विविधरंगी जर्मनी

मुंबई ते जर्मनी प्रवास करताना थेट सेवांचा विचार केला तर फ्रँकफर्ट आणि म्युनिक विमानतळे सोयीची ठरतात.

जर्मनी भारतीय पर्यटकांच्या यादीत क्वचितच आढळत असले, तरी युरोपमधील हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. सांकृतिक, ऐतिहासिक, शहरी, आरोग्य पर्यटन, निसर्गसौंदर्य असे सर्व काही इथे आहे. कोलोन, आखेनची भव्य कॅथ्रेडल्स, ड्रेस्डेन, बायरॉईथची ऑपेरा हाऊसेस, ऱ्हाईनची टूर किंवा ब्लॅक फॉरेस्ट, आल्प्समधील ट्रेकिंग.. जर्मनीच्या पर्यटनात वैविध्य आहे.

मुंबई ते जर्मनी प्रवास करताना थेट सेवांचा विचार केला तर फ्रँकफर्ट आणि म्युनिक विमानतळे सोयीची ठरतात. जर्मनीमध्ये अंतर्गत विमान प्रवासासाठी रायन एअर, ईझी जेट, युरो विंग्स हे स्वस्त पर्याय आहेत. त्यात चेक-इन सामानाचा समावेश आहे का हे पाहावे. त्यासाठी बऱ्याचदा जास्त पैसे मोजावे लागतात. जर्मनी ट्रेन सेवेनेसुद्धा उत्तम जोडलेला देश आहे. इंटरसिटी एक्स्प्रेस, इंटरसिटी, युरोसिटी, रिजनल एक्स्प्रेस, रिजनल ट्रेन असे पर्याय असून त्यात अनेक सवलती मिळतात. ठरावीक राज्यात फिरण्याचे तिकीट, वीकएंड तिकीट, ग्रुप तिकीट अशा सवलतींचा फायदा घ्यायला हवा. Deutsche Bahn च्या वेबसाइटवर ही माहिती उपलब्ध आहे. www.bahn.com/en/view/index.shtml वर ऑनलाइन बुकिंग करणे शक्य आहे. बसने प्रवासासाठीो’्र७ु४२ इत्यादी स्वस्त सेवा आहेत.

शहरी पर्यटनात रस असणाऱ्यांनी बर्लिन, हॅम्बर्ग, डय़ुसेलडॉर्फ, कोलोन, लाइपझिश, ड्रेस्डेन, न्युरेम्बर्ग, म्युनिक, स्टुटगार्ट ही शहरे पाहावीत. जर्मन गाडय़ांवर प्रेम असेल तर वोल्फ्सबर्गमधली फोक्सवागेनची फॅक्टरी अथवा स्टुटगार्टमधले मर्सिडीज-बेंझ म्युझिअम निवडता येईल. साहित्य-कला-संगीताची आवड असल्यास वायमार, बायरॉईथला जावे. थीम पार्क्‍स आवडणाऱ्यांना युरोपा पार्क, लेगोलँड जर्मनी रिसॉर्ट असे पर्याय आहेत. ऐतिहासिक पर्यटनात रस असणाऱ्यांना ट्रीअर, इत्यादी ठिकाणी रोमन काळातील वास्तू बघण्याची संधी मिळते. अद्भुतरम्य गढय़ा, पॉट्सडॅममधले भव्य प्रशिअन राजवाडे ही सगळ्यांसाठीच आकर्षणस्थळे आहेत.

इथे सांस्कृतिक व निसर्गपर्यटनाचे उत्तम संयोजन करता येते. फ्रँकफर्टहून सुरुवात केली तर ऱ्हाइन नदीला मध्यवर्ती ठेवून टूर ठरवता येते. काठावर वसलेली कोलोन, बॉन शहरे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. भव्य कॅथ्रेडल हे कोलोनचे मुख्य आकर्षण असले तरी चॉकलेट म्युझिअम, लुडविग म्युझिअम पाहण्यासारखी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर एकत्रीकरणरपत बॉन ही जर्मनीची राजधानी होती. अनेक शासकीय आणि खासगी संस्थांची मुख्यालये, बॉन युनिव्हर्सिटी, बीथोवेन या प्रसिद्ध संगीतकाराचे घर बघण्यासारखे आहे. ऱ्हाइनचे भव्य पात्र, अनेक तलाव, उद्याने, जवळच असलेले सात डोंगर यामुळे हा परिसर रम्य आहे. पश्चिमेतील मोझेल नदीचा भाग वाइन टूरसाठी प्रसिद्ध आहे. चित्रातली भासतील अशी गावे, डोंगरावर वसलेल्या गढय़ा, द्राक्षांचे मळे यामुळे हा भाग रमणीय झाला आहे. इथे सायकलने फिरण्याची मजा औरच!

