डॉ. संजीवनी राजवाडे

पूर्वी सुट्टय़ांमध्ये आजोळी किंवा मामाच्या गावी जाण्याची घाई लागलेली असायची. हल्ली मात्र दुसऱ्या शहरांमध्ये किंवा अगदी थेट परदेशात फिरायला जाण्याचा कल वाढत आहे. फिरण्याचे ठिकाण, हॉटेल यांची सर्व तयारी काही महिन्यांआधीच सुरू होते. असे असले तरी उत्साहाच्या भरात अति चालणे, अति खाणे, अपुरी झोप, वेळी-अवेळी प्रवास यांमुळे आजारी पडण्याची शक्यता असते. तेव्हा सुट्टय़ांसाठी बाहेर पडताना काय काळजी घ्यावी ते जाणून घेणे गरजेचे आहे. आपली ही सफर शारीरिक व मानसिकदृष्टय़ा आरोग्यदायी व्हावी याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पेहराव

आपण ज्या प्रदेशात जाणार असू त्याप्रमाणे कपडे, बूट, मोजे, स्वेटर, जॅकेट, हॅट आदी गोष्टींची बारकाईने काळजी घ्यावी. कपडे अति घट्ट नसावेत. स्टाइल असावी; पण ती सहन होईल इतपत असावी. फिरताना मोकळीक जाणवेल आणि असलेल्या पेहरावाचा त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे. गॉगल, काठी, वॉकर इत्यादी आपल्या गरजेच्या वस्तू आवर्जून न्याव्यात. कपडय़ांचे जादा सेट ठेवावेत. तरण तलावात पोहताना वेगळे कपडे वापरावेत. ओले, धुळीने माखलेले, घामट कपडे पुन्हा पुन्हा वापरू नयेत. त्यांचा संसर्ग होऊ  शकतो. मोजेदेखील सुखकर असावेत. घट्ट इलॅस्टिकचे नसावेत.

आहार

मधल्या वेळेत खाण्यासाठी सुका खाऊ नक्की सोबत ठेवावा. शक्यतो तेलकट/ तुपकट पदार्थ नसावेत. दीर्घकाळ टिकणारे (खजूर, राजगिरा चिक्की, शेंगदाणा चिक्की, कुरमुऱ्याचा चिवडा) पदार्थ सोबत घ्यावेत. बाहेर खाताना पचण्यास जड पदार्थ टाळावेत. पाणी पिताना स्वच्छतेची खात्री करून घ्यावी. शक्यतो खाण्याच्या वेळा पाळाव्यात. मसालेदार-तिखट पदार्थाचा अतिरेक टाळावा.

लसीकरण

टायफॉइड, कावीळ, फ्लूचे नियमित लसीकरण करून घ्यावे. ज्येष्ठ नागरिक किंवा दम्याचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक ते लसीकरण करून घ्यावे. बऱ्याचदा काळजी घेऊनही छोटय़ा-मोठय़ा आजारांना प्रवासात सामोरे जावे लागते. अशा वेळी काही औषधे सोबत असणे उत्तम!

मळमळ- उलटय़ा

काहीजणांना बस, गाडी, विमानाच्या प्रवासात त्रास होतो. मळमळ आणि कधी कधी उलटय़ापण होतात. अशांनी वाहनात बसण्याआधी लिंबाचा रस, आल्याचा रस (दोन्ही १-१ चमचा) + साखर (१ चमचा) आणि मीठ (२ चिमूट) एकत्र करून पाणी घालून प्यावे.

अनेकदा अपचनानेही असा त्रास होतो, अशा वेळी दालचिनी पूड सोबत ठेवावी. पाव चमचा पूड पाण्याबरोबर दर २-३ तासांनी घेता येते.

आवळ्याची सुपारीसुद्धा चघळून खाता येते.

जुलाब

आरारूट व मक्याचे सत्त्व नेहमी जवळ ठेवावे. १-१ चमचा दोन्ही एकत्र करून त्यात पाणी व साखर घालून प्यावे.

जायफळ पूड (१ मोठा चमचा भरून) + गूळ (४ मोठे चमचे भरून)+ सुंठ (२ छोटे चमचे)+ तूप घालून वरील मिश्रणाच्या शेंगदाण्याएवढय़ा गोळ्या कराव्या. दर दोन-दोन तासांनी २-३ गोळ्या चघळून खाव्यात. अनेक दिवस या टिकत असल्यास प्रवासात नेण्यास शक्य असते.

अपचन – गॅस

अनेकदा चुकीच्या वेळी/ अतिप्रमाणात अन्नसेवनामुळे पोटफुगी, पोटदुखी, ढेकर येणे, अपचनामुळे असह्य़ छातीत किंवा पोटात दुखणे असे त्रास होतात. यासाठी पुढीलप्रमाणे चूर्ण तयार करून बरोबर न्यावे आणि प्रत्येक जेवणानंतर १ चमचा खावे. (बडीशेप चूर्ण+ जिरेपूड+ दालचिनी पूड+ तमालपत्र चूर्ण ) समप्रमाणात एकत्र करून डबीत भरून न्यावे. काळे मीठ चार चिमूट आणि हे चूर्ण एक चमचा असे प्रत्येक जेवणानंतर घ्यावे.

