महेश सरलष्कर

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’च्या विरोधात जेएनयू प्रकरणाचा चलाखीने वापर करून घेतला आहे. पण, केजरीवाल यांनी मैदानात येऊन लढण्याच्या आव्हानाला पूर्ण बगल दिली आहे.

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील (जेएनयूमधील) हिंसाचार हा वैचारिक हल्ला असल्याचे डाव्या विचारांच्या लोकांचे म्हणणे आहे. त्याचा सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे भाजप आणि त्यांच्या ‘परिवारा’कडून प्रतिवाद केला गेलेला नाही. किंबहुना ते त्यांनी जाणीवपूर्वक टाळले आहे. जेएनयूमधील हल्ल्याची घटना तात्कालिक कारणांमुळे झाल्याचे त्यांच्याकडून सातत्याने सांगितले जात आहे. विद्यापीठात शुल्कवाढीचा विषय बरेच दिवस गाजत आहे. त्यासाठी डाव्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलनही केले होते. हे प्रकरण रेंगाळत ठेवले गेले. त्याचा तात्काळ निपटारा करून प्रश्न मार्गी लावला गेला नाही. त्यामुळेच नव्या सहामाहीच्या नोंदणीप्रक्रियेत गोंधळ माजला. डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया बंद पाडण्याचा प्रयत्न केला. दोन गटांत हाणामारी झाली. हे सगळे झाले, पण ‘५ जानेवारीच्या संध्याकाळी झालेला हिंसाचार जेएनयूने कधी पाहिलेला नव्हता’ असे विद्यार्थी सांगतात. या हिंसाचाराला सत्ताधाऱ्यांनी एकप्रकारे पाठीशी घातले. हल्लेखोर कोणत्याही अडथळ्याविना पोलिसांच्या समोर जेएनयूच्या आवारात शिरले आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. हे हल्लेखोर उजव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते, हे विद्यार्थ्यांना-शिक्षकांना, विद्यापीठाच्या प्रशासनाला, पोलिसांना आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना अशा सगळ्यांना माहिती होते. तरीही या हिंसाचारासाठी उजव्या हल्लेखोरांना जबाबदार धरण्याचे पोलिसांनी टाळले. हा घटनाक्रम पाहिला तर, जेएनयूमधील हिंसेचा वापर दिल्लीतील निवडणुकीसाठी चलाखीने करून घेतला गेला असे दिसते.

महाराष्ट्र-झारखंड हरलेल्या भाजपला स्वतचे नाक पुन्हा कापून घ्यायचे नसेल तर दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. दिल्लीत शत्रू समोर दिसत असला तरी त्याचा पाडाव करता येत नाही अशी भाजपची स्थिती झालेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी इंदिरा गांधी स्टेडियमवर पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात शहा यांनी कार्यकर्त्यांना शत्रूचा पाडाव करण्याचा मंत्र दिला होता. दिल्लीच्या निवडणुकीत शत्रू अर्थातच आम आदमी पक्ष (आप) ठरतो. हा शत्रू हाताला लागला असे वाटत असताना निसटून जातो ही बाब भाजपला लक्षात आलेली आहे. त्यामुळे शत्रूला मोकळ्या मदानात आणण्याचे सर्व प्रयत्न भाजप करताना दिसते. या डावपेचात जेएनयूमधील हल्ल्याचा प्याद्याप्रमाणे वापर केला गेला आहे.

मात्र, ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी मोकळ्या मदानात येण्याचे टाळले आहे. ते अजूनही गढीत आहेत. आपल्या शक्तिस्थळांचा योग्य वापर करत त्यांनी मतदारांना ‘आप’ला मत देण्याचे आवाहन केले आहे. हा केजरीवाल यांचा गनिमी कावा आहे. भाजपशी समोरासमोर लढत दिली तर लढाई कठीण होत जाईल. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने विरोधकांच्या तथाकथित महाआघाडीला मदानात येण्यास भाग पाडले होते. त्यामुळे महाआघाडीचा दारुण पराभव झाला. त्याची पुनरावृत्ती दिल्लीत करण्याचा विचार मोदी-शहा करताना दिसतात. ‘आप’ने भाजपवर पहिला हल्ला केला तो केजरीवाल यांच्यासमोर आहेच कोण, असे आव्हान देत. त्याला भाजपने थेट ‘मोदी’ असे उत्तर दिले. पण, केजरीवाल यांनी अशा थेट लढाईपासून अलिप्त राहाणेच पसंत केलेले आहे. त्यांनी निवडणुकीचे स्वरूप मोदी विरुद्ध केजरीवाल असे अजून तरी होऊ दिलेले नाही. केजरीवाल यांनी हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद या मुद्दय़ांच्या विरोधातही लढण्यास नकार दिला आहे. केजरीवाल यांच्या सभांमध्ये, जनसंवादांमध्ये फक्त दिल्लीच्या स्थानिक विकासाचा आणि कल्याणकारी योजनांचा उल्लेख असतो. या परिघाबाहेर केजरीवाल गेलेले नाहीत. हेच त्यांचे बलस्थान आहे आणि ते भाजपला मोडून काढता आलेले नाही. त्यामुळे शत्रूला त्याच्या बलस्थानावरून बाहेर काढण्यासाठी काय उपयोगी पडू शकेल याचा विचार भाजपने केला असल्याचे दिसते. शहा यांनी दिल्लीतील सभांमध्ये अत्यंत जाणीवपूर्वक ‘जेएनयू’चा उल्लेख केलेला आहे. ‘जेएनयू हा डाव्या विचारांचा समूह असून तो राष्ट्रवादाविरोधात आहे’. ‘जेएनयू हा ‘तुकडे तुकडे गँग’चा अड्डा आहे’. ‘या गँगचा कन्हय्याकुमार हा एक सदस्य आहे. या ‘देशद्रोही’ सदस्याला मोदी सरकारने अटक केली, पण केजरीवाल यांच्या हस्तक्षेपामुळे कन्हय्याकुमारला तुरुंगात टाकता आले नाही. आता हीच गँग पुन्हा देशाचे वातावरण बिघडवत आहे. देशाचे तुकडे झाले तर केजरीवाल हेच जबाबदार असतील’, असे युक्तिवाद शहांनी दिल्लीतील प्रत्येक सभांमध्ये केलेले आहेत. कन्हय्याकुमार याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची परवानगी दिल्ली सरकारने नाकारली असल्याचा राग शहांनी भाषणातून काढला. राष्ट्रवाद आणि देशद्रोहाच्या मुद्दय़ावर केजरीवाल यांना उचकवण्याची आखणी भाजपने केली खरी; पण केजरीवाल यांनी असल्या युक्तिवादांना बगल दिलेली आहे.

