‘ब्रूस स्ट्रीट’  माझ्या तरुणपणातल्या एका कृतिशील काळाचा साक्षीदार आहे. त्याच्या कोपऱ्याकोपऱ्यावर माझ्या आठवणी विखुरल्या आहेत.. या स्ट्रीटवरच्या निरनिराळ्या वास्तू, तिथे भेटलेली माणसं यांचा माझं व्यक्तिमत्त्व, माझे विचार घडवण्यात खूप मोठा वाटा होता.. आणि त्यावरच्या नीओ कॉफी हाऊसकडे मी आकर्षित व्हायचं मुख्य कारण होतं, तिथला प्रायोगिक नाटकवाल्यांचा अड्डा!

हुतात्मा चौकातून जरा पुढे आल्यावर डाव्या बाजूला ‘होमी मोदी’ नावाचा रस्ता जातो. सेंट्रल बँकेच्या इमारतीपासून ते स्टेट बँकेच्या कार्यालयापर्यंतचा हा छोटासा रस्ता म्हणजेच पूर्वीचा ‘ब्रूस स्ट्रीट’! हा रस्ता माझ्या तरुणपणातल्या एका कृतिशील काळाचा साक्षीदार आहे. त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यावर माझ्या आठवणी विखुरल्या आहेत.. खाण्यापिण्याच्या, मौजमस्तीच्या, नाटक-चित्रपट-सेन्सॉरसंबंधीच्या! चैतन्यमय, आनंददायी आठवणी!

Chandrapur, Sudhir Mungantiwar, Pratibha Dhanorkar,
चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…
Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

या रस्त्याच्या एका कोपऱ्यावर सेंट्रल बँकेच्या दगडी इमारतीत आमचे वकील रवी कुलकर्णी यांचं कार्यालय होतं. १९७४ मध्ये महेश एलकुंचवार लिखित ‘वासनाकांड’ हे नाटक अमोल व मी करत असताना नाटय़-परीक्षण मंडळाने त्यावर बंदी आणली, तेव्हा रवीकडून कायद्यातले डावपेच जाणून घेत अनेक तणावपूर्ण तास आम्ही त्या कार्यालयात घालवले. आणि श्रमपरिहाराच्या निमित्ताने बाजूच्या गल्लीतल्या अंधाऱ्या ‘मरोजा’ रेस्तराँमध्ये, चिकन वा प्रॉन ‘पॅटी’वर ताव मारला! रस्त्याच्या थेट दुसऱ्या टोकाला ‘नानावटी महाल’ आहे. तिथे पूर्वी तिसऱ्या मजल्यावर असलेला ‘वेस्टर्न आऊटडोअर’ हा स्टुडिओ प्रामुख्याने जाहिरात क्षेत्रातल्या ध्वनिमुद्रणांसाठी प्रसिद्ध होता. तिथले दमन सूदसारखे उत्कृष्ट ध्वनिमुद्रक, कमी पैसेवाल्या समांतर चित्रपटांविषयी सहानुभूती बाळगणारे असल्याने, अशा चित्रपटांना स्टुडिओच्या दरात सवलत मिळायची. त्यामुळे आमच्या ‘आक्रीत,’ व ‘थोडासा रूमानी हो जाये’ या चित्रपटांची गाणी भास्कर चंदावरकरांनी तर ‘अनकही’तली गाणी जयदेवजींनी तिथेच ध्वनिमुद्रित केली.

