21 November 2017

News Flash

हे कसले ‘इन्सान’?

बाबा रामरहीमच्या ताटाखालचे मांजर बनलेले हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकार हे त्याचे जळजळीत उदाहरण.

संतोष कुलकर्णी | Updated: August 28, 2017 1:20 AM

बाबा रामरहीम व मनोहरलाल खट्टर

बाबांच्या आशीर्वादाने सत्ता आणि सत्तेवरील पक्षाच्या पाठिंब्याने बाबांची (समांतर) सत्ता असा हा चक्रव्यूह पंजाब व हरयाणाचे राजकीय प्राक्तन आहे. ‘स्टेट्स विदिन स्टेट’ झालेल्या या बाबांच्या मागे असलेल्या आंधळ्या भक्तांच्या फौजांनी त्यांच्यापुढे लोटांगण घालण्याची वेळ लाचार राजकारण्यांवर आलीय. बाबा रामरहीमच्या ताटाखालचे मांजर बनलेले हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकार हे त्याचे जळजळीत उदाहरण..

सिरसा हे आपल्याकडील ‘ब’ वर्ग नगरपालिकेसारखे हरयाणा आणि पंजाबच्या सीमेवरील शहर. फेब्रुवारीत झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीचे वार्ताकन करण्यासाठी मी सुरुवात केली होती सिरसापासूनच. का? तर तेथील ‘ बाबा’बद्दल जाम उत्सुकता होती. कारण तो कोणत्याही अँगलने बाबा, संत, साधू नव्हता. त्याचे सत्संग म्हणजे लाखोंचे रॉक शो. अचकट-विचकट कपडे घालून फिरणारा हा बाबा स्वत:ला ‘देवाचा दूत’ मानायचा. प्रतिभावान लेखक, विचारवंत, संशोधक, सच्चा समाजसुधारक, स्वरांचा बादशहा, भ्रष्टाचारविरोधी जननायक, ‘प्रभावशाली लोकसंख्या नियंत्रक’ असा जंगी बायोडेटा घेऊन मिरवायचा.  तो चित्रपट काढायचा, त्यात तो आणि फक्त तोच असायचा. त्याच्यावर बलात्कार, खुनासारखे चार-पाच गुन्हे असतानाही राजकारणी नव्हे, तर नोकरशहा, उद्योगपती, बॉलीवूडची मंडळीही त्याच्या पायावर माथा टेकवायची. बाबाची एवढी महती का तर त्याच्या अनुयायांची अविश्वसनीय संख्या. ते लाखोंच्या संख्येने निश्चितच असतील.

हा बाबा म्हणजे ज्याच्या अटकेवरून हरयाणा आणि पंजाबमधील अभूतपूर्व हिंसाचारात ३६ जणांचा बळी गेला, तो गुरमीतसिंग रामरहीम! डेरा सच्चा सौदाचा सर्वेसर्वा. डेरा म्हणजे आपल्याकडील मठ. सिरसा हे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय. त्या दिवशी तर हजारोंच्या संख्येने आलेल्या बायाबापडय़ांची वर्दळ तिथे होती.  एवढय़ा मोठय़ा जनसमूहावर बाबाने कसे काय गारूड केले असावे, असा प्रश्न मनातून काही जात नव्हता. त्या दिवशी बाबा डेऱ्यातच होता. त्याची पत्रकार परिषद होती. बाबाला किती तरी प्रश्न विचारले. चित्रपटाबद्दल, नवनवीन प्रकल्पांबद्दल, पंजाब निवडणुकीतील पाठिंब्याबाबत.. पण एकानेही त्याच्याविरुद्धच्या बलात्कार आणि खून खटल्याचा प्रश्न विचारला नाही. धारेवर धरण्याचे तर लांबच.  बाबाने सर्वकाही ‘मॅनेज’ केले असणार आणि त्याला हात लावण्याची हिंमत कुणी करणार नसल्याचेच बहुतेकांनी गृहीत धरले असावे.

मात्र, अनपेक्षितपणे शुक्रवारी डेऱ्यातील दोन साध्वींवर बलात्कारप्रकरणी बाबाला पंचकुला न्यायालयाने दोषी ठरवले आणि पाहता पाहता हरयाणा व पंजाबमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. बाबाच्या हिंसक भक्तांचा नंगानाच काबूत आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात ३६ जणांचा जीव गेला. शेकडो जखमी झाले. आपल्याच शिष्यांवर बलात्कार करणाऱ्या बाबासाठी भक्तांच्या बेलगाम टोळक्यांनी केलेला प्रच्छन्न हिंसाचार पाहून सारा देश दिग्मूढ झाला. एका बलात्काऱ्यासाठी एवढा हिंसाचार? स्वत:च्या जिवाची पर्वा नसणारी एवढी आंधळी श्रद्धा कशी काय असू शकते? बाबाच्या भक्तांना ‘प्रेमी’ म्हणतात आणि त्यांचे शिष्यगण जातींचे निर्मूलन करण्यासाठी ‘इन्सान’ असे आडनाव लावतात. मग त्या दिवशी रस्त्यारस्त्यांवर हिंसाचार करणाऱ्या ‘प्रेमीं’मधील ‘इन्सान’ कुठे गेले होते? हे सगळे प्रश्न अनेकांना अस्वस्थ करणारे आहेत.

