17 December 2017

News Flash

लाभलेलं यश व कौतुकही

रुहीच्या घराच्या सजावटीसाठी रेखा सबनीसकडचं जुनं फर्निचर मुंबईहून आलं

चित्रा पालेकर | Updated: September 30, 2017 1:01 AM

‘आक्रीत’ पाहिल्यावर, सत्यजित राय यांनी आम्हाला त्यांच्या घरी चहापानासाठी खास बोलावून कौतुक केलं

‘आक्रीत’चं संकलन नीट पार पडल्यावरही, चित्रपट पैलतीराला लागण्यापूर्वी अनेक लहानसहान वादळांना तोंड द्यावं लागलं. मात्र शेवटच्या टप्प्यातही सर्वजण सुरुवातीच्याच उत्साहाने, चित्रपट चांगला बनवायच्या जिद्दीने व तो चांगला बनतोय हा विश्वास बाळगून रात्रंदिवस काम करत राहिले.. समाजातील अंधश्रद्धा व विषमता यावर टीका करणारा हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी आम्ही स्वत:च तो प्रदर्शित केला. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आक्रीत’ पाहिल्यावर, सत्यजित राय यांनी आम्हाला त्यांच्या घरी चहापानासाठी खास बोलावून कौतुक केलं, तेव्हा मी स्वप्नातच आहे असं मला वाटलं!  ‘आक्रीत’ चा भाग २

चित्रीकरण सुरू व्हायला अतिशय कमी दिवस असताना छायाचित्रकार उपलब्ध नसल्यामुळे अमोल व मी फार काळजीत आहोत हे कळल्याबरोबर आमचा मित्र बाबा माजगांवकर धावून आला व म्हणाला, ‘‘माझा ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’मधला एक मित्र खूप चांगला ‘कॅमेरामन’ आहे पण त्याने अजून रंगीत चित्रपट केला नाही. तुम्हाला चालत असेल, तर त्याला विचारतो. तो सध्या मोकळा आहे.’’ बाबाने मित्राच्या नावाचा उल्लेख करताच अमोल उत्तेजित झाला. ‘‘मी ओळखतो देबूला! तो ‘घरौंदा’च्या वेळी बीरचा मुख्य साहाय्यक होता. आत्ताच्या आता त्याला फोन कर.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर देवधर (देबू) पुण्याहून भेटायला आला. व्यावहारिक बाबींविषयी अक्षरही न उच्चारता एका खोलीत बसून पूर्ण पटकथा त्याने वाचून काढली व म्हणाला, ‘‘तीनचतुर्थाश चित्रीकरण रात्रीचं आहे.. छान! मजा येईल!’’ त्याक्षणी भविष्यातल्या चित्रपटांसाठी छायाचित्रकार तसंच सृजन-प्रक्रियेतील भागीदार आमच्या आयुष्यात आला. आणि मला एक अत्यंत जवळचा मित्र व कॅमेऱ्यातून पाहायला शिकवणारा गुरू भेटला. एका कठीण प्रसंगातून निभावून ‘आक्रीत’ची तयारी पुन्हा रुळावर आली. चित्रीकरण सुरू होण्याच्या काही दिवस आधी, पूर्ण चमू पूर्वतयारीसाठी जांभुळपाडय़ात पोचला. राहण्यासाठी जुन्या शाळेची मोठी एकमजली जागा रिकामी मिळाली. तिथे खालच्या बाजूला स्वयंपाकघर व जेवण, आवारात तात्पुरते उभे केलेले संडास व न्हाणीघर आणि वरच्या मोठय़ा दालनात गाद्या घालून कलाकारांसकट सर्व पुरुषांची (व मी एकटीच बाईमाणूस असताना माझीही) झोपण्याची व्यवस्था होती. स्त्री-कलाकारांसाठी पलीकडे छोटीशी खोली होती. गावातल्या शिंप्याकडून पारध्यांचे कपडे शिवून घेतले.. रुहीच्या घराच्या सजावटीसाठी रेखा सबनीसकडचं जुनं फर्निचर मुंबईहून आलं.. ‘गोलमाल’च्या निर्मात्यांकडून ३५ मिमी कॅमेरा, ‘फिल्म-सेंटर लॅब’मधून कच्च्या चित्रफितीचे डबे इत्यादी चित्रीकरणाची साधनसामुग्रीदेखील येऊन पोचली. शिवाय, ‘चमूतले बहुतेकजण एकमेकांच्या अति-परिचयाचे असल्याने ‘पॅक-अप’नंतरच्या मैफिलीत शीण-परिहाराऐवजी एकमेकांची अवज्ञा होईल हे गृहीत धरून, संपूर्ण चित्रीकरण संपेपर्यंत दारूचं नाव काढायचं नाही, असं चक्क सर्वानी मिळून ठरवलं!

