21 January 2018

News Flash

भाजप बंडखोरांचे अंतरंग

एका अर्थाने ते मोदींच्या प्रेमात होते. अनौपचारिक गप्पांमध्ये ते मोदींबद्दल भरभरून बोलायचे

मोदींचे समर्थन करणे ही माझी चूक होती,’ अशी प्रांजळ कबुली ते आता देतात. | Updated: December 11, 2017 12:13 AM

नाना पटोले

शत्रुघ्न सिन्हा ते यशवंत सिन्हा व्हाया वरुण गांधी, अरुण शौरी, कीर्ती आझाद, नाना पटोले, डॉ. भोलासिंह अशी भाजपमधील बंडखोरांची मांदियाळी आहे. त्यापैकी भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी तडकाफडकी राजीनामा देत बंडाला प्रारंभ केलाय; पण लोकसभेला दीड वर्षे शिल्लक असतानाच राजीनामा देण्याचे धाडस इतर बंडखोर दाखवतील?

२०१५ चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होते. संसदेतील खासदारांसाठीच्या उपाहारगृहात नेहमीसारखी वर्दळ होती.  तेवढय़ात अचानकपणे किचनच्या दरवाजातून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. ते आले, साधी थाळी घेतली आणि त्याचे २८ रुपयांचे बिल देऊन निघूनही गेले. पंतप्रधान प्रथमच आल्याने ही बातमी होती. त्यांनी ज्या खासदारांसोबत जेवण घेतले, त्या सर्वाना वृत्तवाहिन्यांनी पकडले. ‘मोदींनी आमच्यासोबत भोजन केल्याने आम्ही धन्य झालो..’ वगैरे प्रतिक्रिया त्या खासदारांच्या तोंडातून टपकत होत्या. अपवाद फक्त एकाचा होता. नाना पटोलेंचा. भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार. जन्मजात बंडखोर, पूर्वाश्रमीचे काँग्रेसजन आणि भाजपमध्ये बरेच बरे रुळलेले. मोदींनी भोजन केलेल्या टेबलवर पटोलेसुद्धा होते. स्वाभाविकपणे त्यांनाही वृत्तवाहिन्यांनी पकडले होतेच; पण त्यांची प्रतिक्रिया एकदम हटके होती. ‘जेवताना मोदीजींना देशातील गरिबांची चिंता सतावत होती. एकही भारतीय उपाशी झोपणार नाही, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील.. असे मोदी आम्हाला सांगत होते. गरिबांबद्दलची मोदीजींची कणव पाहून खूप भरून आले,’ अशी प्रतिक्रिया पटोलेंनी दिली. त्या वेळी पंतप्रधान नेमके वृत्तवाहिन्या पाहत होते. त्यांनी पटोलेंची सर्वस्वी वेगळी प्रतिक्रिया पाहिली. पटोलेंनी पकडलेला ‘सेन्स’ अफलातून होता. कदाचित मोदींना तो ‘क्लिक’ झाला असावा आणि लगेचच त्यांना भेटीचा निरोप पाठविला. तेव्हा पटोले सभागृहात होते. तब्बल अर्ध्या तासाचा वेळ मोदींनी त्यांना दिला. नेहमीप्रमाणे मोदी फार बोलले नाहीत, पण पटोलेंचे ऐकून घेत होते. भेट एकदम मस्त झाली होती आणि पटोले खुशीची गाजरे खात होते.