या पापाचे मुख्य धनी हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकार. बाबाविरोधात निकाल गेल्यास उमटणाऱ्या पडसादांची पूर्ण कल्पना असूनही पंचकुलामध्ये हजारो भक्तांना कसे काय जमू दिले गेले? जमावबंदीचे १४४वे कलम काय फक्त नावापुरते होते? या अक्षम्य हलगर्जीपणामागची दोनच कारणे असावीत. एक तर बाबाची सुटका गृहीत धरली असेल किंवा गावागावांहून आलेल्या झुंडीला अडविण्याचे राजकीय धाडस नसेल. एकीकडे कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान आणि दुसरीकडे राजकीय स्वार्थ. खट्टरांनी दुसऱ्याला पसंती दिली. खट्टरांचे सरकार हे बाबाच्या ताटाखालचे मांजर असल्याचे लपून राहिले नव्हतेच मुळी. किंबहुना मोदीलाट वगैरे ठीक आहे; हरयाणासारख्या ‘राजकीय वाळवंटा’मध्ये २०१४ ला कमळ फुलले होते ते बाबाच्या कृपेनेच. मोदींच्या जोडीला बाबा नसते तर ४ वरून थेट ४७ जागा भाजपला कधीच मिळाल्या नसत्या. त्यामुळेच बाबाच्या एवढय़ा ओझ्याखाली दबलेल्या खट्टरांनी त्याला दुखावण्याचा प्रश्नच नव्हता. झालेही तसेच. बाबाच्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागणार हे अगोदरच जाहीर झाले असताना, निकाल विरोधात गेल्यास भक्तांच्या झुंडी धुडगूस घालणार असल्याची माहिती असतानाही खट्टर शांत राहिले आणि हरयाणाला त्याची किंमत ३६ जणांचा बळी देऊन मोजावी लागली. एवढे होऊनही खट्टर यांची उचलबांगडी करण्यास भाजप तयार नाही. आजचा (सोमवार) शिक्षेचा दिवस शांततेत गेल्यास खट्टरांना अभय मिळालेच म्हणून समजा. त्यामागची राजकीय गणिते पक्की आहेत. एक तर खट्टर बहुसंख्याक जाटांविरोधी जनमताचा चेहरा बनलेत आणि एवढे होऊनही डेरा सच्चा सौदाला दुखावण्याची भाजपची अजिबात तयारी नाही. भाजपचे भवितव्य डेराच्या पाठिंब्याशी निगडित असल्याची पक्की समजूत भाजपने करून घेतलीय. त्यातूनच ज्यांच्या नाकाखाली हरयाणात तीनदा हिंसाचार झाले, त्या खट्टरांना पाठीशी घालण्यावर मोदी-अमित शहा ठाम असल्याचे दिसते आहे. नैतिकता आणि साधनशुचितेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संस्कृती भाजपने केव्हाच मोडीत काढलीय. शुद्ध राजकीय हेतूने खट्टरांना मिळणारे अभय हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणायला हरकत नाही.

या बाबाची आणि भाजपची चुंबाचुंबी २०१३पासून. ३० टक्के जाटांच्या जिवावर राजकारण करणाऱ्या धूर्त भूपिंदरसिंह हूडा यांना खाली खेचण्यासाठी भाजपने बाबाला जाळ्यात ओढले होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये सिरसामध्ये प्रचाराला आलेल्या मोदींनी बाबाच्या ‘पवित्र भूमीला वंदन’ केले होते. भाजपसाठी बाबा एवढे महत्त्वाचे होते, पण भाजपच नव्हे तर सर्वच राजकारण्यांसाठी बाबा ‘अ‍ॅसेट’. आज बाबा भाजपबरोबर असतील; पण यापूर्वी ते काँग्रेसकडे होते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी २००२, २००७ आणि २०१२ मध्ये बाबाच्या ‘सुपर आशीर्वादा’साठी आपले जोडे झिजविलेले आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल असो वा आपल्या बहिणीच्या विजयासाठी बाबाच्या दर्शनास येणाऱ्या सुषमा स्वराज असो वा आज घडाघडा बोलणारे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणजित सूरजेवाला असो, सर्वपक्षीय नेते बाबाच्या दरबारात लोटांगण घालतात. खुद्द बाबाची सून ही काँग्रेसच्या माजी आमदारांची कन्या. हूडा आणि माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला हेही बाबाला दुखावण्याच्या फंदात कधी पडले नाहीत. नाही तर २००२चा खटला २०१७ पर्यंत लांबलाच नसता. बाबाला चुचकारण्याच्या खेळात काँग्रेस माहीर होतीच; पण भाजपने तिला खूप वेगाने मागे टाकलेय एवढाच काय तो फरक.

