गेली अनेक वर्ष माझा अनेक निरनिराळ देशांतल्या लोकांशी संबंध आला. भारतीय कुटुंबपद्धतीबद्दल सगळं छान छानच ऐकत आलोय. त्यातला काही अनुभव प्रत्यक्ष परदेशात राहिल्यामुळे, तर बाकीचा त्यांच्याशी या विषयाबद्दल बोलल्यामुळे. व्यावसायिक समुपदेशक म्हणून शक्य तेवढय़ा अलिप्त नजरेने भारतीय कुटुंबांची सध्याची परिस्थिती बघतो तेव्हा मात्र मला अनेक शंका येतात. त्या सगळ्या गोष्टींचं मूळ मला लग्नाचा अर्थ अनेकांना कळलेला नसतो याच्यात दिसतं. लग्न करायचा निर्णय स्वत: घेतलेला असला तर त्याची जबाबदारी वाटते आणि आधी पुरेसा विचार केलेला असला तर त्या निर्णयाबद्दल खात्री वाटते.

व्यवस्थापनशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या माझ्या अभ्यासाच्या तीनही विषयांत सांगितली आहे ती खूप महत्त्वाची गोष्ट प्रथम सांगतो. ‘आपण कोणीही दुसऱ्याला बदलू शकत नाही, पण स्वत:ला बदलू शकतो.’ आणखी एक गोष्ट, मी अमेरिकेत शिकलेल्या व्यवस्थापन शास्त्रात होती. एकूण सगळ्या प्राण्यांचे, माणसासकट, दोनच भाग असतात. एक म्हणजे स्वत: आणि दुसरा भाग म्हणजे त्याखेरीजचे सर्व. त्याचंच तर व्यवस्थापन करायचं असतं. नवरा किंवा बायको हे कितीही जवळचं नातं मानलं तरी ती व्यक्ती स्वत:व्यतिरिक्तच्या दुसऱ्या गटातलीच असते. ही मूलभूत गोष्ट न कळल्यामुळे दोघांपैकी एक जण किंवा दोघंही एकमेकांना गृहीत धरतात आणि तिथेच घोटाळ्याला सुरुवात होते. माझ्या आधीच्या पिढीमध्ये फक्त बायकोने ‘अ‍ॅडजस्ट’ करायचं म्हणजेच विवाहाचा अर्थ समजत होते. खरी गोष्ट अशी आहे, की कोणीही एकच एक जोडीदार कायम ‘अ‍ॅडजस्ट’ करत राहू शकत नाही. तशी परिस्थिती असली तर केव्हा तरी त्याचा उद्रेक होतो. तेही शक्य नसलं तर निराशेचा तीव्र झटका येऊ शकतो. किंवा निरस संसार चालू राहतो. त्यासाठी काही महत्त्वाची तत्त्वं वैवाहिक जीवनात सतत लक्षात ठेवावी लागतात. १) निराळं म्हणजे वाईट नाही. २) मतभेद म्हणजे भांडण नाही. ३) कोणालाही मूर्ख म्हणण्याचा अधिकार आपल्याला नसतो. या तीनही गोष्टींविषयी जरा सविस्तर सांगतो.

google steps to lay off more employees
गूगलकडून कर्मचारी कपातीचे पाऊल; भारतासह इतर देशांमध्ये काही व्यवसायांचे स्थलांतर करणार
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Foreign investors invested more than Rs 2 lakh crore in the domestic capital market
परदेशी गुंतवणूकदारांचे दमदार पुनरागमन; सरलेल्या आर्थिक वर्षात २ लाख कोटींची गुंतवणूक

१)  स्त्री आणि पुरुष या दोन निराळ्या व्यक्ती आहेत. निराळ्या कुटुंबातल्या, निराळ्या पाश्र्वभूमीतून आलेल्या. त्या निराळ्याच असणार. त्यामध्ये चांगलं-वाईट हा प्रश्नच येत नाही. आपापल्या परिस्थितीच्या मर्यादेत तो माणूस निर्णय घेऊन निवड करतो ते अनेकदा कळत नाही त्यामुळे अडचण होते.

