News Flash

नवनिर्माणांच्या शिल्पकार

जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली बिहार आंदोलनाचे रूपांतर एका मोठय़ा सत्याग्रही चळवळीत झाले

जयप्रकाशजींनी ‘संपूर्ण क्रांती’ची घोषणा केली.. विविध संघर्षांत देशातील अस्वस्थ तरुण वर्ग लोंढय़ांनी सामील झाला, त्यात तरुण मुलींचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर होता हे विशेष. जयप्रकाशजींनी चळवळीला दिलेल्या नैतिक बैठकीमुळे या चळवळीतून असंख्य स्त्री-पुरुष कार्यकर्ते निर्माण झाले, हे या चळवळीचे मोठेच यश. नंतर आलेल्या आणीबाणीच्या संकटाला तोंड देण्यासाठीची जणू ही पूर्वतयारीच होती.

नवनिर्माण आंदोलनाआधीची परिस्थिती लक्षात घेतली, तर १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्धात खंबीर भूमिका निभावली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे वर्णन ‘दुर्गा’ असे केले होते. परंतु त्यानंतर त्यांचे रूप पालटले. त्यांनी अधिकारांचे केंद्रीकरण सुरू केले. त्यामुळे लोकसभेत आणि बाहेरही त्यांच्याविरोधी वातावरण तयार झाले. पाकिस्तानशी झालेल्या युद्धामुळे महागाई प्रचंड वाढली होती, त्यात १९७२च्या भयंकर दुष्काळाची भर पडली. महागाई, टंचाई, दुष्काळ यांनी जनतेच्या मनात मोठा असंतोष माजला होता. इंदिरा गांधींचे न्यायालय आणि कायदेमंडळ यांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याविरुद्ध लोक मोठय़ा प्रमाणावर बोलू लागले होते. इंदिरा गांधींच्या भ्रष्ट सरकारवर मधू लिमये आणि जॉर्ज फर्नाडिस यांनी टीकास्त्र चालवले होते.

सर्वप्रथम या असंतोषाची ठिणगी पडली ती गुजरातमध्ये. गुजरातचे सरकार भ्रष्ट असल्याची भावना लोकांत होती. मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या कार्यशैलीबद्दल गुजरातमध्ये असंतोष होता. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी आणि सामान्य लोकांमधून निर्माण झालेल्या नवनिर्माण चळवळीने देशाचे राजकारण बदलले. चिमणभाई यांना राजीनामा द्यावा लागलाच, पण तिने बिहारसह देशभर इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण तयार केले. विशेष म्हणजे या उत्स्फूर्त आंदोलनात विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य स्त्रियांचा वाटा मोठा होता. या संदर्भात निमित्त घडले ते २० डिसेंबर १९७३ रोजी एल. डी. इंजिनीअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या संपाचे. कॉलेजच्या वसतिगृहात खाणावळीचे दर अचानक २० टक्क्यांनी वाढवल्याने विद्यार्थ्यांनी संप केला. वसतिगृहातील गैरव्यवहारांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. ३ जानेवारी १९७४ रोजी गुजरात विद्यापीठात विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली, त्यामुळे गुजरातमधील विद्यार्थ्यांच्यात संताप उसळला. त्यांनी शिक्षण आणि वसतिगृहातील गैरव्यवहारांविरोधात बेमुदत संप सुरू केला. या आंदोलनाला मध्यमवर्गातील स्त्रिया आणि पुरुष तसेच कामगार वर्गाचीदेखील साथ मिळाली. विद्यार्थी, वकील आणि प्रोफेसर्स यांनी मिळून ‘नवनिर्माण युवक समिती’ स्थापन केली. गांधी पुतळ्याजवळ जाऊन त्यांनी नवनिर्माणाची शपथ घेतली. त्या वेळी त्यात हजारो विद्यार्थिनी आणि महिला सामील होत्या. त्यांनी संपूर्ण सक्रियतेने हा लढा जिंकला.
नवनिर्माण समितीने गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र या मागणीकडे केंद्राने दुर्लक्ष केले. त्यामुळे या हिंसक आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले. ३३ शहरांत पोलीस आणि नागरिक यांच्यात संघर्ष होत राहिले. गुजरात सरकारने ४४ शहरांत कर्फ्यू लावला. त्यामुळे संपूर्ण गुजरातमध्ये असंतोष पसरला. २८ जानेवारी १९७४ रोजी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने लष्कराला पाचारण केले. परंतु अखेर इंदिराजींना चिमणभाईंचा राजीनामा घ्यावा लागला.