आशा भोसले व भीमसेन जोशींसारख्या थोर गायकांनी ‘अनकही’त पाश्र्वगायन करण्याला अतिशय प्रेमाने होकार दिला, पण ध्वनिमुद्रणाच्या वेळी गमतीच झाल्या! वादकांनी संगीताची तालीम करून खूप वेळ झाला तरी आशाताईंचा पत्ताच नव्हता! ध्वनिमुद्रण रद्द करणं मुळीच परवडण्या सारखं नव्हतं. ते करावं लागेल असं वाटून आम्ही पार हादरलो. शेवटी त्यांना आणण्यासाठी मला

‘प्रभू कुंज’ला पिटाळण्यात आलं. ‘‘बस गं.. सरबत घे’’ असं मला प्रेमाने सांगून त्या लगोलग दुसऱ्याच कुठल्याशा कामात गुंतल्या. मी रडायचीच बाकी होते. शेवटी धीर करून ‘‘जयदेवजी वाट पाहताहेत’’ असं सांगितलं. जयदेवजींना त्या खूप मानत. त्यांचं नाव ऐकताक्षणी मात्र हातातलं काम टाकून आशाताई ताबडतोब माझ्यासोबत निघाल्या. ध्वनिमुद्रण अर्थातच उत्तम झालं हे सांगायला नको! भीमसेनजींच्या वेळची गंमत वेगळीच होती. ‘‘पाश्र्वगायकांप्रमाणे  एकटय़ाने काचेच्या केबिनमध्ये उभं राहून, कानाला हेडफोन लावून गाणं गायला जमणार नाही’’,  त्यांनी सांगितलं. त्यांना मैफिलीप्रमाणे वादक त्यांच्या भोवतीच हवे होते. वास्तविक दमन व अविनाश या ध्वनिमुद्रकांसाठी ही मोठी अडचण होती. पण त्यांनी कुरकुर न करता जमिनीवर बैठक घालून भीमसेनजींना वादकांमध्ये बसवलं आणि उत्कृष्ट ध्वनिमुद्रण केलं. जयदेवजी, आशाताई व भीमसेनजी यांचा त्रिवेणी संगम असलेल्या ‘अनकही’च्या संगीताला त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

‘ब्रूस स्ट्रीट’वरच्या मधल्या भागात ‘पॅरिशियन’, ‘पिकोलो’, ‘जॉर्ज’ असे हॉटेल-रेस्तराँ होते. तिथले पूर्णत: वेगळ्या चवीचे इराणी-फारसी वा पारसी पदार्थ; बिर्याणी व बदामपिस्त्याची उधळण असलेली फिरणी, हे कोकणी व मराठी घरगुती जेवणावर वाढलेल्या माझ्यासाठी अत्यंत अनोखे होते. अधूनमधून, (बहुधा पगाराच्या दुसऱ्या दिवशी) ते चाखल्याशिवाय मला राहवत नसे. मला खवय्यी

(व माझा दृष्टिकोन विशाल) बनवण्यात विविध संस्कृतीतल्या या खाद्यपदार्थानी नक्कीच हातभार लावला.

आणि याच रस्त्यावर, एक साधसुधं उडपी उपाहारगृहदेखील होतं. ‘निओ कॉफी हाऊस’ या नावाचं! स्वातंत्र्यानंतर ‘भारतीय कॉफी बोर्डा’ने आपल्या कॉफीचा प्रसार करण्यासाठी दिल्ली, कोलकाता, मुंबई इत्यादी शहरांत ‘कॉफी हाऊस’ काढले. त्यापैकीच एक होतं ‘ब्रूस स्ट्रीट’वरचं ‘इंडिया कॉफी हाऊस’. अजिबात भेसळ नसलेली शुद्ध कॉफी आणि ती प्यायला रोज येणारे कॉफीप्रेमी ही त्या जागेची वैशिष्टय़ं! मी तिथे जायला लागले, तोवर तिथल्या व्यवस्थापनात बदल झाला होता. कॉफी व अंडय़ाचे प्रकार या वर्षांनुवर्षांच्या यादीत इडली-उपम्याची भर पडली होती. पण आपल्या ग्राहकांची निष्ठा नेमकी कशावर आहे, हे चाणाक्षपणे ओळखून व्यवस्थापकांनी शुद्ध कॉफी हे परंपरागत वैशिष्टय़ जसंच्या तसं राखलं. आणि, शिवसागर, सुखसागर अशा खास उडुपीस्टाइल नावांऐवजी ‘नीओ कॉफी हाऊस’ हे नाव देऊन बदल व परंपरा दोन्ही सूचित केले!

