26 January 2021

News Flash

संवादाची योग्य कला

चांगला संवाद म्हणजे, ‘खरं, स्पष्ट, थोडक्यात, गोड आणि वेळेवर बोलणं.’

प्रतिनिधिक छायाचित्र

जवळजवळ सगळ्या दु:खाचं कारण म्हणजे, ‘लोक नको तेव्हा नको ते बोलतात आणि हवं तेव्हा योग्य ते बोलत नाहीत.’ चांगला प्रतिसाद मिळाला तर संवाद चांगला होतो, पण प्रथम कोणी तरी सुरुवात करावी लागते. त्याची सुरुवात स्वत: करायची हा निर्णय पक्का झाला की सोपं जातं. चांगल्या संवादाची व्याख्या कठीण नाही, पण चांगला संवाद साधणं मात्र कठीण आहे. ती कला रुजवण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात.

आपल्या शरीराची गरज म्हणून आपल्याला खावं – प्यावं लागतंच, त्याचं पचन करावं लागतं आणि ते मलमूत्रावाटे बाहेरही टाकत राहावं लागतं. यातली एक जरी क्रिया थांबली तरी आपल्याला गंभीर आजार होतो. तात्पुरती बिघडली तरी औषधपाणी करावं लागतं. मनाचं अगदी तसंच आहे. आपल्याला ऐकून, बघून, वाचून किंवा अनुभवाने ज्ञान मिळवावं लागतं. पुढे त्या मिळालेल्या ज्ञानाबद्दल आपण विचार करतो. आपल्या आत्तापर्यंतच्या घटनांबरोबर ते मिळालेलं ज्ञान ताडून बघतो. त्यानंतर आपण कोणाशी तरी ते बोलतो. शरीराच्या तीन क्रियांसारखंच ज्ञानग्रहण, चिंतन आणि संवाद यांपैकी एक क्रिया जरी थांबली, बिघडली तरी आपल्याला अस्वस्थ वाटतं.

जवळजवळ सगळ्या दु:खाचं कारण अगदी साधं असतं. ‘लोक नको तेव्हा नको ते बोलतात आणि हवं तेव्हा योग्य ते बोलत नाहीत.’ अनेकांच्या मनात बोलायला सुरुवात कोणी करायची असादेखील प्रश्न असतो. शिवाय प्रतिसादावर समोरच्या माणसाचा संवाद किती मनापासून, किती, कसा हे सगळं अवलंबून असतं. चांगला प्रतिसाद मिळाला तर संवाद चांगला होतो, पण प्रथम कोणीतरी सुरुवात करावी लागते. त्याची सुरुवात स्वत: करायची हा निर्णय पक्का झाला की सोपं जातं. चांगल्या संवादाची व्याख्या कठीण नाही, पण चांगला संवाद साधणं मात्र कठीण आहे.

चांगला संवाद म्हणजे, ‘खरं, स्पष्ट, थोडक्यात, गोड आणि वेळेवर बोलणं.’ असा संवाद ज्यांच्याशी नीट जमला, मध्यम जमला, नाही साधला यावरून ३ गट होतात. पहिला गट खूप जवळच्यांचा. अशी संख्या अगदी कमी असते. किती गुपितं एकमेकांना माहीत आहेत, यावरून ते ठरतं. दोन्ही माणसांना एकमेकांविषयी तेवढी जवळीक वाटत असली तरच ते या गटात येतात. दुसरा गट हितचिंतकांचा. असेही संख्येने बऱ्यापैकी असतात. म्हणजे असे लोक की, ज्यांना तुमच्याविषयी आदर, कौतुक आहे, पण ते पहिल्या गटात नसतात. तिसरा गट व्याख्या करायला फार सोपा आहे. यांचा निव्वळ परिचय असतो. नाव, चेहरा माहीत असतो. कमी वेळा गाठ पडते. अर्थात अशांची संख्या खूप असते. या तीनही गटातल्या लोकांशी आपला संवाद असतो. ‘फेसबुक फ्रेण्ड्स’ या तीनही गटांत धरता येत नाहीत.

मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे स्वत:हून बोलायचं असा निर्णय झाला तर त्या संवादाविषयी थोडं सांगतो.

इतर सगळ्या नात्यांपेक्षा नवरा-बायको हे निराळं, खास नातं आहे. नवरा-बायकोमधला मोकळा जवळिकीचा संवाद ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या विशेष नात्याविषयी अनेक वेळा अनेक पद्धतीने उल्लेख होतील, पण त्यातली जादूची एक सगळ्यांनी लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट आहे. काहीही ठरवण्यापूर्वी ‘जोडीदाराला विचारून सांगतो’ हे वाक्य. त्याच्या खालोखाल आपल्या मुलांशी आणि आईवडिलांशी मोकळा संवाद ही शिकण्याची गोष्ट आहे. कुटुंबात जवळची, जरा दूरची, लांबची कितीतरी नाती असतात. मित्रमंडळी असतात. सहकारी असतात. त्यांच्याशी संबंध राखण्यासाठी संवाद साधावाच लागतो.

परिपक्वता याचाच अर्थ मुद्दा विरोधी असला तरी तो योग्य पद्धतीने सांगता येणं. माणसाची खरी परीक्षा होण्यासाठी विरोधी विचार समोर येणं जरुरीचं असतं. आपली चूक झाली तर माफी मागता यायला हवी. अनेक जण शक्यतोवर चूक कबूल करत नाहीत. अगदी खिंडीत कोणी पकडलं तर ‘तूच शहाणा. मला काही अक्कल नाही, झालं?’ असं म्हणायचं. याने खरं म्हणजे काहीच साध्य होत नाही.