एका अर्थाने ते मोदींच्या प्रेमात होते. अनौपचारिक गप्पांमध्ये ते मोदींबद्दल भरभरून बोलायचे. त्यात इतर मागासवर्ग (ओबीसी) हा मोदींशी जोडणारा धागा असल्याची पक्की खूणगाठ त्यांनी बांधली होती. त्यामुळे पटोले जोशात असायचे. दररोज रात्री वृत्तवाहिन्यांवरील चर्चामध्ये आक्रमकपणे भाजपची बाजू मांडायचे. ‘मोदीजी आपल्याला नक्की मंत्री करणार,’ असे ते जवळच्यांना खात्रीने सांगायचे. विदर्भात अगोदरच दोन मंत्रिपदे (नितीन गडकरी, हंसराज अहीर) आहेत, मुख्यमंत्रिपदही विदर्भाकडेच आहे. मग तिसरे मंत्रिपद विदर्भाला कसे मिळणार, असा प्रश्न त्यांना केला, की म्हणायचे, ‘अरे बघ रे, असल्या मळलेल्या आडाख्यावरून मोदी कधीच जात नाहीत.. नक्की होणार.’ पण मंत्रिमंडळ फेरबदलात अपेक्षेप्रमाणे पटोले नव्हतेच. धुळ्याचे नवखे खासदार डॉ. सुभाष भामरेंना संधी मिळाली आणि तेही चक्क संरक्षण राज्यमंत्रिपद. पटोलेंना भाजपमध्ये बसलेला तो पहिला जबरदस्त धक्का असावा. मोदींबद्दलच्या शंकांचा जन्म तेव्हाच झाला. पटोले हे अतिशय सळसळते आणि उमदे व्यक्तिमत्त्व; पण निराशेने पोखरायला सुरुवात झाली. अशात एक घटना घडली. अधिवेशनादरम्यान मोदी प्रत्येक राज्याच्या भाजप खासदारांशी गप्पा मारतात. अशाच एका बैठकीमध्ये पटोलेंनी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय करण्याची ‘लोकप्रिय’ मागणी केली; पण, ‘अगोदरच आपण मंत्रालयांची संख्या कमी करतोय आणि तुम्ही वाढविण्याची सूचना करताय,’ असे मोदी म्हणाले. पण शेतकरी, विमा योजना, परदेशातील प्रयोग वगैरेवरून पटोलेंची गाडी सुरूच राहिली. ती काही केल्या थांबेना.  शेवटी एक क्षण असा आला, की मोदी चक्क वैतागले आणि म्हणाले, ‘आप अभी चूप बैठीए..’ मोदींचा तो पवित्रा पाहून उपस्थित खासदारांची जवळपास टरकलीच. दुसऱ्या दिवशी सगळीकडे बातम्या होत्या.. पटोलेंचे मोदींनी कान पिरगाळले! पटोले खऱ्या अर्थाने तेव्हा दुखावले. आपला हा व्यक्तिगत अपमान झाल्याचे वाटून त्यांनी तो जिव्हारी लावून घेतला. तेव्हापासून ते भाजप, मोदींपासून हळूहळू दूर होऊ  लागले आणि त्या घुसमटीचा प्रवास शुक्रवारी अखेर थांबला. दीड वर्षे शिल्लक असतानाच त्यांनी खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला; पण हा प्रवास त्यांच्यासाठी फार वेदनादायी होता. ते जवळपास एकटे पडत गेले. अन्य सहकारी खासदार त्यांना टाळू लागले. त्यातच ‘अरेतुरेतला मित्र देवेंद्र’बरोबरही मनभेद होत गेले. त्यांची काही कामे न झाल्याने चिडलेल्या पटोलेंनी सर्वादेखतच फडणवीसांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी हे ‘सुपर सीएम’ झाल्याचे सुनावले होते. त्यातूनच अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचे गोंदियातील कट्टर प्रतिस्पर्धी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबरील भाजपचे गुफ्तगू पाहून ते अधिकच बिथरले. ते स्वत:च्या कोषात गेले. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी घरही बदलले; पण राजकीय प्रवासाची दिशा बदलू शकले नाही. त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला असता; पण असे धाडस पटोलेच करू शकतात. पण शुक्रवारी ते म्हणाले, ‘राजीनामा देणारा मी पहिला असलो तरी शेवटचा नक्कीच नसेन.’

पटोलेंचे म्हणणे कितपत खरे ठरेल माहीत नाही;. पण त्यांच्यासारखेच अस्वस्थ असलेल्या भाजप खासदारांची यादी मोठी आहे. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले शत्रुघ्न सिन्हा, मंत्री मेनका गांधींचे पुत्र वरुण, बिहारमधील दरभंगा येथून तीन वेळा खासदार बनलेले माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद, बेगुसरायचे डॉ. भोलासिंह ही ती नावे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरींची भर आहेच.

