19 January 2021

News Flash

पैशांबद्दलची मानसिकता

 श्रीमंत म्हणजे ज्यांना म्हातारपण, आजारपण, पुढची पिढी याबद्दल पैशांची काळजी नसते.

मुला-मुलींना लग्नाआधी एकमेकांच्या आर्थिक व्यक्तिमत्त्वासंबंधी काही गोष्टी कळणं जरूरी आहे. प्रत्यक्ष दर महिना उत्पन्न मग ते नियमित असो, की अनियमित ते कळायला हवे. पैसे मिळवण्याच्या,खर्च करण्याच्या बाबतीतली जिद्द, शिस्त, बचतीच्या सवयी, पैसे देताना-घेताना समतोल चोख व्यवहाराची समज आणि अनुभव आहे की नाही याची माहिती हवीच हवी.

किती पैसे खिशात असले की माणूस स्वत:ला गरीब समजतो, श्रीमंत समजतो की मध्यमवर्गीय हे अवलंबून असतं. पुढे काहीही बोलण्यापूर्वी आपण आपल्यापुरत्या व्याख्या पक्क्या करून टाकू.

गरीब म्हणजे ज्याला चालू महिनादेखील चरितार्थ चालवता येईल की नाही याची खात्री नसते.

मध्यमवर्गीय म्हणजे ज्याला चालू महिना, चालू वर्ष, पुढची काही र्वष निश्चिंतपणी काढता येतील याची खात्री वाटते, पण मोठं आजारपण, म्हातारपण, मोठे खर्च यांच्याबद्दल पैशाच्या सोयीची खात्री वाटत नाही.

श्रीमंत म्हणजे ज्यांना म्हातारपण, आजारपण, पुढची पिढी याबद्दल पैशांची काळजी नसते.

आता आपण हा विषय संपूर्ण आयुष्याशी जोडून बघू या. लग्न करण्यापूर्वी पैशांबद्दलची विचारसरणी कळली तर फार बरं असं सगळ्यांना वाटतं. त्याचा एक पर्याय म्हणजे एकत्र खरेदी करणं. जो माणूस प्रत्येक गोष्ट घासाघीस करून खरेदी करतो तो आयुष्यभर वागणुकीत भावनांचीसुद्धा घासाघीस करत राहतो. हे कळायला हवं.

मुला-मुलींना लग्नाआधी एकमेकांच्या आर्थिक व्यक्तिमत्त्वासंबंधी काही गोष्टी कळणं जरूरी आहे. प्रत्यक्ष दर महिना उत्पन्न मग ते नियमित असो, की अनियमित ते कळायला हवे. पैसे मिळवण्याच्या,खर्च करण्याच्या बाबतीतला स्वभाव – जिद्द, शिस्त, बचतीच्या सवयी, पैसे देताना-घेताना समतोल चोख व्यवहाराची समज आणि अनुभव आहे की नाही याची माहिती हवीच हवी.  अनेक खर्च हे एकत्रित करावे लागतात विशेषत: नातेवाईक वा मित्रमंडळी यांच्यामध्ये. त्या एकत्रित कामासाठी जो खर्च येईल तो हजर असलेल्या लोकांच्यात वाटून घेणं, थोडक्यात ‘सोल्जर्स कॉन्ट्रिब्यूशन’ किंवा ‘गोइंग डच’ यासारखा उत्तम मार्ग नाही. याबद्दल भारतीय लोकांपेक्षा पाश्चात्त्यांमध्ये जास्त समज आढळते.

एखादी व्यक्ती कनिष्ठ मध्यमवर्गीय असो नाही तर मध्यम मध्यमवर्गीय असो, जर अल्पबचतीची जादू त्याला अवगत असली तर पैशांच्या अडचणीमुळे तो नक्की त्रस्त होणार नाही. अल्पबचत म्हणजे अल्प रक्कम नियमितपणे बाजूला टाकणं. किती ते ज्याने त्याने ठरवावं, पण ‘अल्प आणि नियमित’ या दोन गोष्टी महत्त्वाच्या. त्यातलं नियमित म्हणजे ‘रोज’ अशी शिफारस आहे. तरच त्यात जादू आहे.