आणखी लोकांचा एक प्रकार मी खूप प्रमाणात बघितलाय. त्यांना चांगल्या गोष्टींचं कौतुक करताच येत नाही. खाद्यपदार्थ चांगला झाला असं तोंडाने सांगता येत नाही. वर ते असंही म्हणतात, ‘तोंडाने कशाला सांगायला हवं, वागणुकीवरून, चेहऱ्यावरून नाही का कळत?’ इतर अनेक चांगल्या कौतुक करण्याजोग्या गोष्टी आसपास घडत असतात, ओळखीचे लोक करत असतात. पण तेवढं साध्या शब्दात व्यक्त करणं जमत नाही असे खूप जण असतात. भरमसाट कौतुक करणारेही असतातच, इतकं की ते खरं वाटेनासं होतं. अशा साध्या गोष्टींऐवजी लोक जेवायला घरी बोलावतात. अशा लोकांच्या मनातलंपण न बोललेलं वाक्य असं असतं, ‘तुम्ही मला समजून घ्या. पण मी माझा न बोलण्याचा हट्ट सोडणार नाही.’ आपल्या मनातलं त्याला प्रतिक्रिया म्हणून न बोललेलं वाक्य असं असतं – ‘तुम्ही आधी स्वत:हून बोला, मगच आम्ही तुम्हाला अवश्य समजून घेऊ.’

व्यवसाय, धंदा, दुकानदारी यांमधले संवाद हा त्यासंबंधीच पण खास अभ्यासाचा विषय आहे. माझ्या असे काही दुकानदार ओळखीचे आहेत, की जे सगळ्या गिऱ्हाईकांची आडनावं लक्षात ठेवतातच, पण त्यांचा काम-धंदा, नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक माहिती असं सगळं लक्षात ठेवतात. भेटलं की, चौकशी करतात. काय बोललं की दुसऱ्याला आपलेपणा वाटतो हे त्यांना चांगलं माहीत असतं.

याच्या विरुद्ध टोकही तुम्ही पाहिलं असेल. एक ओळखीचे दुकानदार आहेत. गेल्या अनेक वर्षांत मी त्यांना प्रसन्न चेहऱ्याने वावरताना एकदाही बघितलेलं नाहीय. त्यांच्या दुकानात मी अनेक वेळा गेलेलो आहे. ते मला कधी वेडंवाकडं बोललेले नाहीत, पण इतरांना ‘एवढं कळत नाही का?’, ‘तुमची अक्कल कुठे गेली?’ असलं बोलताना मी बघितलं आहे. गिऱ्हाईकांना तुच्छतेने वागवल्यामुळे धंदा वाढतो असा त्यांचा विश्वास आहे.

एक मूलभूत मुद्दा शेवटी मुद्दाम मांडतोय. मानसशास्त्रात एका विषयावर भरपूर संशोधन झालेलं आहे. तो प्रश्न म्हणजे माणसाचे प्रश्न बोलल्याने सुटतात का न बोलल्याने? प्रश्न असला की तो सोडवण्यासाठी एकूण ३ मार्ग असतात हे कायमच मान्य आहे.

कुठचीतरी अदृश्य शक्ती आपला प्रश्न सोडवेल आणि सगळं काही ठीक करेल. कुठचाही मूर्त किंवा अमूर्त देव, त्याचा प्रेषित, बुवा, महाराज ज्यांच्या कोणावर श्रद्धा असेल त्यांच्या हाती तो प्रश्न देऊन आपण मोकळं होणं.

दुसऱ्या कोणाचीही मदत न घेता स्वत: वाचन, चिंतन या जोरावर स्वत:चे प्रश्न सोडवणं. हा मार्ग कठीण आहे. ते जमलं नाही तर लोक नुसता वेळ काढतात. प्रश्न सोसत राहतात आणि एकमेकांना छळत बसतात.

तिसरा मार्ग प्रश्नाविषयी बोलायला सुरुवात करणं. इतर व्यक्तींशी बोलणं, ग्रूप जमवणं, पुस्तक वाचणं, लिहिणं. कुठच्याही पद्धतीने पण संवादाला सुरुवात करणं. व्यवस्थापनशास्त्रात म्हटलंय की प्रश्नाचं उत्तर माहीत नसलं की, प्रथम प्रश्न काय ते बोलायला सुरुवात करावी. प्रश्न काय ते समजावून सांगता सांगता उत्तराचा शोध लागायला सुरुवात होते. मला वाटतं की तिसरा मार्ग सर्वात योग्य आहे.

संवादाच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी –

कौतुक करायचं असलं तर लगेच आणि सगळ्यांच्या देखत जाहीरपणे करावं. पण टीका करायची असली तर खासगीत, थोडक्यात आणि काही काळानंतर करायची.

जेव्हा संवाद काही कारणांने तुटतो तेव्हा दोघांपैकी जो शहाणा असेल त्याने पुन्हा संवाद सुरू करायचा.

दुसऱ्याला म्हणण्याचं मुख्य वाक्य, ‘मी सांगतो म्हणून कुठलाही निर्णय बदलू नका. तुम्हाला योग्य वाटेल तेच करा.’

चांगल्या संवादाला कला का म्हणत असावेत? त्याचं कारण आपलं स्वत:चं मन मारायचं नाही, आणि दुसऱ्याला दुखवायचं नाही. दोन्ही साधण्यासाठी कलाकारच असायला हवं ना!

अनिल भागवत hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2018 1:01 am

Web Title: the art of communication
Next Stories
1 लैंगिक शिक्षण
2 छुपा घटस्फोट 
3 कुटुंबाचं व्यवस्थापन
Just Now!
X