परदेशातला ‘घरोबा’

अँड्रॉइड आणि आयओएससोबतच संकेतस्थळावरही काऊचसर्फिग उपलब्ध आहे.

(संग्रहित छायाचित्र)

फिरण्याची अनेकांना आवड असते. यामध्ये एकटय़ानेच फिरण्याची इच्छा असणाऱ्या अनेक व्यक्ती समाजात पाहायला मिळतात. बॅग पाठीवर अडकवून जगातल्या कानाकोपऱ्यांत जाऊन तेथील संस्कृतीची माहिती जाणून घेणे, त्या गावांमध्ये-शहरांमध्ये प्रवास करून सफरीचा आनंद घेणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र अनेकदा एखाद्या दुसऱ्या देशात गेल्यानंतर हॉटेलमध्ये राहण्याऐवजी तेथील स्थानिक नागरिकांच्या घरातच राहून त्यांच्यासोबतच प्रवास करून तेथील संस्कृती अनुभवण्याची संधी मिळाली तर अशी सफर अनेकांना कायमस्वरूपी लक्षात राहील. होय, अशी संधी जरूर मिळेल, अशक्य ते शक्य करून दाखवणाऱ्या इंटरनेटमुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्या काही विशेष अशी अ‍ॅप्लिकेशन्स आणि संकेतस्थळे आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण दुसऱ्या देशात जाऊन, तेथील स्थानिकांच्या घरी राहून सफरीचा आनंद घेऊ शकतो. अशाच काही अ‍ॅप्स आणि संकेतस्थळांविषयी..

काऊचसर्फिग

‘ट्रॅव्हल लाईक अ लोकल’ म्हणेजच स्थानिकांप्रमाणेच प्रवास करा, असे आकर्षक ब्रीदवाक्य असणारे काऊचसर्फिग हे अ‍ॅप्लिकेशन अनेकांमध्ये सुप्रसिद्ध आहे. अनेक जण बाहेरच्या देशात गेल्यानंतर तेथील संस्कृती पुरेपूर अनुभवण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात.

अँड्रॉइड आणि आयओएससोबतच संकेतस्थळावरही काऊचसर्फिग उपलब्ध आहे. सुरुवातीला तुम्हाला काऊचसर्फिगवर स्वतचे खाते तयार करावे लागते. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून तुमच्या खात्याची तथ्यता तपासण्यात येते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना करण्यात आली असून सफरीचे विविध पर्याय या माध्यमावर उपलब्ध आहेत. सफरीपूर्वी तुम्हाला सफरीची इत्थंभूत माहिती काऊचसर्फिग प्रवास नियोजनात टाकावी लागते. त्यानंतर तुम्ही ज्या देशात जाण्यास इच्छुक आहात त्या देशाचे नाव टाकल्यानंतर काऊचसर्फिग माध्यमावर खाते असणाऱ्या आणि त्या देशात राहणाऱ्या व्यक्तींचे नावे तुम्हाला दिसतात. त्यानंतर त्या व्यक्तीला तुमचे सफरीचे नियोजन कळवायचे असते, समोरील व्यक्ती संपूर्ण माहिती घेऊन संपूर्ण नियमावली तपासून काही कालावधीसाठी घरात राहू देण्यासाठी इच्छुक असेल तर तुमचे पुढील काम सोप्पे होते. यामध्ये तुम्ही इतर देशातील नागरिकांनाही स्वतच्या घरी राहण्याची- त्यांच्यासाठी पाहुणचाराची संधी दर्शवू शकता.

एअर बीएनबी

एअर बीएनबी हे माध्यमही फिरस्त्यांसाठी सर्वात चांगले माध्यम आहे. एअर बीएनबी संकेतस्थळावर सुयोग्य सफरीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. एखाद्या प्रेक्षणीय गावापासून ते शहरापर्यंतची सर्व माहिती या माध्यमावार उपलब्ध आहे. एखाद्या ठिकाणी फिरायचे झाल्यास खासकरून बाहेर देशात फिरण्यास जायचे असल्यास कुठे जावे, कसे जावे, कोणत्या हॉटेलमध्ये राहावे-खावे तसेच त्या देशात पाहण्यासारखे काय काय आहे, या सर्व प्रश्नांची माहिती या माध्यमावर आपल्याला सहजरीत्या वाचायला आणि पाहायला मिळते. स्पोर्ट्स, अ‍ॅडव्हेन्चर सफर करण्यासाठी अशी ठिकाणे कोणती याचीदेखील माहिती या माध्यमावर देण्यात आली आहे. तेथील स्थानिक नागरिकांच्या घरी राहता येईल अशीही सुविधा या माध्यमात पाहायला मिळते. अँड्रॉइड आणि आयओएससोबतच संकेतस्थळावरही एअर बीएनबी उपलब्ध आहे.

