|| आशुतोष बापट

भारताच्या आग्नेयेला असलेला कंबोडिया हा देश भारतीय संस्कृतीची अनेक मानचिन्हे आपल्या अंगाखांद्यावर मोठय़ा अभिमानाने मिरवतो आहे. एकेकाळी अज्ञात असलेला हा सगळा परिसर आता ख्मेर स्थापत्यशैलीत बांधलेल्या मंदिरांमुळे उजेडात आला आहे. कंबोडिया आणि अंकोरवाट मंदिर हे समीकरण अगदी रूढ झालं आहे, पण इतरही अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

अंकोरवाट या महाकाय मंदिरामुळे जरी कंबोडियाची जगाला ओळख झाली असली तरी कंबोडियाचे वैभव तेवढय़ावरच संपत नाही. इतरही अनेक आश्चर्यकारक गोष्टी कंबोडियात पाहायला मिळतात. सीएम रीप या शहरात ‘अंकोर रीजन’ नावाचा एक वेगळा भागच आहे, ज्यात विविध सम्राटांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधलेली देवळे, राजवाडे आणि इतर स्थापत्य पाहता येते. ‘अंकोरथॉम’ हे त्यातलेच एक महत्त्वाचे आणि सुंदर ठिकाण.

अंकोर म्हणजे ‘शहर’ आणि थॉम म्हणजे ‘राजधानी.’ राजधानीचे शहर ते अंकोर थॉम. सीएम रीप या शहरात अंकोर रीजनमध्ये अंकोरवाट मंदिराच्या खालोखाल महत्त्वाचे ठिकाण कुठले असेल तर ते अंकोर थॉम हे होय. कंबोडियामधे इ.स.च्या १२व्या शतकात जयवर्मा सातवा हा ख्मेर साम्राज्यातील एक बलाढय़ सम्राट होऊन गेला. त्याच्या कारकिर्दीत त्याने आपली राजधानी अंकोरथॉम येथे वसवली. या शहराला ३ कि.मी. लांब आणि ३ कि.मी. रुंद तटबंदी आहे. बौद्ध धर्माचा अनुयायी असलेल्या या सातव्या जयवम्र्याची कारकीर्द मोठी देदीप्यमान होती.

अंकोरथॉमचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे इथे असलेले बयोन हे राजमंदिर आणि त्यावर असलेले मानवी चेहरे. मानवी चेहरे ही या सर्व स्थापत्याची खास ओळख म्हणावी लागेल. फेस टॉवर्स म्हणून ते ओळखले जातात. या चेहऱ्यांवर एक प्रकारचे गूढ आणि मंद स्मित झळकते. या स्मितहास्याला ‘अंकोर स्माईल’ असे नाव मिळालेले आहे. बयोन मंदिरावरचे फेस टॉवर्स हे इथले खास आकर्षण आहे.

याचा प्राकार अतिशय विस्तीर्ण आहे. सुरुवातीलाच असलेल्या भिंतींवर चारही बाजूंनी शिल्पकाम केलेले आहे. माणसाच्या रोजच्या जीवनातील प्रसंग, विविध लढायांचे प्रसंग यांनी या भिंती सजल्या आहेत. हे शिल्पकाम पाहून तत्कालीन समाजजीवनाची संपूर्ण कल्पना येते. इथून लाकडी जिना चढून वर आल्यावर किंवा येतानाच समोर दिसायला लागतात ते जगप्रसिद्ध अंकोर स्माईल म्हणून ओळखले गेलेले चेहेरे. त्यांची संख्या सध्या ३७ आहे. परंतु पूर्वी इथे ४९ ते ५४ फेस टॉवर्स होते, असे संशोधक सांगतात. मुख्य मंदिर आणि त्याच्या चहुबाजूंनी लहान मंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिराचा कळस हा अशाच मानवी चेहऱ्यांनी तयार केलेला आहे. अंकोरथॉम इथले हे बयोन मंदिर या अशाच मानवी चेहऱ्यांसाठी जगात प्रसिद्ध आहे. या चेहऱ्यांबद्दल अभ्यासकांनी दोन वेगवेगळी मते मांडली आहेत. काही जणांच्या मते हे चेहरे इथला राजा सातवा जयवर्मा याचेच आहेत. तर काहींच्या मते हे चेहरे बौद्ध देवता अवलोकितेश्वराचे असावेत.

