व्हॉटस्अ‍ॅप फेसबुक विकले गेले आहे. त्यामुळे नवीन सेवापुरवठादाराचा लोगो आणि सेवा कायम ठेवायची असल्यास तुमच्या व्हॉटस्अ‍ॅपवरून किमान दहा जणांना संदेश पाठवा, अन्यथा तुमची सेवा येत्या २४ तासांत खंडित केली जाईल, अशा आशयचा एक संदेश सध्या व्हॉटस्अ‍ॅपवर ‘व्हायरल’ झालाय. परंतु तो पूर्णपणे बनावट आहे. अशा आशयाची कोणतीही माहिती फेसुबकच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली नाहीच, शिवाय बनावट व्यक्तीच्या नावे तयार करण्यात आलेला या संदेशात व्याकरणाच्या चुका आहेत. विशेष म्हणजे ‘व्हॉटस्अ‍ॅप अप्लिकेशन’ अद्ययावत (अपडेट) करण्यासाठी सर्व व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर आणि व्हॉटस्अ‍ॅप कार्यान्वित करण्यासाठी दहा जणांना संदेश पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र अशी माहिती पाठविणाऱ्या ‘यूजर्स’ची माहिती चोरण्याचा तो कुटिल डाव असतो. यासाठी अशा प्रकारचे संदेश वारंवार प्रसारित केले जातात. २०१३ सालीसुद्धा व्हॉटस्अ‍ॅप वापरणाऱ्यांना काही प्रमाणावर पैसे आकारले जातील, असा संदेश समाजमाध्यमांवर फिरत होता. मात्र तीही एक शुद्ध थापच असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही दहा संदेश कोणालाही पाठविण्याची गरज नाही!