नेक्झॉन सहज व सुखद अनुभव

१६ व १७ जानेवारी रोजी टाटा मोटर्सने चिंचवड येथे नेक्सॉन इलेक्ट्रिक कारची प्रात्यक्षिके दाखवली.

||सुशील जोशी

टाटाने नुकतीच भारतातील पहिली विद्युत कार नेक्झॉन बाजारात आणली असून या कारची नुकतीच पुण्यात टेस्ट ड्राइव्ह देण्यात आली. यात ही कार प्रथमदर्शनी आकर्षित करीत असून कार चालविण्याचा सहज व सुखद अनुभव देते. विशेषत: पहिल्यांदा विद्युत कार चालवितानाही ती सहज हताळता येते. मात्र अद्याप या कारची किमत कंपनीने जाहीर केलेली नाही. यावर गाडीला खरेदीदार कशी पसंती देतात ते दिसणार आहे.

विद्युत कारविषयी मोठी समस्या मांडली जाते ती या कार भारतीय हवामानात तग धरू शकतील का? विशेषत: पावसाळ्यात आपल्याकडे रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे व पाणी साचणे ही गंभीर समस्या आहे. मात्र नेक्झान चालविल्यानंतर ती चढ, उतारावर, पाण्यात व खडतर रस्त्यातही चांगला अनुभव देते.

१६ व १७ जानेवारी रोजी टाटा मोटर्सने चिंचवड येथे नेक्सॉन इलेक्ट्रिक कारची प्रात्यक्षिके दाखवली. प्रत्येक गटाला स्वतंत्र नेक्झॉन कार एका टाटा ईआरसी तज्ज्ञासोबत देण्यात आली होती. आम्ही ही कार स्वत: चालवीत टाटा लेक रेसॉर्ट चिंचवड येथून ऑक्सफर्ड गोल्फ रेसॉर्ट बाणेर येथपर्यंत नेऊन परत लेक रेसॉर्ट चिंचवड येथे आणली. या एकूण सुमारे ५० किलोमटरचा प्रवासाचा मार्ग गर्दीचा नागरी भाग, महामार्ग, तीव्र चढ-उताराचे व वळणांचे रस्ता (जे काही ठिकाणी अर्धकच्चे रस्ते होते.) असलेला होता. जेणेकरून वेगवेगळ्या परिस्थितीत कार चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. विशेष जमेची बाब म्हणजे प्रथमच विद्युत कार चालवत असूनसुद्धा (नेहमीच्या कारप्रमाणे) सहजपणे चालविल्याचा अनुभव आला. (हाय वेवर अगदी ८०-१०० कि.मी.वेगानेसुद्धा)

ड्रायव्हिंगचा अनुभव

१. मंदगती (crow) मोड : ड्राइव्ह

तसेच रिव्हर्स मोडमध्ये अ‍ॅक्सिलरेटर न दाबता कार ५ ते ७ कि.मी. वेगाने हळूहळू सरकत असते व ब्रेक दाबताच वाहनांबरोबरच कारच्या मोटारचा वीजप्रवाहसुद्धा थांबविला जातो. ही सुविधा ऑटोमेटिक ट्रान्समिशन असलेल्या सर्व कारमध्ये असते. फरक इतकाच, की या

कारचे इंजिन चालूच असल्यामुळे इंधन जळतच असते. जे या कारमध्ये होत नाही. (मोटरचा वीजप्रवाह थांबविल्याने बॅटरीतील वीज खर्च होत नाही.)

२. चढावर मदत (Ascent Assist) मोड : चढावर ब्रेक दाबून उभ्या केलेल्या वाहनाचा (अ‍ॅक्सलरेटर न देता) ब्रेक सोडल्यावर मागे घरंगळून न देता मंदगतीने पुढे नेण्यास सुरुवात करते.

३. उतारावर मदत (Descent Assist) मोड : हा मोड वाहन उतारावर असताना वाहनाची गती ब्रेक न दाबतासुद्धा नियंत्रित करतो. तसेच उतारामुळे मिळणाऱ्या शक्तीचा उपयोग करून (RE-Generative Braking) खर्च झालेली वीज काही प्रमाणात परत मिळवून बॅटरीत भरतो. मॅन्युअल गिअरबॉक्स असलेली वाहने चालविताना दाट गर्दीच्या रस्त्यांवर ‘इंच इंच पुढे जाऊ’ प्रकारच्या किंवा तीव्र चढावर थांबवल्यावर पुन्हा पुढे जाण्यासाठी जी क्लच ब्रेक व अ‍ॅक्सलरेटर वापरण्याची कसरत करावी लागते ती वरील क्रॉल व अ‍ॅसेंट मोडमुळे टळते.