मांसपेशी वेदना

उन्हात फिरून, बर्फात चालून किंवा अतिथकवा आल्याने मांसपेशी थकतात. अशा वेळी पाठदुखी, मानदुखी, पायात गोळे येणे, सांधे दुखणे असे त्रास प्रवासात होण्याची शक्यता असते. पायांवर / पावलांवर सूजपण येते. अशा वेळी एप्सम सॉल्टची पाकिटे जवळ ठेवावी. (औषधांच्या दुकानात उपलब्ध असतात.)

१ लिटर पाण्यात १ चमचा पूड घालून त्यात पाय घालावे. बाथटब असेल तर पाण्यात एप्सम सॉल्ट घालून पडून राहावे अन्यथा या पाण्यात बुडवलेल्या पट्टय़ा त्या त्या ठिकाणी ठेवाव्या. मांसपेशी मोकळ्या होऊन वेदना व सूज कमी होते.

२ ते ३ बँडेज आणि मलम जवळ बाळगावे. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित वेळेवर घ्यावीत. एखादा आजार असेल त्याविषयीचे औषध चिठ्ठी आणि डॉक्टरांचा दूरध्वनी क्रमांक जवळ बाळगावा.

घशाचा संसर्ग

अनेक ठिकाणी तेलकट पदार्थ खाल्ले जातात, तसेच वारंवार थंड पदार्थ आणि पेयांचे सेवनही केले जाते. अशा वेळी सर्दी होण्याचा धोका असतो, तसेच घसापण दुखतो व गिळताना त्रास होतो.

लवंग+ खडीसाखर चघळून खाता येते.

ओवा रुमालात पुरचुंडी करून घ्यावा. त्याचा इनहेलरप्रमाणे वास घेण्यास उपयोग करता येतो. पुरचुंडी चुरून वास घेत राहावे.

हळदीचे चूर्ण न्यावे. गरम पाण्यात घालून गुळण्या करता येतात आणि पोटातही गरम पाण्याबरोबर घेता येते.

कानदुखी

प्रवासात सतत कानावर वारे किंवा एसीच्या हवेचा झोत बसल्याने कानदुखी होण्याची शक्यता असते. यासाठी स्कार्फ किंवा ओढणी कानाभोवती गुंडाळावी. कानात कापसाचे छोटे बोळे घालावे. हिंगाचे २-४ खडे सोबत न्यावे. हे खडे कापसात गुंडाळून रात्री कानात घालून झोपावे. अनेकांना विमान प्रवासाने कानात दडे बसतात. अशा वेळी विमान उडताना आणि उतरताना खडीसाखर व लवंग चघळत राहावे.

केसांची काळजी

प्रवासात धूळ साठल्याने केसांना हानी पोहोचते. प्रखर सूर्यप्रकाशातही अनेकदा हिंडावे लागते तर काही वेळा पाण्यातील खेळ, स्विमिंग यांमुळेही केसांवर विपरीत परिणाम होतो. यामुळे मग केसात खाज येते, अधिक प्रमाणात गुंता होतो. केस वेळेवर धुतले जातील ही

खबरदारी घ्यावी, तसेच केसांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने टोपी, ओढणी, स्कार्फ इत्यादीचा वापर अवश्य करावा. केस शक्यतोवर मोकळे सोडू नयेत. पाण्यात उतरण्यापूर्वी केसांना थोडे तेल लावावे.

काय टाळावे?

* उघडय़ावरील अन्नपदार्थ आणि अस्वच्छ पाणी.

*  झोपेची आणि जेवणाची अवेळ.

*  सतत उन्हात आणि वाऱ्यावर हिंडणे.

*  अंगातील ताकदीच्या पलीकडे पायपीट करणे.

*  प्रत्येक नवा पदार्थ खाल्लाच पाहिजे, असा अट्टहास करणे.

*  मसालेदार पदार्थ आणि थंड पेयांचा अतिरेकी वापर.

जखम किंवा मार लागणे

* हल्ली सहलीमध्ये अनेक खेळांचेही आयोजन केले जाते. डोंगर चढणे, रॅपलिंग, पॅरासेलिंग इत्यादी कारणांनी जखमा होणे किंवा मुका मार लागणे असे प्रसंग उद्भवतात. अशा वेळी सोप्या गोष्टींचा वापर करता येतो.

*  तूप+हळद यांचे मलम न्यावे, जे जखमांवर लावता येते.

*  सुंठपूड+ तुरटी चूर्ण समप्रमाणात एकत्र करून न्यावे. गरम पाण्यामध्ये पेस्ट तयार करून मुका मार लागल्यास किंवा सूज आल्यास लावता येईल.