12 December 2017

News Flash

पडद्यामागे

जी काही नाटकं माझ्या मनात कायमचं घर करून बसली आहेत, त्यात ‘एवम् इंद्रजीत’ला महत्त्वाचं

चित्रा पालेकर | Updated: April 21, 2017 10:22 AM

‘एवम् इंद्रजीत’ हे शब्द ऐकले किंवा वाचनात आले की हटकून येणारी, अर्धशतकामागची ही एक आठवण..

जी काही नाटकं माझ्या मनात कायमचं घर करून बसली आहेत, त्यात ‘एवम् इंद्रजीत’ला महत्त्वाचं स्थान आहे. या संहितेने माझ्या तरुणपणीच्या लवचीक संवेदनशील जाणिवांवर ठसा उमटवला; विचारांना चालना दिली. इतकंच नाही तर वाढत्या वयाबरोबर बदलणाऱ्या विचारप्रक्रियेतही साथ दिली. इतरांचे विचार, मतं यातून या नाटकाशी माझं नातं जडलं नाही तर स्वत:च्या अंत:प्रेरणेतून, अनुभवांतूनच ते निर्माण झालं..

‘एवम् इंद्रजीत’ हे शब्द ऐकले किंवा वाचनात आले की हटकून येणारी, अर्धशतकामागची ही एक आठवण..

सात वाजायला दहा मिनिटं बाकी असताना तेजपाल नाटय़गृहातला, रंगमंचाच्या बाजूने दर्शनी भागाकडे जायचा दरवाजा किलकिला करून मी बाहेर डोकावते.. ‘थिएटर युनिट’च्या नाटकांना बहुदा येतात, त्याहून बरेच जास्त प्रेक्षक ‘एवम् इंद्रजीत’च्या प्रयोगाला आलेले पाहून बरं वाटतं, पण आश्चर्य नाही वाटत. बादल सरकारांनी मूळ बंगालीत लिहिलेलं हे नाटक सत्यदेव दुबेंनी मुंबईत हिंदीतून सादर करण्यापूर्वीच, कोलकाता व दिल्लीतल्या नामवंत संस्थांनी ते रंगमंचावर आणलंय. देशभरातल्या नाटय़जगतांत त्याचं नाव झालंय. साहजिक इथल्या प्रायोगिक नाटकवाल्यांना व नाटय़प्रेमींना दुबेंचा प्रयोग पाहण्याची उत्सुकता असायचीच! ओळखीचे कोण कोण नाटकाला आलेत हे मी न्याहाळत असताना, ‘थिएटर युनिट’चे सर्वेसर्वा अब्दुल शकूर दुसरी घंटा देण्याची खूण करतात व मी पुन्हा आत पळते. रंगभूषेच्या खोलीत सुलभा देशपांडे ‘मानसी’च्या व माझी आई शालिनी मुर्डेश्वर ‘मौसी’च्या भूमिकेसाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांना शुभेच्छा देऊन मी विंगेकडे येते. रंगमंचाच्या बाजूची ही जागा अत्यंत चिंचोळी. प्रकाश अंधुक. त्यातच तिथे स्टँडवरचा माइक उभा ठेवलेला. त्यामुळे त्या जागी दोन माणसांनी एकावेळी उभं राहणं अशक्य! इतर कुणी येण्याआधी मी जवळच्या बारीक लोखंडी शिडीवरून ध्वनी व प्रकाशयोजनेसाठी बनवलेल्या छोटय़ाशा माळ्यावर पटपट चढते. ध्वनिसाहाय्यकाचं काम करण्यासाठी सज्ज होत सात वाजण्याची वाट पाहते. आता काही मिनिटांत तिसरी घंटा वाजेल.. रंगमंचावर अंधार होईल.. दुबे विंगेतल्या माइकवरून बोलायला सुरुवात करतील, ‘‘जब परदा खुलता है..’’

आणि, अचानक माझं मन फ्लॅशबॅकमध्ये जातं – वालचंद टेरेसच्या हॉलमध्ये मानसीच्या भूमिकेची मी एकटीच तालीम करत आहे. कधी रोजच्या साध्या शब्दांतून तर कधी काव्यपंक्तीतून जीवनाविषयीच्या अनेक तरल भावना मानसी व्यक्त करते, त्या उमजून घेण्याचा, अभिनयात पकडण्याचा प्रयत्न करत आहे. ‘‘खोटे इमोशन्स नको. नुस्तं वाच’’ आतून दुबे ओरडतात.. व फ्लॅशबॅक खुंटतो!

