सध्या पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. राजधानी दिल्लीमध्ये तर यामुळे काही दिवस शाळा बंद ठेवण्यासह प्रदूषण करणाऱ्या इंजिनांच्या गाडय़ांवर बंदी घालण्यात आली. असे असले तरी वाहन क्षेत्रातील कंपन्यांची योजना पाहता येणाऱ्या १० वर्षांमध्ये रस्त्यावर धावणाऱ्या गाडय़ांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. कंपन्यांकडून हायब्रिड कारची निर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. टोयोटानेही यात पुढील पाऊल टाकले असून, तिचा जगभरात सर्वाधिक हायब्रिड कार विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समावेश झाला आहे. टोयोटाने भारतात ‘कॅमरी हायब्रिड’चे उत्पादन आणि विक्री सुरू केली असून, भविष्याचा विचार करता ती अतिशय फायदेशीर कार ठरणार आहे. कॅमरी हायब्रिडचा थोडक्यात आढावा.

टोयोटाने २०१३ मध्ये कॅमरी हायब्रिडला बाजारात दाखल केले. त्यानंतर सातत्याने तिच्यामध्ये बदल करण्यात आले. बॅटरी आणि पेट्रोलवर आधारित असणाऱ्या या हायब्रिड कारमुळे प्रदूषण होत नाही. लांबसडक, दिसायला देखणी, सुरक्षित, पाहताक्षणी नजरेत भरणारी, मायलेज उत्तम देणारी आणि दमदार इंजिनमुळे ती ग्राहकांचे लक्ष चटकन वेधून घेत आहे. ही कार जरी हायब्रिड असली तरीही ती अन्य कारप्रमाणेच काम करते. ती इंधनात मोठी बचत करते. तिच्या बॅटरीला कोणत्याही प्रकारे बाहेरून प्लग लावून चार्ज करण्याची गरज नाही, की तिचे इंजिन लवकर खराब होत नाही. गाडीमध्ये मागील आसन आपल्याला सोयीचे होईल असे करता येते, या सुविधेसह अन्य इतर अनेक वैशिष्टय़ांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कॅमरी हायब्रिड स्वत:ला इतर प्रीमियम गाडय़ांच्या वर्गात जाऊन ठेवते.

सुरक्षा

कॅमरी हायब्रिडला ३६० अंशात सुरक्षा देण्यात आली असून, यामध्ये सेन्सर देण्यात आले आहेत. ज्या वेळी एखादी गाडी कॅमरीच्या एकदम जवळ जाईल त्या वेळी आपल्याला बीपच्या माध्यमातून याची सूचना मिळते. गाडीमध्ये सुरक्षिततेसाठी ७ एअर बॅग्ज, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) यासह इतर सुविधा देण्यात आल्या आहेत.

इंजिन

कॅमरी हायब्रिडमध्ये ४ सिलिंडर असून, इंजिन २४९४ सीसीचे आहे. इंजिन ५७०० आरपीएमला १६० एचपीची ताकद निर्माण करते. ४५०० आरपीएमला २१३ एनएम टॉर्क तयार होतो. इंधनाची टाकी ६५ लिटरची आहे. इलेक्ट्रिक मोटर पॉवर १४३ एचपी असून, ती २७० एनएमचा टॉर्क तयार करते. कॅमरी सुरू होताना बॅटरीच्या मदतीने सुरू होत आपली गती पकडायला सुरुवात करते. जसजसे आपण एक्सिलटेरवर दाब देतो तेव्हा गाडीचे पेट्रोल इंजिन बॅटरीसोबत संयुक्त काम करत २०५ बीएचपीच्या शक्तीने गाडीला वेग पकडण्यासाठी ताकद दिली जाते. कॅमरीच्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिकचा ताळमेळ अतिशय सुंदर असून, गाडी पेट्रोल इंजिन अथवा इलेक्ट्रिकवर चालते आहे हे चालकाला लक्षात येत नाही. गाडी ६० किमीचा वेग घेईपर्यंत बॅटरीवर चालते. मात्र त्यापुढील वेग घेतला की गाडी आपोआप पेट्रोलवर येते. त्यामुळे जर शहरात अथवा गर्दीच्या ठिकाणी आपण प्रवास करत असू तेव्हा कॅमरी बॅटरीचा वापर करते, त्यामुळे पेट्रोलची बचत होते. गाडी ८० किमी प्रति तास वेगाच्या पुढे असेल आणि ती उताराला लागली असेल त्या वेळी गाडी लगेच बॅटरीवर काम करू लागते. यामुळे गाडीच्या मायलेजमध्ये मोठी वाढ होते. ही एक ऑटोमॅटिक पेट्रोल हायब्रिड असून, हॅण्डब्रेक पायांच्या जवळ देण्यात आले आहेत. गाडी ज्या वेळी पेट्रोलवर चालते त्या वेळी आपोआप बॅटरी चार्ज होते. त्यामुळे तिला चार्जिगसाठी वेगळा प्लग लावण्याची आवश्यकता नसते.

