06 August 2020

News Flash

‘देशद्रोहा’चा प्रचार भाजपला तारेल?

विरोधी पक्षांचा प्रचार नकारात्मक असू शकतो.

|| महेश सरलष्कर

भाजपचा प्रचार काँग्रेसच्या कथित ‘देशद्रोही’पणावर केंद्रित झालेला असून तो अधिकाधिक नकारात्मक होऊ लागला आहे. सत्ताधाऱ्यांनी स्वत:च्याच ‘विकासाच्या यशोगाथे’ला दुय्यम ठरवल्याने पाच वर्षे केंद्रात खरोखरच भाजपचे सरकार होते का, असा प्रश्न पडतो.

विरोधी पक्षांचा प्रचार नकारात्मक असू शकतो. सरकारच्या कामकाजातील त्रुटी, योजनांच्या अंमलबजावणीतील अपयश, धोरणात्मक चुका या सगळ्यांचा वापर करून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. याउलट, सत्ताधारी पक्ष सरकारी योजना-धोरणांच्या यशाचा लेखाजोखा मांडत पुन्हा सत्तेची संधी देण्याचे आवाहन मतदारांना करतात. गेल्या आठवडय़ाभरातील भाजपचा निवडणूक प्रचार पाहिला तर पाच वर्षे केंद्रात सरकार भाजपचे होते की, काँग्रेसचे असा प्रश्न पडावा. भाजपचा प्रचार काँग्रेसच्या कथित ‘देशद्रोही’पणावर केंद्रित झालेला असून पक्षाचे एकमेव स्टार प्रचारक-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उर्वरित भाजप नेत्यांच्या जाहीर भाषणातील मुद्दे अधिक नकारात्मक होऊ लागले आहेत.

केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने मोदी सरकारच्या जनधन, उज्ज्वला अशा सात महत्त्वाकांक्षी योजना कशा यशस्वी झाल्या याचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन केले होते. अनेक केंद्रीय मंत्र्यांना देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवून भाजप सरकार कसे कल्याणकारी, महिलांचा विकास साधणारे संवेदनशील सरकार असल्याचे ठसवण्याचा जोरदार प्रयत्न झालेला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिर नव्हे तर विकास हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचे सांगितले जात होते. अगदी महिनाभरापर्यंत आयुष्मान योजना, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत या योजनांचाही गवगवा करण्यात आला होता. पण आता भाजपच्या प्रचारात मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील ‘यशोगाथे’चा मागमूसही राहिलेला नाही. उज्ज्वला योजनेतील अपयशाची वस्तुस्थिती पक्षाचे फायरब्रॅण्ड प्रवक्ते आणि ओदिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संबित पात्रा यांनीच उघड करून पक्षाच्या पायावर दगड मारला आहे. तीन दिवसांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या टप्प्यात तरी भाजपने आणि मोदींनी उज्ज्वल यशांपेक्षा ‘देशद्रोहा’च्या मुद्दय़ाचा आधार घेतलेला आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होईपर्यंत भाजपचा प्रचाररथ ‘राष्ट्रवादा’च्या रस्त्यावरून घोडदौड करत होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रत्येक राज्यातील ‘सरदारां’शी लढावे लागणार असले तरी अखेर केंद्रात सत्ता बनवताना काँग्रेस हाच मध्यस्थानी येणार आहे. त्यामुळे भाजपने काँग्रेसलाच प्रमुख विरोधक बनवलेले आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा निम्म्याने वाढल्या तरी हा पक्ष शंभरी गाठेल. तसे झाले तर काँग्रेसचे ‘शतक’ भाजपच्या सत्ता मिळवण्याच्या मार्गातील मोठा अडथळा ठरेल. हे जाणून काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना ‘देशद्रोही’ ठरवण्यावर भाजपने प्रचारात भर दिलेला आहे. त्यासाठी ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीतील कथित गैरव्यवहाराचा बेमालूमपणे वापर केलेला दिसतो. या प्रकरणातील आरोपी दलाल मिशेल याच्याविरोधातील आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेण्याआधीच त्याच्या प्रति प्रसारमाध्यमांकडे पोहोचवण्यात आल्या. आरोपपत्रातील एपी म्हणजे अहमद पटेल, मिसेस गांधी, फॅम म्हणजे फॅमिली अशा शब्दांचा उल्लेख हा काँग्रेस आणि गांधी घराण्याचा गैरव्यवहारामध्ये हात असल्याचा पुरावा असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले गेले. आरोपपत्र प्रसारमाध्यमांकडे पोहोचल्यानंतर लगेचच मोदींनी जाहीर भाषणात ‘मिशेलमामा’, एपी, फॅमिलीभोवती काँग्रेसविरोधात कथित ‘देशद्रोहा’ची रचना केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘अफ्स्पा’ कायद्यात सुधारणा करण्याचा वा देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याच्या आश्वासनांविरोधातही भाजप नेते प्रचार करत आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा हा पाकिस्तानने बनवल्याचा आरोप करून काँग्रेसला ‘देशद्रोही’पणाचा शिक्का मारण्याचा अट्टहास मोदी-शहा आणि भाजप नेते करताना दिसतात. इतका आक्रमक प्रचार केल्यानंतर भाजपला आता प्रचाराची गाडी पुन्हा विकासाच्या रस्त्यावर वळवणे कठीण आहे. मोदी सरकारच्या ‘यशोगाथे’वर केंद्रात पुन्हा सत्ता मिळवता येणार नाही हे भाजपला कळून चुकले आहे!

