विमल शिंदे

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..  coronafight@expressindia.com 

मी पुण्यातील एका विशेष मुलांच्या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये शिवण विभागात काम करते. या मुलांना कापडी पिशव्या, पूजेचे बटवे, पेपर  पिशव्या वगैरे बनवण्यास शिकवते. विशेष मुलांना शाळेच्या कालावधीत कार्यरत कसे ठेवायचे हे आम्हाला माहीत असते. शाळेला सुट्टय़ा जाहीर व्हायच्या आदल्या दिवशी म्हणजे १२ मार्चला २०० मुखपट्टय़ा अर्थात मास्कची मागणी आली होती. नमुना तयार केला होता, परंतु १३ तारखेला शाळेला सुट्टी जाहीर झाली. आम्ही शिक्षक मात्र शाळेत गेलो होतो. लगेचच कटिंगला सुरुवात केली. एक विद्यार्थिनीही आली होती, तिही मदतीला आली. सगळ्या जणी पटापट कामाला लागलो आणि पंचवीस मुखपट्टय़ा तयार के ल्या. लगेच एका सहशिक्षिके ने त्या विकतही घेतल्या. १५ मार्चपासून आमच्या शाळेला सुट्टीच मिळाली. मग घरी असतानाही स्वस्थ बसलो नाही.  रोज २५ मुखपट्टय़ा शिवत होतो. घरातील कामांचे नियोजन आणि विभागणी के ल्यामुळे त्याचा ताण आला नाही. स्वत: शिवलेल्या जवळपास ५०० मुखपट्टय़ा मी गरजूंना दिल्या. नवनवीन पदार्थ शिकले. नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी, सहकाऱ्यांशी फोनवरून संपर्कात राहिलो. सकारात्मक विचार के ल्याने हे दिवस आमच्यासाठी सुकर झाले.

आकाश निरीक्षण

श्रीराम वैजापूरकर, नाशिक : मला आकाश निरीक्षणाची आवड आहे. माझ्या मुलाने एक छानशी दुर्बीण पाठवली आहे. परंतु तिची नीट उभारणी करून आकाशदर्शनाचा आस्वाद घेणे, याचा योग काही येत नव्हता. अखेर करोना काळात हा योग जुळून आला. मार्च महिन्यात पश्चिमेस सायंकाळी तेजस्वी शुक्राचे दर्शन होत होते आणि पहाटे पूर्वेस गुरू, शनी व मंगळ हे ग्रह क्रमाने वरपासून क्षितिजापर्यंत नुसत्या डोळ्यांनीही दिसत होते. अधूनमधून चंद्रकोरही आकाशपटलाची शोभा वाढवीत होतीच. मुलाने पाठवलेली दुर्बीण नीट जोडून तिच्यातून आकाश पाहताना तर चमत्कारच दिसू लागला. प्रथम शुक्र ग्रहाची चंद्राप्रमाणेच शुक्रकोरही दिसू लागली. मग पहाटे गुरूभोवती त्याचे किमान चार चंद्र बघता आले. त्यापाठोपाठ उगवणाऱ्या शनी ग्रहाभोवतीची कडी अतिशय सुंदर दिसली. त्यानंतर उगवणारा लालसर मंगळ आपले रंग दाखवीत होता. हा सर्व निसर्गाचा  चमत्कार नुसत्या डोळ्यांनी, दुर्बिणीशिवाय दिसणे शक्यच नव्हते. मग जवळपासच्या विद्यार्थी व मित्रांना बोलावून त्यांनाही आकाशदर्शन घडवले. आकाशात एकाच वेळी रात्री चार चार ग्रहांचे व व्याध, ध्रुव, कृत्तिका इ. तारकापुंजांचे निरीक्षण ही एक पर्वणीच होती. शिवाय याच काळात तीन चार वेळा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकही ( करर ) आकाशातून प्रवास करताना बघता आले.

