महेश सरलष्कर mahesh.sarlashkar@expressindia.com

करोनाची दुसरी लाट हाताळण्यात आलेल्या अपयशाबाबत केंद्रातील नेतृत्वाचा बचाव करणे अशक्य झाले असताना काँग्रेसचे कथित ‘टूलकिट’ भाजपच्या हाती लागले. त्यावरून काँग्रेसविरोधात आगपाखड करण्यापूर्वी हे (कथित) टूलकिट खरे की बनावट, याची शहानिशा एकाही भाजप नेत्याला करावीशी वाटली नाही..

दर आठवडय़ाला किमान दोनदा तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी देशातील करोनाच्या स्थितीची माहिती देतात. हा आढावा घेताना हे अधिकारी नेहमी सकारात्मक बोलतात. केंद्राकडून राज्यांना कसे आदेश दिले जात आहेत, राज्या-राज्यांमध्ये केंद्रीय पथके जिल्हा स्तरावर कशी मदत करत आहेत, करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत कशी घट होते आहे, ही माहिती आकडेवारीसह दिली जाते. पण दररोज चार हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे, हे मात्र सांगितले जात नाही. भारतात सापडलेला उत्परिवर्तित विषाणू फारसा धोकादायक नाही असे सरकारी तज्ज्ञांकडून सांगितले गेले होते. ही चूक होती, अशी कबुली हे अधिकारी देत नाहीत. आत्ताही लहान मुलांना करोनाचा संसर्ग झाला तर तो तुलनेत सौम्य असेल असा दावा केला जात आहे. पण नजीकच्या भविष्यात हा अंदाज चुकीचा ठरला तर त्याची जबाबदारी हे अधिकारी घेतीलच असे नाही. करोना हा साथरोग नवा असून त्याचा अभ्यास केला जात आहे; नवनवी परिस्थिती उद्भवत असल्याने त्यानुसार सरकारी निर्णयांमध्ये बदल केले जात आहेत, असे कुठल्याही प्रश्नावर एकच साचेबद्ध उत्तर ऐकवले जात आहे. पण हा अधिकाऱ्यांचा युक्तिवाद बिनतोड असल्याने कुठलाही कठीण मुद्दा सोडून दिला जातो. गेले वर्षभर हेच पाहायला मिळाले आहे. या अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचा दबाव असल्याने त्यांनाही कदाचित चौकटीबाहेर जाऊन बोलता येत नसावे. सगळा खटाटोप लक्ष विचलित करण्याचा असेल, तर केंद्रीय नेतृत्वासमोर हे अधिकारीही हतबल होतात.

काँग्रेसचे कथित टूलकिट हाही असाच मुख्य प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या तमाम नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतील समान धागा असा की, काँग्रेसला देशाचे भले झालेले बघवत नाही. परदेशी शक्तींची मदत घेऊन देशाची बदनामी करण्याचा कट काँग्रेसने केलेला आहे. कथित टूलकिटमध्ये मोदींची बदनामी केलेली आहे, कुंभमेळ्याला करोनाचा मोठा प्रसारक म्हटले आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या नेत्यांचा आरोप असा की, ‘काँग्रेस प्रेतांचे राजकारण करत आहे.’ पण काँग्रेसविरोधात आगपाखड करण्यापूर्वी हे कथित टूलकिट खरे की बनावट, याची शहानिशा एकाही भाजप नेत्याला करावीशी वाटली नाही. आताही ते करत नाहीत, कारण ही शहानिशा न करणे ही भाजपच्या काँग्रेसविरोधातील प्रचारासाठी सोयीची बाब ठरते. भाजपच्या पथ्यावर पडणारी दुसरी बाब अशी की, काँग्रेसची विश्वासार्हता संपल्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे अत्यंत सोपे असते. कुठल्याही प्रश्नावरून लोकांची नजर काँग्रेसकडे वळवली की, ‘अपेक्षित’ परिणाम घडवून आणता येतो. मग लोकही भाजपला जाब विचारत नाहीत. भाजप हा राष्ट्रवादी पक्ष असून काँग्रेस हा राष्ट्रविरोधी, असा प्रचार कथित टूलकिटच्या अनुषंगाने केला जात आहे. लोकांनी राष्ट्रविरोधी गटांचे न ऐकता भाजपकडून वा केंद्र सरकारकडून करोनाबाबत दिली गेलेली माहिती ऐकली पाहिजे, असा एक प्रकारे ‘आदेश’ दिलेला आहे. करोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यातच नव्हे, तर तिचा अचूक अंदाज बांधण्यातही केंद्र सरकारला अपयश आल्याचे स्पष्ट झाले. पण त्याची कबुली ही केंद्रातील नेतृत्वासाठी मोठी नामुष्की ठरली असती. त्यापासून कथित टूलकिटने केंद्राला आणि भाजपला अक्षरश: वाचवलेले होते. पण ट्विटरने या प्रकरणात हस्तक्षेप केला. भाजपचे प्रवक्ते सम्बित पात्रा यांनी कथित टूलकिटचा आधार घेत केलेले ट्वीट ‘फेरफार’ करणारे वा ‘दिशाभूल’ करणारे असल्याचा शिक्का ट्विटरने मारला. भाजपच्या नेत्यांचा खोडसाळपणा ट्विटरने उघड केल्यावर थेट केंद्र सरकार या नेत्यांच्या मदतीला धावून आले आणि ट्विटरलाच हा ‘बदनामी’चा शिक्का पुसून टाकण्याचा ‘आदेश’ दिला. जे मुळातच बनावट आहे, त्याचा आधार घेऊन केंद्र सरकारला वाचवण्याचा प्रयत्न झाला; भाजपची ही मेख उघड केली म्हणून ट्विटरला शिक्षा देण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. म्हणजे पुन्हा मूळ मुद्दय़ावरून लक्ष विचलित करण्याचा खेळ खेळला जात आहे!

