17 December 2017

News Flash

धमाल मस्ती!

‘कच्ची धूप’ या मालिकेला ३० र्वष होऊन गेली आहेत.

चित्रा पालेकर | Updated: March 21, 2017 5:13 PM

‘कच्ची धूप’ या मालिकेला ३० र्वष होऊन गेली आहेत. यात कामं केलेल्या बाल-कलाकारांची आता चाळिशी उलटली आहे. सगळे आपआपल्या क्षेत्रांत चमकताहेत. आशुतोष गोवारीकर खूप मोठा दिग्दर्शक झाला आहे. पुरं युनिट विखुरलं आहे आणि मी सत्तरीकडे झुकते आहे; पण जेव्हा यातलं कुणी भेटतं तेव्हा हमखास मधली र्वष गळून पडतात आणि ‘कच्ची धूप’च्या वेळची धमाल आठवत आम्ही चक्क लहान मुलांसारखं हसायला, खिदळायला लागतो. 

‘कच्ची धूप’ या हिंदी मालिकेचं एका शब्दात वर्णन करायला कोणी सांगितलं तर माझा शब्द असेल.. धमाल! लोकांना धमाल फक्त ‘दूरदर्शन’वर दिसली; पण युनिटमधल्या सर्वानी मालिका बनवताना ती प्रत्यक्षात पुरेपूर अनुभवली. एकूण उत्साहाला सुरुवात झाली ती आमच्या मुलीपासून, शाल्मलीपासून. तिच्या बालपणी आमची नाटय़-कारकीर्द ‘फक्त प्रौढांसाठी’ होती. ‘क्षोभ’, ‘वासनाकांड’ अशी नावं असलेली आणि बहुधा सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेली आमची नाटकं छोटय़ा मुलांना दाखवणं शक्यच नव्हतं. शाळेतल्या मुलांसाठी काही र्वष मी कार्यशाळा घेतली आणि एकदा मुलीच्या शाळेतल्या वार्षिक उत्सवासाठी तिला घेऊन तेंडुलकरांचं ‘बॉबी’ हे नाटक बसवलं, एवढाच काय तो माझा त्या काळात मुलांच्या सर्जनशीलतेला लागलेला हातभार. पुढे चित्रपट बनवला तोही मानवत खुनावर आधारित, ए-सर्टिफिकेटवाला, ‘आक्रीत’. साहजिकच आमच्या कुठल्याही नाटक-सिनेमात शाल्मली कधी सहभागी होऊ शकली नाही. त्यामुळे स्वत:च टुमणं लावल्याने का होईना, आम्ही मुलांची मालिका करायचा निर्णय घेतल्यावर ती खूप एक्साइट झाली. शिवाय, मालिकेतल्या तीन बहिणींपैकी मधल्या टॉमबॉय बहिणीची, नंदूची भूमिका मिळाल्यावर तर ती फारच खूश!

या मालिकेसाठी व्यावसायिक बालनट न घेता सर्व नवी, अननुभवी मुलं घ्यायची असं आम्ही ठरवलं. त्यामुळे मालिकेला वेगळाच तजेला प्राप्त होईल, असा आमचा अंदाज होता (आणि तो पुढे खराही ठरला.) पण अशा मुलांना घेतल्यावर त्यांची शाळा, अभ्यास बुडणार नाही, याची काळजी घेणंही आलं. तेव्हा पहिले दोन भाग नाताळच्या सुट्टीत करायचे आणि उरलेलं चित्रीकरण उन्हाळ्याच्या सुटीत संपवायचं, असा निर्णय घेऊन आम्ही तयारीला लागलो.

ही मालिका संगीतिका असल्यामुळे तिन्ही मुलींना गाता येणं आवश्यक होतं. ध्वनिमुद्रण त्यांच्या स्वत:च्याच आवाजात आम्ही करणार होतो. शाल्मली गाणं शिकली होती, त्यामुळे तिची चिंता नव्हती. मोठय़ा अलकाच्या भूमिकेसाठी सुरेल गाणाऱ्या एका मुलीची निवड केली आणि आमच्या शेजारच्या बंगल्यात राहणारे सांगलीचे राजे विजयसिंग पटवर्धन यांची धाकटी मुलगी पूर्णिमा ऊर्फ पिंकी हिला छोटय़ा मिनूच्या भूमिकेसाठी घेतलं. विजयसिंगना संगीत दिग्दर्शनाची भारी हौस होती. मालिकेचं संगीत करायला ते एका पायावर तयार झाले. कमलेश पांडे या आमच्या हिंदी भाषिक लेखकमित्राने मी मूळ इंग्रजीत लिहिलेल्या संवाद आणि गाण्यांचा सुरेख अनुवाद करून दिला. बरेच दिवस मालिकेसाठी चांगलं नाव सापडेना. मी दिलेलं तात्पुरतं नाव होतं, ‘ग्रोइंग अप’. मुलांच्या कार्यक्रमांना सहसा दिली जाणारी नावं टाळून, वाढत्या वयाचे सर्व रंग व छटा ज्यातून व्यक्त होतील, असं नाव आम्ही शोधत असताना, विजय तेंडुलकरांच्या एका सदराचं शीर्षक अमोलला आठवलं – ‘कोवळी उन्हे’ आणि त्यावरून नाव तयार झालं ‘कच्ची धूप’! मुलांच्या मालिकेत