रोजनिशी लिहिली

विजय सुजाता शांताराम : टाळेबंदीच्या काळात मी आधी वाचनाला सुरुवात के ली. मग एकदा लक्षात आले की या काळातले आपले अनुभव आपण लिहून काढावेत. त्यामुळे रोजनिशी लिहू लागलो. माझा मुलगा ११ वर्षांचा आहे. त्याच्यासोबत वाचन, संवाद, खेळ खेळणे सुरू के ले. आम्ही एकत्र व्यायामही करू लागलो.  मी ज्या सामाजिक संस्थेचे काम करतो त्या युवा संस्थेच्या कामामध्ये लक्ष देणे, ऑनलाइन बैठकांना उपस्थित राहाणे हेही सुरू होतेच. आमच्या घरात नियमितपणे लोकसत्ता येतो, त्यातील संपादकीय, स्तंभलेखन कायम वाचतोच. या काळात लोकसत्ताच्या वेबिनारचीही माहिती मिळाली. त्यातही सहभागी झालो. मन:स्वास्थ्यविषयक  वेबिनारमध्ये डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या तर  मधुमेह व कोरोना यावर डॉ. शशांक जोशी यांच्या सत्रात सहभागी झालो, त्यातून खूप चांगली माहिती मिळाली. तसेच  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आणि राष्ट्र सेवा दल, अनुभव शिक्षा केंद्र व युवा संस्था यांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवर आयोजित के लेल्या  ऑनलाइन शिबिरातही सहभागी होत आहे. या काळात स्वत:कडे तटस्थपणे पाहण्याची एक संधी मिळाली आहे. प्रत्येक संकटाला संयमाने व शांतपणे सामोरे जाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे.  लोकसत्ताचे संपादकीय, कोविडोस्कोप आणि कु मार के तकर यांचे विश्लेषण, रवीश कु मार यांचे टीव्हीवरील कार्यक्रम या साऱ्यातून करोनाकाळातील परिस्थितीची जाण वाढत आहे. या काळात

कु टुंबासमवेत वेळ घालवणे. मनोरंजनासाठी वेबसीरिज गाणी पाहणे-ऐकणे, माध्यमांतून योग्य ती माहिती घेणे, त्यानुसार काळजी घेणे ही त्रिसूत्री राबवत आहे.

संधीचे सोने

मृणाल कांडलीकर : इयत्ता आठवीची आमची परीक्षा १८ मार्च २०२०ला संपली. त्यानंतर मी फिरायला जाण्याची स्वप्ने पाहत होते कारण दरवर्षी माझी परीक्षा संपल्यावर आम्ही कुठेतरी भटकं ती करतोच. पण यंदा करोनामुळे साऱ्यांच्याच उत्साहावर पाणी पडले. आवडणारी सुट्टी कं टाळवाणी होऊ लागली. मग ठरवले काहीतरी करायला हवे. रोज सकाळी व्यायामाला सुरुवात के ली. सोबत गरम पाणीही पिऊ लागले. चित्रे काढली. कु टुंबासह खेळ खेळले. आईबरोबर स्वयंपाकघरात पदार्थ शिकू  लागले. १४ एप्रिलला दादाचा वाढदिवस असतो. त्याच्यासाठी के कही घरीच केला. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात आमची ऑनलाइन शाळा सुरू झाली, पण ती थोडय़ा दिवसांसाठीच होती. मग पुन्हा काय करायचे हा प्रश्न पडला. मग लक्षात आले, शाळा-अभ्यास-शिकवणी वर्ग यामुळे घरी आपल्याला वेळच मिळत नव्हता. आता सुट्टी मिळालीच आहे, तर आपल्या आई-वडिलांसोबत जास्त वेळ घालवायला हवा. मला संगीताचीही आवड आहे. चार परीक्षाही दिल्या होत्या, पण पुढे अभ्यासामुळे गाणे मागे पडले. आज या टाळेबंदीमुळे मला संगीत व चित्रकला हे छंद जोपासता आले.

माझी आई अनिता कांडलीकर ही सध्या राजीव गांधी शिष्यवृत्ती मिळवून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पीएचडी करत आहे. टाळेबंदीच्या काळात तिने स्वत:च्या अभ्यासासोबत आमचाही अभ्यास घेतला.  बाबांनी तिला स्कू टी आणि कार शिकवली. मी आणि अभिनव दादाने तिला ऑनलाइन व्यवहार करायला शिकवले. एकू ण टाळेबंदीच्या संधीचे आम्ही सोने के ले आहे. एवढे असले तरीही ही टाळेबंदी कायमची नको. करोनासंकट लवकर संपावे, हीच अपेक्षा!