यातल्या प्रत्येकाचा स्वतंत्र असा नाराजीनामा आहे. शत्रुघ्न सिन्हा एके काळचे भाजपचे स्टार प्रचारक; पण मोदी, शहांनी त्यांना मंत्रिपद तर दूरच, साधे सौजन्यही न देण्याचं ठरविलंय. इतक्या टोकाच्या सूडबुद्धीने वागण्याचे नेमके कारण सांगता येणार नाही; पण कदाचित शत्रुघ्न सिन्हांची लालकृष्ण अडवाणींबरोबरील अत्यंत घसट आणि मोदींच्या ‘राज्याभिषेका’दरम्यान त्यांनी (अडवाणींच्या वतीने) केलेल्या कारवाया हे कदाचित कारण असू शकते. इतके दिवस ते आडून मोदी, शहा, जेटलींवर प्रहार करायचे; पण आता ते थेट लक्ष्य करतात. ‘वन मॅन शो’, ‘टू मॅन आर्मी’ असे बोचकारे काढतात. वरुण गांधींचेही तसेच. त्यांनाही मोदी-शहांनी खडय़ासारखं बाजूला केलंय; पण ते शत्रुघ्न सिन्हांसारखे उघड बोलत नाहीत; पण ‘समझनेवालों को इशारा काफी होता है..’ असे त्यांचे वर्तन, लेखन आणि बोलणे असते. आई मेनका गांधी मंत्री असल्यामुळे त्यांची कुचंबणा होत असावी. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा अधिक गाजावाजा केल्याची किंमत कदाचित त्यांना चुकवावी लागत असावी; पण त्याच्याही अगोदर शहांनी पक्षाध्यक्ष झाल्याझाल्या त्यांच्याकडून पश्चिम बंगाल भाजपचा प्रभार आणि सरचिटणीसपद काढून घेतले होते. आता तर राजधानीत अशी चर्चा आहे, की पुढील लोकसभेपूर्वी ते काँग्रेसमध्ये जातील. प्रियांका गांधी वढेरा यांच्या पुढाकाराने गांधी घराण्याचे मनोमीलन होऊ  घातलंय. सोनिया गांधी व मेनका गांधी यांच्यातील कडवटपणा राहुल-प्रियांका आणि वरुण या भावाबहिणींमध्ये नसल्याचे सांगितले जाते; पण मेनका गांधी असेपर्यंत वरुण गांधी काँग्रेसमध्ये कितपत परततील, याबद्दल रास्त शंका आहेत.

कीर्ती आझादांचे मात्र मोदी-शहांपेक्षा जेटलींशी अधिक भांडण, तेही दिल्ली क्रिकेट संघटनेतील राजकारणावरून. दिल्ली क्रिकेट संघटनेचे जेटली वर्षांनुवर्षे सर्वेसर्वा. तेथील भ्रष्टाचाराविरुद्ध आझाद आणि माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी कित्येक वर्षांपासून आवाज उठवीत आहेत; पण जेटलींना लक्ष्य करण्यासाठी अरविंद केजरीवालांनी त्या वादात उडी घेतली आणि वातावरण पेटविले. आझादही जेटलींविरुद्ध जाहीररीत्या बोलू लागले. त्यामुळे जेटली इतके संतापले, की आझादांना आवरण्याचा ‘इशारा’च त्यांनी मोदी-शहांना दिला. तेव्हा कुठे आझादांना निलंबित करावे लागले. बेगुसरायचे बंडखोर खासदार डॉ. भोलासिंह हेही राजीनाम्याच्या रांगेत असल्याचे सांगितले जाते. बिहार निवडणुकीपासून त्यांच्या हाती बंडाचा झेंडा आहे. ‘भाजप म्हणजे शहांची टोळी’, ‘मोदींनी पंतप्रधानपदाचा दर्जा घालविला’, ‘कन्हैयाकुमार हा नव्या पिढीचा भगतसिंग आहे’, अशी पक्षाला डिवचणारी विधाने ते दररोज करतात. त्यांनी भाजप सोडल्यातच जमा आहे.

यशवंत सिन्हांच्या दुखण्याचे कारण सर्वविदितच आहे. पहिल्यांदा त्यांना तिकीट नाकारून मुलाला दिले, नंतर राज्यपालपदाच्या आमिषाला चुना लावला आणि शेवटी ब्रिक्स बँकेचा अध्यक्षपदाचा घास जेटलींनी आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन प्रमुख के.व्ही. कामथ यांच्या घशात टाकला. तेव्हापासून सिन्हांची सटकली होतीच. आता तर ते उघडपणे रस्त्यांवर उतरलेत. शौरींचे तसेच काही. मोदी जिंकल्यानंतर शौरींचे नाव अर्थमंत्रिपदासाठी चालू होते. स्वत: शौरीही अनेक वृत्तवाहिन्यांना मोदी सरकारचे आर्थिक धोरण कसे राहील, याबद्दल मुलाखती देत होते; पण माशी कुठे तरी शिंकली आणि जेटली अर्थमंत्री बनले. पत्ता कट झाल्यानंतर शौरी कोषातच गेले. मग दिल्ली व बिहारमधील पराभवानंतर ते एकदम मोदींचे कडवे वैचारिक टीकाकार बनले. ‘मोदींचे समर्थन करणे ही माझी चूक होती,’ अशी प्रांजळ कबुली ते आता देतात.

असे आहे भाजप बंडखोरांचे अंतरंग. काही पडद्यावर, काही विंगेत. काही ‘प्रेक्षकां’मध्ये आहेत; पण ते कोणत्याही क्षणी ‘पडद्या’वर येऊ  शकतात. ही मंडळी दररोज कडवी टीका करतात; पण मोदी-शहा त्यांची दखलसुद्धा घेत नाहीत.  पण खरा प्रश्न हा आहे की, या बंडखोरांचे उपद्रवमूल्य नेमके किती? ते फार नसल्याने भाजप त्यांना भीक घालत नाही; पण लोकसभा जसजशी जवळ येत जाईल, तसे अनेकांच्या नाराजीला धुमारे फुटतील. बघू या.. पटोलेंसारखे धाडस किती जण दाखवितात ते.

