23 January 2018

News Flash

वेगळी

आज मी आपल्याला माझ्या आयुष्याच्या एका वेगळ्या, अत्यंत महत्त्वाच्या बाजूविषयी सांगणार आहे.

चित्रा पालेकर | Updated: June 24, 2017 4:08 AM

आज मी आपल्याला माझ्या आयुष्याच्या एका वेगळ्या, अत्यंत महत्त्वाच्या बाजूविषयी सांगणार आहे. ती आहे, समलिंगी (लेस्बियन) मुलीची आई या नात्याने माझं जगणं..

गेल्या काही वर्षांत समलिंगी (लेस्बियन किंवा गे), उभयलिंगी (बाय-सेक्शुअल), तृतीयपंथी (ट्रान्स-जेंडर) इत्यादी शब्द माध्यमांद्वारे सर्वपरिचित झाले आहेत. बहुसंख्य माणसांहून वेगळी लैंगिकता असलेल्या सर्व घटकांना एकत्र आणणारं छत्र ‘एलजीबीटीक्यू’ म्हणून ओळखलं जातं, हेही अनेकांना माहीत आहे. पण २४ वर्षांपूर्वी माझ्या मुलीने आपण ‘लेस्बियन’ असल्याचं मला सांगितलं, तेव्हा परिस्थिती फारच वेगळी होती. समलैंगिकतेचा विषय जवळजवळ पूर्णपणे अंधारात होता. ज्या समाजात स्त्री-पुरुषांमधल्या लैंगिक आकर्षणाविषयी, आचारांविषयी, उघडपणे बोलणं-लिहिणं अश्लील मानलं जात होतं, (किंबहुना अजूनही मानलं जातं) तिथे समलैंगिकतेची काय कथा! शिवाय भारतीय दंडविधान कलम ३७७ खाली समलैंगिकता गुन्हा असल्याने, एखाद-दुसरा अपवाद सोडल्यास कुणीही आपण समलैंगिक असल्याची वाच्यता करत नसे. अशा व्यक्ती समाजात वावरत असून अस्तित्वात नसल्यागत होत्या.

मला स्वत:ला इंग्रजी साहित्यातून व जागतिक चित्रपटांमधून समलैंगिकतेची थोडीफार ओळख होती. पुरुषाविषयी लैंगिक किंवा भावनिक आकर्षण वाटणाऱ्या पुरुषाला ‘गे’, तसंच जिला स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं व आपली सहचरी स्त्रीच असावी असं वाटतं त्या स्त्रीला ‘लेस्बियन’ म्हणतात वगैरे मला ढोबळपणे माहीत होतं. पण प्रत्यक्षात मी अशा कुठल्याही व्यक्तीला ओळखत नव्हते. ही माणसं माझ्यासाठी कथा-कादंबरीतली किंवा चित्रपटातली काल्पनिक पात्रं होती. माझ्या स्वत:च्या आयुष्यात एखादी समलैंगिक व्यक्ती असेल व ती दुसरी-तिसरी कुणी नसून माझी एकुलती एक मुलगी असेल, असं मला कधी कल्पनेतही वाटलं नव्हतं. त्यामुळे मुलीने बी. ए. झाल्या झाल्या अनपेक्षितपणे स्वत:ची समलैंगिकता माझ्यापाशी उघड केल्यावर मला साहजिक थोडा धक्का बसला, पण मी ना हादरले ना उद्ध्वस्त झाले! पहिल्या क्षणापासून एक गोष्ट अत्यंत तीव्रपणे मला जाणवत राहिली की, काही झालं तरी शाल्मली माझीच मुलगी आहे. माझं तिच्यावर जिवापाड प्रेम आहे. वाटलं, तिच्या ‘लेस्बियन’ असण्याने तिच्या-माझ्या नात्यात, प्रेमात काही फरक पडतो का? अंत:प्रेरणेतून उत्तर आलं, ‘‘नाही. त्या नात्यात, प्रेमात काहीही फरक पडत नाही.’’ तेवढय़ात मुलीनेही नेमकं हेच बोलून माझ्या मनातल्या विचारांना पुष्टी दिली.

