्याने प्रत्येक पायरी चढणे गरजेचे आहे. अशामुळे तुम्हाला बाइक योग्यरीत्या हाताळता येईल आणि नियंत्रणात ठेवता येईल. सुरुवात ही २५० सीसीच्या बाइकपासून करा.

या बाइक्समध्ये ट्रक्शन कंट्रोल, ए बी एस, रायडिंग मोड असे पर्याय असतात, परंतु बाइक चालवताना दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.बाजारात चांगल्या हेल्मेट्सचे पर्याय उपलब्ध आहेत. हे हेल्मेट वजनाने हलके असून यात चीन प्रोटेक्टर असते. हेल्मेटच्या मागे रिफ्लेक्टर असतो. पण केवळ हेल्मेट डोक्यावर घालणे पुरेसे नाही. चांगल्या प्रतीचे जॅकेट्स वॉटर प्रूफ पर्यायासह बाजारात मिळतात. हातभर असणारे हे जॅकेट्स अपघाताच्या वेळी कमी मार लागावा किंवा अंगाला कमी खरचटले जावे याची काळजी घेतात. या जॅकेट्सना पुढे आणि मागे मेश असते. खांद्यांसाठी सुरक्षात्मक पॅडिंग असते. अपघातात गुडघ्यांना मार लागण्याचा धोका आहे. बरेच वेळा ही अवजड बाइक पडताना आपला पाय त्याखाली सापडण्याची शक्यता असते. ग्लोव्ह्ज, गुडघ्यांसाठी गार्ड, आणि बूट्स यांचेदेखील बरेच पर्याय बाजारात वेगवेगळ्या किमतीत उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या स्टाइलप्रमाणे या सेफ्टी गियरची निवड करू शकता.

अनुभवी व्यक्तीसोबत असणे गरजेचे आहे

पहिल्यांदा अशा प्रकारची बाइक चालविताना अनुभवी व्यक्तीला सोबत ठेवणे गरजेचे आहे. जे चालक अशा प्रकारच्या बाइक वर्षांनुवर्षे चालवत आहेत. त्यांना या बाइक कशा हाताळण्याचा अनुभव असतो. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या चुका तुम्ही करू नयेत यासाठी ते मार्गदर्शन करू शकतात.

सुरुवात कशी कराल?

* २५० सी सीची बाइक तुम्ही लवकर चालवायला शिकाल. ६०० सी सीची बाइक पहिल्या गियरमध्येच ४० ते ५० ताशी किमीचा वेग गाठते. त्यामुळे अशा प्रकारच्या शक्तिशाली बाइक चालवताना त्या बाइकच्या पूर्ण ताकदीचा अंदाज असणे गरजेचे आहे. वाहनावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी लहान बाइकवर सराव करणे हा एक सोपा पर्याय आहे. एक्सेलरेशन मध्येच तुम्हाला सामान्य बाइकच्या तुलनेत मोठा फरक जाणवेल.

*  २५० सीसी च्या बाइक या मोठय़ा स्पोर्ट्स बाइकच्या तुलनेने स्वस्त असतात. त्याचप्रमाणे त्यांचे वजनही कमी असते. या बाइकची रिसेल व्हॅल्यू अतिशय चांगली आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला मोठी बाइक विकत घ्यायची असेल तेव्हा आधीची बाइक विकली जाणार का नाही याची काळजी करावी लागणार नाही.

*  या बाइकला तुम्ही वळणदार रस्त्यांवर किंवा घाटावर नेऊन बाइक हाताळण्यात एक्स्पर्ट होऊ शकतात. ६०० किंवा १०० सीसीची बाइक थेट वळणदार रस्त्यांवर किंवा घाटावर घेऊन जाणे कठीण आहे.

स्टंटबाजी नको

यूटय़ूब व्हिडीओज किंवा चित्रपटांतील स्टंटबाजीला भुलून बाइक खरेदी करणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. यामुळे अपघाताचा आणि जीव जाण्याचा धोका आहे. स्टंटबाजीमुळे नाहक बळी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचबरोबर कारवाईचा बडगादेखील तुमच्यावर पडू शकतो.

vaibhavbhakare1689@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about before buying a superbike

ताज्या बातम्या