चालवण्याचा अनुभव

शहरात आणि खडबडीत रस्त्यांवर कॅमरी हायब्रिडची टेस्ट ड्राइव्ह घेण्यात आली. हायब्रिड असल्याने ओव्हरटेक घेताना येणारी समस्या सोडली तर इतर सर्व आघाडय़ांवर ती आपली मानके पूर्ण करताना दिसते. टायर रुंद असल्याने गाडी रस्ता सोडत नाही. ६० किमी प्रति तास या वेगाने चालवताना ती बॅटरीवर चालते, त्या वेळी ती पेट्रोलवर चालते की बॅटरीवर हेही कळत नाही. त्यामुळे आवश्यक ती ताकद बॅटरीमधून मिळते. गाडी सुरू केल्यानंतर इंजिन सुरू आहे की बंद हेही कळत नाही. ज्या वेळी गाडी शहरातून धावते, त्या वेळी ग्राऊंड क्लीअरन्स कमी असल्याने स्पीड ब्रेकरला गाडीचा वेग बऱ्यापैकी कमी करावा लागतो. मात्र ज्या वेळी गाडी हायवेवर वेग घेते त्या वेळी तिचा वेग १२० किमी प्रति तासाच्या पुढे असल्याशिवाय तिचा आनंद घेता येत नाही. अगदी १३० ते १४० किमी प्रति तास या वेगातही ती थोडीही विचलित न होता, इंजिनचा आवाज न होता एका सरळ रेषेत धावते. पॉवर स्टेअरिंगही हाताळण्यास उत्तम आहे.

अंतर्गत रचना

कॅमरी हायब्रिडची अंतर्गत रचना अतिशय आकर्षक आहे. इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल आसने, भरपूर मोकळी जागा यामध्ये देण्यात आली आहे. पाच आसने असल्यामुळे मागे सामान ठेवण्यास अधिक जागा उपलब्ध होते. दूरच्या प्रवासासाठी आवश्यक असणारे सर्व सामान तुम्ही यामध्ये अगदी आरामात घेऊन जाऊ शकता. गाडीमध्ये पॉवर स्टेअरिंग असून, गाडी चालवताना कसलाही त्रास जाणवत नाही. स्टेअरिंगवरच आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यात आल्यामुळे चालकाला जास्तीची हालचाल करावी लागत नाही. पॉवर स्टेअरिंग हाताळण्यास तिच्या इतर स्पर्धक गाडय़ांच्या तुलनेत सुलभ आहे.

गाडीमध्ये पॉवर विंडोज, क्रूझ क्रंटोल देण्यात आला आहे. पाठीमागील सीटसाठीही एअर व्हेन्ट देण्यात आले आहेत. गाडीतील इन्फोटेन्मेंट सिस्टीम म्हणावी इतकी रुंद वाटत नसली तरी ती त्यामध्ये सर्व सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. कॅमरी हायब्रिडमध्ये जागेचा पुरेपूर वापर करण्यात आला असून, प्रवाशांना जास्तीचे सामान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रचना

टोयोटा कॅमरीची अंतर्गत आणि बारचना अतिशय आकर्षक आहे. पाच रंगांत उपलब्ध असलेली टोयोटा कॅमरी तिच्या लांबीमुळे सर्वाचे लक्ष वेधून घेते. टायरची रुंदी अधिक असल्याने गाडी रस्ता सोडत नाही. ती एका सरळ रेषेत पळते. कॅमरीमध्ये एलईडी डे टाइम रनिंग लाइट देण्यात आले आहेत. गाडी बाहेरून दिसायला उत्तम असली तरी ग्राऊंड क्लीअरन्समध्ये ती मार खाते.

मायलेज

शून्य प्रदूषण असणाऱ्या कॅमरी हायब्रिडचे मायलेज उत्तम आहे. कमी वेग असताना बॅटरीचा वापर होत असल्याने ती अधिक मायलेज देते. १९.१६ किमी प्रति तासचे ती मायलेज देते. मात्र ज्या वेळी गाडी एका समान वेगामध्ये चालवली जाते, त्या वेळी त्यामध्ये थोडी आणखी वाढ होताना दिसते.

किंमत

हायब्रिड कार असल्याने या कारची किंमत ३७ लाख रुपयांपासून पुढे आहे. ती थोडी जास्त वाटू शकते. मात्र अतिशय आरामदायी प्रवासाची हमी, मायलेज उत्तम, सुरिक्षत प्रवास, शून्य प्रदूषण आणि दिसायला देखणी या वैशिष्टय़ांमुळे इतर स्पर्धकांच्या तुलनेत ती थोडी उजवी ठरते.

Chandrakantdads@gmail.com