23 January 2019

News Flash

‘मातीमाय’ची निर्मिती  

नव्या सहस्रकाच्या साथीने नवं आयुष्य सामोरं आलं

नव्या सहस्रकाच्या साथीने नवं आयुष्य सामोरं आलं; तोवर राहून गेलेल्या आकांक्षा पूर्ण करत स्वत:चं देणं द्यायची नवी संधी उगवली. पण कधी कधी खूप लांबचा प्रवास जोमात पार पाडल्यावर फार थकवा आल्यामुळे, पुढय़ातल्या सुंदर जीवनाच्या शक्यता दिसेनाशा होतात, तसंच काहीसं माझं झालं होतं. चित्रपट-दिग्दर्शनापासून ते जगभरच्या प्रवासापर्यंतच्या असंख्य गोष्टींची यादी माझ्यात तयार होती; पण प्रत्यक्षात, कृतीसाठी लागणारी ऊर्जा नाहीशी झाली होती. ती पुन्हा मिळवण्यासाठी मी धडपडत असताना एक दिवस, नाटय़क्षेत्रात भारतभर नाव कमावलेली उषा गांगुली ही माझी कोलकात्याची मैत्रीण अचानक घरी टपकली.

गप्पा मारता मारता महाश्वेतादेवींच्या ‘बायेन’ या कथेचा हिंदी अनुवाद माझ्या हातात ठेवून म्हणाली, ‘‘यावर नाटक लिहून बसव.’’ मी लगेच नकारार्थी मान हलवली. ‘‘वाचल्यानंतर ठरव,’’ असं उषाने दटावल्यामुळेच अखेर कथा वाचायला घेतली आणि तिच्या पहिल्याच शब्दांनी माझ्यावर जादू केली.. क्षितिजापर्यंत पसरलेल्या निर्जन माळरानावर, रखरखत्या उन्हात उभं छोटं खोपटं व त्यावर फडफडणारा मळका, लाल झेंडा.. हे चित्र नजरेसमोर उभं केलं. हां हां म्हणता सर्जनेच्छेवरचं मळभ दूर होऊन ‘बायेन’ मला चित्रपटरूपात दिसायला लागली!

महाश्वेतादेवींच्या बंगाली साहित्याची अनुवादांद्वारे मला ओळख होती. त्यांमधून स्त्रिया, आदिवासींसारख्या शोषित घटकांविषयीची कळकळ, अन्यायाविषयीची चीड माझ्यापर्यंत पोचली होती; पण देवींच्या तापटपणाच्या आख्यायिकादेखील ऐकल्यामुळे, कोलकात्यात उषाबरोबर त्यांना भेटायला जाताना, माझ्या तोंडून एखादा चुकीचा शब्द निघाल्यास त्या नाराज होतील अशी मला काळजी होती; पण त्यांनी ज्या प्रेमाने माझं स्वागत केलं; कामापलीकडे जाऊन माझ्या आयुष्याविषयी चौकशी केली; माझं प्रथम दिग्दर्शन असल्याचं सांगितल्यावर कुठलीही शंका उभी न करता चित्रपटासाठी परवानगी दिली, त्याने मी थक्क झाले! तरीही ‘स्वभावधर्मा’प्रमाणे एक घोटाळा मी केलाच! त्यांच्या घरून निघताना वाचायचा चष्मा मी तिथेच विसरले. त्यांना पुन्हा त्रास देण्याच्या कल्पनेने मी खूप अस्वस्थ झाले. शिवाय त्यांचा फोनही लागेना. शेवटी नाइलाजाने आम्ही परत त्यांच्या घरी थडकलो. माझा चिंताग्रस्त चेहरा पाहिल्यावर त्या हसून म्हणाल्या, ‘‘बरं झालं चष्मा विसरलीस! तुला पुन्हा भेटण्याची, गप्पा मारण्याची संधी मिळाली!’’ पुढे चित्रपट संपल्यावरही त्यांची आपुलकी कायम राहिली.

‘बायेन’चा अर्थ हडळ. ‘आपण राजा हरिश्चंद्राचे वंशज असल्याचा अभिमान बाळगत मृत मुलांना माती देणारी चंडी, स्वत: आई झाल्यावर जेव्हा स्मशानात काम करण्याचं नाकारते, तेव्हा गावकरी तिला हडळ ठरवून गावाबाहेर हाकलून देतात’ अशी ही कथा.. जातीयतेच्या विळख्यात असलेल्या पुरुषप्रधान, अंधश्रद्ध समाजावर कोरडे ओढतानाच काव्यात्मक व दृश्यात्मकही असलेली! महान चित्रकाराने कुंचल्याच्या कमीत कमी फटकाऱ्यात चित्र रंगवावे तशी ही कथा महाश्वेतादेवींनी लिहिली असून, बऱ्याचदा घटनेमागची कारणं अध्याहृत ठेवली आहेत. पटकथा लिहिताना कथेचा पोत व तोल यांना धक्का न लावता महत्त्वाच्या घटनांमधल्या जागा भरून घेणं, तसंच संवाद कमीत कमी ठेवून दृश्यात्मकतेवर अधिक भर देणं, मला जरुरीचं वाटलं.