राजकारण्यांना गर्दीची भूल पडते. बाबाकडे तर बारा महिने चोवीस तास गर्दी. बाबा आता खलनायक झाला असला तरी त्याच्या कथित लोकप्रियतेचे, जनसमूहावर गारूड करण्याच्या विलक्षण ताकतीचे गमक समजून घेतले पाहिजे. बाबाच्या विलक्षण प्रभावाच्या मुळाशी शीख समाजामधील घुसळण आहे. शिखांमधील वरिष्ठ जातींच्या (जट्ट शीख) वर्चस्वाला कंटाळलेल्या दलित शिखांचे बाबा प्रतिनिधित्व करतो. त्याचे जवळपास ८० टक्के शिष्यगण हे शीख आणि हिंदूंमधील दलित समाजातील आहेत. एका अर्थाने कनिष्ठ शिखांमधील जातीय अस्मितेचा ते प्रतीक आहेत. पंजाबात शीख दलितांना आणि हरयाणात हिंदू दलितांना नेता नाही, आवाज नाही, प्रतिनिधित्व नाही. ही पोकळी बाबाने भरून काढलीय. जोडीला डेरा सच्चा सौदाकडून मोठय़ा प्रमाणात सामाजिक कामे चालतात. त्यातून बाबा घराघरांत पोहोचला. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या चमत्काराच्या भाकडकथांना सामान्य माणूस सहज बळी पडतो. पंजाबातील माळवा प्रांत राजकीयदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा. ११७ पैकी ६७ जागा असलेल्या या माळवा प्रांतात तर बाबाची लोकप्रियता अफाट. मग का त्याच्या मागे राजकीय नेते धावणार नाहीत? पंजाब निवडणुकीत बाबाने शेवटच्या क्षणी अकाली दल- भाजपला पाठिंबा दिला. त्याने आम आदमी पक्षाकडे चाललेल्या दलित मतांमध्ये फाटाफूट झाली आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळेच कॅ. अमरिंदर बाबाविरोधात बोलत नाहीत. काँग्रेसनेही बाबाविरोधात ‘ब्र’सुद्धा काढलेला नाही.

अशी ताकत असलेला गुरमीतसिंग हा काही पंजाब, हरयाणातील एकमेव बाबा नाही. डेरा सच्चा खंड आणि बियाँसजवळचा डेरा राधास्वामी हाही प्रभावशाली. पंजाब निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी डेरा राधास्वामीमध्ये थेट मुक्काम केला होता. थोडक्यात काय, तर विशिष्ट जातींचे प्रतिनिधित्व करून मतांची सौदेबाजी करणारे डेरे हे राजकीय प्राक्तन आहे. राजकारणी, नोकरशहा, उद्योगपती यांच्या अभद्र युतीने हे बाबा शक्तिशाली बनलेत. बाबांमुळे सत्ता आणि सत्तेवरील पक्षाच्या पाठिंब्याने बाबांची (समांतर) सत्ता असा हा चक्रव्यूह आहे.  त्यामुळेच डेऱ्यांच्या बुरख्याआडून ते करीत असलेल्या धंद्यांकडे सर्वच जण दुर्लक्ष करीत असल्याचे जळजळीत वास्तव आहे. बाबापुढील लोटांगण घालण्याची ही लाचारी आलीय ती मतपेढीने. स्वार्थी राजकारणाने पोसलेल्या भस्मासुराने असल्या बाबांना जन्म दिलाय.

आसाराम बापू, रामपाल आणि आता रामरहीम ही त्याची भळभळती उदाहरणे. आणखी काही रांगेत असतीलच. आज भाजपचे हात पोळले आहेत, उद्या इतरांचे पोळतील. बाबालोकांच्या चरणी लोटांगण घालणाऱ्या राजकीय नेत्यांनी गुरमीतसिंग प्रकरणातून एवढा जरी धडा घेतला तरी खूप बरे होईल.

First Published on August 28, 2017 1:20 am

Web Title: haryana cm manohar lal khattar relation with baba ram rahim
टॅग Baba Ram Rahim