आशुतोष बापट

पावसाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकवेळी महाबळेश्वर, माथेरान, कोकण अशाच ठिकाणी जायचं असं काही नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ठिकाणे आपली वाट बघत उभी आहेत. खान्देशच्या उंबरठय़ावर असलेले गौताळा अभयारण्य हे त्यातलेच एक. औरंगाबाद पासून वेरूळ-कन्नडमार्गे ११० कि.मी. तर चाळीसगावपासून जेमतेम २० कि.मी. वर असणारा हा सगळा प्रदेश! सातमाळा अजिंठा डोंगररांगांच्या मध्ये वसलेलं हे अभयारण्य अत्यंत रमणीय आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं आहे. श्रद्धाळू, पर्यटक, ट्रेकर्स, पक्षी निरीक्षक आणि पुरातत्त्व अभ्यासक या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची ठिकाणं येथे आहेत.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

कन्नडच्या पुढे गेल्यावर एक रस्ता पितळखोरा लेणीकडे जातो. या लेणीच्या समोरून जाणारा कच्चा रस्ता सरळ डोंगराच्या खाली धवलतीर्थापाशी असलेल्या पाटणादेवी मंदिराजवळ उतरतो. जवळजवळ एक ते दीड तासांची ही डोंगरातली भटकंती आहे. इथे दुसऱ्या बाजूने असलेला प्रवेश हा औट्रम घाट उतरून पाटणे गावामार्गे आहे. या सगळ्या प्रदेशाला गौताळा- औट्रम घाट अभयारण्य असं नाव आहे. पाटणे गावाच्यापुढे ३ कि.मी. वर पाटणादेवी मंदिर आहे. पितळखोऱ्याच्या बाजूने असो किंवा पाटणे गावाकडून असो अभयारण्यात जाताना चेकपोस्ट लागते आणि तिथे नाममात्र शुल्क आकारलं जातं. अभयारण्यात मुक्कामासाठी वनखात्याचं विश्रामगृह असून त्याचं आरक्षण औरंगाबादमध्ये होतं. पण पाटणे गावात पाटणादेवी मंदिर ट्रस्टचं अतिशय सुंदर भक्तनिवास आहे. तिथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते.

हा परिसर फिरायचा तर किमान दोन दिवसांचा मुक्काम तरी करायला हवा. पाटणादेवी हे ठिकाण थोर गणिती भास्कराचार्याचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या चंडिका मंदिरात देवीची भव्य मूर्ती असून मंदिराच्या बाहेर दोन मोठय़ा दीपमाळा आहेत. मंदिरात एक २४ श्लोकांचा देवनागरी लिपीतील शिलालेख असून तो भास्कराचार्याचा नातू चंगदेव याने इ.स. १२०६ मध्ये कोरलेला आहे. तो भास्कराचार्याची वंशावळ तसेच त्यांचे कार्य, त्याचसोबत यादव आणि निकुंभ राजघराण्याबद्दल माहिती देतो. याशिवाय सन १२०६ ला प्रभवनाम संवत्सर असताना श्रावण पौर्णिमेला चंद्रग्रहण होते त्या वेळी श्री सोन्हदेवाने आपल्या गुरूने स्थापिलेल्या मठाला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. मठाला मंदिर दान दिलेलं आहेच शिवाय पाटणे बाजारात जो व्यापार होई त्यावर काही कर बसवून तो मठाला दिल्याचा उल्लेखही इथे केलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे उंचचउंच डोंगर दिसतात. इथून एक रस्ता केदारकुंड या ठिकाणी जातो. अंदाजे २ कि.मी. ची पायपीट केली की तो रस्ता तीनही बाजूंनी असलेल्या डोंगरांनी बंद झालेला आहे. समोरच्या डोंगरावरून पावसाळ्यात धबधबा कोसळत असतो आणि त्याच्या पाण्यामुळे खाली मोठं कुंड तयार झालं आहे. ऐन जंगलात असलेलं हे ठिकाण नितांतसुंदर आहे.

पाटणे गावातून देवीच्या मंदिराकडे जाताना वाटेत उजवीकडे रस्त्याचा फाटा एका महादेव मंदिराकडे जातो. इ.स. १२ व्या शतकात बांधलेलं हे मंदिर कण्हेरगडाच्या मांडीवर वसलेलं आहे. १० फूट उंचीच्या जोत्यावर असलेलं हे मंदिर शिल्पसमृद्ध आहे. या मंदिराचे स्तंभ आणि बाह्यभागावर असलेली शिल्पकला केवळ सुंदर. या मंदिरातही एक २४ ओळींचा शिलालेख असून त्यात निकुंभ वंशातील राजांची वंशावळ आहे. निकुंभ राजा इंद्रदेव याने हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि त्याचा पुत्र गोवन तिसरा याने ११५३ साली हे मंदिर पूर्ण केलं, असा स्पष्ट उल्लेख आहे.

मंदिराच्या शेजारून एक पायवाट कण्हेरगडाच्या डोंगराकडे जाते. पुढे ही पायवाट डोंगरावर चढते. चाळीसगावातल्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने जागोजागी फलक लावलेले आहेत. तसेच डोंगराचा चढावाचा भाग पायऱ्या खोदून सोपा केलेला आहे. इथे डोंगराच्या पोटात दोन लेणी खोदलेली आहेत. पाहिलं आहे ते नागार्जुन लेणं. हे जैन लेणं असून आत र्तीथकरांची सुंदर मूर्ती आहे. त्यांच्या बाजूला सेवक तसंच पुढे एका बाजूला सर्वानुभूती यक्ष तर दुसऱ्या बाजूला अंबिका यक्षी यांच्या सुंदर मूर्ती दिसतात. इथून आजूबाजूचा परिसर फार सुंदर दिसतो. या लेणीच्या काहीसं पुढे गेल्यावर सीतेची न्हाणी नावाचं अजून एक लेणं दिसतं मात्र या लेणीत काहीही नाही.

हीच पायवाट पुढे कण्हेरगड या किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर तटबंदी आणि पाण्याचं एक टाकं आहे. इथूनच समोर असलेला पितळखोरा लेणीचा डोंगर आणि त्याच्या माथ्यावर केलेलं बांधकाम दिसतं.

या सगळ्या परिसरात असंख्य पक्षी आढळतात. मोर, सातभाई, कोतवाल, तांबट, हळद्या, खंडय़ा, धनेश अशा अनेक पक्ष्यांचा कलकलाट सतत कानावर पडतो. ऐन पावसात या ठिकाणी जाऊन एक वेगळंच विश्व अनुभवता येतं. आपला आवाज बंद ठेवला तर जंगलाचा आवाज ऐकण्याची पर्वणी इथे अनुभवता येते. इथल्या अभयारण्यात बिबटे, तरस, डुकरे, लांडगे, ससा, माकड असे विविध प्राणी वसतीला आहेत. सातमाळा-अजिंठा डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गौताळा अभयारण्य आणि इथला परिसर हा आपला अनमोल ठेवा आहे. इथलं वातावर गढूळ न करता आपण या वनसंपदेचा मनमुराद आस्वाद घ्यावा.