नागरी संघटनांनी दिल्लीत शनिवारी तालकटोरा स्टेडियमवर ‘जनअजेंडा’ मांडण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, सीपीएम-सीपीआय हे डावे पक्ष, आप, स्वराज इंडिया या भाजपविरोधी पक्षांना व्यासपीठावर एकत्र आणले होते. या व्यासपीठाचा काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपकडून होणाऱ्या ‘देशद्रोहा’च्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी अचूक वापर करून घेतला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सोनियांनी केलेले हे पहिलेच भाषण आहे. काँग्रेसच्या जाहीरनामा प्रसिद्धीच्या कार्यक्रमातही सोनिया बोलल्या नव्हत्या. वैचारिक विविधता मान्य नसलेले लोक देशभक्तीची नवी व्याख्या करू लागले आहेत, हा सोनियांचा मुद्दा मोदींच्या ‘देशद्रोहा’च्या आरोपावर केलेला प्रतिहल्ला होता. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद मतदारसंघात माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लष्कराला ‘मोदींची सेना’ संबोधल्यानंतर त्यांच्यावर सिंग कमालीचे नाराज झालेले होते. पण, नाइलाज झाल्याने अखेर सिंग यांना नमते घ्यावे लागले. गाझियाबाद भाजपसाठी मजबूत मानला जात असूनदेखील सिंग यांच्यासाठी योगी, राजनाथ, अमित शहा अशी फौज प्रचाराला उतरली आहे. भाजपचा उमेदवार तुलनेत तुल्यबळ असूनही या मतदारसंघात प्रियंका गांधींनी रोड शो केला. तिथे प्रियंका यांनी मोदी कुठल्या गरिबाच्या घरात गेले हे सांगा, असा प्रश्न तिथल्या गर्दीला केला. त्यावरून राहुल-प्रियंका यांचा प्रचार प्रामुख्याने जाहीरनाम्यातील विकास मुद्दय़ांवर केंद्रिभूत राहील. पण सोनियांच्या भाषणानंतर काँग्रेसने मोदींच्या ‘देशद्रोहा’च्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचीही तयारी केलेली दिसते.

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे भाजपचे बुजुर्ग नेते विरोधी पक्षांची ‘बी टीम’ बनल्यानेही मोदी-शहा आणि भाजपची कोंडी झालेली आहे. मोदींच्या ‘देशद्रोहा’च्या आरोपाला अडवाणींनी ब्लॉग लिहून अप्रत्यक्ष उत्तर दिले आहे. या ब्लॉगमधून अडवाणींनी मोदी-शहांना लोकशाही परंपरेची आठवण करून दिलेली आहे. वैचारिक विविधता भाजपने कधीही अव्हेरली नसल्याची शिकवण अडवाणींनी एकेकाळच्या आपल्या शिष्याला दिली आहे. कधीकाळी हेच अडवाणी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींना अपेक्षित असलेल्या ‘राजधर्मा’च्या आड आले होते हे खरे. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडवाणींनी मोदींना लोकशाहीचे धडे देण्यास सुरुवात केल्यामुळे अडवाणींचे उफाळून आलेले ‘लोकशाहीवरील प्रेम’ हे मोदींच्या प्रचाराचा ‘अवसानघात’ करेल असे भाजप नेत्यांना आणि भाजप समर्थकांना वाटत आहे. अर्थातच, अडवाणींच्या विचारांशी सहमती दर्शवून आणि काँग्रेस कसा लोकशाहीविरोधी आहे, असा मुद्दा मांडून मोदींना स्वत:चा बचाव करून घ्यावा लागला आहे.

मोदी-शहांविरोधात मुरली मनोहर जोशी यांनी उघड ‘बंड’ केल्यामुळे त्यांनाच मोदींविरोधात लढवण्याची चर्चा विरोधी पक्षांकडून घडवून आणली जात आहे. २०१४ मध्ये जोशींना वाराणसी लोकसभा मतदारसंघ मोदींसाठी सोडावा लागला. त्यांची रवानगी कानपूरमध्ये झाली. आता तर भाजपने त्यांना कानपूरच नव्हे तर निवडणूक रिंगणातूनच बाहेर काढले आहे. भाजप जोशींना निवडणूक लढवण्याची संधी देणार नसेल तर वाराणसीत जोशींनी मोदींच्या विरोधात लढावे, अशा शक्यतेला वाट करून दिली जात आहे. वाराणसीत जोशी हे विरोधी पक्षांचे अपक्ष उमेदवार असतील, असा जोशी विरुद्ध मोदी सामना रंगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही कल्पना निदान आत्ता तरी मूर्त स्वरूपात आलेली नाही, पण पूर्व उत्तर प्रदेशमधील उच्चवर्णीय मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ठरू शकते.

पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी संपेल, पण मतदानाच्या आणखी सहा फेऱ्या होणार आहेत. जसजसे मतदानाचे टप्पे वाढत जातील तसा उन्हाचा तडाखाही वाढत जाईल. दुष्काळाच्या झळांची तीव्रताही वाढत जाईल. अशा वेळी पाण्याचा, पिकांचा, गुरांचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर बनत जाईल. पण, भाजपने विकासाचा मुद्दा प्रचारातून हद्दपार केल्याने राष्ट्रवाद, देशद्रोह याच मुद्दय़ांच्या आधारावर प्रचार करावा लागेल. राष्ट्राचा, द्रोहाचा हा अतिरेकी मारा मतदारांना सातही टप्प्यांमध्ये आकर्षित करत राहील का, हे टप्प्याटप्प्याने दिसू शकेल.

mahesh.sarlashkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2019 12:18 am

Web Title: bjp preparation for election 2019
Next Stories
1 आघाडीत काँग्रेस पक्ष नेमका कुठे?
2 मोदी, शहा आणि पात्रा
3 गुंतागुंतीची निवडणूक
Just Now!
X