सर्व कलाकार रंगदेवतेला स्मरून रंगमंचावर आपापल्या जागा घेत आहेत. हे माळ्यावरून पाहताना वाटतं, ‘‘दुबेंनी मला एका गैरवाजवी कारणावरून नाटकातून काढून टाकलं नसतं तर आता इथे अंधारात ध्वनिसहाय्यक म्हणून बसण्याऐवजी मी तिथे रंगमंचावर, प्रकाशाच्या झोतात, मानसी म्हणून उभी असते!’’ मी क्षणभर खिन्न होते, पण लगेच स्वत:ला फटकारते, ‘‘दुबे कसेही वागले असतील, पण ही काय खिन्नबिन्न होण्याची वेळ आहे? अहं गोंजारत बसण्यापेक्षा, (कुठल्याही प्रकारे का होईना) या थोर नाटकाशी निगडित राहणं महत्त्वाचं, असं वाटल्यामुळे आपणहून तू हे काम स्वीकारलंस. आता ती जबाबदारी नीट पार पाडायला नको?’’ भानावर येऊन मी मनावरची मरगळ झटकते. एव्हाना धरमसीभाई र्मचट व अमोलदेखील माळ्यावर येऊन, प्रकाश व ध्वनियोजनेच्या साधनांसमोर, प्रयोग सुरू करण्याच्या तयारीत बसले आहेत. लेखकाच्या भूमिकेतले अमरीश पुरीसाहेब रंगमंचावरल्या टेबलापाशी स्थानापन्न झालेत. तर, इंद्रजीतची भूमिका करणारे सत्यदेव दुबे विंगेतल्या माइकसमोर (दिग्दर्शकाच्या नात्याने) उभे आहेत.

तिसरी घंटा होते. रंगमंचावरच्या पूर्ण अंधारात दिग्दर्शक दुबेंचा आवाज स्पीकर्समधून ऐकू येतो, ‘‘जब परदा खुलता है, रंगमंचपर लेखक बैठा लिख रहा है..’’ त्या सूचनेबरोबर पडदा दोन्ही बाजूंना सरकतो आणि लेखनाचा आविर्भाव करणाऱ्या पुरीसाहेबांवर प्रकाशझोत येतो. पुन्हा दुबेंच्या आवाजात सूचना – ‘‘मौसी का प्रवेश’’ हे वाक्य संपता संपता पलीकडच्या बाजूने ‘मौसी’ रंगमंचावर प्रवेश करते. आणि, नेमक्या त्याच वेळी, ‘तेजपाल’च्या मॅनेजरसाठी चहा घेऊन जाणारं कँटीनमधलं पोरगं (‘माणूस’ चित्रपटातल्या राम मराठेसारखं) एका हातात गरम चहाची किटली व दुसऱ्या हातात काचेचे दोन-तीन ग्लास धरून, गाणं गुणगुणत बाहेरच्या दरवाजातून विंगेत शिरतं;  दुबेंच्या मागे असलेल्या अतिचिंचोळ्या जागेतून अंग चोरत घाईघाईने जायला लागतं. दुबे पुढचं वाक्य बोलणार इतक्यात शॉर्टकट घेणाऱ्या त्या पोराचा धक्का त्यांना लागतो आणि वाक्य बोलता बोलताच दुबे अत्यंत चपळाईने त्याचा हात मागच्या मागे पकडतात. त्यानंतर विंगेत एक धमाल फार्स! रंगमंचावर लेखक व मौसीचे संवाद सुरू होताच दुबे वळतात व एका हाताने मुलाचा हात घट्ट पकडून ठेवत, दुसरा हात त्याच्या तोंडासमोर नाचवत, त्याला शिव्या द्यायला लागतात. अर्थात समोर माइक चालू असल्यामुळे अनावर झालेला संताप मूकपणेच व्यक्त करणं भाग असतं. तेवढय़ात मौसी आपले संवाद संपवून आत जायला वळत आहे, हे दुबेंना डोळ्याच्या कोपऱ्यातून दिसतं व ते पटकन माइककडे चेहरा वळवून, टायमिंग न चुकवता ‘‘मौसी बडबडाते हुए चली जाती है’’ हे वाक्य घेतात. मग पुढच्याच क्षणाला मुलावर डोळे वटारत मूकनाटय़ पुन्हा सुरू!

नाटय़गृहातल्या प्रेक्षकांना, रंगमंचावरल्या कलाकारांना, या पडद्यामागच्या (आणि संहितेबाहेरच्या) नाटकाची कल्पनाच नाही. माळ्यावरून वाकून खाली चाललेला हा फार्स पाहणारे आम्ही तिघे (अजिबात आवाज न करता हसून हसून) थकतो पण दुबे काही थकण्याचं नाव घेत नाहीत. शेवटी जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपला प्रवेश आता सुरू होतोय व पहिली एंट्री प्रेक्षागृहातून घ्यायची आहे, तेव्हा कुठे दुबे पोराचा हात झटकून हा सीन संपवतात व इंद्रजीतच्या भूमिकेत शिरतात..

‘एवम् इंद्रजीत’ या शब्दांनी माझ्या मनात अशा अनेक सुखद-दु:खद-हास्यजनक आठवणी जाग्या होतात. हे शब्द माझ्यापुढे ‘६० व ७०’च्या दशकांमधल्या भारतीय प्रायोगिक नाटकांच्या उत्कर्षांचा (आणि माझ्या उत्साही तारुण्यातील अनुभवांचा) काळ उभा करतात. ते शब्द उच्चारताच बादलदा, ‘इंद्रजीत’च्या अनुवादिका प्रतिभाजी अग्रवाल, दिग्दर्शक श्यामानंद जालान ही कोलकात्यातली, माझ्यावर अत्यंत लोभ करणारी माणसं व त्यांच्याशी जवळिकीच्या हक्काने विनासंकोच मारलेल्या गप्पा आठवतात.

