ओंकार वर्तले 

पुणे जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात असणाऱ्या मावळ तालुक्याला पवना आणि इंद्रायणी या दोन मुख्य नद्यांचा परिसस्पर्श झाला आहे. या दोन नद्या मावळच्या संस्कृतीची प्रतीकेच आहेत. या नद्यांमुळे मावळ खऱ्या अर्थाने सुजलाम्-सुफलाम् झाले आहे. कला, संस्कृती, अध्यात्म, समाजजीवन इत्यादींचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास या खोऱ्यांना भेट द्यायलाच हवी!

माणूस आणि नदी यांचं नातंच घट्ट आहे. कितीतरी समुदाय हे भारतातील विविध नद्यांच्या काठी स्थिरावले, त्यांची प्रगती झाली. सह्य़ाद्रीच्या घाट माथ्यावरील डोंगरांतून उगम पावलेल्या नद्या या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. दोन डोंगरांच्यामधून वाहत गेलेल्या नदीचा प्रदेश म्हणून पवना खोरं आणि इंद्रायणीचं खोरं प्रसिद्ध आहे. या दोन नद्यांनी मावळची संस्कृती, कला विकसित केली आहे. या खोऱ्यातूनच स्वराज्याचा नाद  घुमला. येथील गड-किल्ले, लेण्या, मंदिरे याची साक्ष देतात.

पवना नदीच्या परिसराला पवनेचं खोरं किंवा पवनमावळ असं म्हटलं जातं. हे नाव शिवकाळात मोठा आब राखून होतं. सह्याद्रीच्या घाट-माथ्याजवळ असलेल्या मुख्य डोंगरातून ही नदी उगम पावते. आतवण हे तिचं उगमस्थान. सहारा-लोणावळा रस्त्याला खेटूनच हे गाव आहे. छोटय़ा झऱ्याचं रूपांतर नदीत होऊन ती घेवंडे-आपटी-आंबेगाव अशी पुढे वाहत जाते. तिच्या एका बाजूला तुंग तर दुसऱ्या बाजूला लोहगड आहे. सध्या येथे धरण बांधल्यामुळे तिचा काळे कॉलनीपासूनचा प्रवाह दिसतो. पवना नदीच्या काठी बांधलेलं हेमाडपंथी धाटणीचं वाघेश्वराचं अप्रतिम शिवालय पाण्याखाली गेलं. (सध्या हे मंदिर पाण्याबाहेर आलंय) यावरून या नदीच्या काठी धार्मिक बीजेही रोवली गेलेली दिसून येतात. या खोऱ्याची व्याप्ती आणि सौंदर्य पाहायचं असेल तर तिकोना-ब्राह्मणोली या रस्त्यावर कुठेही उभे राहा. तिथे रस्त्याला तीव्र चढ आहे. स्थानिक भाषेत या जागेला वारदांडा म्हणतात. येथून समोरच पवनेचं समृद्ध खोरं पाहा.

पवनेने हा काठ सुफलाम् केलाय. हा प्रवाह काले गावावरून कोथुर्णे गावाला स्पर्शून जातो. कोथुर्णेला तर नदीवर घाट बांधलाय. गो. नि. दांडेकर म्हणतात, ‘घाट म्हणजे नदीचा अलंकारच.’ नदी येथे फार शोभून दिसते. इथला घाट आणि पूल हा पाहण्यासारखा आहे. नंतर हा प्रवाह शिवली-भडवली-आर्डव मार्गे थुगावला जातो. मधल्या कडधेच्या पुलावरून पवना खूपच सुंदर दिसते. थुगाव येथला पवनेचा प्रवाह जास्त उताराचा आहे. या उतारावरून पाणी मोठं खटय़ाळ बनतं. इथल्या खडकावरून पाण्याचा वेग पाहणं हा रोमहर्षक अनुभव असतो.

