22 January 2021

News Flash

रूढी-परंपरा आणि विवाह

चांगलं काम केलं की तुम्ही लोकांच्या आपोआप लक्षात राहता. तुमच्या कामाला मागणी असते

प्रतिनिधिक छायाचित्र

अनिल भागवत

निरनिराळ्या धर्मात, जातीत आणि समाजांत निराळी रूढी-परंपरा आणि कर्मकांडं असतात. प्रत्येक कृतीमागे पूर्वी अर्थ असणारच पण तो संदर्भ संपला की कृती बंद व्हायला पाहिजे. एखाद्याने विचार करून रूढींमधून हळूहळू मुक्त व्हायचं ठरवलं तर काही काळ आयुष्यात तात्पुरती पोकळी जाणवेल. ती लवकरात लवकर चांगल्या, समाजोपयोगी, आधुनिक गोष्टींनी भरण्याचा मात्र प्रयत्न करायला हवा. नाहीतर पोकळीचा त्रास होईल आणि पुन्हा कर्मकांडाकडे वळावं लागेल.

तुमच्यापैकी काहीजण स्वत:च्या वैवाहिक आयुष्यात आग्रहाने काही रूढी पाळत असाल, काही केवळ सवयीने विचार न करता परंपरेने पाळत असाल. काहीजण अजिबात पाळत नसाल. निर्णय तुम्हीच घ्यायचा असतो. सर्वसाधारण भारतीय माणूस बदल करण्याबद्दल घाबरट आहे. बदल करण्यापूर्वी तो सतत आसपास आधार शोधात असतो.

हजारो वर्षांच्या सांस्कृतिक प्रवासात आणि विवाहाच्या इतिहासात निरनिराळ्या भौगोलिक भागात प्रत्यक्षात लोकांनी सुचतील तसे बदल केले. त्या त्या काळातल्या सामाजिक पुढाऱ्यांनी ‘असं शास्त्रात सांगितलंय’ असं त्याचं वर्णन केलं. सर्वसामान्य माणसांनी ‘शास्त्रात कुठे सांगितलंय ते दाखवा’ असं आवाहन तेव्हाही केलं नाही आणि कोणी करतही नाही. आपल्याला रीतिरिवाजांची एवढी माहिती आहे ही प्रौढी मिरवण्याची संधी कुठच्याही काळातल्या ज्येष्ठांनी सोडली नाही. त्याचा परिणाम म्हणून किंचित बदलत सगळ्या रूढी-परंपरा-कर्मकांडं चालू राहिली.

निरनिराळ्या धर्मात, जातीत आणि समाजांत निराळ्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडं असतात. प्रत्येक कृतीमागे पूर्वी अर्थ असणारच पण तो संदर्भ संपला की कृती बंद व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. त्या चालूच राहातात.

विवाहाच्या संबंधांतला एक मोठा विषय म्हणजे पत्रिका. मानसशास्त्र पुरेसं प्रगत झालेलं नव्हतं तेव्हा पत्रिकेशिवाय लोकांना काही आधार नव्हता. पुढे तीच रूढी बनली. भारतात तर बहुतांशी विवाह पत्रिका आणि शुभमुहूर्त बघून होत असताना असमाधानी वैवाहिक आयुष्याचं एवढं प्रमाण असणं याचा अर्थ पत्रिका या कल्पनेत काही तथ्य नाही असाच होतो. आमच्या घरात एकही लग्न अशा पत्रिका पद्धतीनं झालं नाही. अगदी माझ्या आणि शोभाच्या आई-वडिलांचं देखील नाही.

कायद्याने हुंडय़ाला बंदी असली तरी अनेक जण त्याला मार्ग शोधताना दिसतात. तो रूढीचाच पगडा आहे. मुलाकडच्यांनी काहीही मागणी केली नाही तरी मुलीकडचे आग्रहाने मुलाकडच्यांना काहीना काहीतरी देणं आपलं कर्तव्य मानतात. वस्तुरूपात, वागणुकीच्या स्वरूपात आयुष्यभर त्याचं बंधन मानतात.

अशीच गोष्ट ‘शपथ’ची. संसारात नवरा-बायकोने लग्नविधीपासून शेकडो शपथा घेतलेल्या असतात. पण त्या खरोखरच किती पाळल्या जातात. वैवाहिक जीवनात अशा शपथांचा गांभीर्याने विचार झाला आणि त्या पाळल्या गेल्या तरी अनेक विवाह यशस्वी होतील, पण तसे होत नाही. माझ्या दृष्टीने ते निर्थक कर्मकांड आहे. त्या शपथेच्या मजकुराचा कायदेशीर कागद बनवून त्याखाली त्या व्यक्तीने सही करावी. मग आपण विश्वास ठेवू. साक्षीदार म्हणून अनेकांनी सह्य़ा कराव्यात.

मी स्वत: रूढी, चालीरीती, परंपरा, कर्मकांड यांचा जाहीर विरोधक आहे. जवळजवळ सगळ्या रूढी नुसत्या निर्थकच नाहीत तर अपायकारक आहेत. रूढी-परंपरा निरक्षरांसाठी होत्या आणि आजही आहेत. त्या सुशिक्षितांसाठी नाहीत. आपण स्वत: समजून विचार करून वागावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. तसं होत नाही. त्याबद्दलचं एक महत्त्वाचं उदाहरण सांगतो. स्त्रीच्या मासिक पाळीबद्दलची हिंदू धर्मातली कर्मकांडं इतकी अनैसर्गिक आहेत की ती पाळणाऱ्यांबद्दल फार वाईट वाटतं. सर्वसाधारणपणे जगातली निम्मी लोकसंख्या स्त्रिया आहेत याचा अर्थ त्यांना मासिक पाळी येणारच. ही गर्भ राहण्यासाठीची निसर्गयोजना आहे आणि त्या काळात स्त्रीने विश्रांती घेण्याची गरज असते हे साध्या शब्दात ठरवून टाकण्याऐवजी तिला अपवित्र समजायचं नि अनेक गोष्टी करण्यासंबंधी बंधनं घालायची हे चुकीचं आहे. मलमूत्र या गोष्टी नैसर्गिक आहेत पण अस्वच्छ आहेत, हे कळल्यावर शौचाला जाण्याची बंदी आहे असं म्हणणं जितकं वेडगळपणाचं आहे तसंच हे आहे.