सापशिडी ते बुद्धिबळ

माधवी संतोष अहिरराव, बेल्जियम

नोकरीनिमित्ताने मी ऑगस्ट २०१९ मध्ये  पती संतोष आणि अथर्व व अनिशा या मुलांसोबत बेल्जियमला आले.  ऑगस्टमध्ये आल्यावर मुलांसाठी शाळा शोधणे, घर, खर्च हे सारे पगाराच्या गणितात बसवताना दमछाक झाली पण अनुभव आनंददायी होता. या नव्या देशात जुळते न जुळते तोवर हे करोनाचे संकट आले. बेल्जियममध्येही टाळेबंदी घोषित झाली. मुलांचा घरून अभ्यास सुरू झाला.

आमची कार्यालयीन कामेही घरातूनच सुरू झाली. आठवडय़ातून एकदा बाजारात जाऊन जीवनावश्यक वस्तू खरेदी करून आणत होतो. तरीही वेळ उरत असे. त्यामध्ये मग पुस्तकवाचन, गोष्टी सांगणे, योगासने करणे, चित्र काढणे, सापशिडी खेळणे, बुद्धिबळ खेळणे हे सुरू झाले. आता हळूहळू त्यातून सावरतो आहोत.

तंत्रज्ञानाची मदत

अहान नांदगावकर, इयत्ता पाचवी, वसंत विहार हायस्कुल, ठाणे.: शाळा वगैरे सुरू असताना अचानक टाळेबंदी झाली. मित्रांसोबत खेळायलाही जाता येत नव्हते. काही दिवस मित्रांना फोन केले पण नंतर त्याचा कंटाळा आला. चित्रं काढली, तबला, गिटार  वाजवले. गोष्टीची पुस्तके  वाचायला लागलो. आई-बाबांसोबत काही सिनेमेही पाहिले. तरी थोडा कंटाळा तर यायला लागलाच होता. मग एक दिवस सुचले की आपण एक व्हिडीओ बनवू या. त्यांत काय काय करता येऊ शकते हे शेअर करू या. मग मी यू-टय़ूबच्या साह्यने व्हिडीओ एडिटिंग वगैरे शिकलो आणि पहिला व्हिडीओ बनवला. त्यानंतर माझ्याकडे असलेल्या आर्टिस्ट्सच्या पुस्तकांवर आधारित अजून एक व्हिडीओ बनवला.  खूप मजा आली. वेळही छान गेला. मग मी ठरवले की, आता निरनिराळे विषय घेऊन त्याचे छान स्क्रिप्ट तयार करू आणि व्हिडीओ बनवू.

गीतेच्या अध्यायांचे पठण

कमल दिगंबर मोटेगावकर, पुणे (हल्ली मुक्काम — श्रीरामपूर) : मी मूळची अंबाजोगाईची. आताशा राहायला पुण्याला नातवंडांकडे असते. आठ दिवसांसाठी मी माझी मुलगी  श्यामा हिच्याकडे श्रीरामपूरला आले. परंतु तितक्यातच टाळेबंदी जाहीर झाली आणि मी इथेच अडकले. याआधी माझ्या ८६ वर्षांच्या आयुष्यात मी कधीही, कुठेही इतके दिवस घर सोडून राहिले नाही. परंतु वाचनाची आवड असल्याने हा काळ तितकासा कंटाळवाणा झालेला नाही. मला संपूर्ण भगवतगीता पाठ आहे. तसेच माझे जावई मुकुंद देशपांडे यांनाही त्याची आवड असल्याने त्यांनीही रोज एक याप्रमाणे सर्व अठरा अध्याय माझ्या आवाजात रेकॉर्ड करून ठेवले. याव्यतिरिक्त रोजचे एक अध्यायाचे वाचन तर चालू आहेच. इथे आल्यानंतर रामायण, महाभारत या दूरदर्शनवरील मालिका पाहण्याबरोबरच गीतारहस्य, आचार्य द्रोण, वैदिक, नानासाहेब पेशवे व इतर अशी साधारण १० ते १२ पुस्तके आतापर्यंत वाचण्यात आली. सुदैवाने इकडे वर्तमानपत्र वाटप चालू असल्याने नित्यनेमाने लोकसत्ताचे वाचनही होतेच. अशारीतीने वाचनाबरोबर रोजचा योगाभ्यास, मोबाइलवरून पणती शर्वी हिच्याशी गप्पा आणि सर्वच जण घरी असल्याने इथल्या नातवंडांच्या खेळात सहभाग असा दिनक्रम करोनाच्या कृपेने चालू आहे. पण आता हे करोना संकट लवकरात लवकर नष्ट होऊन सर्व सुरळीत व्हावे हीच प्रार्थना !!!