खाता-पिता, उठता-बसता केल्या जाणाऱ्या सर्व घडामोडींचा ‘अपडेट’ समाज माध्यमांवर प्रसारित करणारी आजची तरुणाई समाज माध्यमांवर आपली वेगळी ओळख जपत आहे. रोज ऑफिसमध्ये किंवा महाविद्यालयात भेटणाऱ्या रोहनची समाज माध्यमांवर ‘सोबरदृष्टिकोन’ किंवा ‘चाय-लवर’ अशी ओळख आहे. स्वत:ची हीच वेगळी ओळख जपत आजची तरुणाई स्वत:चाच नाही तर आपल्या आजू-बाजूला असणाऱ्यांचाही फायदा करण्याच्या प्रयत्नात आहे..

मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या रश्मीला अचानक कुणी तरी मागून हाक मारली, ‘ए फूडी-पांडा’ आणि रश्मीने वळून पाहिलं.  ‘फूडी-पांडा’ हे रश्मीचे इन्स्टाग्रामचे नाव. आज स्वत:च्या नावापेक्षा रश्मीला बहुतेक जण तिच्या या नावाने जास्त ओळखू लागले आहेत. आजकालची तरुणाई अशीच काहीशा वेगळ्या नावांच्या शोधात असते. मिस-लायलॅक, शटरबगसोल, बी-युतीफुल अशा आगळ्या-वेगळ्या नावांचे अनेक लोक आपल्याला येथे पाहायला मिळतात. मात्र या इन्स्टाग्राम खात्यांची फक्त नावेच वेगळी नसतात. या प्रत्येक खात्यात त्यांचे काही तरी वेगळेपण असते. काही तरी हटके संकल्पना घेऊन खाती उघडली की त्यांना लोकप्रियताही अधिक मिळते आणि हळूहळू त्या खात्यांचे ‘फॉलोअर्स’ वाढत जातात. मग काही जण एखाद्या विशिष्ट गोष्टींचेच छायाचित्र प्रसारित करतात. तर काही एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित छायाचित्र प्रसिद्ध करतात. अगदी साध्या माचिसच्या बॉक्सपासून ते हिरव्या मसाल्यापर्यंत विविध फोटोंच्या खात्यांनी लोकप्रियता मिळवली आहे. ही खाती पाहिली तर अगदी सुरुवातीपासूनच येथे सुसंगतपणा ठेवल्याचे जाणवते. प्रत्येक वेळी प्रसारित होणारे फोटो वेगळे असले तरी प्रत्येक प्रसारणात एक सुसंगतपणा असतो आणि त्यामुळे ही खाती दिसायला अधिक आकर्षक दिसतात.

गर्दीत लपलेला ‘डोंबिवलीकर-बॅटमॅन’

लहानपणापासून आपण बघत आलो की कोणी एखादा सुपर हिरो असतो, सर्वासोबतच गर्दीत चालतो, पण कुणाला त्याची खरी ओळख समजत नाही. अशीच स्वत:ची ओळख गुपित ठेवत ‘डोंबिवलीकर’ या खात्याने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. फोटोग्राफी करणारी तरुणाई सहसा मुंबईच्या चौपाटय़ा, इमारतींना आकर्षित असते. अशा तरुणाईचे फोटो आपल्या खात्यावर प्रसारित करत त्यांना डोंबिवलीसारख्या शहराकडे वळवण्याच्या उद्देशाने हे खाते सुरू करण्यात आले. आता जणू एक कुटुंबच बनलेल्या या खात्यावर अनेक जण आपल्या समस्याही घेऊन येतात. लोकांना स्वत:चे व्यासपीठ मिळवून देणारा हा खातेदार स्वत:ला ‘बॅटमॅन’ म्हणवतो. अनेक डोंबिवलीकर एखाद्या कार्यक्रमाच्या गर्दीत हा नेमका ‘बॅटमॅन’ आहे कुठे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

माचिसच्या बॉक्सची किमया

माचिसच्या बॉक्सचा समाजशास्त्रीय अभ्यास केल्यानंतर निर्माण झालेल्या आवडीचा वापर करून श्रेया कतुरी ही तरुणी ‘आर्ट ऑन अ बॉक्स’ या खात्याद्वारे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. माचिसच्या बॉक्सचा बारकाईने अभ्यास करताना अशा बॉक्समधून वेगवेगळ्या ठिकाणची आणि संस्कृतीची ओळख झाल्याचे श्रेया सांगते. हे खाते तयार केल्यानंतर या वेगळ्या संकल्पनेमुळे माझ्या अनेक लोकांशी गाठी-भेटी झाल्या. अनोखी संकल्पना घेऊन तयार केलेल्या या खात्यामुळे अनेक ठिकाणी काम करण्याच्या संधीही मिळाल्याचा आनंद श्रेया व्यक्त करते.

चाय पिने चले?

चहा हा सर्वाच्याच आवडीचा विषय. एका चहाच्या कपाभोवती किती गोष्टी घडू शकतात याची प्रचीती आपल्याला शुभम या तरुणाच्या ‘झुवमआर्ट’ या खात्यामधून कळते. ‘व्हायरल’ झालेल्या गोष्टी किंवा एखादे नवीन पुस्तक चहाच्या कपशेजारी ठेवायचे आणि त्याचा फोटो प्रसारित करायचा. काळ्या टेबलावर ठेवलेला सफेद कपमधील चहा आणि त्याच्या भोवती बदलणाऱ्या गोष्टी ही या खात्याची ओळख. एखाद्या साध्या गोष्टीमधून संकल्पना तयार करायच्या हेतूमधून हे खाते तयार केल्याचे शुभम सांगतो.

हिरवा मसाला इन्स्टाग्रामवर

इन्स्टाग्राम हे समाजमाध्यम फोटो प्रसारित करण्यासाठी तयार करण्यात आले. अनेक खात्यांमधून स्वत:चे फोटो किंवा कोणत्या तरी ठिकाणाचा फोटो प्रसारित केला जातो. मात्र प्रियंका सूर्यवंशी या तरुणीने चक्क रोजच्या जेवणात वापरला जाणारा हिरवा मसाला या इन्स्टाग्रामच्या खात्यावर आणला आहे. एखाद्या सफेद ताटलीवर हा मसाला सजवून त्याचा फोटो टाकणाऱ्या या ‘हिरवा मसाला’ नावाच्या खात्याची तरुणाईमध्ये चांगलीच चर्चा आहे.

पोस्टकार्डच्या आठवणींना उजाळा!

कुटुंब- मित्र-मैत्रिणींपासून दूर राहणाऱ्या ‘त्वॉफिक’ नावाच्या तरुणाने चक्क पोस्टकार्ड रंगवून आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबीयांना पाठवण्यास सुरुवात केली आणि याच संकल्पनेतून ‘त्वॉफिकमॅनहॅम’ हे खाते तयार झाले. या खात्याला भेट दिल्यास विविध रंगांचे, शैलीचे, चित्र काढलेले असे पोस्टकार्ड पाहायला मिळतात. काही वेळा अनेक लोकांकडून आपल्या नातेवाईकांना पोस्टकार्ड तयार करून बाहेरगावी पाठवण्याच्या विनंती येत असल्याचे ‘त्वॉफिक’ सांगतात. एका मैत्रिणीची लग्नाच्या दिवशी पाठवलेले पोस्टकार्ड हे सर्वाधिक लोकप्रिय झाल्याचे त्वॉफिकने सांगितले.