खाण्यापिण्याबद्दलदेखील गमतीशीर रूढी आहेत. अनेकांच्या संसारात त्या दिसतात. धार्मिक उपवास या कल्पनेबद्दल मला वाटतं, की आयुर्वेदातली लंघन, फलाहार ही कल्पना धर्मानी उचलली आणि पुढे त्याला रूढीचं चमत्कारिक स्वरूप दिलं. उपवासाला चालणाऱ्या आणि न चालणाऱ्या खाद्यपदार्थाची यादी तर विनोदबुद्धीचा कहर आहे. त्यामागची तर्कसंगती कोणीही सांगू शकत नाही. ‘काहीतरी खाल्लंच पाहिजे’ असा यजमान आग्रह करतो आणि ‘बरं मग नुसती हातावर साखर द्या’. असं म्हणून पाहुणा त्या रूढीला मान देतो हे मला निर्थक वाटतं.

संस्काराची आधुनिक व्याख्या प्रथम थोडक्यात सांगून टाकतो. आधुनिक संस्कार म्हणजे ‘बलवानाने दुर्बलाला मदत करण्याची कर्तव्य भावना’. संस्कार कोणी करायचे नसतात. ते एखाद्या व्यक्तीवर इतरांच्या वागणुकीमुळे आपसूक होतात. थोडक्यात संस्कार घेता येतात, पण देता येत नाहीत.

पूर्वी इतिहासात काय झालं, का झालं, प्रश्न कसे सोडवले, हे जरूर शिकावं, पण या सगळ्याचा उद्देश सध्याचे प्रश्न सोडवणं हाच आहे. हे समजून न घेता परंपरावाद्यांचं ठरावीक वाक्य असं असतं, ‘‘आसपास बघायचं आणि चारचौघं करताहेत तसं वागायचं.’’ पारंपरिकतेमध्ये ‘याविषयी एक शब्द काढू नका’ याची मोठी यादी असते. त्यामुळे पारंपरिकता आपल्या अभ्यासासाठी काही कामाची नाही.

आता एका निराळ्या मुद्दय़ाकडे वळू. एखाद्याने विचार करून रूढींमधून हळूहळू मुक्त व्हायचं ठरवलं तर काही काळ आयुष्यात तात्पुरती पोकळी जाणवेल. ती लवकरात लवकर चांगल्या, समाजोपयोगी, आधुनिक गोष्टींनी भरण्याचा मात्र प्रयत्न करायला हवा. नाहीतर पोकळीचा त्रास होईल आणि पुन्हा कर्मकांडाकडे वळावं लागेल.

आमच्या घरात आम्ही नवी आधुनिक परंपरा पाळतो. कुठचाही सण साजरा करायचा नाही पण ३६५ दिवस आनंदी, समाधानी, शांतचित्त आणि स्थितप्रज्ञ राहायचं अशी पद्धत आम्ही पाडली आहे.

करायला हव्यात अशा गोष्टींची यादी एवढी मोठी आहे हे जर पटलं तर पुढचा प्रश्न मनात येणार. एवढय़ा गोष्टींचं नियोजन कसं करायचं? त्यासाठी शोधलेला आधुनिक संस्कार म्हणजे सतत बाळगायची, खिशात किंवा पर्समध्ये ठेवण्याची डायरी आणि ती कशी वापरायची याची पद्धत. नोंदी करण्याचा हा आधुनिक संस्कार खरा उपयोगी ठरणार आहे.

वैवाहिक आयुष्यात मुलं होतात. सगळे शहरात राहणारे असं गृहीत धरू या. कामाबद्दलचा एक महत्त्वाचा संस्कार मुलांच्या मनावर व्हायला हवा. स्वत:चं काम अतिशय गंभीरपणे, मनापासून, कष्ट घेऊन करायला पाहिजे. प्रत्येक दिवशी स्वत:च्या कामाचं स्वत:ला समाधान वाटलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. चांगलं काम केलं की तुम्ही लोकांच्या आपोआप लक्षात राहता. तुमच्या कामाला मागणी असते, पैसे आपोआप मिळतात. अडचण अशी आहे की, हा संस्कार मुलांच्या मनावर होण्यासाठी प्रथम पालकांच्या मनावर होण्याची गरज आहे. ‘ज्या कामाला हात लावीन ते चांगलंच करीन’ हा प्रथम स्वत:चा निर्धार पाहिजे. माझ्या दृष्टिकोनातून चांगलं शोधण्यासाठी परंपरेने सांगितलेल्या रूढी, कर्मकांडं यांच्यामधून सबंध कुटुंबाने मुक्त होण्याची गरज आहे. शिवाय अशी अनेक कुटुंबं जोडायला हवीत तर त्यातून विवाह ठरणार आणि समाधानाने टिकणार!

(सदर समाप्त)

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2018 1:01 am

Web Title: article about wedding traditions and customs
Next Stories
1 विचारांतील स्पष्टता महत्त्वाची
2 लग्न ‘समारंभ’
3 विवाह अभ्यासाची गरज
Just Now!
X