हृषीदांकडून खास विनंती करून बोलावून घेतलेला त्यांचा तल्लख बुद्धीचा, शिस्तप्रिय दिग्दर्शन-साहाय्यक शशांक शंकर (शँकी) याने, काटेकोरपणे, संपूर्ण वेळापत्रक तारीखवार बनवलं होतं. रुहीच्या घरी सर्वाधिक दृश्यं असल्यामुळे पहिले दहा-बारा दिवस तिथेच चित्रीकरण करायचं ठरवून आम्ही जय्यत तयारी केली. आणि, चित्रीकरण सुरू होण्याच्या नेमक्या आदल्या दिवशी बातमी आली की, त्या जागेच्या वृद्ध मालकिणींचे यजमान परगावी मुलाकडे वारले. ते ऐकून आम्ही अतिशय सुन्न झालो. एका बाजूने मला त्या बाईंवर ओढवलेल्या प्रसंगाचं दु:ख कळत होतं, तर दुसऱ्या बाजूने, ‘‘आता त्या वास्तूत चित्रीकरण करता येईल का? ते पुढे ढकलावं लागेल, की गावकऱ्यांनी अपशकुन झाला असं मानल्यास रद्दच करावं लागेल?’’ असे असंख्य प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. तितक्यात बाईंचा निरोप आला, ‘‘यजमान आजारी होते.. ते गेले यात तुमची काहीच चूक नाही. मी इथे नसले तरी तुम्ही तुमचं काम करा.’’ आणि, घराची चावी आमच्या ताब्यात देऊन त्या मुलाबरोबर गावी निघून गेल्या. आमची चित्रीकरणाविषयीची काळजी मिटली खरी, पण स्वत:वर दु:खद प्रसंग ओढवला असूनही या वृद्ध बाईंनी आमचा विचार करावा आणि स्वत:ला ‘संवेदनशील कलाकार’ मानणाऱ्या माझ्या मनात मात्र प्रामुख्याने आपल्या चित्रपटाचीच काळजी असावी, हे जाणवून मला फार खंत वाटली.