पटकथा झपाटय़ाने लिहून मी २००४ मध्ये एनएफडीसीकडे पाठवली. तिथल्या पटकथा-निवड समितीत ती एकमताने मंजूर झाल्याचं एनएफडीसीने महिनाभरात लेखी कळवलं. कागदपत्रं तयार व्हायला दोनेक महिने जातील, असंही तोंडी सांगितलं. दिग्दर्शकाच्या ‘प्रथम चित्रपट निर्मिती’ योजनेखाली ही निवड झाल्यामुळे मी निर्धास्त होते, पण बरेच महिने उलटले तरी पुढची कार्यवाही होईना. खूप हेलपाटे घातल्यावर कळलं की, एनएफडीसीकडे सध्या पैसेच नाहीत! २००७ मध्ये पैसे मिळतील हे ऐकल्यावर मला धक्काच बसला. दिग्दर्शनासाठी मी (माझ्या मते) किमान दहा-बारा वर्ष उशीर केला होता. आता अजून तीन वर्ष थांबायचं? एनएफडीसीचा नाद सोडून मी दुसरा निर्माता मिळवण्यासाठी धावपळ केली. ती निष्फळ ठरल्यावर शेवटी जवळच्या सर्वाशी बोलून स्वत:च निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याबरोबर माझ्यात ऊर्जेचा, उत्साहाचा जणू स्फोट झाला!

मी चित्रपट करायचं ठरवल्याबरोबर विजय शिर्के, छायाचित्रकार देबू देवधर, शशांक शंकर, प्रतिमा जोशी हे माझे सर्व जुने सहकारीमित्र माझ्या साहाय्यासाठी आपणहून धावून आले. त्या वेळी माझी धाकटी बहीण अरुंधती बंगळूरुला राहात होती. स्वत:चं घर-संसार तिथे असतानाही ती चित्रपट पूर्ण होईस्तोवर, वर्षभर मुंबईत माझ्यासोबत सावलीसारखी राहिली.

महाश्वेतादेवींच्या आग्रहामुळे तसंच एकूण खर्चाचा विचार करून चित्रपट मराठीत बनवायचं नक्की केलं. कथेत वर्णिलेल्या जमातींपैकी काही जण विदर्भात स्थायिक झाल्याचे संदर्भ सापडल्यावर, चित्रीकरण-स्थळं प्रथम तिथेच शोधायचं ठरवून मी व देबू अमरावतीला, माझे अतिशय जवळचे मित्र

वसंत आबाजी डहाके व प्रभा गणोरकर या कविदाम्पत्याकडे पोचलो. गमतीची गोष्ट म्हणजे, त्या दोघांनी आमच्याबरोबर अख्खा विदर्भ पालथा घातल्यानंतर, चित्रीकरणास अतिशय योग्य असं मातीच्या घरांचं छोटंसं, सुंदर जळू गाव आम्हाला अमरावतीहून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर सापडलं! अमरावतीत मुक्काम करून तिथे रोज ये-जा करणं सहज शक्य होतं. (काही वर्षांनी याच गावात ‘गाभ्रीचा पाऊस’ चित्रित झाला) शिवाय, प्रचंड रखरखीत माळरान, खुरटलेली शुष्क काटेरी झुडपं किंवा अक्राळविक्राळ गूढ वृक्ष असलेली ठिकाणंदेखील जवळपासच मिळाली. चित्रीकरणातल्या दृश्यात्मकतेत, वातावरणनिर्मितीत मोलाची भर टाकू शकणारी स्थळं सोयीस्करसुद्धा असावीत, हे सुदैवच होतं!

चंडी व नरसू या मुख्य पात्रांसाठी नंदिता दास व अतुल कुलकर्णी या उत्तम अभिनेत्यांनी पटकथा वाचून तात्काळ होकार दिल्यावर माझी ऊर्जा दुपटीने वाढली. चंडीच्या मुलाच्या भूमिकेसाठी मुंबईतल्या अनेक मराठी शाळांमध्ये जाऊन आम्ही मुलांच्या स्क्रीन टेस्ट घेतल्या; मुलं निवडून त्यांची कार्यशाळाही घेतली. शेवटी, संवेदनशील व गोड चेहऱ्याचा क्षितिज गावंडे सापडला तो अमरावतीमध्येच! १९७९ मध्ये वसंताच्या आमंत्रणावरून अमरावतीत महिनाभराचं नाटय़ शिबिर घेतल्यामुळे तिथल्या बऱ्याच कलाकारांना मी ओळखत होते. प्रभाचा भाऊ चित्रकार संजय गणोरकरच्या साहाय्याने सर्व जुन्या-नव्या हौशी कलाकारांच्या चाचण्या घेऊन इतर पात्रांची निवड केली. क्षितिजसकट कोणीही त्यापूर्वी कॅमेऱ्यासमोर काम केलं नव्हतं; पण नवीन चेहऱ्यांमुळे चित्रपटाला अनोखा तजेला लाभतो असा आमचा अनुभव होता. चंडीच्या मैत्रिणीच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी मात्र मी रंगभूमी गाजवत असलेल्या मुक्ता बर्वेला निवडलं. प्रतिमा जोशी ही आणखी एक गुणी अभिनेत्री. ‘बनगरवाडी’पासून ‘ध्यासपर्व’पर्यंतच्या चित्रपटांत दिग्दर्शन-साहाय्यक असलेल्या प्रतिमाने, चमूबरोबर दोन दिवस घालवण्यासाठी मुद्दाम अमरावतीला येऊन छोटीशी भूमिका केली.