२) जोडीदाराशी वागताना एकमेकांना वाईट वाटू शकेल अशा काहीतरी घटना घडल्या तरी त्या मुद्दामहून केलेल्या असणं शक्य नाही, याची खात्री बाळगावी. मतभेद असले तरी त्याला भांडण समजायचं काहीच कारण नाही. मतभेद म्हणजे निराळा किंवा विरोधी विचार आणि त्याचा सामना करण्याची ताकद म्हणजेच खरी ताकद. मतभेदाच्या विषयावर अधिक विचार, अभ्यास करून त्याविषयी पुन्हा काही दिवसांनी बोलता येतं हे कळलं की मोठी भांडणं टळतात. हे न कळल्यामुळे अनेक जोडपी छोटय़ा छोटय़ा विषयांत इतकी भांडतात, की त्यांची सगळी शक्ती त्यातच संपून जाते. खऱ्या महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष द्यायला त्यांच्याकडे शक्ती शिल्लकच नसते आणि वेळही नसतो.

३) आपल्या दृष्टीने एखादी व्यक्ती मूर्ख असली तरी तसं म्हणता येत नाही. ‘आपला या बाबतीत मतभेद आहे’, ‘तुमची ही गैरसमजूत आहे’, असं काही तरी बोलणं ही त्याची मर्यादा आहे. दुसऱ्याला मूर्ख म्हणणं, मंदबुद्धी म्हणणं हे तत्त्व म्हणून मान्य केलं तर दुसऱ्या एखाद्या जास्त हुशार माणसांनी आपल्याला मूर्ख, मंदबुद्धी म्हटलं तरी ते त्याच तत्त्वात बसणार आहे, याची सतत जाणीव ठेवावी.

आता आणखी एका गोष्टीबद्दल बोलू या. माझा अभ्यास शहरी मध्यमवर्गीय सुशिक्षितांबद्दल आहे. माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा, महत्त्वाचा आणि जास्तीत जास्त आनंदाचा काळ कुटुंबाबरोबरचा असतो हे सगळे जण मान्य करतात. त्यामध्ये कुटुंबातल्या सगळय़ा लोकांचं एकमेकांवर प्रेम असतं. मी त्याबद्दल शंका व्यक्त करत नाही आणि तरी त्यात मला काही उणिवा दिसतात.

वस्तूची किंमत त्याच्या उपलब्धतेवरून ठरते, हा मूळ तर्कसंगत विचार लक्षात घेऊन जरा अधिक स्पष्टपणे प्रेम व्यक्त करण्याकडे बघूया. प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग म्हणजे त्या माणसासाठी वेळ देणं, बुद्धी खर्च करणं, श्रम करणं, यातलं काहीच शक्य नसलं तर फक्त पैसे खर्च करणं. यातली सर्वात कठीण ती जास्त किमती गोष्ट आणि सर्वात सोपी ती स्वस्त असा क्रम लावून बघूया. असं दिसतं, की सर्वात मूल्यवान वेळ आहे, त्याखालोखाल श्रम, त्याखालोखाल बुद्धी वापरणं आणि सर्वात शेवटचा क्रम म्हणजे पैसे खर्च करणं. या मोजपट्टीवर तपासलं तर बाजारातून आणून वस्तू ‘प्रेझेंट’ देण्याची कृती सर्वात खालच्या दर्जाची आहे. ही गोष्ट कमी लोकांना समजते. प्रत्यक्षातलं समाजाचं सरासरी मध्यमवर्गीय कुटुंब तर ‘प्रेझेंटेशन आर्टिकल्स- ग्रीटिंग कार्ड्स’च्या वाटेने फार पुढे पोहोचलं आहे. मग नातेसंबंध सुधारतील कसे?