फारसा रस नसलेला कमलेश तोवर या मालिकेमध्ये इतका गुंतला होता की, त्याने लगेच शीर्षकगीत लिहून दिलं.

‘जिंदगी के आंगनमे, उम्र की दहलीजपर

आ खडी होती है एक बार.

कच्ची धूप, गुनगुनी धूप

अधखिली और चुलबुली धूप’

मालिकेच्या स्वरूपाचं हे हुबेहूब वर्णन होतं.

मुलींच्या घराचं नेपथ्य उभारण्यासाठी नटराज स्टुडिओ निश्चित केला. पहिल्या दोन गाण्यांचं ध्वनिमुद्रणही सुरळीत पार पडलं आणि चित्रीकरणाला दोन दिवस असताना मोठा धक्का बसला. आमची साहाय्यक श्रावणी देवधर वेशभूषेबद्दल सूचना देण्यासाठी अलकाची भूमिका करणाऱ्या मुलीच्या घरी गेली तर ती मुलगी गायब झालेली! घरच्यांना ती कुठे गेली, कधी परत येणार, काही सांगता येईना. चित्रीकरण पुढे ढकलणं अजिबात शक्य नव्हतं आणि ते रद्द केलं असतं तर मोठं आर्थिक नुकसान झालं असतं. शेवटी अलकासाठी दुसरी मुलगी शोधायची आणि ती नाहीच मिळाली तर चित्रीकरण रद्द करायचं असं ठरलं.

दुसऱ्या दिवशी पहाटे मी व श्रावणी माझ्या गाडीतून मुलगी शोधायला निघालो. ज्यांना १६/१७ वर्षांची मुलगी आहे, अशा सर्व ओळखीच्या माणसांची आम्ही यादी केली. कुलाब्यापासून कांदिवलीपर्यंत यादीतल्या प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावयाचा आणि ‘तुमची मुलगी आमच्या मालिकेत काम करेल का?’ विचारायचं, असा आमचा साधासरळ बेत! त्याप्रमाणे कुलाब्यापासून सुरुवात केली; पण संध्याकाळी वांद्रे पार केलं, तरी आमची योजना यशस्वी होण्याचं नाव घेईना. आम्ही ओळखीचेच असल्याने आईबापांची हरकत नसे, मात्र मुलींच्या अनेक अडचणी निघाल्या. एक नाताळच्या सुट्टीसाठी आखलेला बेत रद्द करेना, दुसरी प्रिलिम्सच्या तयारीत व्यग्र होती, तिसरीला अभिनयामध्ये अजिबात रस नव्हता इत्यादी इत्यादी. हळूहळू यादीतली नावं कमी होत गेली आणि सूर्याबरोबरच आमचा उत्साहही मावळायला लागला. प्रदीप व रजनी वेलणकर यांची मुलगी मधुरा नक्की हो म्हणेल, अशी आशा बाळगून आम्ही पाल्र्याला पोहोचलो, तर तीही नुकतीच मुंबईबाहेर एका सहलीला गेली होती. अखेरीस अत्यंत थकलेल्या आणि निराश अवस्थेत मी व श्रावणी परतलो. घरात शिरता शिरता कसं कोण जाणे, अचानक मला एक कल्पना सुचली. विजयसिंग पटवर्धन जवळपास कुठल्याशा चित्रीकरणामध्ये व्यग्र होते, तिथे मी जाऊन थडकले आणि त्यांना म्हटलं, ‘‘आणीबाणीची परिस्थिती आहे, तेव्हा मी तुमच्या भाग्यश्रीला मोठय़ा मुलीच्या भूमिकेसाठी घेणार आहे. तुम्ही नकार दिला, तर चित्रीकरण रद्द करावं लागेल.’’ भाग्यश्री ही त्यांची, म्हणजेच राजघराण्यातली सर्वात मोठी मुलगी. त्यामुळे तिच्या बाबतीत घरचे बरेच कडक आहेत, हे माहीत असल्याने तिचा आम्ही आजवर विचार केला नाही, पण आता दुसरा पर्यायच उरला नव्हता. बिचारे विजयसिंग! माझ्या दादागिरीचा सामना ते करू शकले नाहीत. अखेरीस भाग्यश्री, शाल्मली आणि पिंकी या घरच्याच तिघींना घेऊन ठरल्या दिवशी चित्रीकरण सुरू झालं आणि त्याबरोबर धमालही..