शाल्मलीच्या समलैंगिक असण्याचा मी व तिच्या बाबाने लगेच स्वीकार केला, पण तिच्या जगण्याच्या या महत्त्वाच्या बाजूविषयी मला केवळ ओझरती माहिती होती. मुलीचं वेगळं जीवन समजून घ्यायचं तर समलैंगिकतेविषयी सखोल माहिती असणं आवश्यक होतं, पण त्या काळी आपल्या देशात या विषयासंबंधी पूर्वग्रहरहित, तर्कशुद्ध तथा वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देणारी पुस्तकं किंवा मासिकं सहजासहजी उपलब्ध नव्हती. त्यातून लेस्बियन स्त्रियांभोवती तर दाट धुकं होतं. इंटरनेटचा जमाना यायला अजून दहा-एक वर्षांचा अवकाश असल्यामुळे आजच्यासारखं गुगलच्या साहाय्याने कुठल्याही विषयावरची हवी ती माहिती मिळवणंही शक्य नव्हतं. शाल्मलीने व मी यातून मार्ग काढला. एकमेकींशी बिलकूल संकोच न करता, आडपडदा न ठेवता, पूर्ण मोकळेपणाने बोलण्याचा!  मी शंका विचारत राहिले. ती त्यांचं निरसन करत गेली आणि बहुतेक वेळा तिने आपणहूनच माहिती दिली.

सर्वप्रथम तिने खुलासा केला की समलैंगिकता ही एखादी व्याधी, व्यंग अथवा विकृती नाही. शिवाय तिच्या दृष्टीने त्याला अनैसर्गिक मानणंही चुकीचं आहे. हा मुद्दा समजावताना तिने एक सोपं व छान उदाहरण दिलं. डावखुऱ्या माणसांचं. दैनंदिन व्यवहारात उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचा वापर करणारी माणसं समाजात अल्पसंख्य असतात; बहुसंख्य माणसांपेक्षा ‘वेगळी’ असतात. पण डावखुरं असणं (एके काळी अनैसर्गिक मानलं गेलं तरी) आज नैसर्गिकच मानलं जातं. त्याचप्रमाणे समाजात अल्पसंख्य असलेल्या समलिंगी माणसांची लैंगिकतादेखील ‘वेगळी’ असली तरी नैसर्गिकच असते. तिनं हेही सांगितलं की, ‘‘समलैंगिकता शारीरिक आजार तर नाहीच, पण मानसिक आजारसुद्धा नसल्याचं ‘अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिक असोसिएशन’ व ‘जागतिक आरोग्य संघटना’ यांनी काही वर्षांपूर्वीच मान्य केलंय.’’ ती पुरावे देत होती, पण मुलीवर विश्वास ठेवण्यासाठी, तिच्या समलैंगिकतेचा स्वीकार करण्यासाठी, मला कुठल्याही पुराव्यांची अथवा दाखल्यांची आवश्यकता नव्हतीच. जिला मी तिच्या जन्मापासून अतिशय जवळून ओळखत होते ती माझी मुलगी, केवळ तिची समलैंगिकता उघड केल्यामुळे अचानक बदलणं कसं शक्य होतं? जिने अभ्यास, खेळ, अभिनय अशा विविध क्षेत्रांत आम्हाला अभिमान वाटेल, अशीच कामगिरी केली होती; जी स्वत:च्या प्रेमळ व मिस्कील स्वभावामुळे कुटुंबीयांची, तसंच तिच्या मित्रमंडळींची आवडती होती, त्या आमच्या शाल्मलीत केवळ तिची लैंगिकता ‘वेगळी’ असल्यामुळे काहीही फरक पडला नाहीए, हे मला स्पष्ट दिसत होतं, जाणवत होतं.

बोलता बोलता मी विचारलं, ‘‘तुला आपण लेस्बियन असल्याची जाणीव हल्लीच झाली की..?’’ ती म्हणाली, ‘‘नाही.. चौदाएक वर्षांची असताना. माझ्या मैत्रिणींना मुलांविषयी आकर्षण वाटायला लागलं, पण अनेक मुलांशी मैत्री असूनही मला कुठल्याही मुलाविषयी आकर्षण वाटेना. ‘लेस्बियन’ हा शब्द मला त्या वेळी माहीत नव्हता, पण आपण मैत्रिणींपेक्षा वेगळ्या आहोत हे मात्र हळूहळू जाणवायला लागलं.’’ म्हणजे शाल्मलीने चक्क सहा-सात र्वष ही गोष्ट आमच्यापासून लपवली होती तर! ‘‘तू आम्हाला कुठलीही गोष्ट सांगू शकतेस, विचारू शकतेस,’’ असा दिलासा मी व तिच्या बाबाने वारंवार दिला होता, तरीही!! माझा ईगो किंचित डिवचला गेला व तिने पुढे काही सांगण्याआधीच ‘‘मग हे इतकी र्वष बोलली का नाहीस?’’ असा प्रश्न मी केला. त्यावर तिने दिलेलं उत्तर मी कधीही विसरू शकत नाही.

