|| सुहास जोशी

राजकोटला मध्यवर्ती एसटी स्टॅण्डबाहेर एक गल्ली आहे. काही विशेष नाव नसलेली, पण या गल्लीत अंडय़ाचे इतके पदार्थ मिळतात, की या गल्लीला अंडा गल्ली असे नाव ठेवायला हरकत नाही. अगदी तुफान गर्दी असलेला हा भाग! इथे अंडय़ाच्या किमान वीस तरी गाडय़ा आहेत. मात्र इकडे जाऊन ऑम्लेट, बुर्जी-पाव मागू नये. किंबहुना तिथे एवढे नावीन्यपूर्ण पदार्थ असतात की तुम्ही बुर्जी वगैरे विसरूनच जाता. एग घोटाळा, एग टिक्का, एग उंधियो असे अनेक प्रकार. सर्व पदार्थात बटर आणि तेलाचा सढळ वापर आणि तिखट जरा कमीच!

एक उकडलेले अंडे तेलावर परतलेले, त्यावर ग्रेव्ही, त्यावर एक अंडे किसून, आणि या सर्वावर कडी म्हणजे एक उकडलेले अंडे बटरमध्ये कुस्करून.. झाला अंडा उंधियो. सगळ्या पदार्थात किमान तीन किंवा चार अंडी. त्याखाली अजिबात नाही. दुसऱ्या एका गाडय़ावर अजुबा मिळतो. एक ऑम्लेट तव्यावर टाकतात आणि त्यावर अंडय़ाचे चार काप चिकटवतात. त्यावर स्पेशल तिखट ग्रेव्ही आणि वर एक अंडे किसून घालतात. हे सर्व पदार्थ ब्रेड स्लाइसबरोबर दिले जातात.