scorecardresearch

अस्स लिव्हिंग रूम सुरेख..

लिव्हिंग रूम डिझाइनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बैठक व्यवस्था केली जाते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

घराची सजावट करताना लिव्हिंग रूम डिझाइनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बैठक व्यवस्था केली जाते. बैठक व्यवस्थेशिवाय लिव्हिंग रूम पूर्ण होऊ शकत नाही. लिव्हिंग रूमच्या इतर कोणत्याही फर्निचरपेक्षा बैठक व्यवस्था सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. कारण लिव्हिंग रूममध्ये बसणे हाच सर्वात महत्त्वाचा भाग असतो. यामध्ये  फॉर्मल सीटिंग, सेमी फॉर्मल सीटिंग, इनफॉर्मल सीटिंग, कॅज्युअल सीटिंग, युटिलिटी सीटिंग व थीम बेस्ड सीटिंगअसे काही प्रकार आहेत. फॉर्मल सीटिंग म्हणजेच सर्वत्र दिसणारा सोफा. पूर्णपणे अपहोलस्ट्रीने झाकलेला हा सोफा पाश्चिमात्य पद्धतीने तयार केला आहे. हा सोफा बनवताना सर्वप्रथम लाकडाची चौकट म्हणजेच सोफ्याचा सांगाडा बनवला जातो. त्यावर गरजेनुसार विशिष्ट जाडीचा फोम चढवला जातो व सगळ्यात शेवटी अपहोलस्ट्रीने सजवण्याचे काम केले जाते. अपहोलस्ट्रीमध्ये लेदर, रेग्झिन व कापड मुख्यत्वे वापरले जाते. या प्रत्येक प्रकारात खूप प्रकार उपलब्ध आहेत. आधी हा सोफा शोरूममध्ये तयार स्वरूपात मिळायचा, पण गेल्या काही वर्षांपासून आपल्या गरजेनुसार सोफा बनवून मिळतो. घरी सोफा बनवून घेण्याचा फायदा असा की, वापरल्या जाणाऱ्या मटेरियलच्या दर्जाची खात्री देता येते. कारखान्यातून बनवून आणलेला सोपा बादर्शनी दिसायला जरी सुंदर दिसत असला तरीही आत सुमार दर्जाचे मटेरियल वापरले जाण्याची शक्यता असते. या कारणास्तव खात्रीच्या शोरूममधूनच सोफा खरेदी करावा. काही शोरूम्स विशिष्ट कालावधीची हमीही देतात. या कालावधीत सोफ्यास काही झाल्यास तो विनामूल्य दुरुस्त करून दिला जातो. अर्थात सोफा खराब होण्यात ग्राहकाची चूक नसावी. शोरूममधून सोफा घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे सोफा बनवताना होणाऱ्या त्रासामुळे सुटका होते.

फॉर्मल सोफा पूर्णपणे अपहोलस्टर्ड असल्याने थोडा बोजड भासण्याची शक्यता असते. म्हणूनच सोफ्याचे डिझाइन काळजीपूर्वक निवडावे. लहान आकाराच्या लिव्हिंग रूममध्ये फॉर्मल सोफा वापरणे कटाक्षाने टाळावे, अन्यथा आधीच लहान असलेली लिव्हिंग रूम आणखीनच लहान वाटायला लागेल. फॉर्मल सीटिंग या प्रकारात अनेक डिझाइन्स उपलब्ध आहेत. सुताराकडे असलेल्या डिझाइन्स कॅटलॉगमधून आपण  इंटिरिअरला शोभेल असे डिझाइन निवडावे.

  • सेमी फॉर्मल सीटिंग- सेमी फॉर्मल सीटिंग हे फॉर्मल बैठकीपेक्षा थोडे वेगळे असते. या प्रकारात फॉर्मल सोफ्यासारखे पूर्णपणे अपहोलस्ट्रीने झाकले जात नाही. यात सोफ्याची लाकडी फ्रेम मुद्दाम दाखवली जाते. ती सुंदर दिसण्यासाठी खास पॉलीश करून घेतली जाते. आर्मरेस्ट म्हणजेच सोफ्यावर बसल्यावर हात ठेवण्याच्या जागेवरही अपहोलस्ट्री लावली जात नाही. तसेच सोफ्याचे लाकडी पायही दाखवले जातात. त्यामुळे सीटच्या खाली मोकळी जागा राहते. यामुळेच हा सोफा बोजड वाटत नाही. लहान आकाराच्या लिव्हिंग    रूममध्ये या प्रकारचे सेमी फॉर्मल सीटिंग वापरल्याने रूम फार भरल्यासारखी वाटत नाही. सुटसुटीत वाटते. या सोफ्याची फ्रेम दिसत असल्याने ती मजबूत व शोभिवंत लाकडापासून बनवली जाते. यात केवळ बसण्यासाठी असलेल्या सीटसाठी व पाठ टेकवण्यासाठी असलेल्या बॅकरेस्टसाठी कुशन्स बनवली जातात. या प्रकारात कुशन्ससाठी झिप असलेली वेगळी कव्हर्सही शिवता येतात. त्यामुळे आपण हवे तेव्हा सोफ्याचा लुक बदलू शकतो. या प्रकारच्या सोफा सेट्समध्ये खूप प्रकारची डिझाइन्स उपलब्ध आहेत. लाकडाच्या चौकटीचे सोफा सेट्स वीस वर्षांपूर्वी खूप प्रमाणात वापरले जात. हाच ट्रेंड हल्ली परत आला असून खूप लोकप्रिय होत आहे. सगळ्या शोरूममध्ये व ऑनलाइनही या प्रकारचे सोफा सेट्स मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. सेमी फॉर्मल बैठकीचे सोफे लोकप्रिय आहेत.
  • इनफॉर्मल सीटिंग- अजिबात फॉर्मल नसलेली सीटिंगअशी या इनफॉर्मल सीटिंगची व्याख्या करता येईल. वेगवेगळ्या आकाराचे, डिझाइनचे, रंगाचे सीटिंग जे आपल्याला कॅफे, लाऊंज अशा ठिकाणी पाहावयास मिळते, ते सीटिंगही या इनफॉर्मल प्रकारात मोडते. यात तऱ्हेतऱ्हेची मटेरियल्स वापरली जातात. जसे की मेटल, स्टोन, रॉट आयर्न, केन (बांबू). या मटेरियल्सपैकी रॉट आयर्न व केनने बनवलेल्या सीटिंगचा वापर होम इंटिरियरमध्ये जास्त होतो.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2018 at 03:15 IST

संबंधित बातम्या