तमाम वाहनप्रेमींची दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चाळविली जाणारी उत्सुकता नवे वर्ष सुरू झाले आहे तशी अधिकच उत्कंठतेला पोहोचली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात होऊ घातलेल्या ऑटो एक्स्पोची आयोजकांकडून तयारीही पूर्ण झाली आहे. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत वाहनरसिक आबालवृद्धांसाठी यंदा अनोखी मेजवानी आहे. यामध्ये फ्यूचर मोबिलिटी म्हणजे इलेक्ट्रिक, हायब्रिड वाहने सादर होणार आहेत. तसेच अनेक नव्या कार व एसयूव्हीचे प्रोटोटाइप व मॉडेल जागतिक पातळीवर लाँच केले जाणार आहे. अशी कोणती वाहने असू शकतात याचा घेतलेला आढावा.

मागील वर्ष वाहन उद्योगासाठी चढ-उताराचे राहिले असले तरी वर्षअखेर गोड राहिला. नोटाबंदी, जीएसटी यांचा परिणाम वाहन उद्योगावर काही कालावधीमध्ये दिसला. पण कंपन्यांनी लाँच केलेल्या नव्या मॉडेलमुळे सकारात्मक वाटचाल राहिली आहे. गेल्या वर्षी मान्सून चांगला झाला आहे. त्यामुळे २०१७-१८ व पुढील आर्थिक वर्ष वाहन कंपन्यांना चांगले जाण्याची अपेक्षा आहे. २०३० पर्यंत देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले असले तरी यामध्ये अनेक अडचणी आहेत. तसेच निती आयोगाने विजेवरील चालणारी वाहने विशेषत: कार व दुचाकी भारताला कितपत झेपू शकतात यावर आपला अभिप्राय दिला आहे. पण असे असले तरी काही कंपन्यांकडून विजेवर अर्थात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची झलक नव्या वर्षांत पाहायला मिळणार आहे.

दर दोन वर्षांनी भारतात ऑटो एक्स्पो हे वाहन प्रदर्शन दिल्लीमध्ये होते. यामध्ये भारतातील बहुतेक सर्व कंपन्या सहभाग घेतात आणि आगामी काळात वा पुढील दोन वर्षांत लाँच होऊ  शकणाऱ्या मॉडेलचे प्रोटोटाइप या ठिकाणी दाखवितात. तसेच गेल्या दोन ऑटो एक्स्पोमध्ये काही कंपन्यांनी थेट नवी मॉडेल लाँच केली आणि त्याच वर्षी लाँच होणाऱ्या उत्पादनासाठी तयार असणाऱ्या वाहनांची मॉडेल सादर केली होती.

ऑटो एक्स्पो २०१८ हेही या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. कारण महिंद्र, टाटा मोटर्स या देशी कंपन्या उत्तम संशोधन करून आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त, उत्तम डिझाइनच्या कार, एसयूव्ही लाँच करणार आहेत. तसेच काही वाहन कंपन्यांकडून प्रथमच जागतिक पातळीवर सादर होणारी वाहने ऑटो एक्स्पोत सादर केली जाण्याची शक्यता अधिक आहे.

मारुती सुझुकी, होंडा, टोयोटा, फोर्ड यांच्यासह रेनॉ, निस्सान या कार उत्पादक कंपन्या आपली अनेक नवी मॉडेल या ठिकाणी सादर करणार आहेत. मारुती सुझुकीने पुन्हा एकदा बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढविला असून, ते स्थान आगामी काळात लाँच होणाऱ्या कारमुळे अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.

(पूर्वाध)

  • मारुती सुझुकी : संपूर्ण नवी रचना असणारी स्विफ्ट ऑटो एक्स्पो वा त्याआधी सादर होण्याची शक्यता आहे. बा व अंतर्गत रचनेत मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले आहे. पहिल्या तुलनेत नवी स्विफ्ट अधिक सुरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळेच नव्या स्विफ्टचा प्लॅटफॉर्मही नवा आहे. परिणामी, कारची किंमत सध्याच्या स्विफ्टच्या तुलनेत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र स्पर्धकांना शह देण्यासाठी कंपनी धक्का तंत्र म्हणून आकर्षक किंमत ठेवू शकते. नव्या स्विफ्टला सध्याच्या मॉडेलमध्ये असणारे पेट्रोल व डिझेल इंजिन कायम राहणार आहे. मात्र त्यामध्ये अधिक सुधारणा करण्यात आली आहे.
  • अर्टिगा : मल्टिपर्पज सेगमेंटमध्ये अर्टिगा ही मारुतीची यशस्वी कार आहे. यामध्ये नवे डिझेल इंजिन लाँच केले जाऊ शकते. कंपनीने बाहेरून व आतून रचनेत बदल केला असून, पहिल्या तुलनेत केबिन स्पेस अधिक असणे अपेक्षित आहे. सात सीटचा पर्याय कायम राहणार आहे.
  • सियाझ : सेदान सेगमेंटमध्ये मारुतीची एकमेव यशस्वी झालेली कार आहे. त्यामुळेच आपले स्थान जाऊ नये यासाठी सियाझचे सुधारित व्हर्जन या वर्षी लाँच करण्यात येणार आहे.
  • टोयोटा : इनोव्हा क्रेस्टा व फॉच्र्युनर या कंपनीच्या दोन यशस्वी गाडय़ा भारतात आहेत आणि स्पर्धक कंपन्यांची या सेगमेंटमधील आकडेवारी टोयोटाला विचार करायला लावणारी नाही. मात्र कंपनी सेदान सेगमेंटवर भर देण्याची शक्यता आहे. त्यामुळेच व्हॉओस लाँच होण्याची शक्यता आहे.यू ३२१ व स्कॉर्पियो गेटअवे यू ३२१ ही एमपीव्ही महिंद्रकडून सादर होण्याची शक्यता आहे. प्रीमियम प्रकारची ही एमपीव्ही असेल. यामध्ये सहा व सात आसन पर्याय मिळू शकतात. स्कॉर्पियो गेटअवे ही पाच आसनांची व मागील बाजूस सामान वाहून नेण्यासाठी खुली जागा अशी याची रचना असणार आहे.
  • टाटा मोटर्स : इम्पॅक्ट डिझाइन टाटा मोटर्सला चांगले उपयोगी पडले आहे. हेक्सा, टियागो, नेक्सॉन या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळाली आहे. त्यामुळेच टाटा मोटर्सकडून नव्या वर्षांत अनेक नवीन वाहने पॅसेंजर सेगमेंटमध्ये येणार आहेत.
  • नेक्सॉन : या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे एएमटी म्हणजे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन असणारे मॉडेल लाँच होणार आहे. त्याच्या टेस्टही सध्या सुरू आहेत. पेट्रोल व डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये नेक्सॉन एएमटी असेल.
  • इलेट्रिक कार : टाटा मोटर्स व महिंद्रकडून इलेक्ट्रिक वाहने लाँच होऊ शकतात. यामध्ये टाटा मोटर्सकडून टिगॉर या कॉम्पॅक्ट सेदान इलेक्ट्रिक व्हर्जन ऑटो एक्स्पोत सादर होणार आहे. महिंद्र इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करीत आहे. रेवाच्या पोर्टपोलियोबरोबर व्हेरिटो, केयूव्हीचे इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले जाऊ शकते.