विद्यार्थिदशा संपवून नोकरी सुरू केली त्या सुमारास मी तिथे जायला लागले. जवळच ‘बँक ऑफ इंडिया’च्या मुख्य कार्यालयात असलेला अमोल मात्र आधीपासूनच तिथला ‘नियमित सभासद’ होता. किंबहुना, दक्षिण मुंबईत नोकऱ्या करणारे अथवा गिरगावात राहणारे बहुतेक सर्व प्रायोगिक नाटकवाले तिथे नियमितपणे जमत. आम्हा सर्वाचा अड्डाच होता तो!

या कॉफी हाऊसची आणखी एक खासियत म्हणजे इथे रोज दिवसभरात ठरावीक वेळी ठरावीक लोकांचा अड्डा असे. मी बॅलार्ड पियरला ‘टाटा इकॉनॉमिक कन्सल्टन्सी’मध्ये नोकरी करत असताना, मला अनेकदा कॉफी हाऊससमोर असलेल्या (‘टाटा ग्रुप’च्या) ‘बॉम्बे हाऊस’मध्ये सकाळी यावं लागायचं. त्यावेळी, शेअरबाजार सुरू होण्यापूर्वी कॉफी पीत आर्थिक उलाढालींची चर्चा करणारे दलाल कॉफी हाऊसमध्ये आढळत. शेअरबाजार बंद झाल्यावर नफ्यातोटय़ाचा आढावा घेत कॉफी पिण्यासाठी अनेकजण पुन्हा येत. त्यांच्यातले नंदकिशोर मित्तल हे शेअर्स बाजारातले  ब्रोकर, दुबेंचे मित्र असल्याने माझ्या चांगल्या ओळखीचे होते. एका हातात मारवाडी पद्धतीच्या धोतराचा सोगा, खांद्याला कापडी पिशवी अशा पेहरावात डुलत डुलत चालणारे नंदोजी, प्रत्येक शब्द संथपणे उच्चारत, जाड आवाजात, ‘‘अरे भाई सुनो..’’ अशी सुरुवात करून माझ्याशी (खरं तर कुणाशीही!) ‘थिएटर युनिट’च्या नाटय़प्रयोगांविषयी मोठमोठय़ाने वाद घालत. नंदोजींकडे पाहून ते संवेदनशील गीतकार होते हे खरं वाटत नसे. तसंच, सकाळी न्यायालय सुरू होण्यापूर्वी, काळ्या कोटातले वकील तिथे कॉफीचा (व ऑम्लेट टोस्टचा) समाचार घेत एखाद्या वादग्रस्त निकालावरून अथवा कायद्यातल्या मुद्दय़ावरून चर्चा करताना दिसत. न्यायालयाचं कामकाज आटोपल्यावर दिवसभराचा आढावा घेत कॉफी पिण्यासाठी तेही पुन्हा येत. आमचा ‘वासनाकांड’चा खटला लढलेले प्रख्यात वकील अतुल सेटलवाड तिथे नियमित येणाऱ्यांपैकी होते.

कॉफी हाऊसमध्ये दुपार तेवढी निवांत असायची. या परिसरात कामं असली आणि त्यांच्या दरम्यान दीडएकतास दुपारी मोकळा मिळाल्यास तिथे शांतपणे पुस्तक वाचत किंवा काही लिहीत बसल्याचं मला आठवतं. कधीकधी मी तिथे असताना प्रा. सदानंद रेगे येत. कोपऱ्यात बसून कॉफीचे घुटके घेत भाषांतराचं काम करत. त्यांच्या ‘गोची’ या नाटकाची संहिता ‘अभिरुची’ मासिकाचे सर्वेसर्वा बाबुराव चित्रे यांनी कॉफी हाऊसमध्येच अमोलला दिली (आणि मराठी प्रायोगिक नाटकांना नवी दिशा सापडली!) चित्रेंशी माझ्या खूप गप्पा होत. ‘‘तुम्ही लोकांनी स्वत: केलेल्या नाटकाविषयी लिहायला हवं’’ असं ते म्हणत. त्यावर, ‘‘बाबुराव, आधी आमची नाटकंच लोकांना असह्य़ होतात. त्यांच्याविषयी आणिक लिहायला लागलो तर लोक मारतील ना!’’ असं मी म्हणे. आमचा ‘गोची’चा प्रयोग पाहिल्यावर ‘‘तू यावर लिहीच, मी ‘अभिरुची’त छापतो,’’ असं त्यांनी सांगितलं. मीही धीर केला आणि कॉफी हाऊसमध्येच बसून लेख लिहिला. नंतर ते हस्तलिखित नजरेखालून घालण्यासाठी एका स्नेह्य़ांकडे दिलं नि तिथून ते गायबच झालं!