सेटवर केवळ निरागस, अवखळ आनंद भरून राहिला होता. त्यात बुडय़ा मारत युनिटमधली प्रत्येक व्यक्ती स्वत:चं बालपण पुन:पुन्हा अनुभवायला लागली. नंदूला गोष्टीचं पुस्तक भेट म्हणून मिळण्याची इच्छा असते, या प्रसंगासाठी कलादिग्दर्शक प्रमोद गुरुजींनी चेकाळून राक्षसी मापाचं लाकडी पुस्तक बनवलं. त्यात मजेशीर चित्रेही रंगवली. कुठल्याही स्पेशल इफेक्टशिवाय नंदू त्या पुस्तकासमोर अतिशय चिमुकली दिसत होती. आई स्वत:च्या हातांनी बनवलेली वस्तू भेट देण्यातली मजा मुलींना पटवून देते, असं एक दृश्य होतं. त्यासाठी माझ्या आईने स्वत: कशिदा काढून वस्तू तयार केल्या. मुलींचा छोटा मित्र शँकी याच्या घरातल्या प्रसंगांसाठी अतुल सेटलवाड या नामवंत वकिलांनी स्वत:चं, उत्तम अभिरुचीने सजवलेलं घर प्रेमापोटी दिलं. सर्वाच्या अशा सहकार्यामुळे, सहभागामुळे, कुठल्याही प्रकारच्या झगमगाटाशिवाय मालिका देखणी बनली आणि वातावरण अधिक कौटुंबिक झालं!

सर्वात जास्त धमाल आली ती ‘नंदू नाटक बसवते’ या भागात! लहानपणी उन्हाळ्यांच्या सुट्टीत मी सर्व लहान भावंडांना सक्तीने काम करायला लावून नाटकं, नाच दिग्दर्शित करत असे, त्या आठवणींचा मी आधार घेतला. नंदू बसवत असलेल्या मुलांच्या नाटकाच्या तालमीत आणि प्रयोगात क्षणोक्षणी गोंधळ उडतो, त्यावर हा भाग होता. आमच्या सर्व मित्रमंडळींनी आपापली मुलं आणली. सहा-सात वर्षांपासून ते तेरा-चौदा वर्षांर्प्यतची वीसेक मुलं जमली. यातलं कुणीही बालनट नव्हतं. आमच्याशी घरोबा असल्याने सर्व मुलं संकोच न बाळगता बिनधास्त हुंदडत होती. त्यांची आपापसातील भांडणं सोडवत त्यांना खूश ठेवणं, प्रत्येक मुलाचा चेहरा निदान दोन-तीन शॉट्समध्ये नीट ओळखता येईल याची खबरदारी घेणं, अशा अनेक गोष्टी आम्ही करत होतो. कॅमेरामागच्या या खऱ्या, उत्साही गोंधळातून स्फूर्ती मिळाल्याने कित्येक गोष्टी ऐन वेळी सुचल्या आणि चित्रित केल्या गेल्या आणि एपिसोडमधला गोंधळ अधिकच जिवंत व मजेशीर झाला.

आज या मालिकेला ३० र्वष होऊन गेली आहेत. यात कामं केलेल्या बाल-कलाकारांची चाळिशी उलटली आहे. सगळे आपआपल्या क्षेत्रात चमकताहेत. ज्या आशुतोष गोवारीकर नावाच्या तरुण अभिनेत्याने त्या वेळी शँकीच्या शिक्षकाची भूमिका केली, तो आता खूप मोठा दिग्दर्शक आहे. पुरं युनिट विखुरलं आहे आणि मी सत्तरीकडे झुकते आहे; पण जेव्हा यातलं कुणी भेटतं तेव्हां हमखास मधली र्वष गळून पडतात आणि ‘कच्ची धूप’च्या वेळची धमाल आठवत आम्ही चक्क लहान मुलांसारखं हसायला, खिदळायला लागतो.

चित्रा पालेकर

chaturang@expressindia.com

First Published on February 18, 2017 12:35 am

Web Title: kachchi dhoop serial