बी-वेलकम

बी-वेलकम सफरीसाठी उत्तम मार्गदर्शक असणारे हे माध्यम फक्त संकेतस्थळावरच उपलब्ध आहे. आतापर्यंत २१६ देशांमध्ये बी-वेलकमच्या माध्यमातून अनेकांनी त्यांची अविस्मरणीय सफर अनुभवलेली आहे. तुम्हाला एखाद्या देशात फिरण्यासाठी जायचे आहे, मात्र त्या ठिकाणाची तुम्हाला काहीच माहिती नसेल तर अशांसाठी बी-वेलकम हे माध्यम अतिशय उपयुक्त ठरणारे असे माध्यम आहे. या माध्यमातून तुम्ही इतर देशातील व्यक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून तेथील संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. तुम्हाला तुमचे त्या देशात जाण्याचे नियोजन बी-वेलकम माध्यमाद्वारे समोरील व्यक्तीला कळवल्यानंतर तुमच्या पाहुणचारासाठी उत्सुक असणाऱ्या अनेक व्यक्ती बी-वेलकम या माध्यमावर पाहायला मिळतात. तसेच एखाद्या देशात सफरीसाठी गेल्यानंतर ज्या व्यक्तीने बी-वेलकमच्या माध्यमातून तेथील स्थानिकाच्या घरी आश्रय घेतला होता, त्या व्यक्तीचीही मते आपल्याला बी-वेलकमच्या संकेतस्थळांवर पाहायला मिळतात.

ट्रस्टरूट्स

अनेकदा फिरस्त्या व्यक्तीला त्याच त्याच ऐतिहासिक ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचा कंटाळा आलेला असतो. इतर देशांत जाऊन तेथील ऐतिहासिक किंवा समुद्रकिनारे पाहण्याऐवजी सफरीचा वेगळा आनंद घेण्याची फिरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते. अशा वेळी ट्रस्टरूट्स हे माध्यम कामी येते. एखाद्या देशात फिरण्यासाठी गेल्यानंतर तेथील स्थानिकांसोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणे, त्या देशातील गायक, वादक, चित्रकार यांच्यासोबत वेळ घालवणे. हायकिंग, ट्रेकिंगला जाणे तेथील योग करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत योगा करणे असा विविध प्रकारचा सफरीचा अनुभव ट्रस्टरूट्सच्या माध्यमातून फिरस्त्यांना घेता येतो. ट्रस्टरूट्स माध्यमामध्ये ग्रामीण भागात फिरण्यासाठीचा उत्तम पर्याय देण्यात आलेला आहे. अँड्रॉइड आणि आयओएससोबतच संकेतस्थळावरही ट्रस्टरूट्स उपलब्ध आहे.

ट्रस्टेड हाऊस सीटर्स

अनेकदा बाहेर देशात फिरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला तेथे काय पाहावे आणि कसे राहावे याची माहिती नसते. अशा वेळेस ट्रस्टेड हाऊस सीटर्स हे माध्यम कामी येते. कोणत्या देशात कोणत्या भागात स्वस्त हॉटेल आहेत. तसेच त्या देशातील स्थानिक नागरिक कोणत्या प्रेक्षणीय स्थळाच्या जागी राहतो. त्या स्थानिक नागरिकाविषयीची तथ्यता या सर्वाची सफरीसाठी पुरेपूर माहिती देणारे माध्यम म्हणजे ट्रस्टेड हाऊस सीटर्स होय. या माध्यमाद्वारे अनेक जण माफक दरात इतर देशांतील स्थानिक नागरिकांच्या घरी राहू शकतात. त्या देशातील स्थानिक नागरिकही तुमचे फिरण्याचे नियोजन बनवू शकतो अशी सोय या माध्यमात पुरवण्यात आली आहे. अँड्रॉइड तसेच संकेतस्थळावर ट्रस्टेड हाऊस सीटर्स उपलब्ध आहे.

 संकलन- ऋषिकेश मुळे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on abroad local citizens home app abn