शिवसेनेला जशी वैचारिक बांधणी नाही, तशी ती केजरीवाल यांच्या ‘आप’लादेखील नाही. ‘आप’ कुठल्याही वैचारिक चौकटीतून निसटून जाऊ शकतो. त्यामुळे त्यांना डाव्यांप्रमाणे पुरोगामी भाषेत बोलण्याची गरज वाटत नाही. अर्थात केजरीवाल यांनी कन्हय्याकुमारचा बचाव करून ‘आप’ कुठे उभा आहे हे दाखवून दिले असले तरी, निवडणूक जिंकण्यासाठी त्याचा केजरीवाल वापर करताना दिसत नाहीत. ते लोकांची भाषा बोलतात. त्यांना रोजच्या जगण्यात काय हवे आहे ते थेट विचारतात. ‘रोटी, कपडा, मकान’च्या बरोबरीने शिक्षण आणि आरोग्यावर बोलतात. त्यातून त्यांनी अजून तरी लोकप्रियता टिकवली आहे. भाजपला त्याविरोधात लढता येत नाही. त्यामुळे भाजपने ‘जेएनयू’च्या माध्यमातून केजरीवाल यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराला उजव्या विचारांच्या संघटना जबाबदार असल्याची कबुली मोदी सरकारने दिलेली नाही. दिल्लीचे पोलीस दल केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. या पोलिसांच्या तपासातदेखील उजव्या विद्यार्थी संघटनांचा उल्लेख नाही. जेएनयू प्रकरणाबाबतचे पोलिसांचे वर्तन संशयास्पद असल्याचे उघड झाले आहे. रविवारी रात्री हिंसाचारानंतर जेएनयूच्या आवारातून पोलिसांच्या देखत लाठय़ाकाठय़ा घेऊन तरुणांचा जथा बाहेर पडला होता; पण पोलिसांनी त्यांना अडवले नाही. जमाव हिंसाचार करत होता, तेव्हाही पोलिसांनी हस्तक्षेप केला नव्हता. त्यानंतर त्याच पोलिसांनी तपास करून डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांवर हिंसाचाराचा ठपका ठेवला. शहांनी शिक्का मारलेल्या तथाकथित ‘तुकडे तुकडे गँग’लाच पोलिसांनी एकप्रकारे ‘हल्लेखोर’ जाहीर केले. पत्रकार परिषदेत पोलिसांचा सगळा भर हिंसेला उजवे नाही, तर डावे विद्यार्थी कारणीभूत असल्याचे ठसवण्यावर होता. केजरीवाल आड आल्यामुळे या तथाकथित गँगला बळ मिळाले असे शहा यांना सुचवायचे असावे.

विधानसभा निवडणुकीत सलग १५ वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसला दिल्लीकरांनी – विशेषत मुस्लिमांनी-  नाकारले होते. मुस्लिमांना ‘आप’चे वावडे नाही. मुस्लीम नेहमीच धोरणीपणाने मतदान करतात. गेल्या वेळी मुस्लीम आणि दलितांनी ‘आप’ला मतदान केले होते. यावेळी त्यांच्यासमोर आप आणि काँग्रेस असे भाजपविरोधातील दोन पर्याय असू शकतात. मुस्लीम मते विभागल्यास त्याचा लाभ भाजपला होऊ शकतो. त्यामुळे केजरीवाल नागरिकत्वाच्या मुद्दय़ावर बोलले वा त्यांनी जेएनयू प्रकरणावर भाष्य केले आणि त्याद्वारे निवडणूक प्रचाराचा केंद्रिबदू राष्ट्रीय मुद्दय़ाकडे वळवला गेला तर भाजपला ‘आप’शी थेट लढत देता येईल. लढाई मोकळ्या मदानावर लढवली जाणार असेल तर भाजप निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरवू शकतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीची सूत्रे सध्या तरी ‘आप’च्या हातात आहेत. ती त्याच्याकडून काढून घेतली की, भाजप निम्मी लढाई जिंकेल. जेएनयू प्रकरणाचा वापर हा त्याचाच भाग आहे असे मानले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. भाजपच्या या सगळ्या गणितांना केजरीवाल गनिमी काव्याने तोंड देताना दिसत आहेत.

mahesh.sarlaskar@expressindia.com