मारुती सुझुकीने ‘ओम्नी’ या त्यांच्या लोकप्रिय एमपीव्हीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून उत्पादनात असलेल्या या गाडीचा प्रवास लवकरच संपणार आहे. ओम्नीची जागा ‘मारुती’च्या ‘इको’ने घेतली आहे.

सध्या मारुतीची व्हॅन या संज्ञेत बसणारी इको ही केवळ एकच गाडी बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे साहजिकच ओम्नीची जागा इको घेणार आहे. भारतीय सरकारने लागू केलेले नवे सुरक्षा नियमांची पूर्तता करता न येऊ  शकल्याने या गाडीचे उत्पादन बंद होत आहे. गाडीची अपघात सहन करण्याची क्षमता (क्रॅश टेस्ट) आणि कार्बन उत्सर्जनाचे नियम ऑक्टोबर २०१९ आणि एप्रिल २०२०मध्ये लागू केले जाणार आहे. भारत सरकारने सर्व वाहनांसाठी सुरक्षा नियमावलीची अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. यात सर्व चारचाकी वाहनांमध्ये एअरबग, एबीएस आणि ईबीडीसह इतर सुरक्षा उपकरणे अनिवार्य केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने करावयाचे हे बदल मारुतीला शक्य होते मात्र ऑक्टोबर २०१९ मध्ये लागू होणाऱ्या क्रॅश टेस्टच्या मानदंडाची पूर्तता ओम्नीला करता आली नसती. म्हणूनच या गाडीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

१९८४ पासून ओम्नीच्या विक्रीला सुरुवात झाली. तेव्हापासून या गाडीची अनेक सुधारित संस्करणे बाजारात आली. परंतु गाडीने आपला मूळचा चौकोनी डब्यासारखा आकार कायम ठेवला. ३५ वर्षे झाली, तरी गाडीच्या विक्रीवर फारसा नकारात्मक परिणाम दिसत नव्हता. आतापर्यंत महिन्याला सहा ते सात हजार ओम्नी विकल्या जात होत्या. ओम्नी ही ८०० नंतर भारतीय बाजारात दाखल करण्यात आलेली दुसरी गाडी होती. ओम्नीला ओम्नी हे नाव १९८८ मध्ये मिळाले त्याआधी या गाडीला मारुती व्हॅन म्हणूनच ओळखले जात होते.  क्राइस्टलरने याच नावाची डोज ओम्नी ही गाडी १९७८ मध्ये बाजारात आणली होती. मारुतीची मल्टी पर्पज व्हेईकल (एमव्हीपी)ओम्नी ही मारुती व्हॅन या नावाने सर्वाना परिचित होती. ही गाडी दोन पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध होती. पाच आसनांच्या व्हॅनची मुंबई एक्स शोरूम किंमत ही २.९९ लाख तर आठ आसनांच्या गाडीची किंमत मुंबई एक्स शोरूम किंमत ही ३.०१ लाखापासून सुरू होते. ओम्नीचे उत्पादन बंद केल्यामुळे आता मारुतीची इको ही एकमात्र व्हॅन बाजारात उपलब्ध आहे. तिचे नवे संस्करण कंपनीने या वर्षी बाजारात दाखल केले आहे. इको किमतीने ओम्नीहून ६०-७० हजार रुपयांनी महाग आहे.

ओम्नीत ८००सीसीचे तीन सिलिंडरचे पेट्रोल इंजिन असून ते ३४ बीएचपी आणि ५९ एनएम टॉर्क निर्माण करतात. ४ स्पीड मॅन्युअल गेअर बॉक्स आहे. ८०० सीसी इंजिन असलेल्या सर्वच गाडय़ांचे उत्पादन मारुती बंद करणार असून यामध्ये ‘अल्टो’चाही समावेश आहे.

देशाच्या ग्रामीण भागात अजूनही ओम्नीला चांगली मागणी आहे. गाडी ही आपल्या बहुपयोगी वाहन या श्रेणीला साजेसे काम करते. खासगी, वाहन, प्रवासी वाहन, सामानाची वाहतूक करणे अशी ओम्नीची अनेक वैशिष्टय़े आहेत. मोठे कुटुंबांसाठीदेखील कमी किमतीची परवडणारी ओम्नी ही पहिली निवड असायची. ही गाडी सांभाळणे आणि विकत घेणे हे दोन्ही खिशाला परवडणारे होते. गाडीच्या आकारामुळे ती वळवण्यात आणि कुठेही उभी करण्यात सोपी होती म्हणून व्यवसायांमध्ये या गाडीचा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात आला. आतापर्यंत दीड कोटीहून अधिक ओम्नी विकल्या गेल्या आहेत. १९९८ आणि २००५ मध्ये या गाडीची नवीन संस्काराने बाजारात दाखल करण्यात आली. गाडीची वाढती लोकप्रियता पाहून २००३ मध्ये ओम्नी एलपीजी आणि २००४ मध्ये ओम्नी कारगो एलपीजी लाँच करण्यात आली.

