सध्या पुरुषांमध्ये दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड जोमात सुरू आहे. दाढी-मिशा ठेवणे सध्या रुबाबदारपणाचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. दाढीच्या रचनेतही वैविध्य आले असून सध्या दाढी ठेवण्याचे विविध प्रकार पुरुषांना भुरळ पाडतात. दाढी क्लीन शेव्ह करण्यासाठी, तिला विशिष्ट आकार देण्यासाठी, दाढी ट्रिम करण्यासाठी अनेक तरुण ‘इलेक्ट्रिक बीअर्ड ट्रिमर’ वापरतात. मात्र या उपकरणाची देखभाल नीटनेटकी केली जात नाही. या उपकरणाचे आयुर्मान वाढण्यासाठी तिची देखभाल करणे आवश्यक आहे.

*     इलेक्ट्रिक बीअर्ड ट्रिमर वापरण्यापूर्वी ते कसे वापरले जाते, हे जाणून घ्या. कोणत्या प्रकारची दाढीची रचना करायची आहे, त्यानुसार या उपकरणामध्ये ब्लेडचा वापर करा.

*      वापर झाल्यानंतर ब्लेड उपकरणातून बाहेर काढा आणि त्याची साफसफाई करा. ब्लेडला लागलेले आणि उपकरणात असलेले केस बाहेर काढा. नळाच्या पाण्यात ब्लेड साफ करा.

*      इलेक्ट्रिक बीअर्ड ट्रिमरसोबत एक ब्रश दिला जातो. या ब्रशच्या साहाय्याने ट्रिमरमधील आणि ब्लेडला लागलेले बारीक केस साफ करा. यासाठी सुती कापडाचाही वापर करता येईल.

*      इलेक्ट्रिक बीअर्ड ट्रिमरसोबत एक लहान बाटली दिली जाते. हे वंगण असून या उपकरणाचे आयुर्मान वाढवण्यासाठी वेळोवेळी या वंगणचा वापर केला पाहिजे. त्यामुळे ब्लेडही गंजत नाहीत.

*      वंगणतेलाचा वापर करताना आधी हे उपकरण बंद करा. वंगणतेलाचे दोन ते तीन थेंब ब्लेडवर टाका. त्यामुळे ब्लेड चकचकीत राहते.

*      बहुतेक ट्रिमर पाण्याने स्वच्छ करता येतात. मात्र काही ट्रिमर पाण्याने स्वच्छ केले तर गंजू शकतात. नळाच्या पाण्यात ट्रिमरचे ब्लेड धरल्यास अतिरिक्त केस आणि अन्य कचरा निघून जाऊ शकतो.

*      ट्रिमर नियमित चार्जिग करणे आवश्यक आहे, नाहीतर तो खराब होऊ शकतो.