जनतेसाठी देव काय किंवा राजा काय, दोघेही समान पातळीवरच असतात, असे मानले जाण्याच्या काळातील या कलाकृती आहेत. नाहीतरी राजाला देवाचा पृथ्वीवरील प्रतिनिधीच मानले जाते. त्यामुळे हे चेहरे कुणाचे आहेत याने जनतेला काहीच फरक पडत नसणार. पण एक खरे की ही शिखरे फार सुंदर आणि तितकीच गूढही दिसतात. संध्याकाळच्या कलत्या उन्हाची किरणे या चेहऱ्यांवर पडली, ती एक निराळीच छटा उमटते. प्राचीन अंकोर साम्राज्याच्या राजधानीच्या अवतीभवतीदेखील अनेक ऐतिहासिक निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांची वाट पहात आहेत.

कबाल स्पीअन हे त्यातलेच एक सुंदर ठिकाण. जलाशय आणि शेषशायी विष्णू यांचा संबंध आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मग ती रानी की वाव इथली शिल्पसमृद्ध विहीर असो, किंवा विविध मंदिरांच्या समोर असलेल्या पुष्करिणी असोत. विहिरी, जलाशय म्हटले की तिथे शेषशायी विष्णूची प्रतिमा ही हटकून पाहायला मिळते. कंबोडियातही अशीच एक खूप सुंदर शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. नदीच्या प्रवाहाशी या सुंदर मूर्तीची सांगड घातलेली पाहायची असेल, तर कबाल स्पीअन या रम्य ठिकाणाला भेट देण्याशिवाय पर्याय नाही. इथल्या नदीपात्रात विष्णू आणि इतर देवतांच्या मूर्तीचे अंकन अंदाजे इसवी सनाच्या ११-१२ व्या शतकात म्हणजे राजा उदयादित्यवर्मा दुसरा याच्या कारकिर्दीत केले गेले आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.

स्थानिक भाषेत कबाल स्पीअनचा अर्थ दगडांचा नैसर्गिक पूल असा होतो. सीएम रीप पासून ४० कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण डोंगरावर वसलेले आहे. डोंगर चढून जायला तासभर पुरतो. वर जाण्यासाठी झाडांच्या सावलीतून सुंदर पायवाट आहे. डोंगरमाथ्यावर पोचल्यावर समोरच नदीपात्रात आणि त्याच्या आजूबाजूच्या खडकांवर हजारो शिवलिंग खोदलेली दिसतात. ही शिवलिंग नदीपात्रात खोदलेली असल्यामुळे ही नदी ‘सहस्रलिंग नदी’ म्हणूनही ओळखली जाते. या शिवलिंगांप्रमाणेच ब्रह्मदेवाची एक सुंदर मूर्तीही इथेच नदीपात्रातल्या खडकावर खोदलेली आहे. एका कमळाच्या फुलात ब्रह्मदेव पद्मासनात बसलेले दाखवले आहेत. ज्या खडकावरून ही नदी वाहते त्या खडकावर शेषशायी भगवान कोरलेले आहेत. पायाशी देवी लक्ष्मी दाखवली असून शेषाच्या वेटोळ्यावर भगवान विष्णू पहुडलेले दिसतात. देवाचा मुकुट हा खास अंकोर शैलीमधे कोरलेला पाहायला मिळतो. भगवान विष्णूची ही मूर्ती अशी काही खुबीने कोरलेली आहे की इथे देवाच्या पायावरून नदीचा प्रवाह सतत वाहात रहावा. विष्णू पादोदकं तीर्थम्.. या न्यायाने शहराला होणारा पाणीपुरवठा हा जणू काही देवाच्या पायाचे तीर्थच आहे अशाच उद्देशाने या मूर्ती इथे कोरलेल्या आहेत.

भारतीय संस्कृतीची मानचिन्हे मिरवणारा कंबोडिया अतिशय रमणीय आहे. अंकोरवाट हा तर इथला मेरुमणी. पण त्याचसोबत तितक्याच तोलामोलाची इतर ठिकाणेही पर्यटकांची वाट पाहत आहेत. अंकोर स्माईल आणि कबाल स्पीअन हे कंबोडियाच्या शिरपेचातले दोन मानाचे तुरे मुद्दाम वेळ काढून पाहावेत असेच आहेत.

ashutosh.treks@gmail.com