शहरशेती : गच्चीवरील वेलवर्गीय भाज्या

शेंगा झुबक्याने येत असल्यामुळे इंग्रजीत या भाजीला क्लस्टरबिन असेही म्हणतात.

राजेंद्र श्रीकृष्ण भट

वेलवर्गीय भाज्यांमध्ये जास्त खाल्ली जाणारी भाजी म्हणजे गवार. तिचा उपयोग गवारगम तयार करण्यासाठीही केला जातो. या भाजीला थंडी आवडत नाही, कीड फारशी लागत नाही. शेंगा झुबक्याने येत असल्यामुळे इंग्रजीत या भाजीला क्लस्टरबिन असेही म्हणतात. गवारचे दोन प्रकार आहेत. स्थानिक गावरान आणि सुधारित.

स्थानिक गावरान : ही गवार पांढरट रंगाची, जाडसर आणि आखुड असते. तिला थोडी खाज असते. चवीला अप्रतिम असते. तिचा  वापर गवारमगसाठी केला जातो.

सुधारित गवार : शेंगा हिरव्यागार, लांब आणि कोवळ्या असतात. दिसायला चांगली असते आणि उत्पादन उत्तम येते.

गवारीच्या झुडपाला सामान्यपणे फांद्या येत नाहीत. फांद्या येणारी पुसा दोमोसमी ही एक जात आहे. पुसा सदाबहार आणि शरद बहार या जाती चांगल्या वाढतात.

गवारीला साधारण ४० व्या किंवा ४५ व्या दिवशी फुले येण्यास सुरुवात होते. या पिकाला पाणी अतिशय कमी लागते. पाणी जास्त दिल्यास शेंगा येत नाहीत. जास्त पाणी आणि कमी उन्हामुळे भुरी नावाचा आजार होऊ शकतो. पानांवर पांढरी आणि पावडरसारखी दिसणारी बुरशी वाढते. त्यासाठी एक लिटर पाण्यात एक कप गोमूत्र मिसळून फवारणी करावी किंवा शेवग्याच्या आणि पपईच्या पाल्याचा एकत्रित काढा करून त्याची फवारणी करावी.

पहिली शेंग तोडणीसाठी येण्यास जेवढे दिवस लागतात, तेवढाच काळ पुढे शेंगा येत राहतात.  यातील काही शेंगा पूर्ण जून झाल्यावर झाडावरच सुकू देऊन त्याचे बी पुढील लागवडीसाठी वापरावे. डाळ, तांदूळ, भाजी, मासे, मटण आदी धुतलेले पाणी आणि अधुनमधून थोडे ताक घातल्यास पोषणासाठी पुरते. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करणे ही गवारीचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी गुरुकिल्ली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Growing vegetables on terrace