या घटनेनंतर मात्र चित्रीकरण अत्यंत सुरळीतपणे पार पडलं. अर्थात, माझ्या संपूर्ण अंगाला काळा रंग लावायचा असं दिग्दर्शकाने ठरवल्यामुळे तो लावण्या-काढण्यात एकूण तीन तास खर्ची पडायचे आणि डिसेंबरच्या थंडीत रात्री आंघोळ करताना मला जीव नको व्हायचा, ते सोडा! चमूतले अनेकजण – अरुण जोगळेकर, विलास वंजारी, प्रकाश कुलकर्णी – कॅमेऱ्यापुढे भूमिका करतानाच, कपडेपट सांभाळणं, नेपथ्य-सजावटीसाठी घराघरांतून वस्तू उचलून आणणं, जमावाच्या दृश्यांसाठी गावकऱ्यांना तयार करणं वगैरे कॅमेऱ्यामागची कामंदेखील करत होते. चित्रपटाचा पहिलाच अनुभव असूनही शिर्के, अनुभवी व्यवस्थापकाच्या सफाईने निर्मितीच्या जबाबदाऱ्या पार पाडत होता. जेव्हा माझी दृश्यं नसायची तेव्हा शँकीचं डोकं खाऊन मी दिग्दर्शन-साहाय्यातले तपशील व खाचाखोचा समजावून घेत होते. खरं तर आमच्यासारखी अननुभवीच नाही तर बाबा-शँकीसारखी अनुभवी माणसं व देबू, रुद्रासारखे तंत्रज्ञही पडेल ते काम करत होते. नवीन प्रायोगिक नाटकाच्या तालमी सुरू झाल्यावर दरवेळी वाटायचा, तसाच उत्साह मला वाटत होता. दिलीप कुलकर्णी, रेखा सबनीस, राणी सबनीस यांच्याबरोबरच बाळ कर्वे, सतीश आळेकर, चारुशीला साबळे, हेमू अधिकारी, सदाशिव अमरापूरकर, हैदर अली, मोहन भंडारी, गौतम जोगळेकर, नंदू घाणेकर इत्यादी नाटकवाल्या मित्रांनी कुठल्याही अटी न घालता, छोटय़ा-मोठय़ा भूमिका करण्यास होकार दिला होता. ही मंडळी यायला लागल्यावर तर माझा उत्साह शिगेला पोचला!

झोपण्याची व्यवस्था असलेल्या दालनात रोज रात्री कलाकारांसकट (आपापल्या गादीवर बसून) आम्ही दिवसभरात झालेल्या कामाचा आढावा घेत असू. तिथल्या भिंतीवरच्या भल्या मोठय़ा फळ्यावर शँकीने पटकथेतल्या सर्व दृश्यांचे आकडे मांडले.. दृश्य पूर्ण झाल्यास त्या आकडय़ावर फुली मारायची; थोडं काम राहिलं तर एकच रेष ओढायची, असे नियम सांगितले. चित्रीकरण सुरू झाल्यावर या फुल्या मारण्यासाठी आमच्यात लहान मुलांसारखी चढाओढ होई आणि एखादी ओळ पूर्ण झाली की आम्ही आनंदाने जल्लोष करत असू. एरवी चित्रपट-क्षेत्रात अभावानेच आढळणारं हे खेळीमेळीचं, उच्च-नीच दर्जामधल्या रेषा पुसल्या गेलेलं आणि तरीही अतिशय शिस्तबद्ध असं वातावरण पाहून मुंबईहून येणारे कलाकार थक्क व्हायचे.. कॅमेऱ्यामागच्या चमूप्रमाणेच, चित्रीकरणाला घरचं कार्य मानून आपआपल्या भूमिका करायचे.

