मांडवशहरशेती : राजेंद्र भट

आपल्या आहारात वेलभाज्या असतातच. या वेलींची फळे आपण खातो. पण या वनस्पतींच्या खोडात उभे राहण्याएवढी ताकद नसते. जे वेल जमिनीवर पसरतात, त्यांची फळे मोठी असतात. उदाहरणार्थ तांबडा भोपळा, कोहळा इत्यादी. काही फळे मांडवावर वाढतात. त्यांची फळे हलकी असतात, उदाहरणार्थ पडवळ, दुधी, शिराळी. या वेलींची जी फळे जमिनीला टेकतात, ती सूर्यप्रकाश न मिळाल्याने पांढरी राहतात. असे वेल मांडवावर वाढवल्यास कमी जागेत चांगली आणि अधिक फळे मिळतात. आपल्या गच्चीवर थोडय़ा जागेत कायमच्या मांडवाची रचना करून ठेवावी.

गच्चीत मांडव घालण्यासाठी जिथे ऊन जास्त येते, अशी जागा निवडावी. तिथे भिंतीच्या कडेला आधार घेऊन मांडव उभा करावा. मांडव बांधताना शक्यतो जीआय पाइप वापरावेत. १५ लिटर तेलाच्या रिकाम्या डब्यात मधोमध पाइप उभा करून डब्यात सिमेंटचे मिश्रण ओतावे. वरच्या बाजूला आडवे खांब बोल्टिंग करता येतील, अशी रचना करावी. उंची सहा फूट आणि दोन खांबांतील अंतर सहा फूट असावे. चौरसच असला पाहिजे असे काही नाही. आयतही चालेल. उंची मात्र सहा फूट हवी, त्यापेक्षा थोडी जास्त असेल, तरीही चालेल. अन्यथा वेल वाढल्यावर फळे काढताना उभे राहता येणार नाही.

मांडव उभा झाल्यावर तळात आवश्यकतेप्रमाणे वाफे करावेत. ते तीन फुटांपेक्षा जास्त मोठे नसावेत. मांडवावर नायलॉनची जाळी लावावी. जाळीमधील जागा वीतभर तरी असावी. म्हणजे फळे मुठीत धरून काढता येतील आणि फळे मांडवावरून खाली लोंबण्यात अडथळा येणार नाही. मांडवावर भाजी लागवडीच्या पद्धतींची माहिती पुढील भागात घेऊ.