जर्मनीच्या सीमा नऊ  देशांशी जोडल्या आहेत. इयु-रेल पास वापरून जर्मनीबरोबरच डेन्मार्क, नेदरलँड्स, फ्रान्स, बेल्जियम, लक्सेम्बर्ग, ऑस्ट्रिया, स्वित्र्झलड, पोलंड आणि चेक रिपब्लिक हे देश पाहणे सहज शक्य आहे. इयु-रेलच्या www.eurail.com या संकेतस्थळावर विविध पर्यायांची माहिती आहे.

मे ते ऑगस्ट हा पर्यटनासाठी उत्तम काळ असला तरी बिअरफेस्टच्या निमित्ताने सप्टेंबरमध्ये, ख्रिसमस मार्केटच्या निमित्ताने डिसेंबरमध्ये आणि स्कीइंगसाठी हिवाळ्यात येथे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. फेस्टिव्हल्सची माहिती ऑनलाइन मिळते.

जर्मनी हा पर्यटनाच्या दृष्टीने सुरक्षित देश मानला जातो. देशात प्रामुख्याने जर्मन भाषाच बोलली जात असली, तरीही पर्यटनाबद्दल माहिती देणाऱ्या कार्यालयांत त्या शहराचा नकाशा व पर्यटनस्थळांची माहिती सहज मिळते. शिवाय वॉकिंग/ सायकल/ बस टूर्सची माहितीदेखील मिळते. या टूर्स निवडल्यास स्थानिकांच्या दृष्टिकोनातून शहर अनुभवता येते.

शहरांत फिरण्यासाठी बसेस, ट्राम, अंडरग्राऊंड ट्रेन्स, लोकल ट्रेन्स आहेत. तिकिटांचे ठरावीक तासांसाठी, ठरावीक दिवसांसाठी असे पर्याय असले तरी सर्व प्रकारच्या वाहतूक सेवांसाठी एकच तिकीट असते. बऱ्याचदा शहरांच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक बंदी असते, त्यामुळे हा परिसर चालत फिरता येतो.

राहण्यासाठी मोटेल वन, इबिस, नोवोटेल, माइनिंगर अशी स्वस्त हॉटेल आहेत, ज्याची माहिती ऑनलाइन मिळू शकते. एअर-बीएनबीसारख्या संकेतस्थळांवर कॉटेजेस आणि अपार्टमेंट्स बुक करता येतात. हॉटेल मध्यवर्ती ठिकाणी आहे का, संकेतस्थळावर ते कोणत्या श्रेणीत आहे, बुकिंग फी, कॅन्सलेशन फी, प्रवाशांच्या प्रतिक्रिया, मते, इत्यादी सर्व माहिती खातरजमा करून घेणे कधीही चांगले.

जर्मनीत फिरताना क्रेडिट, डेबिट कार्ड, फॉरेक्स कार्ड उपयोगी ठरते. थोडीफार कॅश बरोबर घेऊन फिरणे कधीही चांगले. जर्मनीतली दुकाने रविवारी बंद असतात. एकंदर जर्मन पर्यटनाचा अनुभव सांस्कृतिक, नैसर्गिक, ऐतिहासिक असे नानाविध पैलू उलगडणारा आहे.

संकल्पनांवर आधारित मार्ग

जर्मनीमध्ये वाईन रूट, अल्पाईन रोड, ब्लॅक फॉरेस्ट रूट, फेअरी टेल रूट, टॉय रोड, रोमँटिक रोड, कॅसल रोड असे अनेक ‘थिमॅटिक रूट्स’ आहेत. फ्रँकफोर्टजवळ हानाउ नावाच्या गावात फेअरी टेल रूट सुरू होतो आणि उत्तरेला ब्रेमेनमध्ये संपतो. ग्रिम बंधूंनी लिहिलेल्या रॅपुन्झेल, लिटिल रेड रायडिंग हूड, स्नो व्हाईट या परीकथांमधील ठिकाणे या मार्गात पाहता येतात. याविषयीची माहिती टुरिझम बोर्डच्या www.germany.travel या संकेतस्थळावर मिळेल.

खाद्यसंस्कृती

जर्मनीत प्रत्येक भागाची वेगळी खाद्यसंस्कृती आहे. तळलेले मासे ही उत्तरेची पारंपरिक डिश, सॉसेजेस ही मध्य जर्मनीमधली विशेषता, इम्पलिंग्स, हॅम ही दक्षिणेची खासियत. बटाटय़ाचे विविध पदार्थ, सॅलड्स, सूप, ब्रेड, चीज हासुद्धा जर्मन जेवणाचा अविभाज्य भाग आहे. बिअर लोकप्रिय मद्य असले तरी अनेक भाग वाइनसाठी प्रसिद्ध आहेत. सफरचंद, बेरी आणि इतर अनेक फळांचे केक, चीजकेक आणि कॉफी ही कॉम्बिनेशन्स लोकप्रिय आहेत. अर्थातच जर्मन खाण्याबरोबरच तुर्किश, इटालियन, व्हिएतनामी, थाई, भारतीय, ग्रीक अशी अनेक रेस्टॉरंट्स आढळतात. तिथे शाकाहारी पदार्थसुद्धा मिळतात.

shraddha.6886@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on germany