ताणमुक्तीची तान : आनंदी राहणे ही नैसर्गिक क्रिया

आनंदी राहणे ही आपल्याला आपली जबाबदारी वाटायला लागली आहे. समाजमाध्यमांमुळे हे घडत असावे.

स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी, अभिनेते

आनंदी राहणे ही आपल्याला आपली जबाबदारी वाटायला लागली आहे. समाजमाध्यमांमुळे हे घडत असावे. पण याच वाढत चाललेल्या भावनेमुळे आपल्या प्रत्येकावरचा ताण वाढत चालला आहे. आनंदी राहणे ही काही जबाबदारी नाही ती नैसर्गिक क्रिया आहे हे आपण सर्वानीच समजून घ्यायला हवे. आजकाल मी ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ पाहिल्यावर वाटते सगळेच सुंदर दिसतात. कमी सुंदर किंवा व्यंग असलेली माणसेच नाहीत की काय जगात? आपण सर्वच जण खोटी छायाचित्रं समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करतो. ब्युटीअ‍ॅप, एडिटिंग काय-काय वापरतो.

पूर्वी आपण माणसांवर प्रेम करायचो आता आपण अवतारांवर प्रेम करायला लागलो आहे. नवरा-बायकोचे कडाक्याचे भांडण झाले तरी रात्री स्टेटस असतो की ‘फिलिंग ब्लेस्ड’. आपण जगाला नंतर स्वत:ला पहिले फसवीत असून आपण आपला अवतार बनवीत चाललो आहोत. विश्वास ठेवायचा प्रयत्न करतो की आपण खोटे पण अवतार खरा. मला असे वाटते, आतापर्यंत फसलेले हे गणित आहे. सत्यापासून आपण लांब चाललो आहोत का? एकदा हे पाहायलाच हवे आपण. कारण त्याचमुळे आपण तणावात येतोय.

पूर्वी प्रेम कसे व्हायचे? मुलगा मुलीला बघायचा. मग तो महिनाभर वाट पाहायचा. मग तिने प्रतिसाद दिल्यावर तो नाक्यावर उभा राहायचा, असे करता करता वर्षभरात ते नात जुळायचे. आता त्वरित प्रतिसादाचे युग आहे. मात्र एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी, जे बनवायला जितका जास्त वेळ लागतो ते तितके जास्त वेळ टिकतेसुद्धा. मी काही गोष्टी पाळतोच, त्यामध्ये मी रोज दोन तास फोनला हात लावत नाही. रात्री घरी आल्यावर फोन बंद करतो. आपण दारू प्यायला लागल्यावर काही वेळाने तीच आपल्याला प्यायला सुरुवात करते, तसेच समाजमाध्यमांचे आहे.

मला लोक विचारतात की तू इतका चिरतरुण कसा राहतोस? तर त्यामागे काही रॉकेट सायन्स नाही. मी झोपायच्या एक तास आधी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करतो. लहानपणी कट्टे, नाके, रात्री जेवून झाल्यावर जिन्यात मारलेल्या गप्पा. यात वेगळेपण होते. संवाद व्हायचा. मी संवाद करतो आणि तो सर्वानीच केला पाहिजे.

मी रेडिओवर ‘शेअर इट विथ स्वप्निल’ हा कार्यक्रम सुरू केला, कारण कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे. मी समाजाला परत काय देतो हे महत्त्वाचे. आम्ही लोकांना बोलण्याचे आवाहनच करीत आहोत, हा कार्यक्रम नसता तर एवढे लोक कदाचित बोललेच नसते. हा आकडा सतत वाढत चालला आहे. यातून एकच कळते खूप लोकांना व्यक्त व्हायचे आहे. आणि म्हणूनच मला असे वाटते, बोलणे आणि ऐकणे आपण परत सुरू करायला पाहिजे. तेही खरे, समोरासमोरच बोलणे, ऐकणे. या संवादात आपल्याला खुलवण्याची क्षमता आहे.

(शब्दांकन – सौरव आंबवणे)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Natural action is to remain happy says actor swapnil joshi