पण हे नाटक मला भावतं ते केवळ या आठवणींमुळे नाही. जी काही नाटकं माझ्या मनात कायमचं घर करून बसली आहेत, त्यात ‘एवम् इंद्रजीत’ला महत्त्वाचं स्थान आहे. या संहितेने माझ्या तरुणपणीच्या लवचिक संवेदनशील जाणिवांवर ठसा उमटवला; विचारांना चालना दिली. इतकंच नाही तर वाढत्या वयाबरोबर बदलणाऱ्या विचारप्रक्रियेतही साथ दिली. या नाटकाचा शेवट आशावादी आहे की निराशावादी, यावर त्यावेळी खूप लिहिलं व बोललं गेलं. मी या चर्चा ऐकल्या. परीक्षणंही वाचली. पण इतरांचे विचार, मतं यातून या नाटकाशी माझं नातं जडलं नाही. स्वत:च्या अंत:प्रेरणेतून, अनुभवांतूनच ते निर्माण झालं.

नाटकाच्या सुरुवातीला (त्यातलं पात्र असलेला) लेखक चार युवकांना त्यांची नावं विचारतो. पहिले तिघे सांगतात- ‘‘अमल, विमल, कमल.’’ पण चौथा स्वत:चं नाव निर्मल असल्याचं सांगतो, तेव्हा लेखक प्रचंड वैतागतो. ‘‘अमल, विमल, कमल आणि निर्मल? हे असूच शकत नाही!’’ लेखकाने खोदून खोदून विचारल्यावर चौथा कबूल करतो की नियमांविरुद्ध वागण्याच्या भीतीमुळे अमल-विमल-कमलशी मिळतंजुळतं निर्मल हे नाव तो सांगतो, पण त्याचं खरं नाव इंद्रजीत आहे.

वयाच्या एकविसाव्या वर्षी, स्त्री, सून, पत्नी इत्यादी नात्यांमधून लादले गेलेले नियम तोडण्याची जबर इच्छा, पण त्याचा परिणाम काय होईल हे जोखता न आल्यामुळे वाटणारी भीती, अशा द्विधा मन:स्थितीत वावरणाऱ्या माझ्यावर या संवादांचा खूप प्रभाव पडला. पुढच्या आयुष्यातदेखील, इतर जातील त्या मार्गाने जायला नकार दिल्यानंतर कधी मन बिचकल्यास, या संवादांनी धीर दिला.

दुसऱ्या ठिकाणी नाटकातला लेखक म्हणतो, ‘मला खूप लिहायचंय. पण मी सर्वसामान्य माणसांची दु:खं, व्यथा जाणत नाही. शेतमजूर, आदिवासी, कोळी यांना जवळून ओळखत नाही.’ चित्रपटासाठी विषय शोधताना या ओळी मला नेहमी आठवत राहिल्या.. सतावत राहिल्या. त्यामुळे ‘थोडासा रुमानी हो जाये’सारखी, मध्यमवर्गीय मुलीवरची पटकथा मला स्वतंत्रपणे लिहिता आली, पण ‘मातीमाय’ सारखी, माझ्या अनुभव कक्षेच्या पूर्णपणे बाहेर असलेल्या समाजावरची पटकथा मात्र महाश्वेतादेवींच्या कथेवरूनच मी लिहिली..

नाटकाच्या तिसऱ्या अंकावर नैराश्येचं सावट आहे. (दुबेंच्या अभिनयात ही भावना अधिकच गडद असे.) अमल-विमल-कमलसारखं, केवळ मध्यमवर्गीयांचं रटाळ जीवन जगण्याऐवजी आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधू पाहणारा इंद्रजीत, अखेरीस हाती काही न लागल्यामुळे अत्यंत निराश होतो; अर्थहीन जीवन जगत राहण्याऐवजी मरण्याचा निश्चय करतो. पण जीवनावर प्रेम करणारी मानसी त्याला मृत्यूपासून परावृत्त करते. आणि, लेखक त्याला सांगतो, ‘‘तू आणि मी थोर नसलो, साधारण माणसं असलो, तरी आपण निर्मल नाही. निर्मल होऊच शकत नाही.’’

नाटकाच्या शेवटी लेखक इंद्रजीतला जीवनयात्रेचा मूल-मंत्र देतो – ‘‘आपल्यासाठी असतो केवळ मार्ग, ज्यावरून आपल्याला चालत राहायला हवं.. त्या मार्गाच्या अंती देवलोक नाही, तरीही! आपण विसरता कामा नये की वाटचाल हेच आपलं उद्दिष्ट.. आपलं गन्तव्य!’’

माझ्या मानसिकतेशी लेखकाचा हा जीवनाविषयीचा विचार सर्वस्वी जुळतो.

चित्रा पालेकर chaturang@expressindia.com

First Published on April 15, 2017 2:56 am

Web Title: evam indrajit drama impact on author chitra palekar life