४. होम चार्जिग : यासाठी एक लहान क्षमतेचा बॅटरी चार्जर गाडीतच बसविलेला आहे. हा ३ किलोवॅटचा चार्जर २३० वोल्ट  विजेवर १५ ए प्लग ला जोडता येतो. सर्वसाधारण घरांत किंवा कोठेही, अशी वीज उपलब्ध असल्याने (जरी पूर्ण चार्जिगसाठी ६ ते ७ तास लागत असले तरीही) अनोळखी जागी बॅटरीमधील चार्ज संपल्यामुळे अडकवून बसण्याची वेळ येत नाही.

नेक्झॉनची वैशिष्टय़े

  • नेक्झॉन कार एक्सझेडप्लस एलयूएक्स, एक्सझेडप्लस (दोन्ही टू टोनमध्ये) आणि एक्सएम (सिंगल दोन) अशा तीन प्रकारांत उपलब्ध असून नेक्झॉन ईव्ही सिग्नेचर टील ब्ल्यू, मूनलिट सिल्व्हर आणि ग्लेशिअर व्हाइट या तीन आकर्षक रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे.
  • ही कार ८ वर्षे किंवा १,६०,००० किलोमीटर्सच्या (यापैकी जे लवकर पूर्ण होईल ते) अतिरिक्त वॉरंटीसह उपलब्ध आहे. ही वॉरंटी बॅटरी व मोटरवर आहे.
  • नवीन नेक्झॉन ईव्हीची रचना उठावदार व ठळक आहे. इम्पॅक्ट डिझाइन २.० शैलीत ही रचना करण्यात आली आहे.
  • पुढील भागात बंपर आणि दणकट मध्यवर्तीच्या ग्रिलच्या स्वरूपात एक नवीन डिझाइन पूर्ण करण्यात आले आहे. आतील भागात नेक्झॉन ईव्हीच्या केबिनची रचना आधुनिक आहे. प्रशस्त अंतर्गत भाग आणि अव्वल दर्जाचे ध्वनी व्यवस्थापन आहे.
  • या कारमध्ये ७ इंची हरमन इन्फोटेन्मेंट प्रणाली आहे. यात उच्च दर्जाची कनेक्टिव्हीटी व अद्वितीय असे ध्वनीसंयोजन (अकॉस्टिक) साधलेले आहे. ही प्रणाली अँड्रॉइड ऑटो व अ‍ॅपल कारप्लेला अनुकूल आहे.

पाण्यातूनही प्रवास सुरक्षित

या गाडीची बॅटरी व मोटार जमिनीपासून फक्त सुमारे २०० मि.मि.वर आहे. त्यामुळे जरी दोन्हींचे आयपी ६७ प्रोटेक्शन असले तरी धुवाधार पावसामुळे तुंबलेल्या पाण्यातून जाताना काय होणार, अशी भीती मनात असतेच. याचे निराकारण करण्यासाठी आम्हाला टाटा मोटर्सच्या टेस्ट ट्रॅक गाडी चालवण्याचा अनुभव देण्यात आला. तेथे १ फूट रस्ता खोल तुंबलेल्या पाण्यातून २०० ते २५० फूट रस्ता नेलेला आहे. आमची कार यातून ३ ते ४ वेळा सहजपणे नेल्यावरही असुरक्षित जाणवले नाही. हा अनुभव पावसाळ्यात पाणी तुंबलेल्या रस्त्यावरून जाताना वाटणारी भीती कमी करण्यास उपयुक्त ठरेल.

झेड कनेक्ट

नेक्झॉन ईव्ही ३५ मोबाइल अ‍ॅप आधारित कनेक्टेड सुविधांनी युक्त आहे. यामध्ये रिमोट कमांड्स, व्हेईकल ट्रॅकिंग, नेव्हिगेशन आणि रिमोट डायग्नोस्टिक्सचा समावेश आहे. झेडकनेक्ट अ‍ॅपमुळे जवळपासचे चार्जिंग पॉइंट्स व टीएमएल सेवा केंद्रे लोकेट करणे शक्य होते, स्पीड अ‍ॅलर्टस् लावता येतात, वाहनाचे लोकेशन ट्रॅक करता येते. याशिवायही अनेक सुविधा यात आहेत.

amtechcorp@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tata nexzon nexzon indias first electric car akp

Next Story
सॅलड सदाबहार
ताज्या बातम्या