महेश सरलष्कर

भाजपने देशाला हिंदुत्व शिकवण्याचा अट्टहास करू नये, असे सांगत प्रादेशिक पक्ष केंद्रातील सत्ताधारी पक्षाला आव्हान देत आहेत. मूळ शिवसेनेच्या असलेल्या या भाजपविरोधी भूमिकेच्या मार्गावरून पुढे जात हे पक्ष अधिकाधिक ‘सौम्य हिंदुत्वा’चे राजकारण करू लागले आहेत…

भाजप केंद्रात सत्तेवर आला नसता आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधानपदावर बसवले नसते, तर भाजपच्या राजकीय विरोधकांनी ‘सौम्य (सॉफ्ट) हिंदुत्वा’ची कास धरली नसती. पण भाजपने कडव्या हिंदुत्वाचा बिनदिक्कत अंगीकार केल्याने स्वत:चे अस्तित्व टिकवू पाहणाऱ्या प्रादेशिक पक्षांनी ‘आमचेही हिंदुत्व’ असे म्हणत भाजपचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली आणि कोलकाता या दोन्ही ठिकाणी झालेल्या घडामोडी पाहता, प्रादेशिक पक्षांच्या पातळीवरून भाजपला आव्हान देण्याचा नवा मार्ग अनुसरला जात असल्याचे दिसते. इथे मुद्दा प्रादेशिक पक्षांनी सौम्य हिंदुत्वाचा आधार घेण्याचे समर्थन करण्याचा नाही, तर भाजपने मतांचे ध्रुवीकरण यशस्वी केल्यानंतर बदललेल्या राजकारणावरील पडसाद टिपण्याचा आहे.

गेल्या आठवड्यात दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने विधानसभेत यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. फेब्रुवारी २०२० मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून ‘आप’ने सत्ता राखली, पण त्यानंतर लगेचच करोनाच्या आपत्तीला सामोरे जावे लागले. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दुसऱ्या पाच वर्षांच्या कालखंडातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प म्हणता येईल. त्यात काय असेल हे आधीच जाहीर केले गेले होते. प्रत्यक्ष अर्थसंकल्पात फक्त आकड्यांचा खेळ मांडला गेला. हा अर्थसंकल्प देशभक्ती-हिंदुत्वाची पाठराखण करणारा आणि त्याअंतर्गत सोयीसुविधा देण्यासाठी आर्थिक तरतूद करणारा होता. अर्थसंकल्प सादर करण्याआधीच केजरीवाल यांनी राम मंदिराचा विषय काढला होता. ‘‘मी हनुमानाचा भक्त, हनुमान रामाचा भक्त, म्हणून मीही रामाचा भक्त,’’ असे केजरीवाल यांनी सांगितले होते. त्यांच्या या ‘ब्रीदवाक्या’नुसार केजरीवाल सरकारने, राम मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर दिल्लीकर ज्येष्ठांना मोफत अयोध्यावारी घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. शाळांमध्ये देशभक्तीवर आधारित अभ्यासक्रमासाठीही तरतूद असेल. भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांना ध्रुवीकरणाच्या जाळ्यात ओढण्यासाठी ‘शाहीनबाग’ आंदोलनाचा वापर करून घेतला, तेव्हा शाहीनबागेकडे ढुंकूनही न बघणारे केजरीवाल भाजपच्या ‘राम मंदिरा’चा निवडणुकीच्या राजकारणासाठी वापर करून घेत आहेत. वर्षभर केजरीवाल सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत की, भाजपचा मुख्य विरोधक काँग्रेस नसून ‘आप’ हाच आहे! सुरत महापालिकेत २७ जागा जिंकल्याने त्यांचा हा सूर आणखी तीव्र झालेला असून भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला आता ‘सौम्य हिंदुत्व’ हाच पर्याय असल्याचे केजरीवाल सांगू पाहात आहेत.

दुसरे उदाहरण आहे पश्चिम बंगालमधील नंदिग्रामचे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत सांगितले की, ‘‘मी हिंदू असून माझ्यासारख्या ब्राह्मण व्यक्तीला भाजपने हिंदुत्व शिकवू नये.’’ मग ममतांनी जनसमूहासमोर मंत्रपठण करून दाखवले. या घटनेकडे दोन बाजूंनी पाहिले जात आहे. ममतादीदींना भाजपमुळे आपण हिंदू असल्याची आठवण झाली, ही त्यासंदर्भात भाजप समर्थकांची भूमिका. तर ममतांनी नंदिग्रामच्या सभेत हिंदू मतांना आवाहन करून भाजपच्या ध्रुवीकरणाच्या रणनीतीला छेद दिला, ही ममतांच्या पाठीराख्यांची भूमिका. पश्चिम बंगालच्या लोकसंख्येत २७ टक्के मुस्लीम आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत ममतांना सत्ता काबीज करण्यासाठी आणि राखण्यासाठी मुस्लीम मतांचा पाठिंबा मोलाचा ठरला होता. पण तेव्हा भाजपच्या राष्ट्रवाद-हिंदुत्वाचे आव्हान ममतांसमोर नव्हते. या वेळी मात्र तृणमूल काँग्रेस हा मुस्लीमधार्जिणा पक्ष असल्याचे बिंबवून हिंदू मतांच्या एकीकरणाचा लाभ मिळणे भाजपला अपेक्षित आहे. पण आता ममतांनी केजरीवाल यांच्या पावलावर पाऊल टाकून ‘मी हिंदू’ म्हणत सौम्य हिंदुत्वाचा आधार घेत भाजपच्या शक्तिस्थानाला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी ध्रुवीकरणाचा टोकाचा खेळ खेळला होता; पण केजरीवाल यांनी ‘हनुमान चालिसा’ म्हणत शहरी हिंदुत्ववादी मतांना आकर्षित केले होते. केजरीवाल यांचा प्रयोग यशस्वी ठरल्याने शहा चारीमुंड्या चीत झाले. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांची फौज प्रचारात उतरेल. त्यांना आव्हान देण्यासाठी ममतांनी पहिला डाव टाकलेला आहे.