‘एशियाटिक’ ग्रंथालयातून घरी परतताना खूपदा अशोक शहाणे कॉफी हाऊसमध्ये डोकावत. क्वचित त्यांच्यासोबत दुर्गाबाई भागवतही असत आणि नेहमी इंग्रजी वाचनाविषयी मला मार्गदर्शन करत. शहाणे माझ्यापेक्षा सर्व बाबतीत खूप मोठे असले तरी मला मित्रच वाटायचे. त्यांच्या खास तिरकस शैलीत किस्से ऐकताना जशी मजा येई तशीच ज्ञानातही भर पडे. कॉफी हाऊसचा इतिहास त्यांनीच मला ऐकवला.

‘ब्रूस स्ट्रीट’वरच्या निरनिराळ्या वास्तू, तिथे भेटलेली माणसं यांचा माझं व्यक्तिमत्त्व, माझे विचार घडवण्यात खूप मोठा वाटा होता. पण कॉफी हाऊसकडे मी आकर्षित व्हायचं मुख्य कारण होतं, तिथला प्रायोगिक नाटकवाल्यांचा अड्डा! तोवर मला ठाऊक असलेल्या ‘वालचंद टेरेस’मधल्या दुबेंच्या अड्डय़ाहून हा फार वेगळा होता. इथे एक कुणी पुढारी व इतर अनुयायी असा प्रकार नव्हता. सगळे समान, शिवाय माझ्याच पिढीचे, त्यामुळे मला बिनधास्त बोलतावागता येई. त्यांच्यामध्ये एकटी स्त्री असूनदेखील मला खूप मोकळं वाटे. दुपारी तीन-साडेतीनपासून नाटकवाले टपकायला सुरुवात होई. त्याकाळी रिझव्‍‌र्ह बँक आयोजित आंतर-बँक नाटय़स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने, जवळजवळ सर्वच बँकांमध्ये हौशी नाटय़कलाकारांना नोकऱ्या मिळत. आणि, बॉस नाटय़प्रेमी असल्यास वेळेआधी सटकणं सहज शक्य असे. कॉफी हाऊसच्या प्रवेशद्वाराला लागून असलेल्या दोन टेबलांवर कमीत कमी १२-१४ लोक दाटीवाटीने बसत; सर्वात मिळून जास्तीत जास्त पाच-सहा कप कॉफी मागवत आणि दीड-दोन तास आरामात गप्पा मारत. अख्ख्या मराठी नाटय़सृष्टीविषयीचं गॉसिप तिथे माझ्या कानावर पडे. पण या अड्डय़ावर (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणे) वात्रटपणा करताकरताच आम्ही सगळे एकमेकांच्या सर्जनशीलतेला चालनाही देत होतो; नाटकांच्या पारंपरिक चौकटी तोडत नवनवे प्रयोग करण्याची स्वप्नं पाहात होतो. आणि या सर्वाबरोबरच माझी प्रायोगिक नाटकांतली कारकीर्द बहरत होती. त्या  कॉफी हाऊसविषयी पुढच्या (१३ मे)लेखात..

चित्रा पालेकर chaturang@expressindia.com