कुटुंबातल्या चांगल्या नातेसंबंधासाठीची सूत्रं १) स्वत:च्या आयुष्याचं जे काही बरं-वाईट करायचं असेल ते आपण स्वत: करणार आहोत. ‘डेस्टिनी’, नशीब असेल तर त्यात आपण बदल करू शकणार नाही त्यामुळे  त्याकडे लक्षही देऊ नये. करण्याजोगं जे असेल ते स्वत: सगळं करून बघावं. तोपर्यंत निराश होण्याचा आपल्याला नैतिक अधिकार नाही.

२) सगळं चांगलं घडेल असं धरूनच चालता येणार नाही. टोकाची चांगली किंवा टोकाची वाईट गोष्ट घडतच नाही. मध्यम गोष्टच प्रत्यक्षात घडते. त्याच्या अभ्यास व्हावा.

३) स्वत:च्या स्वभावाचा प्रकार समजणं फार जरुरीचं आहे. स्वत:च्या स्वभावाचा प्रकार, दुसऱ्याच्या स्वभावाचा प्रकार, स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या मर्यादा समजल्या की निर्णय होतो. निर्णय लवकर घेता येत नाही अशी ज्यांची अडचण असते, त्यांनी हे समजून घ्यावं.

४) एखाद्या प्रश्नावर जेव्हा कोणी गप्प बसतो तेव्हा त्या माणसाच्या न्यूनगंडामुळे तरी किंवा अहंगंडामुळे गप्प बसलेला असतो. थोडक्यात, तो स्वत:ला किंवा आपल्याला निकालात काढत असतो.

५) कितीही प्रतिभावंत कलाकार, हुशार माणूस असला तरी अतिमहत्त्वाच्या- खास, ग्रेट कामातही बिनडोक कामाचा काही भाग असतोच. तो बिनडोक कामाचा वेळ स्वत: योजना करून विभागून घ्यायचा असतो.

६) हुशारी, सौंदर्य, शक्ती, कलागुण या कशाहीपेक्षा आयुष्य जगण्यासाठी जो गुण सर्वात महत्त्वाचा असतो, तो म्हणजे सारासार विचार.  दुसऱ्याचा कुठचाही विचार समजून घेऊन त्यावर विचार करण्याची तयारी त्यात अपेक्षित असते. लग्न करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा गुण ठरतो.

७) प्रत्येक प्रश्नाला कमीतकमी चार-पाच उत्तरं असतात. प्रश्नाचा आणि उत्तराचा क्रम ठरवायला शिकणं आवश्यक असतं. सगळ्याला सारखं महत्त्व असं म्हणत राहिलं तर कशाचाच निर्णय होऊ शकत नाही.

या सगळ्याचा विचार करून या लेखमालेत महत्त्वाच्या सगळ्या विषयांबद्दल संवाद साधायचा ठरवलय. परिचयोत्तर विवाहाबद्दल सविस्तर बोलायचं ठरवल्यामुळे संवादकला, लैंगिक शिक्षणाची गरज, भावनांकांचं महत्त्व, पालकशिक्षण, पैशाबद्दलची  विचारसरणी, शिक्षण, करीअर, आधुनिक किंवा पारंपरिक म्हणजे नेमकं काय, समाजकार्याच्या दिशा या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. या शिवाय विवेकनिष्ठ विचारांचं महत्त्व, नकारात्मक विचारांची शक्ती, ज्येष्ठांशी संवाद, समुपदेशनाचे प्रकार, समुपदेशनात वापरण्याचे  खेळ, अशा  गोष्टींविषयीही आपण बोलूया.

एक गोष्ट नक्की सांगतो, एवढय़ा निरनिराळ्या विषयांबद्दल स्पष्ट विचारांचा प्रवास कष्टाचा आहे, पण तिथे पोहोचल्यावर समाधान नक्की आहे. लग्नाआधी लग्न करणाऱ्या दोघांनी मिळून हा प्रवास केला तर फारच छान. लग्नानंतरदेखील करता येईलच की!

अनिल भागवत

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com