पूर्ण चित्रपट मनाजोगता चित्रित करून मुंबईला परतल्यावर जरा हुश्श म्हणेस्तोवर वेगळेच गोंधळ सुरू झाले. ज्या मित्रावर, तो चांगला संकलक आहे असं गृहीत धरून संकलनाची जबाबदारी टाकली होती, त्याने सर्व दृश्यांची स्वत:च्या मर्जीप्रमाणे वाट्टेल तशी जोडतोड करून वेगळाच असंबद्ध चित्रपट तयार केला, जो पाहून माझे डोळेच पांढरे झाले! या प्रकारात दीड-दोन महिने तर वाया गेलेच, शिवाय ऐनवेळी कोणी चांगला संकलकही मिळेना! सुदैवाने जयंत धर्माधिकारी या चित्रपट क्षेत्रातल्या मित्राने आमच्या मदतीसाठी दिग्दर्शक राजा ठाकूर यांचा मुलगा अविनाशला बोलावून घेतलं. त्याच्या साहाय्याने चित्रपटाचं संकलन करून, अमोलने पूर्वानुभवाशिवाय कामं करण्याची आक्रीत-चमूची परंपरा कायम राखली! मी आयुष्यात प्रथमच संकलनाची प्रक्रिया पाहात होते.. या प्रक्रियेतून चित्रपट कसा फुलत जातो (किंवा कोमेजू शकतो) हे न्याहाळत होते. संकलन नीट पार पडल्यावरही, चित्रपट पैलतीराला लागण्यापूर्वी अनेक लहानसहान वादळांना तोंड द्यावं लागलं. पुनध्र्वनिमुद्रणाची तयारी पूर्ण होण्याआधीच मंगेश देसाईंनी ‘राजकमल’च्या (सहजासहजी न मिळणाऱ्या) तारखा अचानक दिल्यावर आमची प्रचंड पळापळ झाली.. संगीत भास्कर चंदावरकरांचं होतं, पण पाश्र्वसंगीतासाठी ते उपलब्ध होऊ  न शकल्यामुळे, ऐनवेळी अशोक पत्कींचं साहाय्य घ्यावं लागलं.. पण या शेवटच्या टप्प्यातही सर्वजण सुरुवातीच्याच उत्साहाने, चित्रपट चांगला बनवायच्या जिद्दीने व तो चांगला बनतोय हा विश्वास बाळगून रात्रंदिवस काम करत राहिले.. मी क्षणोक्षणी गोंधळून जात, धडपडत, चित्रपट-निर्मितीतल्या नव्या गोष्टी रोज शिकत राहिले!

परिनिरीक्षण मंडळाने ‘आक्रीत’मधे २५ ठिकाणी कापाकापी करायला सांगितल्यावर, ‘‘चित्रपटाचा विषय व त्याची मांडणी ‘प्रौढांसाठी’च योग्य आहे असं आमचं मत असल्यामुळे तेच प्रमाणपत्र आम्हालाही हवं, पण एकही गोष्ट कापणार नाही’’, असा ठामपणे वाद घालून आम्ही मंडळाला माघार घ्यायला लावली. समाजातील अंधश्रद्धा व विषमता यावर टीका करणारा हा चित्रपट डब्यात पडून न राहता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी आम्ही स्वत:च तो चित्रपटगृहांत प्रदर्शित केला, शिवाय अनेक चित्रपट-मंडळांतून, महाविद्यालयांतूनही दाखवला. दूरदर्शनने मध्यरात्री प्रसारित केल्यावरदेखील खूप लोकांनी तो पाहिल्याचं कळवलं. फ्रान्समधल्या ‘नांत’ येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आक्रीत’ला ‘परीक्षकांचा खास पुरस्कार’ मिळाला.. अनेक थोर चित्रपट-दिग्दर्शक व समीक्षकांना तो खूप आवडला.. अमिताभ बच्चनने व वहिदा रेहमानने मुद्दाम बंगळूरुला रिळं मागवून तो पाहिला.. आणि जेव्हा १९८२ जानेवारीत कोलकात्यात झालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आक्रीत’ पाहिल्यावर, सत्यजित राय यांनी आम्हाला त्यांच्या घरी चहापानासाठी खास बोलावून कौतुक केलं, तेव्हा मी स्वप्नातच आहे असं मला वाटलं!

अर्थपूर्ण चित्रपट बनवण्याचं अमोलचं व माझं स्वप्न पूर्ण झालं, पण खरं तर ते केवळ ‘आमचं’ स्वप्न राहिलंच नव्हतं.. अनेकांचं स्वप्न बनलं होतं.. ते साकार व्हावं यासाठी जे जे धावून आले; ज्यांनी ज्यांनी निर्मितीत जीव ओतला; असंख्य रितींनी साह्य़ केलं त्या सर्वाचं! त्यांच्या एकत्रित ऊर्जेतून ‘आक्रीत’ निर्माण झाला आणि म्हणूनच ‘आक्रीत’ला लाभलेलं यश व कौतुकही खऱ्या अर्थाने त्यांचं..

चित्रा पालेकर chaturang@expressindia.com

First Published on September 30, 2017 1:01 am

Web Title: chitra palekar part 2 article on movie akritt