बौर-थुगाव-शिवने-आढे-ओझर्डे-परंडवाडी-सोमाटणे-गोडुंब्रे मार्गे ही नदी पुण्याकडे मार्गस्थ होते. या दरम्यान नदीची वळणेही जवळ जाऊन पाहण्यासारखी आहेत. उसाची शेते तुडवत, भातखाचरांच्या कडेकडेने सळसळत वाहत जाणारी पवना नदी पाहण्यासारखा आनंद नाही. पवनेच्या खोऱ्याने तुंग-तिकोना-विसापूर-लोहगडसारख्या किल्लय़ांचा पराक्रम पाहिला. याच खोऱ्याने शिव-छत्रपतींनी सुरतेहून आणलेली लूट बघितली. तसेच शिवछत्रपतींनी कारतलबखानाविरुद्ध गाजवलेला पराक्रमही उंबरखिंडीने पाहिला. बेडसे-येलघोल-तिकोना लेण्यांसारखी कातळकलाही याच खोऱ्याने जन्माला घातली. अशा या पवनामाईचा अनोखा प्रवास थक्क करणारा आहे.

इंद्रायणी या शब्दातील सामर्थ्य तर अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानदेव या दोन महान संतांच्या चरणांना स्पर्श करून जाणारी ही नदी. धार्मिक आणि विचारांची पीठे देहू आणि आळंदी याच नदीच्या काठावर आहेत. ही नदी वाहत येते मावळातून. भौगोलिकदृष्टय़ा या इंद्रायणीचा प्रवास अनुभवण्यासारखा आहे. लोणावळ्याजवळ कुरवंडेच्या डोंगरात उगम पावणारी ही नदी पुढे टाटा धरणात लुप्त होते व धरणानंतर पुन्हा सुरू होते. लोणावळा शहरातून ती बाहेर पडते व मुंढावरे आणि ताजे दरम्यान दिसते. याच्याच पुढे लोहमार्ग आणि नदीचे पात्र समांतरच म्हणजेच एकमेकांना खेटूनच धावतात. हे दृश्य प्रेक्षणीय असते.

कामशेतच्या अलीकडे वडिवळेला कुंडलिका नदी इंद्रायणीला येऊन मिळते. या संगमावरचं शिवालय पाहण्यासारखं आहे. कामशेत आणि खामशेत या दोघांमधील खिंडीतून जाणारी ही नदी बघतच राहावीशी वाटते. नदीचं विशाल खोरं डोळ्यांत भरतं. तिथून नदी पारवडी-टाकवे-तळेगाव -इंदुरीमार्गे देहूला मार्गस्थ होते. टाकवेवरून पुढे गेलेल्या या नदीला राजपुरीजवळ आंद्रा नदी येऊन मिळते. इंदुरीत नदी भुईकोट किल्लय़ाला स्पर्शून जाते. याच्याच पुढे असलेल्या कुंडमळा येथे या पात्रातले रांजण-खळगेही पाहण्यासारखे आहेत. प्रत्येक ऋतूत ही नदी वेगळी भासते. पावसाळ्यात रौद्रावतार धारण करते.

वडगाव येथे दोन लढाया झाल्या. सुरत लुटीच्या वेळी १७६४ साली नारो बापूजी आणि मुघलांची लढाई आणि इंग्रज-मराठे यांच्यातली लढाई या दोन्ही लढाया या खोऱ्याने अनुभवल्या. याच खोऱ्यातील मळवली येथील छापखान्यातून चित्रकार राजा रवी वर्मा यांची अजरामर चित्रे जगभरात पोहोचली. अलीकडच्या काळात चांगल्या व स्वच्छ नद्या पाहायला मिळणे कठीण झाले असताना, या नद्यांची कला, संस्कृती, समाजजीवन आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून सफर केली तर नक्कीच समृद्ध अनुभव पदरी पडतील.

लेण्या आणि तीर्थक्षेत्रे

या नदीच्या खोऱ्यात कार्ला- भाजेसारख्या जागतिक दर्जाच्या लेण्या आहेत. या लेण्यांच्या बरोबरच पाटण-देवघर-शिलाटने या लहान लेण्यासुद्धा पाहता येतात. एवढेच नव्हे तर कोकणातून दख्खनला जाणारा प्राचीन रस्ता याच लेण्यांच्या साक्षीने या खोऱ्यातून जातो. एकवीरा देवी-भंडारा-देहूसारखी तीर्थक्षेत्रेही याच खोऱ्यात वसली. याच खोऱ्याने इतिहासही घडवला.

ovartale@gmail.com