एक  निराळीच गोष्ट स्पष्टपणे सांगतो. पैशांच्या व्यवहाराबद्दल १०० पैकी ९५ टक्के लोकांवर आपला विश्वास नसतो. तसं तोंडाने बोला असं मी म्हणत नाही, पण स्वत:च्या मनाशी ते मान्य करा. मात्र दुसऱ्याला न दुखावता खुबीने स्वत:ची खात्री करून घ्यावी. कागदपत्रं वाचून मगच सही करावी.

समाजाशी वागणुकीबरोबर पैशांबद्दलची परिपक्वता ओळखण्याचे काही निकष सांगतो.

आपण जे काम करतो त्याचे रास्त पैसे घेतले पाहिजेत आणि कुठच्या कामाचे किती पैसे याचं छापील पत्रक असेल तर उत्तम. अशासाठी की, समोरचा माणूस किती पैसे बाळगून आहे, किती अडचणीत आहे त्याचा पैसे आकारण्याशी संबंध असता कामा नये.

त्या तक्त्यात लिहिल्याप्रमाणे किंवा तोंडी ठरल्याप्रमाणे काम केल्यावर त्याचे पैसे मागायचा जराही संकोच असता कामा नये. हे पैसे मागण्याची भीड चेपणं, त्याची सभ्यपणे आठवण करणं, म्हणजे परिपक्वतेचाच एक भाग आहे.

आज जी वस्तू ज्या किमतीला मिळते त्या किमतीला ती वस्तू व्याजाने कर्जाऊ पैसे घेऊन विकत घेणं हे फायदेशीर आहे ही गोष्ट अनेकांना वेळेवर कळत नव्हती, पण तरुण पिढीला बरोब्बर समजली होती. फ्लॅट्स, जागा यांच्या किमती इतक्या भयानक प्रमाणात वाढल्या की, कर्ज न घेतलेला माणूस खुळा ठरायला लागला. त्यामुळे खुशाल पैसे उसने घ्यावेत, द्यावेत, कागद करावा आणि व्याजाचा दरही बाजाराप्रमाणे आधी ठरवून घ्यावा, तरच कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्य टिकतं असं मला वाटतं.

एक निराळा मुद्दा मांडतो. जगभर लोक म्हणतात की ग्राहक हा राजा असतो. गिऱ्हाईकाला जे हवं असेल ते उत्पादक बनवतात. याला ‘बायर्स मार्केट’ म्हणतात. भारतात मात्र परिस्थिती पार उलटी आहे. गिऱ्हाईकाला कशाची जरूर असायला हवी हे उत्पादक आणि विकणारे ठरवतात. भारतीय जनता या जाळ्यात अलगद शिरते. भारत हे ‘मॅन्युफॅक्चर्स’. ‘डिस्ट्रिब्युटर्स, सप्लायर्स, सेलर्स मार्केट’ आहे. गिऱ्हाईक इथे राजा नाही, गुलाम आहे.

आमच्या ओळखीची अशी अनेक अख्खी कुटुंबंच्या कुटुंबं आहेत की त्यांना बोलायला, विचार करायला फक्त एकच विषय असतो, ‘फक्त पैसे’. आम्ही अशांना फ. पै. किंवा ‘ओ. एम.’ म्हणजे ‘ओन्ली मनी’ म्हणतो.

यातल्या बहुतेक नवरा-बायकोमध्ये लैंगिक संबंधांबद्दल अडचणी असतात. नवऱ्यांना त्यांच्या कामाच्या ताणामुळे लैंगिक संबंध नीट करण्याइतकी मानसिक, शारीरिक शक्ती शिल्लक नसते. ते बायकोला ‘ऑरगॅझम’ ऊर्फ ‘उत्कट क्षणा’चा आनंद देऊ  शकत नाहीत, कारण त्यासाठी मेहनत करावी लागते ती त्यांना शक्य नसते. बायको असमाधानी राहिल्यामुळे तीही नवऱ्याला लैंगिक तृप्ती देऊ शकत नाही. या लैंगिक असमाधानामुळे ‘फक्त पैसे’ वृत्ती आणखी वाढायला लागते. ‘आपल्याकडे कशी कोटी कोटी रुपयांची मालमत्ता आहे.’ हा विचार म्हणजे नवऱ्याचा ‘ऑरगॅझम’ आणि काही जणींच्या बाबतीत ‘जास्तीत जास्त महाग खूप साडय़ा, ड्रेसेस, दागिने’ हा विचार म्हणजे बायकोच्या उत्कट आनंदाच्या क्षणाची अवस्था होते.

