शहरशेती : कढीपत्ता

बागकामात अगदी नवखी असलेली व्यक्तीही वाढवू शकेल आणि दैनंदिन आहारात उपयुक्त ठरेल अशी वनस्पती म्हणजे कढीपत्ता.

(संग्रहित छायाचित्र)

राजेंद्र श्रीकृष्ण भट

बागकामात अगदी नवखी असलेली व्यक्तीही वाढवू शकेल आणि दैनंदिन आहारात उपयुक्त ठरेल अशी वनस्पती म्हणजे कढीपत्ता. त्यामुळे हे झाड बहुतेक घरांच्या खिडकीत किंवा बाल्कनीत हमखास आढळते.

कढीपत्ता ही अत्यंत काटक आणि बहुवर्षांयु वनस्पती आहे. हळद आणि कढीपत्त्याचा रोज वापर होत नाही असे घर भारतात सापडणे जवळपास अशक्यच आहे. कढीपत्ता कडक उन्हात किंवा परावर्तीत प्रकाशातही जगू शकतो. उन्हाची तीव्रता आणि प्रकाश मिळण्याचा कालावधी यानुसार त्याची कमी-जास्त प्रमाणात वाढ होते. हे झाड संथगतीने वाढते.

कढीपत्त्याच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी प्रामुख्याने दिसणाऱ्या आणि सहज ओळखता येणाऱ्या जाती म्हणजे मोठय़ा पानांचा कढीपत्ता आणि लहान पानांचा कढीपत्ता. मोठय़ा पानांच्या कढीपत्त्याला सुगंध तुलनेने कमी असतो.

हे झाड कुंडीतही जगते आणि वाढते. मुबलक जागा असल्यास ते एखाद्या लहान झाडाएवढे साधारण पारिजातकाएवढे वाढते. याला बारीक पांढरी फुले आणि छोटी फुले येतात. बियांपासून पुनर्लागवड करता येते. मुख्यत: आडव्या मुळ्यांमधून जमिनीत नवी रोपे उगवतात आणि त्यापासून लागवड केली जाते. अलगद खोदून रोपे काढून आपण नवी रोपे तयार करू शकतो.

जमिनीत जिवाणूंचे प्रमाण जेवढे अधिक तेवढा जास्त सुगंध येतो. यासाठी पाण्यात आंबट चव येईल, एवढेच ताक मिसळून हे पाणी १०-१५ दिवसांतून एकदा कुंडीत घालावे. लिंबू, संत्रे वगळता अन्य फळांच्या साली आणि भाज्यांची देठे बारीक करून कुंडीतील मातीवर टाकत राहिल्यास बाहेरून जास्त खत देण्याची आवश्यकता भासत नाही. दर महिन्यातून एक चमचा सेंद्रिय खत मातीवर टाकावे आणि थोडेसे मिसळावे. कुंडीतील माती शक्यतो हलवू नये. अगदी वरची एखाद इंच माती हलवून खते घालावीत. कडुनिंब पेंड, करंज पेंड, एरंड पेंड यापैकी एखादी एखादा चमचा-दोन चमचे घालावी. मिळाल्यास बोनमील वापरावे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on city farming