मानवाने तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली. अत्याधुनिक सुविधांद्वारे मानवाने त्याच्यासाठीच्या रोजच्या वापरातील अनेक गोष्टी या सोप्या आणि सोयीस्कर केल्या. मात्र अशीच काहीशी तंत्रज्ञानातील मानवाची निर्मिती ही त्याने पाळलेल्या प्राण्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. एके काळी अपुऱ्या आणि जागृती नसलेल्या तंत्रज्ञानामुळे प्राण्यांचा सांभाळ करताना प्राणीप्रेमींना काहीशी अडचण येत असे. मात्र नव्या तंत्रज्ञानाने यावर मात केली आहे. आज प्राण्यांशी निगडित अनेक टेक्नो वस्तू बाजारात सहज उपलब्ध होत आहे. अशाच प्राण्यांशी निगडित महत्त्वाच्या यांत्रिक गोष्टींविषयी..

डॉग रेपेलर

डॉग रेपेलर हे एक असे आधुनिक गॅजेट आहे. ज्याचा वापर हिंस्र कुत्र्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तसेच घरातील पाळीव कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी होतो. डॉग रेपलेरमध्ये ‘अ‍ॅन्टी बार्किंग’ हा पर्याय उपलब्ध आहे, ज्या पर्यायाच्या माध्यामातून रस्त्याने चालताना एखाद्या कुत्र्याने भुंकण्याचा आवाज काढला तर त्याच प्रतीचा सामान्य कुत्र्याचा आवाज या पर्यायामधून येतो. अनेकदा रात्रीच्या अंधारात चालताना कुत्र्यांचे भुंकणे असते. अशा वेळी या यंत्राचा वापर चांगल्याप्रकारे होण्यासाठी या गॅजेटवर एलईडी लाइटस्देखील देण्यात आला आहे. अनेकदा रस्त्याने चालताना हिंस्र कुत्रे अंगावर येऊन चावा घेण्याची उदाहरणे ऐकण्यात येतात. अशा कुत्र्यांपासून लांब राहण्यासाठी डॉग रेपेलरमध्ये ‘अटॅकर’ नावाचा एक पर्याय आहे. समोरच्या कुत्र्याला घाबरवणारा असा आवाज अटॅकर पयार्यातून काढता येतो. बॅटरीवर तसेच चार्जिगवर चालणाऱ्या डॉग रेपेलर बाजारात उपलब्ध आहेत.

किंमत – सहाशे ते दोन हजार रुपये

कॉलर शॉक बेल्ट

कॉलर शॉक बेल्ट ही महत्त्वाची आणि अतिशय आज गरजेची वस्तू बनलेली आहे. याचा वापर कुत्रे तसेच मांजरी या दोघांसाठी करण्यात येतो. यामध्ये बेल्टसोबत बॅटरीवर चालणारा वायरलेस रिमोटही मिळतो. तुमच्याकडे नवीन कुत्रा आहे. मात्र कितीही प्रशिक्षण दिले तरी तो अनेकदा नियंत्रणात राहत नाही. अशा वेळेस कॉलर शॉक बेल्ट कामास येतो. तुम्ही तुमच्या कुत्र्याच्या गळ्यात हा बेल्ट घातला असेल आणि कुत्रा गरजेपेक्षा लांब गेला तर तुमच्याकडे असणाऱ्या वायरलेस रिमोटवर त्याचा आवाज येतो. तम्हाला तो कुत्रा पळताना दिसल्यास तुम्हाला तुमच्या हातातील रिमोटने व्हायबेट्र बटण दाबणे आवश्यक आहे. जेणेकरून कुत्र्याच्या गळ्यातील बेल्ट हा वायब्रेट होऊन कुत्र्याला थांबण्याची जाणीव करून देतो. मात्र तरीही कुत्रा नाही थांबला तर रिमोटवरील शॉकचे बटण दाबावे लागते. यामुळे कुत्र्याच्या गळ्यातील बेल्टमध्ये शॉक निर्माण होऊन कुत्रा जागीच थांबतो. हा शॉक अतिशय हलक्या दर्जाचा असा स्थिर शॉक असतो. रिमोटवर चालणाऱ्या या वायरलेसची ८०० मीटर इतकी क्षमता आहे.  बॅटरी आणि चार्जिगवर चालणारे हे बेल्ट बाजारात उपलब्ध आहेत.