‘‘मुलांविषयीच्या माझ्या भावना इतर मुलींसारख्या नाहीत, हे लक्षात आल्यावर त्या वेगळेपणाची मला खूप भीती वाटली, अम्मा. जे वाटत होतं ते चांगलं की वाईट, समजेना. जिमखान्यात किंवा इतर ठिकाणी समलैंगिक माणसांविषयीची कुजबुज, गलिच्छ विनोद कानावर येत. शाळेत एखादा मुलगा इतर मुलांपेक्षा जऽऽरा नाजूक दिसत असला की इतर मुलं त्याला खूप त्रास देत; त्याची सतत कुचेष्टा करत. सगळ्यांना त्याचा तिरस्कार वाटे. हळूहळू या सगळ्याचा अर्थ माझ्या ध्यानात यायला लागला. मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे हे कळल्यास माझ्याशीदेखील सगळे तसंच वागतील, अशी भीती वाटायला लागली. तशातून आजूबाजूला जिथे पाहावं तिथे फक्त स्त्री-पुरुषांमधली नाती आणि रोमान्स! दूरचित्रवाणीवर, चित्रपटांत, गाण्यांत, जाहिरातींत.. गोष्टींच्या पुस्तकातसुद्धा तेच! आपल्या कुटुंबात, तुमच्या मित्रमंडळींतही सर्व जोडय़ा फक्त स्त्री-पुरुषांच्या! या सगळ्यामध्ये मला इतकं एकटं वाटायचं.. कुणाशी बोलावं हेच कळेना.’’

‘‘माझ्याशीदेखील नाही?’’ मी काहीशी दुखावले गेले. त्यावर ती म्हणाली, ‘‘आपल्या घरात तऱ्हेतऱ्हेची माणसं यायची. झाडून सगळ्या कलात्मक, सामाजिक, राजकीय प्रश्नांवर चर्चा व्हायची. पण समलैंगिक माणसांचा उल्लेखही कधी कुणी केला नाही. तू व बाबानेही नाही. तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं – केवळ त्या विषयात रस नाही की तुम्ही त्याच्याविरोधात आहात, हे मला समजेना. तुमच्याशी बोलले आणि तुम्हाला माझी शरम वाटली, मी आवडेनाशी झाले, तर? अशा शंका मनात येऊन मी गोंधळून जात असे.’’

वाढत्या वयात, शारीरिक व मानसिक बदल होत असताना, आई-वडिलांनी मुलांना समजून घेणं फार आवश्यक असतं, हे मला तात्त्विकदृष्टय़ा माहीत होतं. ते आचरणात आणण्याचा मी आटोकाट प्रयत्नही केला होता. इतकं असून, माझ्या समलिंगी मुलीला जेव्हा माझी खरी गरज होती, तेव्हा मी कमी पडले होते!

मोठी होता होता शाल्मलीने वाचन, संशोधन व विचार यांच्या साहाय्याने स्वत:च्या शंकांचं स्वत:च निरसन केलं. मानसिक बळ मिळवून अत्यंत आत्मविश्वासाने ती आता मला सांगत होती, ‘‘अम्मा, मी जशी ‘लेस्बियन’ आहे ना, तशीच मी तुझी-बाबाची मुलगी, आजी-आजोबांची नात, मावश्या-आत्यांची भाची, अनेक मुलामुलींची जिवलग मैत्रीण, ‘कच्ची धूप’मधली बालकलाकार आणि सेंट झेवियर्सची विद्यार्थिनीसुद्धा आहे. शिवाय मी ‘कम्बाइण्ड युनिव्हर्सिटी’च्या बॅडमिंटन टीमची कॅप्टन व ‘दोराब टाटा स्कॉलर’देखील होते, हो ना? एकूण काय, समलैंगिकता माझं संपूर्ण अस्तित्व नाही तर त्याचा केवळ एक भाग आहे.’’ तिचं सगळं म्हणणं तिच्या बाबालाच नाही तर जवळच्या सगळ्यांनाही तंतोतंत पटलं. सर्वानी तिचा अतिशय प्रेमाने स्वीकार केला.

