|| महेश सरलष्कर

गांधी घराण्याशिवाय काँग्रेस पक्ष टिकला तरच या मध्यममार्गी पक्षाबद्दल जनतेत विश्वास निर्माण होऊ शकेल. त्यासाठी काँग्रेसमध्ये ‘नागरी युद्ध’ गरजेचे आहे. ही घरातील लढाई आधी लढून मगच तरुण विजयी नेतृत्वाला भाजपसारख्या सशक्त विरोधकाला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरता येईल..

राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिल्यामुळे गेले महिनाभर असलेले काँग्रेसमधील अनिश्चिततेचे वातावरण संपले आहे. नवा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील असेल, हे स्पष्ट झाल्याने पक्षातील सुभेदारांना स्वत:च्या अस्तित्वासाठी वा नेतृत्वासाठी लढाई लढावी लागणार आहे. त्यात कोण विजयी होईल, हे सांगता येत नाही. पण आता काँग्रेसअंतर्गत लढाईला सुरुवात झाली आहे, हे मात्र खरे!

सोनिया गांधी यांनी काँग्रेसची धुरा सांभाळण्यापूर्वी सीताराम केसरी आणि नरसिंह राव यांनी काँग्रेस ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला होता; पण राजकारणात मुरलेल्या काँग्रेसधुरिणांनी गांधी घराण्याचा आसरा घेतला. केसरी निवर्तले. नरसिंह राव हे माजी पंतप्रधान झाल्यावर याच धुरिणांनी त्यांना आपले मानायलाही नकार दिला. वास्तविक निवृत्तीतून परतलेले हे सुभेदार सह्य़ाद्रीच्या सुभेदारालाही भारी पडले होते. काँग्रेसमधील सुभेदारांना गांधी घराण्यातील प्रमुखालाच आपला राजा म्हणून स्वीकारण्याची सवय असल्याने अन्य सुभेदारांकडे पक्षाचे नेतृत्व दिलेले त्यांना आवडत नाही. सर्व सुभेदार एका रांगेत उभे असलेले आणि गांधी घराणे सिंहासनावर विराजमान झालेले पाहण्याची सवय लागलेली असल्याने गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचे काय होणार, या भीतीनेच सुभेदार कासावीस झालेले असतात. गांधी घराणे काँग्रेसला सोडून जाईल असे त्यांना वाटत नाही आणि त्यांना तशी अपेक्षाही नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर तो कोणी गांभीर्याने घेतला नाही. आठ-पंधरा दिवसांत सगळे व्यवस्थित होईल, सोनिया गांधी या राहुल यांना समजावतील आणि राहुल परत येतील, असे मानले गेले होते; पण तसे झाले नाही.

राहुल गांधी यांनी पत्रामध्ये आपली खंत मांडलेली आहे. सत्ता सोडण्याची कोणाची तयारी नाही. सत्तेचा त्याग न करताच लोक नि:स्वार्थतेची भाषा करतात, असे म्हणत राहुल यांनी काँग्रेसमधील ज्येष्ठांकडे बोट दाखवलेले आहे. या ज्येष्ठांना राज्यसभेत जाऊन बसणे अधिक सोयीस्कर वाटते. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून भाजपशी दोन हात करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये नाही हे दिसलेच! पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात अनेकदा आपण एकटे लढलो, असे राहुल यांनी पत्रात म्हटलेले आहे. त्यांचे हे म्हणणे मात्र तंतोतंत खरे आहे. मोदींच्या विरोधात थेट आरोप करण्याची हिंमत फक्त राहुल गांधी यांनी दाखवली. राफेल प्रकरणात राहुल यांना काँग्रेसच्या सुभेदारांनी पाठिंबा दिलेला नव्हता. उलट, राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल नाराजीच होती. राहुल यांनी तयार केलेल्या चमूला निवडणूक लढवण्याचा अनुभव नव्हता. ते ‘टेक्नोकॅट्र’ होते. जनसामान्यांशी त्यांचा संबंध नव्हता. भाजपच्या रणनीतीचा त्यांना आवाका नव्हता. राहुल यांच्याकडे संघटन कौशल्य नाही. ‘चौकीदार चोर है’सारख्या अवास्तव घोषणाबाजीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले.. अशी अनेक कारणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील अपयशाबद्दल दिली जातात. मग राहुल यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे या सुभेदारांना का वाटत होते? गांधी घराण्याशिवाय काँग्रेस म्हणजे सुभेदारांचा एकमेकांशी आमनासामना आणि त्यात अनेक घायाळ होतील. हे घायाळ होणे सुभेदारांना मान्य नसल्याने गांधी घराण्याचा अनुनय केला जात होता.