मूळ मुद्दा करोनाची समस्या हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आहे, त्यासाठी अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. दुसरी लाट येऊ शकेल याची माहिती केंद्रीय नेतृत्वाने लोकांना दिली नाही. उलट, पहिली लाट ओसरल्यावर देशाने करोनावर मात केल्याचा दावा केला. लसमैत्री मोहिमेत लस निर्यात केली गेली. आता लस आयात करण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेला जाणार आहेत. जनुकीय क्रमनिर्धारण प्रकल्पाचे मुख्य सल्लागार डॉ. शाहीद जमील यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशात ‘लसउत्सव’ सुरू केला गेला, पण आधीपासून लसमात्रांसाठी मागणी नोंदणी केली गेली नाही. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी किती लसमात्रा देशाला मिळणार आहेत याची आकडेवारी दिली; पण त्यासाठी मागणी नोंदणी केली का आणि कुठली कंपनी, कुठली लस, किती प्रमाणात आणि केव्हा उपलब्ध करून देणार आहेत, याची सविस्तर माहिती दिली नाही. करोना कृतिगटाचे प्रमुख व्ही. के. पॉल वा केंद्रीय आरोग्य सचिवांकडूनही त्याबद्दल सांगितले गेले नाही. केंद्राचा दावा असा की, राज्यांना लसमात्रा कमी पडू दिलेल्या नाहीत. राज्यांनी लसमात्रा वाया घालवल्यामुळे तुटवडा निर्माण झाला; पण प्रत्येक राज्यामध्ये तुटवडा कसा निर्माण होईल? दिल्लीत एकाच वेळी दीडशे लसीकरण केंद्रे कशी बंद झाली? जमील यांच्या म्हणण्यानुसार, देशात दररोज सुमारे २८ हजार नैसर्गिक मृत्यू होतात. करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात दररोज चार हजार रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन मृत्यूंमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूंची वाढ अत्यल्प ठरते. पण तरीही स्मशानभूमीत वा दफनभूमीत रांगा लागल्या. म्हणजेच सरकारदरबारी झालेल्या करोना मृत्यूच्या नोंदणीपेक्षा कित्येकपटींनी मृत्यू जास्त झाले. किमान पाचपटींनी मृत्यू अधिक झाल्याचे, जमील यांचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात गंगेच्या किनाऱ्यावर ठिकठिकाणी मृतदेह पुरले गेल्याबद्दल केंद्र वा राज्य सरकारने अवाक्षर काढलेले नाही. दिल्लीत मोदींविरोधात फलक लावल्याबद्दल लोकांना अटक मात्र केली गेली.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात झालेला पाहिला. प्रचंड गर्दी झाल्याबद्दल पंतप्रधानांना अचंबित होतानाही पाहिले. पण नंतर करोनाचे रुग्ण आणि मृत्यू इतक्या झपाटय़ाने वाढत गेले की, नाइलाजाने प्रचार थांबवावा लागला. त्यानंतर केंद्रातील नेतृत्व किमान महिनाभर तरी लोकांसमोर आले नाही. त्याआधी दररोज तीन जाहीर प्रचारसभा होत होत्या. शिवाय, विविध संस्था-संघटना आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये भाषणे होत आणि करोना आटोक्यात आणण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’चे कौतुकही होत असे. पण ते अचानक थांबले. तोपर्यंत देशी-परदेशी प्रसारमाध्यमे केंद्रातील नेतृत्वाकडे बोट दाखवायला लागली, त्यांनी जाब विचारायला सुरुवात केली होती. स्वपक्षीयांनीही टीकेचा सूर काढला होता. केंद्रातील नेतृत्वाचा बचाव करणे भाजपच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना अशक्य झाले, त्याच वेळी काँग्रेसचे कथित टूलकिट भाजपच्या नेत्यांच्या हाती लागले आणि गेले आठवडाभर या बनावट टूलकिटच्या आधारे भाजपकडून काँग्रेसला धारेवर धरले जात आहे.

भाजप हल्लाबोल करत असताना काँग्रेसला आक्रमक होऊन केंद्र वा उत्तर प्रदेश सरकारचे वाभाडेही काढता आलेले नाहीत. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या गोटात सामसूम आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी उत्तर प्रदेशात जाऊन क्वचितच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले असेल. काँग्रेसचे अपयश हा भाग वेगळा. पण केंद्रातील नेतृत्वावर सर्व बाजूंनी प्रश्न विचारले जात असताना काँग्रेसच्या नावे बनावट टूलकिट समाजमाध्यमांतून वेगाने फिरवले गेल्याने या कथित टूलकिटबद्दल शंका घेता येतात. स्वत:चा बचाव करण्यासाठी इतकी तकलादू ढाल पुढे करून लोकांचे लक्ष विचलित करावे लागणे, हे केंद्रातील नेतृत्वाचे आणखी एक अपयश म्हणता येऊ शकेल.