वास्तविक भाजपला नामोहरम करण्याचा ‘मार्ग’ महाराष्ट्रात शिवसेनेने दाखवून दिला होता. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहून शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका अत्यंत चोख बजावली होती. सत्तेतून बाहेर पडून स्वत:ला राजकीयदृष्ट्या संपवण्यापेक्षा ‘आम्हीही हिंदुत्ववादी’, ‘आम्ही कधीही हिंदुत्व सोडलेले नाही, हिंदुत्व ही भाजपची मक्तेदारी नाही’ अशी विधाने शिवसेनेचे पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली. शिवसेनेच्या हिंदुत्वात कडवे आणि सौम्य असा कोणता फरक करता येत नाही, पण भाजपला राजकीय उत्तर देण्यासाठी शिवसेनेला हिंदुत्वाची भूमिका उपयुक्त ठरते. भाजपशी असलेले राजकीय नाते बिघडले असले, तरी शिवसेनेच्या नेतृत्वाचे संघनेतृत्वाशी सौहार्दाचे संबंध आहेत. त्यामुळे संघाला शिवसेना परकी नाही. पण हिंदुत्वाच्या आधारावर भाजपबरोबरचा राजकीय प्रवास शिवसेनेला संपवू शकतो, याची सुज्ञ जाण असल्याचे शिवसेनेच्या नेतृत्वाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्राप्रमाणे तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, झारखंड, बिहार, हरियाणा आणि आता दिल्ली व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सशक्त असून त्यांना भाजपच्या आव्हानाला तोंड द्यावे लागते. या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी कमी-अधिक प्रमाणात सौम्य हिंदुत्वाची भूमिका घेतलेली दिसते. या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचे नेते हिंदू धार्मिक सभा-समारंभांत सहभागी होतात, कर्मकांड करतात, कुटुंबातील लग्नसोहळे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे करून त्यांना प्रसिद्धी देतात. तमिळनाडूमध्ये प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांकडेच राजकारणाची सूत्रे असली, तरी तिथे भाजपचे अस्तित्व अद्याप निर्माण झालेले नाही. केरळमध्ये डाव्या पक्षांची आघाडी आणि काँग्रेस आघाडी आलटून-पालटून सत्तेत असते, तिथेही भाजप नगण्य आहे.

भाजपने गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये थेट लढाईत काँग्रेसचा पराभव केला होता. काँग्रेस हा मुस्लीम अनुनय करणारा पक्ष असल्याने हिंदूंसाठी भाजप हाच पर्याय असल्याचे गेल्या सहा वर्षांत बहुसंख्याकांवर इतके बिंबवले गेले आहे, की काँग्रेसविरोधात सरळ लढतींमध्ये ध्रुवीकरणाचा भाजपला नेहमीच फायदा होत आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष हे प्रादेशिक पक्ष असले, तरी बसप हा भाजपचा ‘ब चमू’ होऊन बसला आहे, तर समाजवादी पक्षाचा आधार प्रामुख्याने मुस्लीम मते असल्याने तिथेही भाजपला ध्रुवीकरणाचा लाभ मिळाल्याचे दिसले. उत्तर प्रदेशात सपला अजून ‘आप’चा प्रयोग करणे जमलेले नाही आणि काँग्रेस हा विरोधक म्हणूनही उरलेला नाही. उत्तर प्रदेश वगळता जिथे जिथे प्रादेशिक पक्षांकडे सत्तेत येण्याची क्षमता आहे, त्या राज्यांमध्ये भाजपच्या ध्रुवीकरणाचा फुगा फोडण्यासाठी कमी-अधिक प्रमाणात हिंदुत्वाचा आधार घेतला जात असल्याचे दिसते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत सौम्य हिंदुत्वाचा काँग्रेसचा प्रयोग मात्र अपयशी ठरला होता. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींनी देवळांना भेटी देत देवांना अभिषेक घातला होता, आताही प्रियंका गांधी-वाड्रा गंगेत स्नान करून पूजापाठ करत असल्याची छायाचित्रे काँग्रेसकडून प्रसिद्ध केली जात आहेत. पण त्यांच्या या खटाटोपाला यश मिळत नसल्याचे दिसते. शिवाय काँग्रेसशी युती करून प्रादेशिक पक्षांना फारसा फायदा झालेला नाही. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेसला ७० जागा दिल्या होत्या, त्यापैकी काँग्रेसला जेमतेम १९ जागा जिंकता आल्या. पूर्वी तृणमूल काँग्रेसनेही काँग्रेसशी युती केली होती, पण तृणमूल मोठा होत गेला आणि काँग्रेसची घसरण होत गेली. तमिळनाडूमध्येही द्रमुकने हात आखडता घेऊनच काँग्रेसला जागांचे वाटप केलेले आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या हिंदुत्वाच्या नव्या प्रयोगात काँग्रेसची पुरती कोंडी झालेली दिसते.

mahesh.sarlashkar@expressindia.com