First Published on December 11, 2017 12:13 am

Web Title: bjp rebel mp nana patole dare to resign
 1. R
  Raiba
  Dec 13, 2017 at 10:42 am
  ज्या पक्षाच्या जीवावर हे मोठे झाले त्या पक्षाने याना पदे दिली नाही म्हणून फक्त पक्ष सोडणारे हे असे मत्कबी राजकारणी मोदींनी दूर ठेवले हे बरेच केले ...यशवंत सिनहा सारखा भिकार्ड माणूस आजपर्यत कोणी पहिला नसेल
  Reply
  1. S
   Somnath
   Dec 12, 2017 at 12:50 pm
   सुधारण्याचे वारे अंगाला लावून न घेणारे कसे पिसाळल्यागत करतात याची प्रचिती त्यांच्या बुद्धीतून दिसून येतेच.कुलकर्णी साहेब जसे भाजपच्या अंन्तर्गत नाराजीवर लेखणी खरडली तसे धाडस काँग्रेसच्या बाजार बूनघ्या,लाळघोटेपणा व हुजरेगिरी करणाऱ्या तसेच काँग्रेसच्या (गांधी घराण्याच्या प्रेमाने आंधळे) अखंड भक्तीत अक्कल ओसंडून वाहणाऱ्या नेत्यांविषयी करावे.
   Reply
   1. R
    Rajendra Awate
    Dec 11, 2017 at 3:21 pm
    पण मंत्रिमंडळ फेरबदलात अपेक्षेप्रमाणे पटोले नव्हतेच.
    Reply
    1. S
     sudhara
     Dec 11, 2017 at 12:11 pm
     सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम, अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिंन माफ करना भाइयों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला ीवर म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम, सलाम,सबको सलाम, भाइयों और भैनों,सबको सलाम. ------------------मंगेश पाडगांवकर
     Reply
     1. R
      rajendra
      Dec 11, 2017 at 11:22 am
      अशी पत्रकार बाळे किती व कशी दिवास्वप्ने बघतात ते ह्या लेखावरून चांगलेच सिद्ध होत आहे. ह्या बंडखोर लोकांचे एक साधे व सोपे गणित असते , त्यांचा सत्ता वियोग झाल्यामुळे त्यांना अश्या पत्रकारांना हाताशी धरणे अत्यंत निकडीचे असते, व त्यासाठी पत्रकारी बाजारात काही जण आपले दुकान उघडून बसले असतातच मग कोणी कुबेर घ्या, कोणी केतकर घ्या तर कोणी कुल ..!!
      Reply
      1. S
       sanjay telang
       Dec 11, 2017 at 9:54 am
       पक्षातील नाराजांची नाराजी हि पाडाभोवती घुटमळतेय. पण कदाचित हे लोटातील वरिष्ठ पत्रकारांना माहित नाही. ते एवढ्या मोठ्या हेडलाईन देतात कि कित्येकदा वाटतं 'मोदी सरकार' गेलेच आता. धूर असतो तिथे नेहेमी ज्वालामुखी नसतो.
       Reply
       1. उर्मिला.अशोक.शहा
        Dec 11, 2017 at 8:53 am
        वंदे मातरम-आशाळ किल्लेदाराने वाट बघत बसावे फुटीरांना कसे वागवायचे ते भाजप नेत्यांना चांगले माहित आहे. लोकसभा इलेक्शन पूर्वी आणि नंतर हि अनेक जण भाजप मध्ये आले पण म्हणून निष्ठांवंतांना डावलण्याचे उद्योग मोदी शासनात होत नाहीत उलट अश्या कच्च्या मडक्यांचा कसा फायदा करवून घ्यायचा हे भाजप नेत्यांना चांगले ठाऊक आहे भाजप हा कर्मवीरांच्या पक्ष आहे अर्ध्या हळकुंड ने पिवळे झालेल्यांचा नाही. त्याला कदाचित अपवाद म्हणून अडवाणी जोशींचे नाव घेण्यात येईल पण निवृत्ती वायो मर्यादाची लक्ष्मण रेषा कोठे तरी ओढावीच लागेल आणि तितके धाडस भाजप ने दाखविले. शासकीय पक्ष म्हाताऱ्यांचा निवृत्तांचा करून चालणार नाही नवीन तरुणांना स्थान देणे महत्वाचे आहे. आणि आयाराम गयाराम यांची सत्व परीक्षा हि जा ग ते र हो
        Reply
        1. Load More Comments