ऑफ द फिल्ड : ‘आयसीसी’च्या नियमांचा खेळखंडोबा!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा १२वा हंगाम नुकताच नाटय़मयरीत्या संपला.

(संग्रहित छायाचित्र)

ऋषिकेश बामणे

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा १२वा हंगाम नुकताच नाटय़मयरीत्या संपला. अंतिम सामना सुपर ओव्हरनंतरही ‘टाय’ राहिल्यामुळे सर्वाधिक सीमापार फटके लगावल्याचा निकष लावून इंग्लंडला विश्वविजेतेपद बहाल करण्यात आले. आयसीसीच्या या नियमांवर जगभरातून टीका सुरू आहे. एवढेच नव्हे तर, यानिमित्ताने आयसीसीचे अन्य काही वादग्रस्त नियमही चर्चेत आले आहेत.

१. ‘टाय’ सुपर ओव्हर

रविवारी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत इंग्लंड-न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये संपूर्ण १०० षटके व त्यानंतरची सुपर ओव्हर खेळूनसुद्धा बरोबरीत सुटला. त्यामुळे सर्वाधिक सीमापार फटके लगावणाऱ्या संघाला (चौकार+षटकार मिळून) म्हणजेच इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. परंतु न्यूझीलंडला दुर्दैवाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यामुळे आजी-माजी क्रिकेटपटूंनी या नियमात बदल करण्याचे सुचवले. काहींनी आणखी एक सुपर ओव्हर खेळण्याचा पर्याय सुचवला, तर काहींनी दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्याचेही सांगितले. त्याशिवाय फक्त सीमापार फटक्यांची गणना करण्याव्यतिरिक्त कोणत्या संघाने किती चेंडू निर्धाव खेळले, हेदेखील विचारत घेऊन मग विजेता निवडावा, असे सुचवले.

२. ‘ओव्हरथ्रो’च्या धावा

विश्वचषकाच्याच अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात दुसरी धाव घेताना न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने टाकलेला थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेपार गेला. मुख्य म्हणजे गप्टिलने थ्रो केला तेव्हा इंग्लंडच्या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना ओलांडलेसुद्धा नव्हते. कारण नियमांनुसार क्षेत्ररक्षकाने थ्रो फेकण्यापूर्वी दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले असेल, तरच ती धाव ग्राह्य़ धरली जाते. परंतु यामध्ये पंचांनी इंग्लंडला पाच धावा देण्याऐवजी सहा धावा बहाल केल्या आणि त्याचा फायदा इंग्लंडला झाला.

३. ‘अंपायर कॉल्स’चे गौडबंगाल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा कसा बाद झाला, हे तुम्हाला ठाऊक असेलच. त्यामुळे ‘अंपायर कॉल्स’ आणि ‘डीआरएस’संबंधी नियमांवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. ‘डीआरएस’नुसार पायचीत अथवा झेलबाद अशा कोणत्याही प्रकारच्या बळीमध्ये पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात खेळाडू दाद मागू शकतात, परंतु रिप्लेमध्ये तिसऱ्या पंचांकडे ठोस पुरावा नसल्यास मैदानावरील पंचांचा ‘सॉफ्ट सिग्नल’ म्हणजेच ‘अंपायर कॉल्स’ कायम ठेवावा लागतो. मात्र त्या सामन्यात रोहितला बाद ठरवण्यात आले. त्याशिवाय ‘अंपायर कॉल्स’नुसार चेंडूंचा यष्टय़ांना ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी भागात स्पर्श होत असेल, तर पंचांचा निर्णयच अंतिम मानला जायचा, त्याशिवाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ‘डीआरएस’देखील गमवावा लागायचा. परंतु १ ऑक्टोबर, २०१७पासून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांनुसार आता पंचांनी आढावा घेतला तरी ‘डीआरएस’ वाचवता येणे शक्य आहे. मात्र तरीही याचा फटका महत्त्वांच्या सामन्यात अनेक संघांना पडत आहे.

४. ‘पॉवरप्ले’ दोन्ही संघांना घातक?

२०१५च्या विश्वचषकात पहिल्या १० षटकांचा अनिवार्य ‘पॉवरप्ले’ झाल्यानंतर उर्वरित ४० षटकांत फलंदाजी व क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कधीही पाच-पाच षटकांचे ‘पॉवरप्ले’ घेण्याची मुभा होती. मात्र नव्या नियमांनुसार पहिली १० षटके पहिला, ११ ते ४० दुसरा व ४१ ते ५० षटकांदरम्यान तिसरा ‘पॉवरप्ले’ अनिवार्य आहे. त्यानुसार अनुक्रमे दोन, चार व पाच क्षेत्ररक्षक ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची संधी गोलंदाजी करण्याला संघाला मिळते. मात्र या नियमांनंतरही न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात महेंद्रसिंह धोनी धावचीत झालेल्या चेंडूवर चक्क सहा खेळाडू ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर असल्याचे एका चित्रफितीद्वारे उघडकीस आल्याने क्रीडाविश्वात खळबळ माजली.

५. ‘मंकडिंग’चे वादळ

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये एका सामन्यात रवीचंद्रन अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकिंग क्रीझ सोडलेल्या जॉस बटलरला धावचीत केल्यामुळे (मंकडिंग) आणखी एका वादाला तोंड फुटले होते. क्रिकेटच्या नियमांनुसार अश्विनने केलेले कृत्य योग्य असले तरी त्यापूर्वी किमान एक वेळा फलंदाजाला इशारा देणे आवश्यक आहे, असे काहींचे म्हणणे होते. तर काहींनी यामुळे क्रिकेटची प्रतिमा डागळत असून खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले.

६. ‘चकिंग’चे चक्रीवादळ

१९९५च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पंच डॅरेल हेर यांनी श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचे तब्बल सात चेंडू नो-बॉल ठरवले. कोणत्याही गोलंदाजाने १५ अंशापेक्षा अधिक कोपरा वाकवल्यास त्याला नो-बॉल घोषित करण्यात येते. अशा प्रकारच्या गोलंदाजीला चकिंग असे संबोधण्यात येते. परंतु एकीकडे मुरलीधरन, सुनील नरिन, मोहम्मद हफीझ यांसारख्या नामांकित गोलंदाजांना याचा फटका बसला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Off the field article on icc rule in cricket world cup abn