संदीप नलावडे

आरामदायी प्रवास, सुरक्षित प्रवासासाठीच्या उपाययोजना, आकर्षक रचना आणि परफॉर्मन्स.. कोणत्याही बाइकमध्ये या गुणवत्तेकडे लक्ष दिलेले असेल तर ती बाइक तरुणाईला भुरळ पाडते. सध्या ‘स्मार्ट’च्या जमान्यात बाजारात विविध फीचर्स असलेल्या ‘स्मार्ट’ बाइक उपलब्ध आहेत. आकर्षक रचना आणि विविध वैशिष्टय़े असलेल्या या बाइक तरुणाइला आकर्षित करतात. मात्र केवळ आकर्षण नव्हे तर गरज, उपयोगिता, फॅशन आणि वेगळेपण या बाबी लक्षात घेऊन नवनव्या बाइक बाजारात येत आहेत. टीव्हीएस कंपनीने तरुणाईचे आकर्षण आणि उपयोगिता लक्षात घेऊन ‘टीव्हीएस रेडिअन’ ही बाइक बाजारात आणली आहे. तब्बल २१ नव्या फीचर्सचा समावेश या बाइकमध्ये आहे. ११० सीसीची क्षमता असलेली ही दुचाकी केवळ भटकंतीसाठी नव्हे तर शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणांची उपयोगिता आणि विविध गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

आकर्षक लुक आणि दमदार इंजिन क्षमता ही या बाइकची वैशिष्टय़े. मजबूत मेटल बॉडी, अधिक लांब सीट, आकर्षक लाइटिंग, मेटल सायलन्सर, क्रोम स्पीडोमीटर, यूएसबी चार्जर पॉइंट अशा प्रकारे विविध उपयोगिता असलेल्या या बाइकची रचनाही तरुणाईला आकर्षित करणारी आहे.

आरामदायी प्रवास

सध्या अनेक स्पोर्ट बाइकची सीट मागील बाजूस उंच असते. मात्र ‘हॉरिजाँटल रचना’ असलेल्या बाइकची सीट सरळ मात्र लांबलचक आहे. दोन व्यक्ती या बाइकवर कोणतीही अडचण न येता सहज आणि आरामात बसू शकतात. रस्त्यांवर खड्डे हे शहरांना आणि ग्रामीण भागाला नवीन नाही. ग्रामीण भागात तर अगदी अरुंद रस्त्यावर दुचाकी चालवावी लागते. अशावेळी अपघातची शक्यता असते. हे लक्षात घेऊन या बाइकमध्ये ‘टेलिस्कॉपिक ऑइल डॅम्प्ड फ्रंट सस्पेंशन’ आणि ‘अ‍ॅडजस्टेबल रिअर हायड्रॉलिक शॉक अ‍ॅब्जार्बर’ यंत्रणा बसवण्यात आले आहे. त्यामुळे खड्डेमय आणि अरुंद रस्त्यावरून सहज ही गाडी जाऊ शकते. या बाइकचा १२६५ मिलिमीटर लांब व्हीलबेस आणि १८० मिलिमीटर ग्राऊण्ड क्लीअरन्स यांमुळे बाइकवर सहज नियंत्रण मिळवता येऊ शकते. विशेष म्हणजे या बाइकला यूएसबी चार्जरची सुविधा देण्यात आल्याने रपेट मारताना मोबाइल चार्ज करता येऊ शकतो. बाइकच्या सीटच्या बाजूला एक विशिष्ट स्टँड आहे, ज्यामुळे दुचाकीवर डबलसीट बसणारी व्यक्ती या स्टँडला पकडून आरामात प्रवास करू शकते किंवा पिशवी, बॅग या स्टँडला अडकवता येऊ शकते.

सुरक्षा व्यवस्था

‘सिन्क्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी’ हेही या मोटरबाइकची आणखी एक वैशिष्टय़. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाइकमध्ये प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा या कंपनीचा दावा आहे. या तंत्रज्ञानात अद्ययावत ब्रेकिंग कंट्रोल असून गाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते उपयुक्त आहे. ड्रायव्हिंग करताना बाइक घसरण्याची शक्यता त्यामुळे कमी आहे. विशेष म्हणजे या बाइकमध्ये बीपर असलेल्या साइड स्टँड इंडिकेटरचा वापर करण्यात आला आहे. अनेकदा बाइक चालू केल्यानंतर काही जण साइड स्टँड हटवण्यास विसरतात आणि सरळ पुढे जातात. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. मात्र या बाइकमध्ये असे होण्याची शक्यता कमी आहे. जर चालक स्टँड हटवायला विसरला तर जोरात एक बीप वाजतो. त्यामुळे साइड स्टँड हटवला नसल्याचे चालकाच्या लक्षात येते. या बाइकला १८ इंच व्यासाची मोठी चाके आपली दुचाकी रपेट सुरक्षित बनवते. विशेष म्हणजे दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेकचा वापर केला आहे. बाइकवरून आरामदायी प्रवस करण्यासाठी कंपनीने पाच स्टेप अ‍ॅडजस्टेबल सस्पेंशनचा वापर केला आहे.

आकर्षक रचना

या बाइकची रचना आकर्षक आहेच, मात्र त्याचे विविध पार्टही अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. कारला ज्याप्रमाणे मोठा आणि सुसज्ज स्पीडोमीटर असतो, त्याचप्रमाणे आकर्षक स्पीडोमीटर या बाइकचा आहे. त्याचप्रमाणे स्टायलिश पेट्रोल टँक, रिब्ड थायपॅड, क्रोम असेन्टस, सीट, हँडल यांच्या आकर्षक रचनेमुळे ही बाइक आकर्षक वाटते. पॉवरफुल हँडलँप, क्रोम बीजल, डीआरएल (डेटाइम रनिंग लँप) यामुळे बाइक आकर्षक झाली आहे. विशेष म्हणजे पेट्रोल टाकीवर थायपॅड लावण्यात आल्याने दुचाकीस्वाराला आरामदायी प्रवास करता येतो. डीआरएलमुळे या बाइकची पुढील बाजू आणखी आकर्षक दिसते.

वैशिष्टय़े

* इंजीन : ११० सीसी

*  मायलेज : ६९.३ किलोमीटर पर लिटर

*  पॉवर : ८.४ पीएस@ ७००० आरएमपी

*  किंमत (मुंबई) : ५२,९६२

*  वजन : १०८ किलोग्रॅम

*  इंधन : पेट्रोल

*  रंग : चार विविध रंगांत उपलब्ध. पर्ल व्हाइट, गोल्डर बेज, रॉयल पर्पल आणि मेटल ब्लॅक.

sandeep.nalawade@expressindia.com