जेमतेम दीड वर्षे अध्यक्षपदावर राहिलेल्या राहुल गांधी यांनी आपल्या खांद्यावरील अध्यक्षपदाचे ओझे झिडकारून दिलेले आहे. हे ओझे एकदम कोणा एकाच्या खांद्यावर टाकण्याची, किंबहुना काँग्रेसमधील तरुण पिढीकडे पक्ष सोपवण्याची मानसिक तयारी सुभेदारांनी केलेली नाही. त्यामुळे जुने सुभेदार विरुद्ध नवे सुभेदार असा सामना रंगेल. या आठवडय़ात काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक होणार आहे. त्यात तरुण पिढीकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला गेला, तर काँग्रेसमध्ये ‘रक्तहीन क्रांती’ झाली असे म्हणावे लागेल; पण तशी शक्यता कमीच. कार्यकारिणीमध्ये जुन्या काँग्रेसींचे बहुमत असल्याने ही मंडळी आपल्या स्थानाला धक्का लागू देणार नाहीत. आपले अधिकार सहजपणे कोणीही सोडून देत नाही. त्यामुळेच नव्या अध्यक्षपदासाठी जुनीच नावे पुन:पुन्हा घेतली जात आहेत. राहुल गांधी यांनी जाहीर पत्र लिहिले, त्या दिवशी रात्री ९० वर्षांच्या मोतीलाल वोरा यांचे नाव घेतले गेले; पण वोरा यांनीच ही शक्यता फेटाळली. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली. हे दोघेही पंचाहत्तरीत असून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने एक प्रकारे निवृत्तीतील आयुष्य जगत आहेत. मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्राचे प्रभारी तरी आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे तेही नाही; पण जुन्या मंडळींना हेच बुजुर्ग वादळात अडकलेल्या पक्षाला किनाऱ्यावर नेतील असा दांडगा विश्वास असावा. अन्यथा तलवारीला धार लावलेल्या भाजपचा हल्ला परतवणे सोडाच, तो ढालीवर घेण्याइतकीही ताकद या दोघांकडे नाही. या दोघांकडे राजकारणाचा अनुभव असेल, पण पक्षाला विश्वासार्हता देण्यासाठी खरगे वा शिंदे यांचे नेतृत्व उपयोगाचे नाही हे सांगायला अभ्यासकाची गरज नाही; पण हंगामी अध्यक्ष वा दोन-चार कार्यकारी अध्यक्ष नेमून पक्ष चालवण्याचा अट्टहास केला जाणार नाही, असेही नाही. भाजपमध्येही आता कार्यकारी अध्यक्ष नेमला गेला असला, तरी भाजपमधील प्रत्येकाला माहिती आहे, की सत्ता फक्त मोदी-शहा यांच्याकडेच असते; पण आता काँग्रेसमध्ये खरी सत्ता गांधी घराण्याकडे कायम राहील आणि कार्यकारी अध्यक्ष पक्षाचा गाडा हाकतील असे मानणे गैर ठरेल.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिरदर सिंग यांनी तरुण पिढीकडे नेतृत्व सोपवण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यांनी सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, आर.पी.एन. सिंग अशा चाळिशीतील नेत्यांची नावे जाहीरपणे घेतली आहेत. याचाच अर्थ काँग्रेसमधील बुजुर्ग आणि तरुण नेत्यांमध्ये हळूहळू लढाईला जोर आला आहे. त्यात कार्यकारिणीच्या बैठकीतच रंग भरू लागेल. बुजुर्ग मंडळींकडे हंगामी वा कार्यकारी अध्यक्षपद दिले, तर तरुण नेत्यांना ते त्यांच्याकडून हिसकावून घ्यावे लागेल. राज्या-राज्यांमधील प्रदेश काँग्रेसमधील तरुण पदाधिकाऱ्यांना आपलेसे करावे लागेल. जुन्या मंडळींना राजीनामे देण्यास भाग पाडावे लागेल. कार्यकारिणीतील कित्येक वर्षे लोकसभा निवडणूक न लढवलेल्या सदस्यांना बाजूला करून नवी कार्यकारिणी अस्तित्वात आणावी लागेल. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जुन्यांचा पाडाव करणे कधीच सोपे नसते. काँग्रेसमध्ये तर ते अधिक अवघड! पैशाचे स्रोत कुठून निर्माण होतात, ते कुठे जातात, त्यांना फाटे कसे फुटतात, त्याच्या चाव्या कोणाच्या हातात असतात, याची इत्थंभूत माहिती असलेले मुरलेले काँग्रेसी तरुण नेत्यांना सहजासहजी पक्षाचे नेतृत्व हाती घेऊ देणार नाहीत.

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये ‘नागरी युद्ध’ होणे आता अटळ दिसते. राहुल गांधी यांची मनधरणी करून ‘नागरी युद्ध’ टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो निष्फळ ठरला आहे. आता काँग्रेसींनी ‘प्रियंकाला आणा, काँग्रेस वाचवा’ असे म्हणू नये! गांधी घराण्याशिवाय काँग्रेस पक्ष टिकला, तरच या मध्यममार्गी पक्षाबद्दल विश्वास पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसमध्ये ‘नागरी युद्ध’ गरजेचे आहे. काँग्रेसमधील जुन्या मंडळींशी तरुण नेत्यांनी दोन हात करून त्यांना पळवून लावले पाहिजे. त्यानंतर तरुण नेत्यांमधून एखादे नेतृत्व पक्ष सांभाळण्यास सक्षम होईल. जे काँग्रेस सोडून गेले आहेत, ते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याने ना काँग्रेस वाचेल, ना पक्षाबद्दल विश्वास निर्माण होईल. वास्तविक काँग्रेस सोडून गेलेल्या कोणाही ज्येष्ठांना पक्षात न घेता तरुण नेत्यांनी पक्षाची बांधणी केली, तर काँग्रेस पक्ष नव्याने उभा राहू शकेल. ही काँग्रेसची घरातील लढाई आधी लढून मगच भाजपसारख्या सशक्त विरोधकाला आव्हान देण्यासाठी मैदानात उतरता येईल. हे पाहता राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन काँग्रेसला एक प्रकारे जीवनदान दिले असे म्हणता येईल!

mahesh.sarlashkar@expressindia.com