या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर बिहारमध्येही भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने गती घेतली. १९७३ मध्ये भोपाळमध्ये एका संपाच्या दरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. त्यात आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. रैना चौकशी समितीने सरकारने हे प्रकरण नीट न हाताळल्याचा ठपका ठेवला. १८ फेब्रुवारी १९७४ रोजी पाटणा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एका अधिवेशनासाठी राज्यातील सर्व युवा नेत्यांना निमंत्रित केले. या अधिवेशनात विद्यार्थ्यांनी ‘बिहार छात्र युवा संघर्ष समिती’ स्थापन केली. लालूप्रसाद यादव हा युवा नेता या समितीचा अध्यक्ष म्हणून निवडला गेला. लालूप्रसादांनी या संघर्षांत मोठी भूमिका निभावली. ते, तसेच सुशीलकुमार मोदी, नरेंद्रसिंग, बशिष्ठ नारायण सिंग, रामविलास पासवान, शिवानंद तिवारी हे युवा नेते याच काळात उदयाला आले. समाजवाद्यांबरोबर अभाविपचे चंद्रकांत शुक्ला, मणियार, रसिक ख्मार यांच्यासह सोनल सिंग, अंजली बक्षी या महिलांनी नेतृत्वात आपला वाटा उचलला होता. त्यांनी ‘नवनिर्माण युवती समिती’ आणि ‘नवनिर्माण गृहिणी समिती’ स्थापन केली. हातामध्ये झाडू आणि धोपाटणे घेऊन महिला मोठय़ा संख्येने आंदोलनात उतरल्या. १८ मार्च १९७४ रोजी विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घातला. अंदाजपत्रक मांडण्याच्या सत्रादरम्यान त्यांनी विधानसभेकडे जाणारे सर्व रस्ते रोखून धरले. त्या वेळी झालेल्या पोलीस कारवाईत २७ जणांचा बळी घेतला. २३ मार्चला समितीने राज्यव्यापी संप पुकारला.

दरम्यान, जयप्रकाश नारायण गुजरातमधील विद्यार्थ्यांना भेटले. त्यांनी नवनिर्माण आंदोलनाचे नेतृत्व हाती घेतले. त्याच वेळी लालूप्रसाद तसेच गोविंदाचार्य इत्यादींनीही जेपींनी नेतृत्व स्वीकारावे अशी त्यांना विनंती केली, तेव्हा जयप्रकाशजींनी पहिली अट घातली. ती म्हणजे, आंदोलन लोकशाही मार्गाने आणि गांधीजींच्या अहिंसक पद्धतीने छेडण्याची. या संदर्भात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे उद्गार फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणाले, ‘‘कुठल्याही आंदोलनात केवळ संघर्ष महत्त्वाचा नसतो, लोकशाहीचा लढा हा लोकशाही पद्धतीनेच लढावा लागतो. जयप्रकाशजींनी विद्यार्थ्यांकडून प्रथम ते वचन घेतले आणि मगच नेतृत्व हाती घेतले. मोर्चासुद्धा तोंडाला पट्टी लावून करा, असे त्यांनी सांगितले.’’ भाई सांगत होते.

यानंतर या चळवळीला दिशा देण्यासाठी जयप्रकाशजींनी ‘संपूर्ण क्रांती’ची घोषणा केली. ‘संपूर्ण क्रांती’च्या संकल्पनेत त्यांनी सात प्रकारच्या स्वातंत्र्याचा उद्घोष केला होता. त्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक परिवर्तनाचा विचार होता. आर्थिक क्षेत्रात विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारून समाजातील विविध घटकांत संपत्तीचे समान वाटप करावे, राजकीय सत्ताही विकेंद्रित करावी आणि शासन यंत्रणा आणि राजकीय सत्ता यांवर लोकांचा सतत अंकुश असावा अशी भूमिका त्यांनी मांडली होती. ग्रामसभेस अधिक हक्क मिळावेत, तरुणांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी तसेच जातीयता यांचे निर्मूलन करण्यासाठी लढा द्यावा, त्यास रचनात्मक कामाची जोड द्यावी असे त्यांनी सांगितले होते.
यानंतर ४ नोव्हेंबर १९७४ रोजी पाटण्यात संघर्ष सुरू झाला. आमदारांचे राजीनामे, लाखो लोकांच्या सह्य़ांची पत्रके, धरणे, घेराव, मूक निषेध, निदर्शने मिरवणुका असे विविध मार्ग चोखाळण्यात आले. १८ नोव्हेंबर रोजी त्यांनी इंदिरा गांधींचे सरकार पाडण्याचे लोकांना आवाहन केले. दरम्यान, बिहार छात्र संघर्ष समिती इतकी वाढली होती की, देशभर ‘बिहार संघर्ष सहायक समित्या’ स्थापन झाल्या. पुण्यात सहायक समितीचे अध्यक्ष भाई वैद्य होते. जयप्रकाशांनी पुण्यातून ‘युक्रांद’ या त्या काळात जोरदार सत्याग्रही आंदोलने करणाऱ्या संघटनेचे नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना बिहारमध्ये बोलावून घेतले. त्या वेळी तिथे सिद्धराजजी ढढ्ढा, ठाकूरदास बंग, गोविंदराव शिंदे, चिंचलीकर, डॉ. अरुण लिमये असे अनेक जण होते. मधू लिमये, जॉर्ज फर्नाडिस, मधू दंडवते, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे इत्यादी अनेक नेत्यांचा त्यात मोठय़ा प्रमाणावर सहभाग होता. अनुताई लिमये, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, कमल देसाई इत्यादी अनेक समाजवादी महिला नेत्या तसेच समाजवादी महिला सभेच्या जिल्ह्य़ाजिल्ह्य़ातील कार्यकर्त्यां मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या. त्यावेळचा जनसंघ आणि इतर अनेक विचारधारांचे गट यात सामील झाले. अभाविपच्या गीता गुंडे यांनी सांगितले की, ‘‘गोविंदाचार्यजी, राम बहादूर राय, हरेंद्रकुमार हे अभाविपचे नेते तर होतेच पण नीना श्रीवास्तव, मधु श्रीवास्तव, मणिबाला या लढाऊ महिला संघर्ष समितीचा अविभाज्य भाग होत्या. आरा इथे झालेल्या महिला मोर्चात कालिंदी राय, जया जैन या अग्रभागी होत्या.’’

जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली बिहार आंदोलनाचे रूपांतर एका मोठय़ा सत्याग्रही चळवळीत झाले. भाई सांगत होते, ‘‘जॉर्ज फर्नाडिस यांनी रेल्वे बंदचा पुकारा दिला. दिल्लीत दहा लाखांचा अभूतपूर्व मोर्चा निघाला. त्यात ठाकूरदास बंग आणि ढढ्ढाजी वयाच्या ९० व्या वर्षी चालत आले. लोक उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते, ‘‘जनता आती है, सिंघासन खाली करो’’ जेपींनी ओळखले की हा लढा लोकशाही व्यवस्थेतच लढला पाहिजे, म्हणून त्यांनी विरोधी पक्षांशी संपर्क साधला आणि ‘जनता पार्टी’ची स्थापना केली. कम्युनिस्ट पक्षाने आधी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला, नंतर जसजशी त्यांची दडपशाही वाढत गेली तसा त्यांनी पाठिंबा काढून घेतला. अर्थात हे नंतर.

४ नोव्हेंबरला स्वत: जयप्रकाशांनी सत्याग्रह केला. तोपर्यंत सत्याग्रहात १०० लोकांचा बळी गेला होता. ४ नोव्हेंबरच्या सत्याग्रहात पोलिसांनी लाठीमार केला. जयप्रकाशही त्यातून सुटले नाहीत. अनेक जण जखमी झाले. एके काळी नेहरूंचे निकटवर्ती असलेल्या मोठय़ा नेत्याबाबत झालेल्या या घटनेने लोकांमध्ये तीव्र नाराजी उमटली आणि चळवळीला देशभरात प्रतिसाद मिळू लागला. ‘‘ज्या सरकारला जनमताचा पाठिंबा नाही व जे भ्रष्टतेत बुडाले आहे त्या सरकारला पदावर राहण्याचा हक्क नाही, त्यांना परत बोलाविण्याचा लोकांना हक्क आहे आणि म्हणून ही लोकशाहीची चळवळ आहे.’’ असे जयप्रकाशजींचे मत होते.

या सर्व संघर्षांत देशातील अस्वस्थ तरुण वर्ग लोंढय़ांनी सामील झाला, त्यात तरुण मुलींचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर होता हे विशेष. जयप्रकाशांनी चळवळीला दिलेल्या नैतिक बैठकीमुळे या चळवळीतून असंख्य स्त्री-पुरुष कार्यकर्ते निर्माण झाले, ज्यापैकी अनेकजण आजही सक्रिय आहेत. हे या चळवळीचे मोठेच यश. नंतर आलेल्या आणीबाणीच्या संकटाला तोंड देण्यासाठीची जणू ही पूर्वतयारीच होती.

– अंजली कुलकर्णी
anjalikulkarni1810@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 1:16 am

Web Title: role of womens in indias sturggle for freedom
Next Stories
1 कामगार चळवळीतील वाघिणी
2 दलित चळवळ आणि स्त्रिया
3 भटक्या विमुक्तांची अस्तित्वाची लढाई
Just Now!
X