शाल्मलीने डॉक्टरेट मिळवली व ख्रिस्तीनबरोबर संसार थाटला, त्याला आज १७ र्वष उलटून गेली आहेत. इतर सुना-जावयांप्रमाणेच ख्रिस्तीन आमच्या कुटुंबाची अविभाज्य घटक आहे. घरच्या प्रत्येक समारंभात, दोघींचा जोडीने सहभाग असतो. माझ्या ‘वेगळ्या’ मुलीचं असं फुललेलं जीवन पाहताना खूप समाधान वाटतं. तरीही..

जोवर आपल्या देशात तिच्यावर व प्रत्येक ‘एलजीबीटीक्यू’ व्यक्तीवर कलम ३७७ची टांगती तलवार आहे; लाखो ‘वेगळ्या’ मुलामुलींना त्यांच्या आईबापांकडून नाकारलं जातंय, तोवर मला पूर्णपणे समाधान मिळणं कसं शक्य आहे?

चित्रा पालेकर

chaturang@expressindia.com 

First Published on June 24, 2017 4:08 am

Web Title: lesbian gay bisexual transgender marathi articles
 1. A
  arun
  Jul 1, 2017 at 7:18 am
  जुन्या परंपरेचं, संस्कृती या नावाने ओझं घेऊन वागायचं ही भारतीय मानसिकता. डबकी मनोवृत्ती सांभाळत राहणं म्हणजे आदर्श वर्तन.. यात आपलं खरं लैंगिक अस्तित्व निर्भीडपणे जगासमोर मांडायचं धाडस भल्या भल्याना होत नाही आणि कुणी मांडलं तर व्यक्तिपूजेत ते बसत नाही. या प्रवृत्तीला शह देणार लेखन चित्राताईंनी केलं. अर्जुन बृहन्नडा झाला हे वाचणं फक्त पुस्तकी.. पण आपल्या घरात ते घडलं त्याला ज्या मोठेपणाने त्या सामोऱ्या गेल्या आणि ते लोकांसमोर मांडलं त्याला सलाम.
  Reply
  1. ओंकार जोशी
   Jun 27, 2017 at 12:59 pm
   खरंच अभिमान वाटतो अशा सगळ्या पालकांचा , माहितीचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नसताना , मनातले पुर्वग्रह गड़द असूनही एका व्यक्तीला "माणूस " म्हणून स्वीकारणं आव्हानात्मकच होतं , तरीदेखील मनाचा मोठेपणा दाखवून तुम्ही स्वीकारलंत. आजही तुम्ही हे तुमच्यापुरतं मर्यादित न ठेवता इतर समाजासाठी काम करताना दिसता.खूप बरं वाटतं , आणि तुमच्यासारखेच उदारमतवादी पालक सर्वांना लाभोत हीच सदिच्छा.
   Reply
   1. C
    chitra sheorey
    Jun 25, 2017 at 9:53 am
    .चित्रा पालेकरांचे विचार मनाला भिडले, भावले. त्यांचं धैर्य (वेगळेपणा स्वीकारण्याचं, त्याबद्दल मनोगत व्यक्त करण्याचं) ही मनःस्पर्शी आहे. आता चाही संदर्भ बदललाय, फक्त procreation साठी नसून शरीराला आणि मनालाही सुखावण्यासाठी जर आपण मानतो, तर यात unnatural वाटण्यासारखं काहीच नाही. आणि ual inclination हा फक्त त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे, हेही संपूर्णतया मान्य! 👍🏼चित्रा पालेकरांचं धैर्य कौतुकास्पद आहे, वेगळेपण स्वीकारण्यासाठीही आणि हे विचार व्यक्त करण्यासाठीही.
    Reply
    1. V
     Vasant Vasant
     Jun 24, 2017 at 10:22 am
     साहसी आत्मकथन ! विचारात पाडणारं!
     Reply