किंमत – सात हजार ते दहा रुपये.

नेल क्लिपर

नेल क्लिपर म्हणजे माणसांसारखे प्राण्यांचे नेलकटर. सध्या नव्याने बाजारात येणाठऱ्या या नेलक्ल्पिरमध्ये एलईडी लाइट, विशेष प्रकारचे दिवे पाहायला मिळतात. त्याचसोबत यामध्ये मॅग्निफाइंग काच असल्याने चांगल्या प्रकारे बोटांची नखे  दिसून येत असल्यामुळे कुत्रे तसेच मांजरी यांची नखे कापताना या नेल क्लिपरचा चांगला उपयोग करता येतो. अनेकदा पाळीव प्राण्यांचे नखे कापणे हे मोठे जिकरीचे काम असते. प्राण्यांची नखे ही काहीशी जास्त प्रमाणात बोटाच्या चामडीला जोडलेली असतात. त्यामुळे नखे कापण्याच्या वेळेस नेलकटरचा अंदाज चुकला तर प्राण्यांच्या बोटातून रक्त येण्याची संभावना असते. अशा वेळेस नेल क्लिपर कामाला येते.

किंमत – आठशे ते दोन हजार रुपये

इलेक्ट्रॉनिक ट्रेनिंग मॅट

कुत्रे, मांजरी यांसारख्या पाळीव प्राण्यांना प्रशिक्षण देण्यासाठी खास अशा ट्रेनिंग मॅट बाजारात उपलब्ध होत आहेत. या ट्रेनिंग मॅटच्या माध्यमातून कुत्र्यांना एका ठिकाणी बसवून व्यवस्थित प्रशिक्षण देण्यात येते. बॅटरीवर जास्त काळ चालणाऱ्या या मॅटची प्राणीप्रेमींकडून जास्त मागणी आहे. सुव्यवस्थितरीत्या प्राण्यांना बसता येणारे तसेच व्हायब्रेट मोडवर करता येणारे हे जलरोधक मॅट प्रशिक्षण देण्यासाठी योग्य आहे. या मॅटवर बसलेला कुत्रा ही मॅट सोडून दूर गेल्यास मॅटमधून सर्तकतेचा आवाज येऊ लागतो.

किंमत- दोन हजार ते पाच हजार

स्कूपर

सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या ही अधिक आहे. या वेळी अनेक नागरिक त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन चालण्यासाठी जातात. या वेळी रस्त्यात, बगीचा या ठिकाणी पाळीव कुत्रे, मांजरी विष्ठा टाकतात. अशा वेळेस काही जण त्याचा त्रास इतरांना होऊ नये याकरिता स्कूपरचा उपयोग करतात. विविध तंत्रज्ञानाने युक्त स्कूपर मोठय़ा प्रमाणावर बाजारात उपलब्ध होऊ लागले आहे. यामध्ये हलक्या वजनाच्या स्कूपरला अधिक मागणी आहे. स्कूपरवरील खटका ओढल्यानंतर विष्ठा स्कूपरमध्ये उचलता येते. यामध्ये आता खटक्याऐवजी इलेक्ट्रिक बटणांची सुविधाही पाहायला मिळत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या स्कूपरद्वारे फक्त कळ दाबल्यावर सोयीस्कररीत्या विष्ठा उचलता येते. विष्ठा उचलताना सतत खाली वाकावे लागू नये याकरिता मोठय़ा लांबीचे स्कूपर बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत.

किंमत- ८०० ते हजार

संकलन- ऋषिकेश मुळे

@rushikeshmule24