राजेंद्र श्रीकृष्ण भट

सर्वसामान्यपणे, थोडय़ा सावलीत वेगवेगळी झाडे लावता येतात व त्यांचे अनेक उपयोग सुद्धा असतात. सौंदर्य, सुगंध, खाद्य, औषध, वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरवणे, घरातील हवा शुद्ध करण्यास मदत करणे, असे अनेक फायदे झाडांपासून मिळतात.

बहुतेक घरांच्या दारा-खिडक्यांवर हमखास लावली जाणारी, हिरव्यागार, सुबक पानांनी सौंदर्यात भर घालणारी आणि अतिशय कमी काळजी घ्यावी लागणारी वेल म्हणजे मनीप्लँट. बाटलीत पाणी भरून त्यात वेलीचा तुकडा कापून ठेवला तरी ती आनंदाने वाढते. या वेलीच्या फायद्यांवर कानपूर आयआयटीने बरेच संशोधन केले आहे.

या वेलीमुळे घरातील वातावरण शुद्ध करण्यात मोठी मदत होते, असे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. मनीप्लँटची लावलेल्या बाटलीतील पाण्यात अधूनमधून थोडी साखर घातल्यास वेल छान वाढते. पाने मोठी व चमकदार होतात. ही वेल पाण्याऐवजी मातीत लावली व मॉशस्टिकवर वाढवली तर आणखी छान दिसते आणि वाढते. लाकडाच्या दांडीला किंवा प्लास्टिकच्या पाइपला शेवाळे गुंडाळून मॉशस्टिक तयार केली जाते. हे शेवाळे ओलावा धरून ठेवते व त्यावर मुळे वाढून वेल चांगली पकड घेते. मुळांमधून व हवेमधून अन्न घेत वेलीची वाढ चांगली होते.

घरातील दृश्य बाहेर दिसू नये यासाठी संपूर्ण खिडकीच्या ग्रिलवर ही भरभर वाढणारी वेल चढवल्यास सुंदर आडोसा तयार होतो. दरवाजाभोवतीही महिरप तयार करून घराची वेगळी ओळख निर्माण करता येते.

rsbhat1957@gmail.com