गाडीची रचना अशी होती की, चालक हा समोरच्या चाकांपुढे बसत असे. त्यामुळे गाडी चालवीत असताना बस चालवीत असल्याप्रमाणे वाटते. चालकाची आसनव्यवस्था अशा प्रकारची असल्यामुळे चालकाला अतिशय चांगली दृश्यमानता मिळते. गाडीचे इंजिन हे पुढील सीटच्या खाली होते. त्यामुळे महामार्गावरून किंवा लांबचा प्रवास करताना इंजिन गरम झाल्यावर गाडीच्या केबिनमध्येदेखील घामाच्या धारा लागायच्या. गाडीला पॉवर स्टेअिरग किंवा पावर विण्डो अशा सुविधा सुरुवातीला नव्हत्या.

घरातली पहिली गाडी, शालेय वाहन, व्यावसायिक वाहन, रुग्णवाहिका अशा प्रकारच्या अनेक भूमिका पार पडणाऱ्या ओम्नीचा प्रवास संपला असला तरी तिच्या चाहत्यांच्या मनात या बहुपयोगी गाडीची आठवण कायम  राहणार आहे.

यांचाही गुडबाय

मारुती सुझुकी जिप्सी किंमत : ५.८६ लाख (मुंबई एक्स शोरुम)

तरुणांना एकेकाळी भुरळ पाडणारी आणि अजूनही आपला एक खास चाहता वर्ग राखून ठेवणारी जिप्सी ही मारुतीच्या सर्वात जुन्या गाडय़ांपैकी एक आहे. १९८० मध्ये बाजारात दाखल झालेली ही गाडी या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये बंद होऊ  शकते. या गाडीला जमिनीच्या दुसरे संस्करणाची एक आवृत्ती म्हणून पाहिले जात होते. अवघड रस्त्यांवरील कामगिरीमुळे या गाडीने कमालीची लोकप्रियता मिळवली. वजन कमी असल्याने (९८० किलो) ओबडधोबड मार्गावर देखील सहज जाणाऱ्या या गाडीला ‘माऊंटन गोट’ असे म्हटले जात होते. भारत न्यू व्हेहिकल अ‍ॅसेसमेन्ट सेफ्टी प्रोग्रॅम (बीएसएनएसएपी)च्या मानदंडाचे पालन करता येत नसल्याने ही गाडी बंद होणार आहे. या गाडीची जागा कोण घेणार याबाबत अजून कंपनीकडून काही स्पष्ट करण्यात आले नाही.

महिंद्रा झायलो

किंमत : ८.९९ लाख (मुंबई एक्स शोरुम)

जवळपास दशकभर जुनी असलेली झायलो महिंद्राच्या सर्वात जुन्या गाडय़ांपैकी एक आहे.  स्कॉर्पिओच्या पहिल्या संस्करणाच्या चासीवर आधारित असलेली झायलो भारतात लागू होणारे कॅ्रश चाचणी मानदंड पूर्ण करू शकणार नाही. विशेष म्हणजे स्कॉर्पिओचे दुसरे संस्करण ग्लोबल एनसीएपी मानांकनात कोणतेही गुण मिळवण्यात अपयशी ठरले. गाडीचे बॉडी शेल अस्थिर असल्याचा निर्वाळा देण्यात आला. महिंद्रने झायलोची उत्तराधिकारी म्हणून ‘टीयूव्ही ३०० प्लस’ बाजारात आधीच दाखल केली आहे. त्यामुळे झायलो २०१९ मध्ये बंद करण्यात येणार आहे.

टाटा नॅनो

सर्वात स्वस्त गाडी म्हणून संपूर्ण जगाच्या कुतूहलाचा विषय ठरलेल्या नॅनोच्या प्रवासाची सांगता या वर्षी होण्याची शक्यता आहे. स्वस्त किंमत ही नॅनोची जमेची बाजू या गाडीच्या अपयशासदेखील कारणीभूत ठरली. जगातील सर्वात कमी किमतीची गाडी असूनही या गाडीचा खप आटत चालला आहे. नॅनो ही टाटासाठी एक भावनिक मुद्दा ठरल्याने तिची विक्री सुरूच ठेवण्यात आली. सद्य:स्थितीत नॅनोला भारताच्या नव्या सुरक्षा मानदंडाची पूर्तता करता येणार नाही. त्याचप्रमाणे नॅनोसाठी टाटाकडून त्यासाठी गुंतवणूक केली जाण्याचीही शक्यता कमी असल्याचे वर्तवले जात आहे.

होंडा ब्रिओ किंमत : ४.८२ ते ६.९५ लाख (मुंबई एक्स शोरुम)

तांत्रिकदृष्टय़ा आधुनिक आणि सोयीसुविधांयुक्त गाडय़ा पर्याय म्हणून दाखल होत असल्याचे होंडा ब्रिओला बाजारात तग धरून राहणे कठीण होत आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये या गाडीची विक्री अत्यंत कमी झाली. त्याचप्रमाणे स्विफ्ट आणि आयटेनकडून मिळणाऱ्या स्पर्धेला तोंड देणे ब्रिओला कठीण होत आहे. ब्रिओचे सुधारित संस्करण या वर्षी इंडोनेशियात सादर करण्यात आले, परंतु ही नवी ब्रिओ भारतीय बाजारात दाखल होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.