अत्यंत खेदाने एक स्वतंत्र मुद्दा मांडतो.

फसवायचं नाही हा निर्णय घेतलेले आणि खरोखर तसं वागणारे खूप जण आहेत, पण न फसण्याचा निर्णय घेतला तरी ते आचरणात आणण्यासाठी मोठी तपश्चर्या लागते. न फसण्याची खबरदारी घ्यायला मी अनेक वर्षांनी खूप कष्टाने शिकलो.

भारतीय जनतेचं एका बाबतीत मला खूप आश्चर्य वाटतं. त्यांना फसवणाऱ्या माणसाचा राग येण्याऐवजी कौतुकच जास्त वाटतं. ‘माझं ते मी ठेवणार आणि दुसऱ्याचंही घेणार’ ही वृत्ती एकदा तयार झाली की रोखणं फार कठीण असतं. काहीही करायचं असलं की, ‘त्यात मला काय मिळणार’, हा प्रश्न मनात यायला लागला की भ्रष्टाचाराच्या वाटेवरचा प्रवास सुरू होतो.

एवढय़ा अडचणी असूनदेखील एखादं काम करण्यासाठी कोणी पैसे चारले नाहीत तर अपमान होतो. वर्तमानपत्रात मधूनच प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्याच्या बातम्या येतात. घरात सापडलेल्या नोटांच्या थप्प्यांचे आकडे ऐकले की त्याच्या भयानक स्वरूपाची कल्पना येते. भ्रष्टाचाराच्या बातम्या तर सगळ्याच क्षेत्रातून येत असतात.

कृष्णमूर्तीनी एक फार महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. ते म्हणाले, ‘भारतीय समाजव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंत लोकांना या व्यवस्थेत पाहिजे ते सगळं मिळालेलं आहे, त्यामुळे ते त्यात बदल करणार नाहीत. गरीब लोक स्वत:च्या चरितार्थाच्या झगडय़ात इतके बुडालेले आहेत की त्यांना दुसरा काही विचार सुचू शकत नाही’. त्यामुळे काही अर्थपूर्ण बदल होणार असले तर ते मध्यमवर्गीयांच्याच हातून होतील.’

सबंध जगामध्ये प्रगत देश आणि अप्रगत देश कशाला म्हणतात याची जी समाजशास्त्राने व्याख्या केली आहे ती आपल्याला खूप विचार करायला लावणारी आहे. समाजातल्या श्रीमंतांच्या प्राप्तीची सरासरी आणि गरिबांच्या प्राप्तीची सरासरी या दोन सरासरींमधला फरक कमी असेल तर त्याला प्रगत देश म्हणतात.

पुढचा पेच असा की, या गरीब माणसांकडून माणशी एक असं मत तर पाहिजे असतं त्यामुळे सतत आश्वासनं देत, खोटं बोलत राहणारा तो म्हणजे राजकारणी अशी परिस्थिती असते. विकासाच्या व्याख्येप्रमाणेदेखील भारताचा क्रमांक जगातल्या १६५ देशांच्यात शंभरच्या आसपास असतो. भारताची अवस्था जर इतकी वाईट आहे तर बाकीच्या ६५ देशांची काय अवस्था असेल?

पैशाचे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचे स्थान असते, मात्र त्याच्याशी तुमचं नातं कसं आहे यावर नवरा बायकोचं नातं अवलंबून असतं.

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2018 12:35 am

Web Title: marriage and money mentality
Next Stories
1 उद्याचे पालक घडवताना
2 पालकांचे शिक्षण
3 भावनिक गुणांकाचं महत्त्व
Just Now!
X