संपूर्ण चित्रपट बाह्य़ चित्रीकरणाचा असल्यामुळे, अमरावतीचे मोसम व हवामानाविषयी व्यवस्थित चौकशी करून चित्रीकरण ऑक्टोबरमध्ये करायचं ठरलं. नंदिता व अतुलच्या तारखा घेतल्या.. कार्यकारी निर्माता शिर्केने हॉटेलमालकांशी बोलणी सुरू केली.. वसंत, प्रभा व सुरेश द्वादशीवार यांनी मी (माझ्या मराठीत!) लिहिलेले संवाद विदर्भातल्या बोलीत करून दिले. चित्रपटासाठी नाव तेवढं मिळत नव्हतं. ‘बायेन’ला जवळपास जाणारं नाव दिल्यास तो भयपट समजला जाण्याची मला काळजी होती. मग एक दिवस विचार करता करता मला अचानक ‘मातीमाय’ हे नाव सुचलं.. माती व माय या दोन निरनिराळ्या शब्दांना जोडून तयार केलेलं.. मृत मुलांना माती देणाऱ्या आईवरल्या अनोख्या चित्रपटासाठी अनोखं नाव! अशा सर्व गोष्टी छान जुळून येत असताना अचानक एक अनपेक्षित गोष्ट घडली..

अमरावती जिल्ह्य़ात त्या वर्षी कधी नव्हे तो इतका पाऊस पडला की तत्पूर्वी चंडीच्या वैराण आयुष्यासारखा भासणारा माळरानाचा परिसर हिरवागार झाला! झाडंझुडुपं टवटवीत दिसायला लागली! अभिप्रेत असलेल्या निसर्ग-रंगांसाठी किमान चार-पाच महिने थांबणं आवश्यक होतं, पण मार्च-मध्यानंतरचा कडक उन्हाळा विसरूनही चालणार नव्हतं! अशा कात्रीत सापडलेल्या आम्ही शेवटी गणोरकर कुटुंबीयांच्या सल्ल्याने चित्रीकरण फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचं निश्चित केलं.

जळू गावाच्या मधोमध असलेल्या मोकळ्या जागेत नेपथ्यकार संजय धबडेंनी चंडी-नरसूचं घर उभारलं. ग्रामपंचायतीने सामान ठेवण्यासाठी खोल्या दिल्या.. तिथल्याच शाळेत चित्रीकरणाची परवानगी मिळाली.. इतर दृश्यांसाठी व चमूच्या जेवणाखाण्यासाठी गावकऱ्यांनी आपापल्या ओसऱ्या, अंगणं देऊ केली. त्या भागात तत्पूर्वी कधीही चित्रपटाचं चित्रीकरण न झाल्यामुळे, अख्ख्या पंचक्रोशीत प्रचंड उत्सुकता होती. पहिला ‘शॉट’ अमरावतीहून खास आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या व मित्रांच्या आणि साऱ्या जळूवासींच्या उपस्थितीत घेतला. पुढे संपूर्ण चित्रीकरण उरकेस्तोवर या सर्वाच्या आत्मीयतेची प्रचीती वारंवार येत राहिली.

नंदिता व अतुल नामवंत, पुरस्कार-विजेते कलाकार असूनही सर्वाशी नेहमी अतिशय मिळून मिसळून वागत; रोज न चुकता वेळेवर तयार होऊन चित्रीकरणस्थळी पोचत. नंदिताचे संवाद मी आधी मुद्रित करून दिल्लीला तिच्याकडे पाठवले होते. ती चक्क संवाद आत्मसात करून अमरावतीला आल्यावर मात्र मी चकित झाले! या दोघांची शिस्त व मेहनत, स्थानिक साहाय्यक तथा कलाकारांच्या मनावर बिंबल्यामुळे आमच्या चमूचं काम फार सुकर झालं! आणि स्वतंत्र दिग्दर्शनाची आपली पहिलीच वेळ असल्याच्या जाणिवेतून अधूनमधून होणारी धाकधूक मनातून सपशेल नाहीशी होऊन ‘मातीमाय’चं चित्रीकरण माझ्यासाठी एक आनंदी, उत्साही सोहळा बनलं! पण कुठलीही गोष्ट नुसतीच छान, सुरळीत चालू राहण्यात कुठली आली मजा?

चित्रा पालेकर

chaturang@expressindia.com

First Published on November 25, 2017 5:04 am

Web Title: filmmaking success story of screenwriter chitra palekar