|| समीर सिंग

समाजमाध्यम कोणतंही असो, सध्या ‘शॉर्ट’ अर्थात अवघ्या १५ ते ३० सेकंदांच्या व्हिडीओंची चलती आहे. टिकटॉक, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर या प्लॅटफॉर्मवर हे व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालत आहेत. पण केवळ मनोरंजन म्हणूनच नव्हे तर ‘बॅण्ड’चा प्रसार करण्यासाठी किंवा उत्पादनाच्या जाहिरातींसाठीही अशा व्हिडीओंची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होत आहे.

गेल्या काही वर्षांत व्हिडीओंनी जाहिरातींचे जगच बदलून टाकले आहे. हा ‘फॉरमॅट’ केवळ टीव्हीवरील जाहिरातींपुरता (टीव्हीसी) मर्यादित राहिलेला नाही. ग्राहकांची लक्ष देऊन काही पाहण्याची, ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याने ‘फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स’ (एफएमसीजी), बँकिंग,वित्तीय तसेच विमा कंपन्या, फार्मा, फॅशन, सौंदर्यप्रसाधने, मनोरंजन आणि तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बदल करावे लागत आहेत. सगळय़ांसाठी एकच जाहिरात हा सहज सोपा पर्याय सोडून आता त्यांना जाहिरातीचे नवे मार्ग आणि प्रकार धुंडाळावे लागत आहेत.

बाजारपेठेसंदर्भातील या दृष्टिकोनात भर पडते ती मोबाइल अ‍ॅप्लिकेशन व्यासपीठांची. या व्यासपीठांचे वापरकर्ते प्रचंड संख्येने आहेत आणि ‘युझर जनरेटेड कन्टेन्ट’वरच (यूजीसी) ही व्यासपीठे चालतात. या माध्यमातील प्रचंड क्षमता पाहता आता कंपन्यांनी डोळे उघडून पहायला हवे. प्रचंड प्रमाणातील ग्राहक सहभाग आणि लक्षणीय वाढीची खातरजमा करण्यासाठी या जाहिरात प्रकाराकडे आता गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

काही कंपन्यांनी या माध्यमाचा वापर आपली नवी उत्पादने सादर करण्यासाठी तसेच आधीच्या उत्पादनांना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत नेण्यासाठी केला आहे आणि त्यातून दिसलेले परिणाम फारच प्रोत्साहनपर आहेत. खरं तर, ‘आयटीसी’ आणि ‘ओएलएक्स’सारख्या काही आघाडीच्या कंपन्यांनी चालवलेल्या मोहिमांमुळे या व्यासपीठांची परिणामकारकता स्पष्टपणे समोर आली आहे.

डिजिटल आणि सोशल मीडिया विपणन आणि जाहिरातींनी व्यवसाय आणि ब्रँड्सना नावीन्यपूर्ण आणि परिणामकारक साधनांच्या साह्याने ग्राहकांना सेवा देण्यास सक्षम केले आहे आणि त्याच वेळी बदलत्या काळासोबत सुसंगत राहण्यातही साह्य केले आहे.

याआधी अनेक कंपन्या जाहिरातींवर खर्च करायचा असला की भारतातील शहरी बाजारपेठांवर खर्च करत होत्या. आता मात्र, परवडणारे स्मार्टफोन आणि देशातील हाय-स्पीड डेटा कनेक्टिव्हिटीचे आभार मानायला हवेत. कारण त्यामुळे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी अशा सर्व बाजारपेठांमधील ग्राहकांना या डिजिटल क्रांतीमध्ये सहभागी होता आले. त्यामुळे, कंपन्यांनी ग्रामीण भागात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दमदार प्रयत्न सुरू केले. आता या ग्राहकांना आवश्यक वस्तूंचे अनेक पर्याय उपलब्ध आहेतच शिवाय याआधी जी अत्यंत महत्त्वाकांक्षी उत्पादने त्यांना आवाक्याबाहेरची वाटत होती तीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचली.

ओमीडायर नेटवर्क इंडियाच्या अहवालानुसार २०१७ ते २०२२दरम्यान सुमारे  पाच अब्ज नवे वापरकर्ते इंटरनेटशी जोडले जाण्याची शक्यता आहे. डिजिटलप्रेमींची संख्या २०१८ मध्ये १९ अब्ज होती. आजही ती बऱ्यापैकी आहे. मोबाइल फोनवर व्हिडीओ कंटेंट पाहात आणि डिजिटल व्यासपीठावरील विविध उपकरणांचा वापर करत मोठी झालेली ही पिढी आहे. विशेष म्हणजे, ते आपला कंटेंट स्वत: तयार करतात आणि शिक्षण, मनोरंजन किंवा भलताच भन्नाट विचार मांडणाऱ्या, त्यांच्या मनावर ठसलेल्या जाहिरातींचे व्हिडीओ शेअर करतात.

संधी म्हटल्या की त्यासोबत काही आव्हानेही येतात आणि नव्या सहस्रकातील आणि जनरेशन झेड पिढीतील ग्राहकांसमोरही ती आहेतच. या ग्राहकांमध्ये संयम तसा कमीच आहे आणि ते कोणताही व्हिडीओ कंटेंट किंवा जाहिरात पूर्ण पाहात नाही, ती अगदीच आकर्षक असेल तर अपवाद. त्यामुळेच शॉर्ट फॉरमॅट व्हिडीओ किंवा १५ ते ३० सेकंद किंवा त्याहून कमी वेळाचे व्हिडीओ महत्त्वाचे ठरतात.

निष्कर्ष

अशा परिस्थितीत, देशभरातील वापरकर्त्यांसाठीचे शॉर्ट व्हिडीओ व्यासपीठ कंपन्या आणि ब्रँड्सना त्यांच्या लक्ष्यित ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वाधिक सुयोग्य माध्यम ठरतात. या व्यासपीठांच्या वाढत्या लोकप्रियतेमागील मुख्य कारण म्हणजे युझर जनरेटेड कंटेंट (यूजीसी).

हा नवा ट्रेंड अंगीकारत कंपन्या आता ग्राहकांच्या वर्तनाला महत्त्व देत आहेत आणि ब्रँडची संकल्पना आणि उत्पादने वापरून ग्राहकांना त्यांचा कंटेंट बनवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या व्यासपीठांवर आपल्या जाहिराती प्रसिद्ध करत आहेत. ब्रँडच्या यशोगाथेत शॉर्ट व्हिडीओ व्यासपीठ महत्त्वाची भूमिका बजावू लागले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना मोठय़ा प्रमाणात आकर्षून घेण्यासाठी, आपली उपस्थिती वाढवण्यासाठी आणि वाढीव विक्रीसोबत बाजारपेठेतील वाटा वाढवण्यासाठी कंपन्यांना शॉर्ट फॉरमॅट व्हिडीओचे मोठे साह्य लाभणार आहे.

(लेखक ‘टिकटॉक इंडियाचे उपाध्यक्ष (मॉनिटायझेशन) आहेत.)